संविधान - भारताची खरी ओळख
भारतीय राज्यघटना तयार करण्यामागे दोन मुख्य कारणे होती; ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या भारतीय प्रशासनाला कायद्याच्या स्वरूपात एक योग्य दिशा प्रदान करणे व हजारो वर्षे राजेशाहीची सवय असलेल्या भारतीयांमध्ये लोकशाही रुजवणे. मागील ७० वर्षांत भारतासोबतच स्वतंत्र झालेले भारताचे शेजारी (मुख्यत्वे पाकिस्तान, म्यानमार व श्रीलंका आणि सोबतच १९७१ साली तयार झालेला बांगलादेश) अनेक वेळा लोकशाहीपासून दुरावले. तसेच त्यांचे संविधान अनेक वेळा बदलले. हे भारतीय संविधानाचे श्रेष्ठत्वच म्हणावे लागेल की, अनेक धर्म, वंश, परंपरा, भाषा व समुदाय असणारा; विविधतेने नटलेला हा देश या संविधानाने एका धाग्यात सुंदर असा गुंफून ठेवला आहे. भारताच्या आजच्या एकतेसाठी आपल्या संविधान निर्मात्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. तरीही आपणास संविधानासंबंधी जागृततेची आवश्यकता आहे. कारण अगदी या २१ व्या शतकातही कायद्याचा, स्पर्धा परीक्षांचा किंवा पत्रकारितेचा अभ्यास करणारे व्यक्ती सोडून इतर कोणीही आपल्या संविधानात नेमके काय नमूद आहे याची फारशी दखल घेत नाही. प्रस्तावना संविध...









