नववर्ष
काही गोष्टी न सोडवणाऱ्या असतात,
त्यांत काही आठवणी, काही वस्तू तर कधी काही माणसं ही असतात..
नववर्षाचा गदारोळ मात्र काही नवे स्वीकारायला शिकवतो,
नव्या पर्वात नवक्षितीजाकडे भरारी घ्यायला शिकवतो..
मला ती गाणी सोडवत नाहीत, त्या वाटा सोडवत नाहीत,
त्या गप्पा सोडवत नाहीत आणि त्यातून मिळालेला आनंद ही सोडवत नाही..
मनातील अपेक्षारुपी मोती नवचैतन्याला आजमवायला शिकवतो,
नव्या पर्वात नवक्षितीजाकडे भरारी घ्यायला शिकवतो..
अश्रू साक्ष देतात सर्वच बदल सोपे तर नसतील,
अडखळणारी पावले दर्शवतात हे बदल आवश्यक तर नसतील...
एक अदृश्य हात प्रेमाने डोके कूरवाळत मन शांत करायला शिकवतो,
नव्या पर्वात नवक्षितीजाकडे भरारी घ्यायला शिकवतो..
या आयुष्यरुपी नदीला कधीतरी समुद्रात संपायचेच आहे,
काही जागांना कायमचे सोडत तर काहींना नव्याने भेटायचे आहे..
प्रवाहातील प्रत्येक वळण जगाकडे नव्याने पाहायला शिकवतो,
नव्या पर्वात नवक्षितीजाकडे भरारी घ्यायला शिकवतो...

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा