नागपंचमीचे खरे स्वरूप

 



नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातच का? 

नागपंचमीला नागांची पूजा का केली जाते? 

खरंच हा सण नागांंशी निगडित आहे का, की अजून काही कारण आहे?

असे अनेक प्रश्न मला पडायचे. विविध व्यक्तींशी चर्चा करत, विविध पुस्तकांचे वाचन करत व काही प्रमाणात स्वतःच्या तर्काने बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला.


१) नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातच का -


नागपंचमी हा प्रामुख्याने उत्तर भारतातील सण. उत्तर भारतात पावसाळा उशिरा सुरू होतो. जुलै महिन्यापासून पावसाची सुरुवात होत, जुलैच्या अखेरपर्यंत पाऊस व्यवस्थित व सर्वदूर पसरतो. यादरम्यान जास्त पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढू लागते. तेथील पाणी वाढल्याने सापांचे निवास स्थान नष्ट होते. त्यांना जमिनीबाहेर येण्यापलीकडे उपाय नसतो. पावसाळा कमी होताच ते पुन्हा आपल्या बिळांमध्ये निघून जातात. त्यामुळे जास्त पावसाचा हा काळ नागांचे दर्शन सहज असणारा असतो. त्यामुळे नागपंचमी श्रावण महिन्यातच साजरी केली जाते.


२) नागपंचमीला नागांची पूजा का केली जाते -


बैलपोळा व नागपंचमी हे दोन सण सोडले तर हिंदू धर्मात प्राण्यांशी निगडित इतर कोणताही सण नाही. गोमाता दिवस वगैरे आत्ता-आत्ता आलेत, लोकांना नादाला लावायला. पारंपारिक दृष्टिकोनातून पाहता बैलपोळा व नागपंचमी हेच महत्त्वाचे सण आहेत. पहायला गेलं तर बैल व नाग हे दोघे शेतकऱ्यांचे मित्र. आपली संस्कृती ही प्रामुख्याने शेतीवर आधारित अशी राहिली आहे. आजच्या मशीनच्या युगात सुद्धा बैलाशिवाय शेती ही कल्पना आपण करू शकत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या या पिकांना उंदरासारख्या उपद्रवी जीवांपासून वाचवण्यासाठी नाग महत्त्वाचे राहिले आहेत. त्यामुळे भयंकर असले तरी नाग हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. जिथे आदर असतो तिथे प्रार्थना सुद्धा आपसूकच येते. मग ती बैलाची असो अथवा नागाची. आजची नागपंचमी नागांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते.


पण मग नागाशी संबंधित पौराणिक कथांचे काय? त्याचा काही संबंध नाही का? 

तर त्याचे उत्तर पुढील प्रश्नात आहे. 

नागपंचमीच्या सुरुवातीचे खरे कारण..


३) खरंच हा सण नागांशी निगडित आहे का, की अजून काही कारण आहे -


हा सण जरी नागांशी निगडित असला, तरी ते नाग जमिनीवर सरपटणारे प्राणी नसून मनुष्य आहेत. मी कोणत्याही चित्रपटातील कल्पना मांडत नाहीये, ज्यामध्ये नाग आपले रूप बदलतो. मी सामान्य अशा मनुष्याबद्दल बोलतोय.


नाग एक आदिवासी जमात आहे. आज प्रामुख्याने पूर्वोत्तर भारतात या जमातीचे लोक आढळतात. नागालँड हे नाव या जमातीवरूनच पडले. मध्य व उत्तर भारतात सुद्धा अनेक आदिवासी जमातींना नाग या शब्दाशी जोडले गेले होते. महाराष्ट्रातल्या नागपूर या शहराचे प्राचीन नाव फणींद्रपूर. आता हे असले नाव का? तर नागाच्या फण्याशी संबंधित हे नाव त्या जागी राहणाऱ्या अतिशय आक्रमक अशा नाग आदिवासी जमातींना उद्देशून ठेवले गेले होते. एकेकाळी संपूर्ण भारतच या नाग आदिवासींनी आपल्या ताब्यात ठेवला होता. आजच्या दख्खन पासून ते अगदी गंगेच्या मैदानापर्यंत पसरलेल्या जंगलांमध्ये यांचेच राज्य होते. 


त्यानंतर भारतात आगमन झाले आर्यांचे. पाहायला गेले तर आर्य हा शब्द जगभरात सुशिक्षित, समजूतदार व बुद्धिमान अशा व्यक्तींबद्दल उच्चारला जातो. त्यामुळे जगभरात अनेक देश व हिटलर सारखे राज्यकर्ते स्वतःच्या समुदायाला आर्य म्हणवतात. आम्ही इतरांपेक्षा वेगळे व श्रेष्ठ ही समजूत त्यामागे असते. 


भारतात आलेले आर्य अशिक्षीत‌ व हिंसक होते. मध्य आशियातील वातावरणामुळे त्यांना तसे असणे भाग होते. तोपर्यंत भारतात हडप्पा संस्कृतीचे पतन जवळजवळ झाले होते. काही नाममात्र प्रथा-परंपरा शिल्लक होत्या. भारतात असलेले हे नाग आदिवासी दिसायला अतिशय काळे व कुरूप. आर्य मात्र दिसायला अतिशय गोरे, उंच व सुंदर. यांच्या भाषा सुद्धा वेगळ्या. वागणे व चालीरीती वेगळ्या. तरी महत्त्वाची गोष्ट ठरला तो वर्ण म्हणजे रंगच. स्वतः सारखे न दिसणारे हे दोन समुदाय एकमेकांना शत्रू मानू लागले. यांच्यामध्ये अनेक लढाया झाल्या. 


आज आपण पौराणिक कथांमध्ये देव व दानव यांमधील जे युद्ध वाचतो; ते म्हणजे आर्य व नाग आदिवासी यांमधील युद्धे. आर्यांनी आमच्या जमिनीवर राहू नये ही आदिवासींची मागणी तर आदिवासींनी आमच्या नियंत्रणाखाली रहावे हे आर्यांचे धोरण. नाग आदिवासी रानटी असले तरी शूरवीर होते. आर्यांसारखी शस्त्रे नसले तरी त्यांनी महत्त्वपूर्ण लढा दिला. या लढाईला काही अंतच नाही; हे काही आर्यांनी ओळखले. त्यांनी मध्यस्थी करायचे ठरवले. नाग आदिवासींना आदर देत, त्यांना आपल्या समुदायात सामील होण्यास विनंती करण्यात आली. दूध हे आर्य लोकांचे मुख्य पेय. त्यापासून तयार केलेले पक्वान्न नाग आदिवासींना देत त्यांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यात आले. नागांप्रती दाखवलेल्या आदराचा हा दिवस महत्त्वाचा मानला गेला. हे सहकार्य फार काळ टिकले नाही व रंगातील या भेदावरूनच प्रथम वर्णव्यवस्था आली व त्याचे रूपांतर नंतर जातीव्यवस्थेमध्ये झाले.


त्यानंतर ऋग्वेद तयार करण्यास सुरुवात झाली. ऋग्वेदातील किंवा त्यानंतरचेही महत्त्वाचे देव, सुशोभित कपड्यांनी, दागिन्यांनी व आरामदायी अशा ठिकाणी विराजमान झालेले आपल्याला पहायला मिळतात. शंकर मात्र पूर्णपणे वेगळा असा देव. हडप्पा काळातील पशुपती व लिंगयोनी प्रतिकांवर आधारित या देवाचे मूळ भारतातील सांगितले जाते. त्यामुळेच आर्यांसाठी हा देव अनादी व अनंत. हा एकच देव आदिवासी पोशाखात दाखवला जातो. नाग आदिवासी त्यास मानत असल्याने नागाला त्याच्याशी जोडले गेले. लिंगयोनी प्रतीकाला सुद्धा शिवलिंगामध्ये रूपांतरित करण्यात आले.


याचा परिणाम हा की श्रावण म्हणजे शंकराशी संबंधित महिना व त्यात नागांशी संबंधित असा सण नागपंचमी साजरा केला जाऊ लागला. या सर्व गोष्टी काही लोकांच्या पचनी पडतील तर काहींना यामध्ये हिंदूधर्म विरोध दिसेल.

जे काही असेल, आज नाग या प्राण्याची संख्या भारतात कमी होत चालली आहे. 

नागपंचमीला पूजा केला जाणारा हा प्राणी इतर दिवशी मात्र द्वेषाचा बळी पडतो.

त्याचे संवर्धन केले जाणे आज नागपंचमीचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे.



- अमित 







टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट