भारत भाग्यविधाता

 



आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले व २६ जानेवारी १९५० ला या देशाने लोकशाही स्वीकारली. ही स्वीकारण्यामागे अनेक कारणे होती. येथील राजांना परकीय सत्तेपासून भारतीयांचा बचाव करण्यात आलेले अपयश व आधुनिक विचारांनी प्रेरित स्वातंत्र्यवीरांना या देशात ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचे राज्य असावे हे स्वप्न भारतात लोकशाही घेऊन आले. 


'वसुधैव कुटुंबकम' ही आपली परंपरा व अतिथी देवो भव ही आपली सवय. याला अनुसरूनच जगाला आपले कुटुंब मानत फक्त व्यक्तींना महत्त्व न देता संपूर्ण जगभरात असणाऱ्या उच्च विचारांना आपण स्वीकारले. त्यांना आपल्या संविधानात अंतर्भूत केले. 

हेच ते स्वप्न होते जे प्रत्येक वीराने स्वतंत्र मातृभूमीसाठी पाहिलेले. 

आज मात्र चित्र वेगळेच दिसतेय. आम्हीच श्रेष्ठ, आमची संस्कृतीच, श्रेष्ठ आमचेच विचार श्रेष्ठ; हा अहंकार भारताला कुठेतरी मागे घेऊन जातोय. योग्य ते स्वीकारणे व अयोग्याचा पराजय या आपल्या संस्कृती पासून आपण दूर नाही जात आहोत का??


भगतसिंग हे असे नाव आहे; ज्याच्या राष्ट्रकार्याबद्दल कोणास आदर नाही, असे होऊच शकत नाही. परंतु, भगतसिंग बद्दल आपणास काय माहित आहे?? तर या व्यक्तीस त्याच्या क्रांतीकार्याबद्दल फाशी झाली. त्याने कोणाला मारले हे सुद्धा लोकांना माहीत नसते‌ व या सर्व गोष्टींना फारसा अर्थच नाही. 

भगतसिंग चे विचार जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यास खऱ्या अर्थाने आदरांजली वाहणे ठरेल.


'हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन' या संघटनेची मुहूर्तमेढ रामप्रसाद बिस्मिल यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत घातली. ती फक्त स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नाही; तर स्वतंत्र भारतात 'रिपब्लिक' चा अर्थ लोकशाही रुजवण्यासाठी. हे स्वातंत्र्ययोद्धे फक्त स्वातंत्र्यासाठी नाही, तर एका उत्कृष्ट देशाला घडवण्यासाठी लढलेत. 

या नावात भगतसिंग यांनी 'सोशॅलिस्ट' हा शब्द जोडला. याचा अर्थ समाजवाद. 

भारतीय शासनाने लोकांच्या हितासाठी, गरिबांसाठी, समानतेसाठी व ऐक्यासाठी काम करावे ही या शब्दामागील धारणा. त्यांचे हे विचार आपण समजून घेतोय का??


भारतात आज भगतसिंग ना हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून दाखवले जाते. 

भगतसिंग स्वतः धर्माने हिंदू नव्हते, किंबहुना आयुष्याच्या शेवटी त्यांनी स्वतःला नास्तिक घोषित केले होते. त्यांच्या ' मी नास्तिक का आहे' या पुस्तकातून त्यांचे विचार आपणास कळतात. हे पुस्तक वाचण्याचे धैर्य मात्र भारतीयांमध्ये नाही.

भारतात आज गरिबी अत्युच्च स्तरावर आहे. मागील आठवड्यातच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ब्रिटिश काळापेक्षा जास्त असमानता आजच्या भारतात आहे. 

काय हे भगतसिंग ना अपेक्षित होते??

हे चंद्रशेखर आझाद यांना अपेक्षित होते??


स्वातंत्र्यलढा गांधींच्या मार्गदर्शनाखाली चालू होता. लोकांसाठी गांधी जणू दैवत बनले होते. त्याच काळात ICS परीक्षा उत्तीर्ण होऊनही आपल्या पदाचा राजीनामा देत एक युवक या चळवळीत सामील होतो. गांधींचे नेतृत्व पटल्यामुळे त्यांना साथ देत आयुष्याची वीस वर्षे त्यांच्यासोबत ब्रिटिश शासनाविरुद्ध उभा राहतो.

परंतु, असे नाही होत की ज्याला आपण आदर्श मानतो त्याचे सर्वच खरे.

ज्यावेळी या तरुणास असे वाटते की, गांधी कुठेतरी चुकत आहेत त्यावेळी तो त्यांना विरोध ही करतो.

ही व्यक्ती म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. 

देश हा कोणा एका व्यक्तीचा नसून प्रत्येक भारतीयाचा आहे. त्यामुळे फक्त एका व्यक्तीस दैवत न बनवता जे योग्य आहे व बुद्धीला जे पटते त्या मार्गावर चालण्याची हिम्मत दाखवणे म्हणजेच लोकशाही, हे नेताजींनी आपल्या आचरणातून दाखवून दिले.

आज आपण भारतीय काय करतोय??

एका व्यक्तीला दैवत करून ठेवले आहे व त्याने देशाचे किती वाटोळे केले, तरी त्याचा जयजयकार करायचा; ही मानसिक गुलामी आपण स्वीकारली आहे.


सुभाष चंद्र बोस किंवा नंतर जवाहरलाल नेहरू यांमध्ये गांधीजींना विरोध करण्याची शक्ती येण्यामागे कारण म्हणजे गांधीजींचे विचार. भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला आणि त्यामुळेच सत्य व अहिंसा या तत्वांना सर्वतोपरी मानले. भारतीयांना फक्त भावनेच्या भरात वाहत जात देशासाठी कर्तुत्व गाजवणे हीच देशभक्तीची मर्यादा न ठेवता; सत्य काय आहे ते जाणून घेत त्याचा योग्य मार्गाने विरोध करण्याची शक्ती या व्यक्तीने भारतीयांना दिली.

आज याच गांधीचा असत्य पसरवून तिरस्कार केला जातो. 

गांधीमुळे देशाची फाळणी झाली, गांधीने पाकिस्तानला ५५ करोड दिले, गांधी मुळे भगतसिंगना फाशी झाली,इत्यादी अनेक गोष्टी आहेत; ज्या कारणांमुळे गांधीचा तिरस्कार केला जातो. सत्य नेमके काय आहे, हे समजून घेण्याचा आज भारतीय प्रयत्न करत नाहीत. पुढे आलेत ते ५५ करोड व मागे राहिले ते गांधीचे कार्य. असत्यावर चालणारा लोकशाही समाज फार काळ टिकूच शकत नाही व असा देश गांधीला अभिप्रेत नव्हता.


शासकांनी लोकांच्या हितासाठी कामे करावीत व हे त्यांच्याकडून घडत नसेल तर लोकांच्या हातात ती शक्ती आहे की, अशा शासकांना दूर करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

स्वतः एका सुभेदाराचा मुलगा असूनही या बालकाने स्वराज्य निर्माण केले. 

या स्वराज्यात अठरापगड जातींना घेऊन व अगदी दुश्मनांचा धर्म असलेल्या इस्लामचा द्वेष न करता, आपल्या स्वराज्यातील मुसलमान बांधवांना सोबत घेत ही स्वराज्याची नौका मार्गी लावली.

इतिहासात दाखवले जात नाही, मात्र स्वराज्यातीलच उच्च वर्णीयांकडून त्यांना कायम विरोध होत राहिला व अगदी त्यांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केला गेला.

मात्र या सर्व गोष्टींसाठी ते कोणाचा द्वेष करत राहिले नाहीत. 

यांवर चाप बसवण्यासाठी त्यांनी सरदेशमुखी हे पद निर्माण केले व राज्याभिषेकाचे नियोजन आपल्या चतुरस्त्र बुद्धीने व्यवस्थित घडून आणले.

आज भारतातील नेते शिवरायांच्याच नावाचा वापर करत समाजात द्वेष पसरवत आहेत. 

सत्तेसाठी हा द्वेष पसरवणे त्यांची गरज आहे. शिवरायांनी मात्र मुसलमानांना किंवा खालील जातींना जवळ करताना आपली सत्ता जाऊ शकते, ही भीती कधीही मनात नाही ठेवली. राजा असूनही खऱ्या अर्थाने लोकशाही रुजवली. 

आपण मात्र नावाला 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हणतो आणि त्यांच्या विचारांचा क्षणाक्षणाला अपमान करतो.


अत्याचाराची परिसीमा झालेल्या समाजातून वर येत संपूर्ण देशाला योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती ठेवणारी व्यक्तीच लोकशाहीला खऱ्या अर्थाने समजू शकते. 

भारताचे संविधान जर एवढे उत्कृष्ट घडले, तर त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान व त्यांचा अनुभव हे सर्वात मोठे कारण होते.

आज मात्र हे नाव विवादास्पद आहे. 

एक समुदाय त्यांना दैवत मानतो तर दुसरा समुदाय त्यांचा तिरस्कार करतो. 

दैवत मानणारा समुदाय या गर्वात आहे की, असा महान नेता आपल्या समाजातून झाला. हा गर्व करणे आंबेडकरवादी विचार आहे का??

त्यांच्या एवढे शिक्षण, त्यांच्यासारखे ज्ञान, समाजासाठी - देशासाठी केलेले कार्य पुन्हा या समाजात कोणी का करू शकले नाही??

मग हे दैवत मानणे कितपत रास्त ठरते?? जर आंबेडकरांचे विचारच जिवंत राहणार नसतील, तर त्यांच्या जयजयकाराचा काय तो उपयोग??

बाबासाहेबांनी या देशास उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था असणारे संविधान दिले, ज्याची प्रशंसा जगभर होते. समानता, एकता, धर्मनिरपेक्षता, न्याय, इत्यादी उत्तुंग विचारांचा पुरस्कार करणारी ही तत्वे व त्यांना आणणारा हा असामान्य व्यक्ती आजही जगभर वंदनीय आहे.

तरीही एक समुदाय या व्यक्तीचा कायम तिरस्कार करतो. मग देशाचे नाव जगभरात मोठे करणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या देशभक्तीवरच शंका घेऊ नये का??


भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवळजवळ दीडशे वर्षे लढा दिला. मात्र लोकशाही भारताला आयती मिळाली. त्यामुळे भारतीय समाजात लोकशाही तत्वे नेमकी काय आहेत; ना याबद्दल जागरूकता आहे, ना ते असण्यासाठी भारतीयांचा अट्टाहास आहे.

आजही भारतीय गुलामी मानसिकतेत जगत आहेत. त्यामुळेच पूर्वीच्या राजेशाही सारखेच आज प्रत्येक पक्षात घराणेशाही चालते व नेत्यांची मुले खऱ्या अर्थाने लायक आहेत किंवा नाही हे न पाहता आपण त्यांची त्या पदावर नियुक्ती करतो. 

याचे कारण, आपण या महापुरुषांना व त्यांच्या विचारांना नीट समजूनच घेतले नाही.

राज ठाकरे एकदा म्हणालेले, ' आपणच आपल्या महापुरुषांना वाटून घेतले आहे.'

तर हा विचार करण्याची गरज आहे, हे आपण योग्य करतोय का??

समुदाय महत्त्वाचा की देश महत्त्वाचा??

व्यक्ति महत्त्वाची की विचार महत्त्वाचे??

जर या महापुरुषांच्या विचारांचे पालन आपल्याकडून झाले नाही तर हा देश पारतंत्र्यात जाण्यास वेळ लागणार नाही. यासाठी या सर्वांचे लोकशाही बद्दलचे विचार समजून घेणे व ते आचरणात आणणे उत्कृष्ट भारत घडवण्यासाठी आवश्यक आहे.


- अमित 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट