राधाकृष्ण
तो धावत पळतच चाललेला. वचन दिलेलं की वर्षभर कुठेही असलो, तरी हा एक दिवस मी फक्त तुझा असेन. तरी आयुष्यात एवढ्या लोकांची गर्दी होती की, त्या गर्दीतून सावरत आपल्या हक्काच्या माणसाकडे पोहोचेपर्यंत बराच वेळ गेला. त्याच्या उशिरा येण्यामुळे ती थोडीशी नक्कीच रुसली होती.
तिच्याकडे पाहूनच त्याला कळले, आता आपले काही खरे नाही. काय करावे? बासरी वाजवू? नको, आज बासरी ऐकण्याची इच्छा दिसत नाही तिची. काही खायला सुद्धा आणले नाही. आता काय करावे? हा राग शांत कसा करावा?
मनाला धीर देत हलक्या पावलांनी तो तिच्याजवळ गेला..
तिची नजर शून्यात हरवली होती.. जणू एखादा गुढ विचार ती करत होती..
अगदी तिच्याजवळ उभा राहिल्यानंतर सुद्धा तिचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही..
त्याने हलकेच आवाज दिला - राधे..
त्याला पाहताच ती आनंदली.. त्याच्या उशिरा येण्याचा राग मनात होता..
परंतु, ते स्मितहास्य व ती गोड हाक.. यांवर कसे बरे रुसायचे??
तिच्या सर्व दु:खांना वाहून नेणारा तिचा अमृतरुपी झरा तिच्यासमोर उभा होता, तिचा कृष्ण तिच्याजवळ होता..
कृष्ण - मला वाटले की आल्या आल्या पहिले ओरडा मिळेल. माझी वाट पाहत इकडे तिकडे फेऱ्या मारत असशील. आतापर्यंत काही झाडांची पाने व फुले तोडली गेली असतील. माझ्या रागात बिचार्या पाण्यावर दगड पडत असतील. पदराची गुंडाळी झाली असेल आणि केसांना घट्ट आवळून बांधले असेल. पाहतोय तर चित्र वेगळेच.
एवढा काय तो गुढ विचार मनात चाललेला??
राधा - सर्व माहीत असून काहीही माहित नाही हे दाखवण्याची कला फक्त तुलाच ती जमावी. माझ्या मुखातून स्वतःचे कौतुक ऐकण्याची इच्छा आहे की प्रश्नांनी सजलेले अपरिपक्व विचार कसे असतात, हे ऐकण्याचा आनंद घेण्याची इच्छा आहे?
कृष्ण - अनेकांच्या मुखातून कौतुक ऐकत असतो. त्याचे आता काही विशेष वाटत नाही. लोकांच्या मनात व मुखात जे विचार हवे, जे शब्द हवेत ते ऐकायला मिळतच नाहीत. त्यामुळे मनाची तृष्णा भागवण्यासाठी कसातरी धावत पळत इथे पोहोचतो. ऐकायला, समजून घ्यायला व त्यावर स्वतःचे मत प्रदर्शीत करायला.
राधा - बरोबर आहे. मनुष्याला समजावण्यात खरेच खूप कष्ट आहेत. मनुष्याच्या मनात एक, मुखात दुसरेच आणि आचरणात तिसरेच!! कठीण आहे सर्व. या २१ व्या शतकात म्हणायला तुझे भक्त अनेक आहेत, मात्र त्यांच्यात तुझा कोणताच गुण दिसून येत नाही. दरवर्षी तुझ्या भक्तीत आनंद उपभोगत हे सर्व जन्माष्टमी साजरी करतात.
फक्त आनंद उपभोगायचा हेच एक उद्दिष्ट.
कृष्ण - हरकत नाही राधे. त्यांच्या आयुष्यात एवढे दुःख आहे की हा एक दिवस जर त्यांना आनंद देत असेल तर तो साजरा करण्यास हरकत नाही.
राधा - केशवा, आनंद उपभोगण्यास काहीच हरकत नाही. परंतु, आपण नेमके काय करतोय याचे जरा तरी भान असावे. जन्माष्टमी आली आणि सर्वांनी उपवास धरला. आता हा उपवास नेमका का धरायचा?
कोणीही विचार करत नाही. तरुणांच्या मनात तर मी उपवास ठेवला तर मी काहीतरी मोठे कार्य केले, ही भावना येतेय. कुरूक्षेत्रावर अहंकाराचा नाश करणारा तु असे भक्त कसे बरे सहन करतोस?
कृष्ण - ते बिचारे भोळे आहेत. तू सांग. का धरायचा हा उपवास?
राधा - अच्छा, आता माझी परीक्षा घेतली जाणार तर. ठीक आहे. तुझा जन्म प्रतीक आहे, सत्याचा असत्यावर विजय होण्याची सुरुवात असण्याचा. वाईटाच्या पापाचा घडा भरला. आता तो फोडण्यासाठी तू दाखल झालास. त्याचप्रमाणे मनुष्याने आयुष्यातील अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा ज्या त्याला मोह व अहंकाराकडे घेऊन जाऊ शकतील. अन्न त्याग ही त्यापैकीच एक गोष्ट. मनावर संयम आणण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते.
कृष्ण - वाह!! खूपच सुरेख उत्तर दिलेस. परंतु, मला सांग; अन्न त्याग केल्याशिवाय या गोष्टी साध्य करणे शक्य नाही का?
राधा - निश्चितच शक्य आहे. परंतु, जर अन्न त्यागाने ती गोष्ट साध्य होत असेल; तर ते प्रयोगात आणण्यास काय हरकत आहे?
कृष्ण - हरकत ही आहे की अन्नत्यागाने ती गोष्ट साध्य होते, हा गैरसमज आहे. जर असे असते तर प्रत्येक गरीब अत्यंत पूजनीय असता. आज केला जाणार हा उपवास, मनुष्याला नवनव्या मोहाकडे आकर्षित करत आहे. मनावरील संयम व मनातील शांतता या दोन्ही गोष्टींना या प्रकारचा उपवास तिलांजली देत आहे. असत्य व राक्षसी प्रवृत्ती प्रबळ होत आहे.
राधा - याबाबतीत तु सर्वांना ग्राह्य धरू शकत नाहीस. काही नक्कीच असे असतील, जे खऱ्या अर्थाने उपवासातून त्याग शिकत असतील. मानसिक शांतता मिळवत असतील. चैतन्य त्यांच्यात ओसंडून वाहत असेल.
कृष्ण - जर असे कोणी असेल, तर त्यांचे मन एवढे परिपक्व झाले आहे; की त्यांना उपवास करण्याची आता गरज भासत नसावी. हे असे लोक नेमके कुठे आहेत, कळत नाही. घरातील व्यक्तींविरुद्धच्या द्वेषापासून ते समाज आणि इतर संस्कृतीच्या द्वेषापर्यंत पोहोचलेले माझे भक्त मी शिकवलेलं प्रेम पूर्णपणे विसरून गेले आहेत. अगदी माझ्या प्रेमाच्या व्याख्येमध्ये सुद्धा त्यांनी भलतेच विचार आणले आहेत.
राधा - प्रेमात विचार कोणतेही असो, ते व्यक्तीला समृद्धच करते; नाही का?
कृष्ण - नाही राधा. प्रेम विचारी हवे. त्यात समंजसपणा हवा. एकमेकांवर प्रेम करणारे आजचे तरुण, छोट्या-छोट्या कारणांनी मोठी भांडणे करतात. या भांडणांना ते सामान्य मानतात. एकमेकांवर संशय घेणे, एकमेकांचा अनादर करणे व एकमेकांच्या प्रगतीला विरोध करणे ही प्रवृत्ती असणारे, आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत असे जेव्हा बोलतात; तेव्हा खरेच हसू येते.
राधा - बरोबर आहे तुझं. लग्न झाल्यावर सुद्धा प्रेमरूपी समानता कुठे दिसून येते? तू नाही - तुम्हीच म्हणायचं, पाया पडायचं, अर्धांगिनीने सर्व सेवा करण्याचे ओझे वहायचे आणि पुरुषाने संसाररुपी गाडा ढकलण्याची कसरत करायची. गोष्टी वाटून घेतल्या, आदर सन्मान वाटून घेतले आणि त्रास मात्र वाढवून घेतला.
कृष्ण - या सर्व गोष्टींपलीकडील आपले प्रेम हे समजून घेण्यास हे तयार नाहीत. त्यांना फक्त बासरी ची रिंगटोन आणि वॉलपेपर वर आपले फोटो ठेवून वाटते की हे आपल्यासारखे झाले आहेत. बरं त्यात इतर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा तिरस्कार सुद्धा सामील झालाच.
राधा - मला सांगताना सुद्धा हसू येतेय, जर एखादा मुलगा एकाच वेळी अनेक मुलींसोबत प्रेमाचे नाटक करत असेल तर त्याला कृष्ण समजले जाते!!!
काय बोलणार आता यावर?
कृष्ण - हरकत नाही. परंतु, मी स्वीकारले तसे ज्या मुलींवर अन्याय झालाय त्यांना तुम्ही सुद्धा स्वीकारा. तेव्हा मात्र आजचे तरुण मुलगी अगदी पवित्र असावी ही अपेक्षा ठेवतात. कठीण आहे सर्व.
राधा - तुझ्यासारखेच अनेक माखनचोर सुद्धा आज पाहायला मिळतात. त्या गोष्टीने घेतलेले स्पर्धेचे स्वरूप मात्र जरा खटकते.
कृष्ण - मला तर अक्षरशः त्रास होतो. आम्ही ज्याप्रमाणे काळजीपूर्वक थर लावायचो, त्याचप्रमाणे उतरताना सुद्धा इतर कोणाचीही मदत न घेता काळजीपूर्वक उतरायचो. ठीक आहे, करू देत यांना स्पर्धा. परंतु मग स्पर्धेत कोण किती काळजीपूर्वक उतरतो ही गोष्ट सुद्धा अंतर्भूत व्हावी. दरवर्षी इतके गोविंदा जखमी होतात, छोट्या छोट्या मुलांचा जीव जातो. हे सर्व आमच्या बाबतीत घडायचे नाही. वेदना होतात अशा वेळी. अगदी या गोष्टीला सुद्धा यांनी पैशांमध्ये मोजायला सुरुवात केली आहे. जिथे जास्त पैसा, ती स्पर्धा जास्त प्रसिद्ध. धार्मिकता राहिलीच कुठे?
राधा - आता तर अश्लील नृत्ये आणि मादक पेयांनी या स्पर्धेची सोबत करण्यास सुरुवात केली आहे. हे असे तरुण संस्कृती जपण्याचा दावा करतात, तेव्हा हसायलाच येते. पोटात मदीरा आणि तोंडात संस्कृती जिथे दिसेल, ती खरी राक्षसी प्रवृत्ती.
कृष्ण - हे कलयुग आहे राधे. येथे राक्षसी प्रवृत्ती सरळ सरळ समोर येत नाही. धार्मिकतेचा मुखवटा तोंडावर लावूनच ती समाजात वावरते. जिथे धार्मिकता अधिक तिथे लोकांनी खऱ्या अर्थाने सावध राहणे गरजेचे आहे.
राधा - जिथे योग्य- अयोग्य ओळखण्यात मनुष्य कमी पडतो, तिथे तू त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
कृष्ण - मी त्यांच्या विचारांमध्ये आहे. हे विचार त्यांना काय योग्य हे सतत सांगत असतात. परंतु, त्यांनी ते आचरणात आणावे याबाबत मी काहीही करू शकत नाही. प्लास्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाची मोठी ठेच मनुष्याला लागली आहे. त्यांना त्याचा तोटा माहित आहे. तरी सणासुदीच्या दिवसात नेमकं यांना प्लास्टिकच्या गोष्टीच जास्त वापरायच्या असतात. एका दिवसात अमाप कचरा वाढतो. गणेशोत्सवात मोठ्या मुर्त्या तयार करण्याची ईर्षा यांच्यामध्ये येते. ईर्षा वाढवणारी गोष्ट धार्मिक असू शकते का??
राधा - मुळीच नाही. अधार्मिकता एक वेळ सहन करण्यायोग्य असते. परंतु याच काळात राक्षसी प्रवृत्तीचे अधर्मी लोक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुद्दाम लोकांना सणासुदीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवणे, बनावट मिठाई विकणे; देवाचा, धर्माचा व सणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेणे हे वाढत चालले आहे.
कृष्ण - कठीणच आहे सर्व. परंतु, तुझे गुढ विचार एका वेगळ्या समस्येसंबंधी होते, नाही का?
राधा - कृष्ण व राधा या नावांची ज्या ठिकाणी पूजा होते, जिथे प्रेम, आदर-सन्मान यांची गंगा वहायला हवी, जिथे गुणांनी व विचारांनी नवी उंची गाठायला हवी, एक आदर्श समाज घडायला हवा; तिथे आज एकाच दिवसात अनेक मुलींवर व महिलांवर अनन्वित अत्याचार झाला. त्याचे स्वरूप वेगवेगळे होते. काही ठिकाणी बलात्कार, काही ठिकाणी मारहाण व शिवीगाळ, काही ठिकाणी छेडछाड तर काही ठिकाणी भेदभाव करत प्रगतीची दारे बंद करण्यात आली. या गोष्टी अंमलात आणणारे पुरुष आपलेच भक्त होते हे विशेष. आपण समजावण्यात कमी पडलो का कान्हा?
कृष्ण - या जगाची लीला विचित्र आहे राधे. येथे गोष्टी कोणाच्याच नियंत्रणात नाहीत. देव सर्व पाहून घेईल म्हणून जबाबदारी झटकणाऱ्या मनुष्याला, मी आधीच सांगून ठेवले आहे की, तू सुद्धा माझेच रूप आहेस. याचा अर्थ जबाबदारी झटकणे हा पर्याय तुझ्यासमोर नाही. एखाद्यावर अवलंबून राहणे ही गोष्ट तुला शोभत नाही. तुझ्या आयुष्यात जे घडेल याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस, माझ्या हातात काहीच नाही.
राधा - मनुष्याने मुळात देव या संकल्पनेला नीट समजूनच घेतले नाही. त्यांना कायम चमत्कारांना महत्त्व द्यावेसे वाटले. हिंसेला महत्व द्यावेसे वाटले. प्रेम शिकण्याची व स्वीकारण्याची प्रवृत्ती त्यांना दाखवताच आली नाही. या अशा समाजाचे नेमके काय होईल असे वाटते?
कृष्ण - चिंता करू नको राधे. पतन व पुनर्जनन हा निसर्गाचा नियम आहे. धार्मिकतेचा मुखवटा लावलेली राक्षसी प्रवृत्ती चांगलीच प्रबळ झाली आहे. ती या समाजाचे पतन घडवून आणेल हे निश्चित. त्यानंतर होईल पुनर्स्थापना, योग्य विचारांची.
राधा - हा निसर्ग नियम असला तरी यावेळी गोष्टी फारच बिघडल्या आहेत. अगदी निसर्गाची सुद्धा विल्हेवाट लावण्यात मनुष्य खूप पुढे पोहोचलाय. कदाचित हा सर्वनाश ठरू नये.
कृष्ण - काळजी नसावी. या अंधकारात योग्य विचारांनी प्रकाशाचा छोटासा किरण तेज धारण करत आहे. मला खऱ्या अर्थाने समजून घेणारे काही मनुष्य नक्कीच आहेत. मी पूर्णपणे संपलेलो नाही.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा