मनुस्मृति दहन का झाले??
अस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः पुरुषैः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे ॥ २ ॥
दिवसा किंवा रात्री स्त्रीला एकटी सोडू नये. त्या विषयाला आसक्त होऊ शकतात (आनंद देणाऱ्या गोष्टींच्या व्यसनी होऊ शकतात), त्यामुळे त्यांना नियंत्रणात ठेवावे.
स्वभाव एष नारीणां नराणामिह दूषणम्।
अतोऽर्थान्न प्रमाद्यन्ति प्रमदासु विपश्चित: ||२|२१३||
पुरुषांना कामवासनेसाठी उद्युक्त करणे हा स्त्रीचा स्वभाव असतो. त्यामुळे विद्वान पुरुष स्त्रियांपासून दूर राहतात.
धर्मोपदेशं दर्पेण विप्राणामस्य कुर्वतः ।
तप्तमासेचयेत् तैलं वक्त्रे श्रोत्रे च पार्थिवः ॥ २७२ ॥
जर शुद्रांनी ब्राह्मणांना त्यांची कर्तव्ये सांगण्याचा अहंकार दाखवला तर राजाने उकळते तेल त्यांच्या तोंडात ओतायला हवे.
दिवाकीर्तिमुदक्यां च पतितं सूतिकां तथा ।
शवं तत्स्पृष्टिनं चैव स्पृष्ट्वा स्नानेन शुध्यति ॥ ८४ ॥
जर चांडाळांनी (खालच्या जातीच्या व्यक्तींनी), मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीने, अस्पृश्यांनी, नुकतेच जिला मूल झाले आहे अशा स्त्रीने किंवा मृत शरीराने ब्राह्मणांना स्पर्श केल्यास त्यांनी अंघोळ केल्यासच ते शुद्ध होतील.
अशा प्रकारचे अनेक श्लोक असलेली मनुस्मृती २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे जाळण्यात आली.
बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे आंबेडकरांचे सहकारी मनुस्मृती जाळताना म्हणाले की, 'अशा प्रकारच्या विचारांना हिंदू धर्मात स्थान असल्यानेच समाज म्हणून आपली अधोगती झाली. मी ब्राह्मण असलो तरी अशा क्रूर व अन्यायकारक विचारांना माझा कायम विरोध राहील.'
मनुस्मृति जाळणे ही क्रिया फक्त ते पुस्तक जाळण्यासंबंधी नव्हती; तर तो एक प्रतिकात्मक लढा होता ज्याद्वारे हे दर्शवायचे होते की या प्रकारच्या नियमांना व प्रथांना आम्ही यापुढे मानणार नाही.
आजच्या हिंदू संस्कृतीची सुरुवात वेदिक काळापासून झाली. सर्वप्रथम रचण्यात आला तो ऋग्वेद. त्यानंतर सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद हे वेद सुद्धा रचण्यात आले. वेदिक काळात वर्णव्यवस्थेला मान्यता होती. वर्ण हा शब्द कार्यासंबंधी होता मात्र तो रंगावरूनच तयार झाला होता. जे रंगाने गोरे होते, त्यांना मानाची कामे देण्यात आली होती व रंगाने काळे असणाऱ्यांना हलक्या दर्जाची किंवा खालची कामे देण्यात आली होती. कारण बाहेरून भारतात येऊन भारतातील मुळच्या काळ्या आदिवासी लोकांवर हुकूमत गाजवत आर्य मानल्या जाणाऱ्या या गोऱ्या लोकांनी वेदिक समाज तयार केला.
अगदी तरीही वर्णव्यवस्था क्रूर मानली जात नसे. कारण या व्यवस्थेत आपल्या कर्तुत्वाने आपण आपला वर्ण बदलण्याची व्यवस्था होती. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा सैनिक किंवा शिक्षक होऊ शकत होता. या व्यवस्थेत तोटा उच्च वर्णीयांचा होता. जर त्यांची मुलं कर्तुत्ववान नसतील, तर अशा मुलांना घरी बसून राहावे लागे; अथवा हलक्या दर्जाची कामे स्वीकारावी लागे.
त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात ऋग्वेदात अनेक बदल करण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ऋग्वेदात दहावा अध्याय जोडणे होय. ऋग्वेदातील अध्यायांना मंडल असे म्हणतात. या दहाव्या मंडलात पुरुष सूक्त लिहिले गेले.
ज्यानूसार,
ब्राह्मण - पुरुषाच्या तोंडातून बाहेर पडले.
क्षत्रिय - पुरुषाच्या दंडातून बाहेर पडले.
वैश्य - पुरुषाच्या पोटातून बाहेर पडले.
शूद्र - पुरुषाच्या पायातून बाहेर पडले.
एकूणच मानव आपल्या तोंडाला जास्त महत्त्व देतो व पायांना कमी. त्याप्रमाणे, ब्राह्मण महत्त्वाचे मानले गेले व इतर वर्ण हलक्या दर्जाचे मानले जाऊ लागले.
त्यानंतर ब्राह्मणे व त्यासारखे इतर ग्रंथ लिहिले गेले.
या ग्रंथांनी पुरुषसुक्ताला महत्त्व देत वर्ण व्यवस्थेला एवढे कठोर केले की, ती जातीव्यवस्थेमध्ये बदलली गेली.
जातीव्यवस्थेनुसार आता ज्या जातीमध्ये एखाद्या मनुष्याने जन्म घेतला आहे; त्याला तेच काम करणे भाग होते. आता त्याच्या कर्तुत्वाला महत्त्व राहिले नव्हते. ब्राह्मणांनी या प्रकारे स्वतःसाठी एक जबरदस्त आरक्षण तयार करून घेतले होते. या आरक्षणामुळे खालच्या जातींना हजारो वर्षे स्वतःचे कर्तुत्व दाखविण्यापासून रोखण्यात आले.
या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी बौद्ध, जैन व आजीवक यांसारखे पंथ तयार झालेत. या पंथांविरुद्ध लढा उभारण्यासाठी वैदिक धर्म अजून कठोर झाला व वैदिक विचारांविरुद्ध वागणाऱ्यांना बहिष्कृत केले जाऊ लागले. या बहिष्कृतांची शास्त्रमान्य नसलेली वेगळी अशी जात तयार झाली, जिला अस्पृश्य मानले गेले.
आता समस्या अशी होती की,
अस्पृश्यता या आधीच्या कोणत्याच ग्रंथात लिहिली गेली नव्हती किंवा त्यासारखे काही आचरण असावे याबद्दलही लिखित नव्हते. त्यामुळे या समुदायापासून बंडखोरी होण्याचा धोका शक्य होता. सोबतच बौद्ध विचारांचा आधार घेत स्त्रिया स्वतःच्या हक्कांबद्दल बोलू लागल्या होत्या.
ब्राह्मण व क्षत्रियांमध्ये कोण महत्त्वाचा, हा वाद सतत सुरू असायचा. बौद्ध विचारांना महत्त्व देत अनेक राजांनी वैदिक पंडितांचे महत्त्व कमी केले होते. त्यामुळे राजांना व क्षत्रियांना वठणीवर आणण्यासाठीचे लिखाण आवश्यक होते.
या सर्व समस्यांचा उपाय म्हणजेच मनुस्मृतीचे लिखाण सुरू झाले.
आज मान्यता अशी आहे की, मनू नावाच्या एका संताने या स्मृतीचे लिखाण केले.
मात्र त्या काळात क्षत्रिय एवढे शक्तिशाली होते की, त्यांनी ब्राह्मणांचे ऐकणे अनिवार्य करणारे लिखाण करणे स्फोटक ठरले असते. अशा संताला देहदंडच झाला असता.
सर्वच विचार एकदम मांडणे शक्य नव्हते.
त्यामुळे सुरुवातीला स्त्रियांना वठणीवर आणणारे श्लोक रचले गेलेत. जे सर्व जातीच्या पुरुषांना मान्य झाले. पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने हे लिखाण सहज खपले. या ग्रंथाला मान्यता मिळाली. त्यानंतर ब्राह्मणांच्या पुढील पिढ्या हळूहळू त्यात मागासवर्गाविरुद्ध व राज्यकर्त्यांनी ब्राह्मणांना महत्त्व देणारे श्लोक रचत गेल्या. या ग्रंथाला पूर्वीच मान्यता मिळाल्याने नवीन रचल्या जाणाऱ्या गोष्टी जरी स्वतः विरुद्ध असल्या तरी आता विरोध करणे शक्य नव्हते.
त्यामुळे आज असे मानले जाते की, कोणा एका मनूने मनुस्मृती लिहिली नाही.
मनू महाराज धरतीवर जन्म घेत राहिले आणि नंतरच्या गोष्टी रचत राहिले.
मनुस्मृति लिहिली गेल्यापासून हिंदू धर्मात अनेक विक्षिप्त प्रथा सुरू झाल्या. अंधश्रद्धांचे थैमान निर्माण झाले. जन्म आधारित आरक्षण असल्याने, जे खरच कर्तुत्ववान होते अशा व्यक्तींना सैनिक किंवा शिक्षक बनता आले नाही.
याचा लाभ बाहेरील राज्यकर्त्यांनी घेऊन, भारतातील दुबळ्या राजांना सहज हरवत आपले शासन आणले.
ब्राह्मणांच्या पुढील पिढ्या सुद्धा ज्ञानात अतिशय हलक्या निघाल्याने, त्यांना भारतातील ज्ञानाचा समृद्ध वारसा टिकवता आला नाही. ज्ञानाच्या बाबतीत कमजोर अशा पुढील पिढ्यांमुळे भारत कुप्रथांच्या अंधारात लोटत गेला. या देशाचे अतोनात असे राजकीय, आर्थिक व सामाजिक नुकसान झाले.
वेदिक काळात ब्राह्मण या शब्दाचे दोन अर्थ होते.
१) ज्याचे मन (बुद्धी) मोठे असणारा असा तो.
२) सर्व वेदांचा जाणकार.
२० व्या शतकात फक्त नावाला असे ब्राह्मण भारतात बरेच होते; मात्र विचारांनी अथवा कर्तुत्वाने ब्राह्मण असणारे व्यक्ती फार कमी होते. काहींचा या सर्व मागास विचारांना विरोध असला तरी, या विरोधात जाण्याची शक्ती त्यांच्यात नव्हती.
ही शक्ती फक्त अशा व्यक्तीत असणे शक्य होते, ज्याने हा अन्याय स्वतः मोठ्या प्रमाणात सहन केला आहे. तो सहन करतानाच या सर्व शास्त्रांना व विचारांना नीट समजून सुद्धा घेतले आहे.
अशा त्या महान व्यक्तीचे नाव होते -
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.
ऐकून आश्चर्य वाटेल मात्र बाबासाहेबांना हिंदू धर्म खऱ्या अर्थाने प्रगती करावा अशी इच्छा होती. त्यामुळे त्यात आवश्यक त्या सुधारणा होणे गरजेचे आहे, हे जाणून त्यांनी त्या प्रकारचे लिखाण सुरू केले. मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांमधून त्यांनी आपले सुधारक विचार मांडलेत. हे विचार पटणारा वर्ग फक्त मागासलेल्यांमध्ये नाही तर ब्राह्मणांमध्ये सुद्धा दिसून आला. परंतु, हे सर्व आचरणात आणणे म्हणजे समाजाविरोधात जाण्यासारखे होते. त्यामुळे अशा सर्व व्यक्तींना शक्ती देणारी एक मोठी कृती करणे आवश्यक होते.
ही कृती त्या विचारांनाच शक्य होती जे विचार समाजातील अशा अघोरी प्रथांना संपवण्याची शक्ती ठेवत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन करत ही कृती करून दाखवली. हिंदू समाज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने हादरला. विरोध करणाऱ्यांनी विरोध सुरू केलाच, मात्र प्रगतिशील विचार असणाऱ्यांनी खरेच आपले काय चुकते आहे; याची शहानिशा सुद्धा सुरू केली.
तीन वर्षांनी या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण होतील.
काही गोष्टींचे आकलन आपणही करणे गरजेचे आहे.
आज मनुस्मृतीला मनापासून मान्यता नसली तरी आपले आचरण मनुस्मृतीच्या तत्त्वांना पाठिंबा देणारे नाही का? अगदी बाबासाहेबांना मानणारा समाज त्यांच्या स्त्रियांना कशाप्रकारे वागवतो? मागास समाजामध्ये सुद्धा भेदभाव पाहण्यास मिळतो; तो का?
दुसऱ्या बाजूने पाहिले असता,
मनुस्मृतीला पाठिंबा देणाऱ्या स्त्रिया, आज शिक्षण घेऊ इच्छितात किंबहुना घेतात. अशा स्त्रियांना स्वातंत्र्य हवे असते. आपल्या कर्तुत्वानुसार मिळणारा मान त्यांना हवा असतो. एकीकडे ब्राह्मण राजकारण्यांना विरोध आणि दुसरीकडे धार्मिक मनूस्मृतीला पाठिंबा ही प्रवृत्ती असणारे लोक सुद्धा पाहायला मिळतात.
हे सर्व पाहता, अगदी शंभर वर्षे होतील तरी आपल्या देशाने बाबासाहेबांच्या या कृतीला नीट समजूनच घेतले नाही हे कळून येते.
बाबासाहेबांना आपला आदर्श मानणारा समाज जर कृती मधून मनुस्मृतीचे आचरण करणार असेल तर ही गोष्ट उचित आहे का? त्यामुळे सर्वात आधी, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनी प्रत्येक भेदभाव नष्ट करत व स्त्रियांना योग्य तो आदर देत, त्या प्रकारच्या कृतींचे अनुकरण करावे.
जर स्त्रियांना स्वातंत्र्य, शिक्षण व समानता या गोष्टींचे महत्त्व वाटतेय, तर त्यांनी हे सुद्धा मान्य करावे की मनुस्मृती हा हिंदू समाजाला लागलेला एक काळीमा आहे. यात कमीपणा असण्यासारखे काही नाही. जे अयोग्य आहे त्यास संपवत नव्या सुधारक विचारांना जागा करून देणे हे आपले कर्तव्यच आहे.
या २१ व्या शतकात सुद्धा आपण २००० वर्षांपूर्वीच्या बुरसटलेल्या विचारांना कुरवाळणार असू, तर या देशाची अधोगती नेमकी कोणत्या कारणाने झाली हे शोधण्याची गरजच नाही.
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा