समतेच्या गाथा


 १८६० चा काळ. काशीबाई खूप चिंतेत होती. एकतर जन्माने स्त्री, त्यात विधवा. तरीही मन एका तरुणाशी जोडले गेले. आता मनच ते. कोणीतरी हवे असतेच ना सोबतीला. कोणीतरी हवे असते भावनांना समजून घ्यायला. कोणीतरी हवे असते मनाला आनंद द्यायला. कमी वयातच पतीचा मृत्यू झाल्याने, स्वच्छंदपणे बागडण्याच्या व सर्व आनंदाला उपभोगण्याच्या वयात नशिबी तिरस्कार आला. आता नवऱ्याचा मृत्यू झाला यात काशीबाईची ती काय चूक?? आणि मग या समाजाने काही नियम बनवलेत, तरी मनाला आवर कसा घालायचा?? कोणीतरी आपलं असावं ही गरज नैसर्गिक आहे..

'हे लोकांना कसं समजावून द्यावं??'

'सती गेले असते तर बरं झालं असतं.. हे असलं आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यूच बरा..'

'परंतु, आत्महत्या करण्यासाठी सुद्धा धाडस लागतं.. ते धाडस असतं तर ही वेळ आली असती का??'

(काशीबाईचं मन तिला काही शांत बसू देत नव्हतं..)

'घरच्यांनी, समाजाने व अगदी ज्याला आपला मानून हे शरीर ज्याच्या स्वाधीन केले त्याने सुद्धा आपल्याशी सर्व संबंध तोडलेत.. कोणत्या तोंडाने त्याला जाब विचारावा??'

'एका विधवेकडे असतो हक्क??'

'मरण्याचा तर हक्क आहे.. पण मरायचे तरी कसे; पोटातला हा जीव.. याची काय चूक.'

'याचा जीव घेतला, तर माझे लचके तोडणारा हा समाज आणि माझ्यात काय फरक राहिला??'

(मनाची चलबिचल वाढत चाललेली.. काय करावे कळत नव्हते.)


तोपर्यंत दारात एक तरुण पुरुष आणि स्त्री येऊन उभा राहिले. 

त्यांनी विचारले, 'काशीबाई तुम्हीच का??'

काशीबाई यांना ओळखत नव्हत्या. तिने उलट विचारले, 'तुम्ही कोण??'

त्यांनी थोडक्यात आपला परिचय देऊन काशीबाईला आपल्यासोबत यायला सांगितले.

काशीबाई जातीने ब्राह्मण. पाहायला गेले तर या शूद्र जोडप्याच्या घरी कोणत्याही परिस्थितीत ती गेली नसती..

पण जेव्हा समाजाने माणूस म्हणून जगण्याचा हक्कच हिरावून घेतलाय तर ब्राह्मण जातीचं काय लोणचं घालायचंय?? 

काशीबाई त्या दोघांसोबत एका ठिकाणी गेली..

जिथे विधवा, बलात्कारीत, मूल होत नाही म्हणून घरच्यांनी टाकलेल्या, सासरचा छळ सोसवत नाही म्हणून पळून आलेल्या, बालपणीच अनाथ झालेल्या अशा अनेक प्रकारच्या मुली व स्त्रिया राहत होत्या..

अरे, पण या सर्व एवढ्या आनंदी का आहेत??

तिला कळले, या सर्व स्त्रिया इथे खऱ्या अर्थाने जगत आहेत..

येथे त्यांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आहे.. आपले मत प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे..

हवे ते कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे..

काशीबाईसाठी ही जणू काही वेगळी दुनियाच होती..

संध्याकाळची वेळ झाली, आता देवाला पुजायला हवे..

काशीबाई सोबत ओळख झालेल्या एकीला तिने विचारले, 'तुमी कोणी देवाला पुजत नाय का??'

ती म्हणाली, 'रोज पुजतो आम्ही..'

' बरंय, कंचा देव तुमचा,विठोबा?'

'नाही..'

'खंडोबा?'

'नाही..'

'मग कंचा?'

'आमचा एकच बा.. ज्योतिराव फुले.. ज्योतिबा...'


ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले काशीबाईला येथे घेऊन आले होते. इकडे आल्यावर काशीबाईला या माणसांचे स्त्रियांसाठीचे कार्य कळले. अशा घरात जर आपले मूल वाढले तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल या विचाराने काशीबाईने तिला झालेला मुलगा या घरात राहू शकतो का, हा प्रश्न ज्योतिरावांना केला.

ज्योतीराव व सावित्री या दाम्पत्याने त्या मुलाला फक्त घरात राहण्याची परवानगी नाही दिली, तर सरळ सरळ दत्तक घेतले. त्या काळात विधवेची मुलं अतिशय हीन समजली जात असत. समाज त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करे. या मुलांना जगण्याचा हक्क, कर्तुत्व गाजवण्याचा हक्क व सन्मान मिळवण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्योतिराव फुलेंनी या मुलास दत्तक घेऊन अतिशय उच्च शिक्षित करण्याचे ठरवले. 

मोठा होऊन हा मुलगा -'यशवंत' डॉक्टर झाला..



ज्योतिरावांचं असचं असायचं.. समाजाला काही शिकवत बसायचे नाही. सरळ सरळ उदाहरण प्रस्तुत करायचे. ज्या गोष्टींना लोक घाबरतात, त्या आधी करून दाखवायच्या..

अस्पृश्य जमातीतल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती..

त्यांची वस्ती कायम गावच्या खालच्या भागात असल्याने, सर्व गावाने वापरून झालेले पाणी शेवटी त्यांच्या वाट्याला येई.. हे पाणी बऱ्यापैकी दूषित असत.. ज्यामुळे त्यांना विविध रोग होई.. एका दुष्काळाच्या वर्षात तर वरच्या जातीतील गावकऱ्यांनी अगदी दूषित पाणी सुद्धा खाली जाऊ देण्यास अडथळा निर्माण केला..

मग पाण्याविना काय या माणसांना मरू द्यायचे??

नाही. कळवळा अनेकांच्या मनात होता..

परंतु, ज्योतिरावांनी मात्र अस्पृश्यांना बोलावून आपल्या घराची पाण्याची विहीर त्यांना वापरायला सांगितली. ज्योतिराव शूद्र असले तरी अस्पृश्यांपेक्षा वरच्या जातीचे होते. त्यामुळे, काय करावे हे अस्पृश्यांना कळेना..

ज्योतिबा एका कोपऱ्यात बसले..

'ऊन सोसना.. कायली झाली अंगाची.. ए भिक्या, जरा पाणी काढून आणून दे..'

भिक्याने लगेच पाणी आणून दिले..

ज्योतिबांनी मनसोक्त पाणी पिले..

'बाटलो बाबा एकदाचा.. तुमच्यावानी झालो.. आता तरी पिशीला का नाय पाणी??'

कोणत्याही समुदायाला आपलेसे करण्याची एक वेगळीच कला ज्योतिरावांच्या अंगी होती..



एकदा एक ब्राह्मण मित्र, ज्योतिरावांना म्हणाला, 'हे पोरींना शिकवण्याचं खूळ का बर तुझ्या डोक्यात आलं?? चांगला व्यापार करतोयस, त्यावर जोर दे. पैसा कमव.

शिक्षकच व्हायचं असेल, तर आहे माझी शाळा. इकडे येऊन शिकव. 

पोरींना शिकवायचं म्हणजे, पालथ्या घड्यावर पाणी..'


' असं व्हय.. बरं माझी पोरींची शाळा आणि तुझी पोरांची शाळा.. 

होऊन जाऊदे परीक्षा.. कोणाची कामगिरी चांगली ते कळेल..'

परीक्षा झाली. 

जोतिरावांच्या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागला..

मुलांमध्ये मात्र अनेक जण नापास झालेत..

त्यानंतर एक दिवस त्या मित्राला भेटून ज्योतिराव म्हणालेत,' पुढच्या वर्षी मुलींना सुद्धा शाळेत घे. जरा चांगला रिझल्ट येईल.'



' काय वं जोतिबा.. तुमी देवाला पुजत नाय व्हय..??'

' हातानं चांगलं कार्य घडलं, तर तीच म्हणायची पूजा.. नाहीतर देवाला सोनं वाहून, त्याच्या दुप्पट गरिबांकडून लुटायचं, ही कसली रीत??

असल्यांना देव आपल्या जवळ करंल का??'

'म्हणजे देव असतोय तर..'

'असतोय की.. निर्मिक.. निर्माण करणारा.. ज्याला आपण कोणीच पाहू शकत नाही किंवा ज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही..'

'मग त्यो ब्रह्मा?'

'त्यो देव नाही, भटांचा बाप हाय.. तेनं सांगितलं ब्राह्मण सगळ्यात वर.. आणि ह्या खुळ्यांनी ऐकलं.. देव आपल्याच पोरांमध्ये फूट पाडंल का??'

'भगवद्गीतेचे विचार सर्व मानतात. तुम्हाला पटती का??'

'आरं, एकीकडे तो कृष्ण कर्मयोग सांगतो.. कर्माला महत्व देतो आणि तरी जातीव्यवस्था मात्र काही सोडवत नाही.. आता सगळं कर्माने ठरणार असेल तर जातीव्यवस्थेची गरज हाय का?? फसवा ग्रंथ आहे.. लोकांच्या मनाला भुलवण्यासाठी..'

'आणि मग खंडोबा - विठोबा??'

'ती आरं माणसं होती.. लोकांसाठी झटली.. लोकांनी त्यांना देव केलं.. आणि त्यांनी जे शिकवलं, ते नेमकं विसरलीत..'

'लोक तुम्हाला महात्मा बोलाय लागलीत, लय मोठं झालात तुमी..'

'सोपं आहे ना.. म्हणजे आपण काही करण्याची जबाबदारी संपली.. महात्मा बघून घेईल.. जो माझे विचार समजेल, तो मला 'महात्मा' च्या आधी 'बा' म्हणल..'



' आगं ए सावित्री, चार पानं आणून दे तेवढी..'

' उजव्या बाजूला लखवा मारला, तरी लिहायचा हट्ट काय सोडत नाही.. हे डाव्या हाताने लिहायला शिकलात कधी??'

' शिकायची काय गरज, माझा हात जर माझ्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर माझे स्वतःवरच नियंत्रण नाही म्हणायचे..'

' लोकांना बोलायची आयती संधी मिळाली, देवाधर्माला नाव ठेवतोय.. हे हाल होणार होतं म्हणतात..'

' तुला काय म्हणायचंय..'

' या म्हाताऱ्या माणसाच्या लिखाणाला घाबरणारा देव, जरा भित्राच वाटतोय म्हणायचं..'

(खळखळून हास्य)

' मी मेल्यावर काय ग सावू, हा जो एवढा खटाटोप केला, त्याचं काय होईल??'

' काय होणार म्हणजे? सावित्री जिवंत आहे अजून.. तुम्हाला जायची घाई झालीच आहे, तर जा.. तुम्ही तयार केलेली माणसं काय तुम्हाला मरू देत नाहीत..'


' तरी कधीकधी काळजी वाटते, 

माझी सत्य शोधण्याची महत्वाकांक्षा कोणी समजून घेईल का??

समाजामध्ये समतेचा विचार कधी रुजेल का??

देवाधर्माच्या नावाने अजून किती वर्ष मनुष्याचं शोषण होत राहील??

माझे विचार कधी कोणाच्या लेखणीतून उतरतील, की त्यांना पण मरणच आहे..??'


' काळजी नको..

तुमचे विचार कधीही मरणार नाहीत..

कधीच नाही..'



- अमित 




टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट