लग्नव्यवस्था का बरे सुरू झाली!!
२५००० वर्षांपूर्वीचा काळ :
अऊम आज खुश होता. एक खूप मोठी शिकार त्याच्या कळपाला मिळाली होती. त्यासाठी फारसे काही कष्ट सुद्धा करावे लागले नव्हते. आगीच्या निखाऱ्यांवर दुपारपासूनच ते मांस शिजवत ठेवले होते. त्याचा खमंग सुगंध सगळीकडे पसरला होता. अऊम व त्याचे पुरुष सहकारी मांसासोबत खाण्यासाठी फळे व कंदमुळे गोळा करण्यात गुंतले होते. शिकार करण्यासाठी स्त्रियांची भूमिका मुख्य असल्याने त्यांना आराम करण्याची परवानगी होती. संध्याकाळची वेळ झाली. सर्वांनी मिळून खमंग भोजनाचा आस्वाद घेतला. वाद्ये वाजवण्यात आली, नाचगाणी झाली.
आजचा दिवस छान गेला. उद्याचे होईल ते होईल. हा दिवस धुंद होऊन आनंद लुटत संपवण्याची वेळ होती. कळपातील स्त्रियांनी त्यांची झोपण्यासाठी साथ करण्यास साथीदार निवडण्यास सुरुवात केली. शिकार करण्यात स्त्रियांचा वाटा महत्त्वाचा असल्याने, शरीर संबंधासाठी साथीदार निवडण्याची मुभा सुद्धा स्त्रियांकडे होती.
व्यक्तींचे एकमेकांशी कोणतेही नाते नव्हते. कोणीही कोणासोबतही वय किंवा इतर कोणत्याही गोष्टींची काळजी न करता शरीर संबंध ठेवू शकत होते. फक्त अट एकच होती की, दोघांची त्यासाठी परवानगी हवी. त्यामुळेच कळपात कोणत्याही स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला कळपातील प्रत्येक पुरुष स्वतःच्या अपत्यासारखे जपायचा.
प्रत्येकाच्या मनात मात्र कोणीतरी होते. अऊम च्या मनात सुद्धा एक मुलगी होती. आज त्याचे नशीब चांगले होते. तिने त्यालाच निवडले. आजचा दिवस खरच जबरदस्त गेला. आता फक्त प्रेम आणि प्रेमच मिळणार होते.
११००० वर्षांपूर्वीचा काळ :
अमोमत प्रकृतीने अतिशय दुबळा. कळपातील कोणतीही स्त्री त्याला शरीर संबंधासाठी पसंत करत नव्हती. जर सर्व पुरुष संपलेच तर राहिलेल्या स्त्रीसाठी त्याची निवड व्हायची. काही काळापूर्वी या कळपाने एक नवीन संकल्पना शोधून काढली होती.
ती म्हणजे शेती.
या शेतीमुळे, मनुष्याचे मुक्तपणे बागडणे, विश्राम करणे, नाचगाणे करणे खूप कमी झाले. रोज दिवसभर त्याला शेतात काम करावे लागे. यासाठी जमिनीचा एक विशिष्ट तुकडा तो स्वतःसाठी ठरवत असे. काही काळाने जमिनीच्या तुकड्यावर त्याची मालकी प्रस्थापित झाली होती. शिकारीमध्ये स्त्रिया प्रमुख भूमिकेत असल्या तरी, आता निर्माण झालेल्या शेती व्यवस्थेमध्ये पुरुषांची भूमिका मुख्य होती. त्यामुळे जमिनीच्या तुकड्याची मालकी पुरुषाला मिळत असे.
स्वतःच्या मालकीचा हा जमिनीचा तुकडा आपल्याच बाळाला मिळावा हा पुरुषी स्वार्थ पुढे येऊ लागला. अमोमतने या गोष्टीचा फायदा घेतला. जमिनीच्या तुकड्याला योग्य वारस मिळावा यासाठी एका स्त्रीने एका पुरुषासोबतच मूल होईपर्यंत शरीर संबंध ठेवावेत हा करार करण्याची योजना मांडली. पुरुष साथीदार निवडण्याचा स्त्रियांचा अधिकार पूर्णपणे संपला नसला, तरी किमान वर्षभर त्यांना एकाच साथीदारासोबत रहावे लागत असे. त्यामुळेच काही स्त्रिया तरी नक्की अशा राहत ज्यांना अमोमत सारख्या युवकांना सुद्धा स्वीकारावे लागे.
७००० वर्षांपूर्वीचा काळ :
ॲमीयोटससाठी आजचा दिवस खास होता. लहानपणापासूनच त्याने त्याच्या वडिलांकडून शेती संबंधीची सर्व कौशल्ये शिकून घेतली होती. अगदी शेतीची हत्यारे सुद्धा तयार करण्यात तो तरबेज होता. त्यामुळे मुळातच वडिलांकडून मिळालेल्या मोठ्या जमिनीच्या तुकड्याला त्याने स्वकष्टावर फार मोठ्या भागात पसरले होते.
डोंगरापलीकडच्या वस्तीतील असाच एक समृद्ध शेतकरी आज त्याच्या भेटीसाठी येणार होता. त्याच्याकडून शेती बद्दल काही नवीन माहिती मिळेल का किंवा व्यापारामध्ये काही पावले टाकता येतील का, याचा विचार ॲमीयोटस करत होता.
तो व्यक्ती आला. त्याने स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल व शेतीच्या समृद्धीबद्दल सांगितले. परंतु, त्या व्यक्तीला कोणी मुलगा नव्हता. त्यामुळे ही शेती पुढे कोण सांभाळणार, हा प्रश्न त्याला कायम सतावत असे.
त्याची मुलगी अतिशय सुंदर होती. त्याने ॲमीयोटसपुढे करार मांडला, जर त्याच्या मुलीला ॲमीयोटस आयुष्यभरासाठी स्वीकारणार असेल, तर त्याची संपूर्ण शेती तो ॲमीयोटसला देण्यास तयार होता. देवांची शपथ घेऊन करार स्वीकारण्यात आला.
लग्न झाले.
२००० वर्षांपूर्वीचा काळ :
अमित्रजीतला काही गोष्टी खटकत होत्या. ठीक आहे, ती सुंदर आहे, शास्त्राचे ज्ञान आहे, उत्तम गायिका सुद्धा आहे; तरी माझे मन अजूनही तिला स्वीकारण्यास तयार नाही. लग्न एवढ्या लवकर का होतात? अजून मला खूप काही शिकायचे आहे. ती सुद्धा हुशार आहे, ती सुद्धा नक्कीच खूप काही शिकेल. जेव्हा आम्ही मनाने तयार होऊ तेव्हा एकमेकांना नक्कीच स्वीकारू. फक्त शरीरसंबंध हीच एक गोष्ट लग्नासाठी महत्त्वाची का ठरतेय? आणि असेच असेल तर मला हवी ती साथीदार निवडण्याचा अधिकार का नाही?
काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. हा सुभेदाराचा मुलगा, ती सुद्धा सुभेदाराची मुलगी. यांचे लग्न झाले, तर याच्या वडिलांची ताकद वाढेल. हुंड्याच्या स्वरूपात धनसंपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात येईल. याचा अर्थ स्वतःच्या स्वार्थासाठी अमित्रजीतचे वडील त्याचा बळी देत होते. लग्न नावाचा करार होत होता.
स्वातंत्र्याचा व इच्छेचा दरवाजा कायमसाठी बंद होत होता.
३०० वर्षांपूर्वीचा काळ :
ॲट्रेवोरसला ती खूप आवडत होती. तिला सुद्धा तो खूप आवडत होता. तो राणीचा भाऊ आणि ती सुद्धा राजकुमारी. मात्र दोघांच्या राज्यांमध्ये संघर्ष. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करणे हा राजघराण्याचा अपमान ठरला असता.
ॲट्रेवोरस हुशार असला तरी स्वतःच्या बहिणी विरुद्ध जाऊन बंड करण्याची त्याची इच्छा नव्हती. ती मात्र ॲट्रेवोरससाठी कोणतेही पाऊल उचलण्यास तयार होती.
ॲट्रेवोरसच्या बहिणीने तिला समजावले. तिला इतर राज्यांमध्ये एखादा खूप चांगला राजकुमार नक्की मिळेल. लग्न म्हणजे शेवटी करार. तो कोणासोबतही व्यवस्थित निभावता येईल.
तिच्या दृष्टीने मात्र लग्न म्हणजे फक्त एक करार नव्हता.
जर साथ व सोबत दोन जीवांना एकमेकांसोबत द्यायची आहे, तर त्याच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट त्या दोघांनीच ठरवावी. घर व समाज येतोच कुठे?
स्वातंत्र्य, इच्छा व सर्वात महत्त्वाचे म्हणजेच प्रेम.. याशिवाय होणाऱ्या लग्नाची ती कल्पना सुद्धा करू शकत नव्हती. तिच्या वडिलांनी तिला मृत्युदंडाची शिक्षा दिली.
सामाजिक व्यवस्थेविरुद्ध जाण्याचे हे बक्षीस जणू.
तिने सुद्धा हे बक्षीस हसत हसत स्वीकारले. मेल्यानंतरही आपले प्रेम जिवंत राहील याची तिला खात्री होती. तिच्यासाठी लग्न म्हणजे प्रेम व प्रेम म्हणजेच लग्न होते.
पुरुषांनी सुरू केलेल्या करार व्यवस्थेच्या अभेद्य भिंतीला तिने पहिला तडा दिला होता.
वर्ष २०४५ :
अमित घरासमोरील बागेत एक पुस्तक वाचत बसला होता. त्याच्या शेजारी राहणारी एक तरुणी अतिशय आनंदी दिसत होती. ते दृश्य पाहून त्याला छान वाटले.
त्याने विचारले, आज काही खुशखबर??
तिने सांगितले, हो माझा घटस्फोट झाला..!!
अमितला विचित्र वाटले, ही गोष्ट आनंदाचे कारण असू शकते का??
मात्र मनाविरुद्ध एखाद्या करारात राहण्यासाठी तिचे मन तयार नव्हते. लग्न नावाच्या कराराची ही भिंत तिने एका लाथेत तोडून टाकली होती.
अमित ने विचारले, मग आता यापुढे काय??
तिने उत्तर दिले, लग्न नावाचा करार तर नक्कीच नाही.
आता फक्त आणि फक्त प्रेम.
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा