वटसावित्री

 


वटसावित्रीची कथा आहे मद्र देशाची. प्राचीन भारतातील एक छोटेसे राज्य. या देशाचा राजा होता अश्वपती. त्याला एक कन्या होती. जिचे नाव होते सावित्री. ती रुपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. त्यासाठी ती अनेक ठिकाणी फिरली. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. सत्यवानचा पिता आपले राज्य गमावून बसला होता. म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहात असे.


सत्यवान शूर व रुपवान असला तरी तो अल्पायुषी आहे; हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. सोबतच राजपुत्र असला तरी काही कर्तुत्व नाही की संपत्ती नाही. म्हणून राजा अश्वपती आणि नारदमुनींनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु, सावित्रीने त्यास नकार दिला. त्यांचे लग्न झाले. संसार सुरू झाला. एक वर्ष होऊन गेले.एक दिवस नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला चक्कर आली. त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याचक्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला. सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला.सत्यवानाचे प्राण हरुन ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाला, त्यावेळी सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागली.


यमदेवाने सावित्रीची समजूत घातली. तिला माघारी जाण्यास सांगितले. त्यावेळी सावित्रीने यम देवाची स्तुती करत, स्वतःच्या पती बद्दलच्या भावना व कर्तव्य यांना अतिशय उत्तमरीत्या मांडले. तिच्या वाक् चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने सासऱ्यांना दृष्टी, दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशाप्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती अजरामर झाली.


ज्यादिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे हे महत्व लक्षात घेत वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते.


आजही भारतात अनेक स्त्रिया वटसावित्रीची पूजा करतात. ही कथा मात्र, खूप कमी स्त्रियांना माहित असते. ही कथा जाणून घेत त्यावर विचार केल्यास याचे दोन पैलू दिसतात -


१) आजच्या स्त्री पेक्षा सावित्री किती पुढारलेली होती!!


याचे कारण, आज कितीही शिक्षण घेतले, कितीही पैसा कमावला, तरी मुलींना पूर्णपणे लग्नाचे स्वातंत्र्य मिळत नाही. आई-वडिलांनी घातलेल्या बंधनानुसारच लग्न कर्तव्य पार पाडले जाते. सावित्रीला मात्र होणारा वर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. 

स्वतः ज्ञान व पैशाच्या स्वरूपात आजची स्त्री कितीही सशक्त झाली, तरी तिला होणारा वर स्वतःहून श्रेष्ठच हवा असतो. आपल्याहून दुबळ्या युवकाची जबाबदारी उचलण्यास ती तयार नसते. सावित्रीने मात्र कर्तुत्वहीन व अल्पायुषी सत्यवानाला निवडले. हे करणे आजच्या स्त्रीला जमणार नाही.

यम देवाकडून मिळालेले सर्व वर तिने दुसऱ्यांसाठी खर्च केले. स्वतःसाठी काही नाही मागितले. हे आजच्या स्त्रीला जमेल का??


आता दुसरा पैलू पाहू -

२) आजची स्त्री व सावित्री मध्ये काहीच फरक नाही..


घरातील पुरुषांच्या मतानुसार जी मुलगी वागेल, तिचे आचरण आज योग्य समजले जाते. त्या काळात सुद्धा असेच वातावरण होते. ज्या मुलीला भाऊ नसायचा, त्या मुलीचे लग्न होणे ही कठीण गोष्ट असायची. कारण बहिणीवर लक्ष ठेवणे व तिने गैरमार्गाला लागू नये याची काळजी घेणे, हे भावाचे प्रथम कर्तव्य असायचे. सावित्रीला भाऊ नसल्याने, तिचे लग्न होणे कठीण होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी लग्न करण्यासंबंधी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. 


सावित्रीचे वडील राजा होते. त्यामुळे त्यांची मदत घेत सत्यवानच्या वडिलांना त्यांचे राज्य पुन्हा मिळवून देण्यासाठी सावित्रीला प्रयत्न करता आले असते. किंबहुना सावित्रीच्या वडिलांनी हे स्वतः करायला हवे होते. परंतु, एकदा का मुलीचे लग्न झाले की सासरी तिचे काय होते याच्याशी कर्तव्य नाही ही सामाजिक मानसिकता जशी आज आहे, तशी तेव्हाही होती. संसाराचा गाडा पुरुषानेच ओढायचा याबाबतीत सावित्रीचे आचरण सुद्धा काही वेगळे नव्हते.


आयुष्यात जे काही मिळेल ते वडिलांसाठी, भावासाठी, नवऱ्यासाठी किंवा घरात जो पुरुष असेल त्याच्या स्वाधीन करणे हे स्त्रियांच्या मनात बिंबवले गेले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रत्येक स्त्री; मग ती सावित्री असो की आजची स्त्री, पुरुषांचा प्रथम विचार करते.



जरी मी हे दोन पैलू मांडलेत, तरी या दोन्ही बाजूंना फारसे महत्त्व राहत नाही. 

कारण, पहायला गेले तर वटसावित्री पूजनाला विविध कारणे देत, पाठिंबा दिला जातो. जसे की :

- उपवास करून स्त्रियांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- वडाच्या झाडाखाली त्यांना जास्त प्राणवायू मिळतो. 

- या पूजेने त्यांचा संसार बहरतो. 


पाहायला गेले तर भारतीय स्त्रिया कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उपवास करत असतात. जर एवढाच प्राणवायू मिळत असेल, तर त्यांनी रोज वडाकडे जायला हरकत नाही. परंतु, याला शास्त्रीय आधार नाही. वटसावित्रीची पूजा करणाऱ्या या भारतातच हुंडाबळी, वैवाहिक बलात्कार, मानसिक शोषण, इ अनेक प्रकार आढळतात. पूजा करून सुद्धा या स्त्रियांचे संसार बहरतच नाहीत.


हे कुठेतरी स्त्रियांना सुद्धा माहित आहे. 

तरीही वटसावित्री हा सण स्त्रियांना प्रिय आहे. याचे कारण -

१) छान सजायला मिळते. 

२) मैत्रिणींशी भेटीगाठी घ्यायला कोणी अडवत नाही. 

३) उपवासाच्या निमित्ताने का असेना आराम मिळतो. 

४) मनात कितीही द्वेष असला तरी नवऱ्यावर प्रेम दाखवायला मिळते.

५) सर्वात महत्त्वाचे, सर्वांकडून आदर व सन्मान मिळतो.


ज्या स्त्रियांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, त्यांसाठी हा सण सुद्धा फार महत्त्वाचा नाही. आज अनेक स्त्रिया तोडलेल्या फांदीला गुंडाळे करत, लॅपटॉप वर वडाचा फोटो ठेवून त्याला धागा बांधत किंवा फक्त दुपारच्या जेवणाचा उपवास करत हा सण कसातरी ढकलतात. एका जन्मातच नवरा बायको एकमेकांना एवढे कंटाळलेले असतात की पुन्हा एखाद्या जन्मात सोबत असणे, त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी कल्पना असते.


त्यामुळेच, ज्या दिवशी स्त्रिया हा सण साजरा करण्यास पूर्ण निरुत्साह दाखवतील.

त्या दिवशी सावित्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र व समजूतदार झाली असे समजण्यास हरकत नसेल.


- अमित 



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट