औरंगजेबाची दक्षिणेकडील स्वारी व संभाजी राजे

 


औरंगजेबासारखे अशांत जीवन व क्वचितच कोणास लाभले असेल. शहाजहानच्या पुत्रांपैकी औरंगजेब सर्वात नावडता. दारा शीकोव या राजपुत्राला पुढील बादशहा करण्याचे ठरलेले. अतिशय विद्वान असा दारा शीकोव, सर्व धर्मांना आदर देण्याच्या बाबतीत जणू काही अकबरच मानला जायचा. औरंगजेब मात्र त्याच्या अगदी विरुद्ध. लहानपणापासूनच औरंगजेबाच्या वाट्याला आला तो म्हणजे वडिलांचा द्वेष आणि एक मानसिक आजार, ज्यामध्ये तो स्वतःला मौलवी समजायचा. त्यामुळे तो एक कट्टर धार्मिक व्यक्ती झाला. 


वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या मुराद या भावाला सोबत घेऊन, औरंगजेबाने दारा शिकोव चा प्रमुख अडथळा दूर गेला. त्यानंतर मुरादला फसवणुकीने ठार करत स्वतः बादशाह झाला. फसवणुकीने मिळवलेल्या या पदाने त्याची संतुष्टी होऊ शकली नाही. बाबर पासून शहाजहान पर्यंत मुघल बादशहांनी उत्तर भारताला व्यवस्थित काबीज केले होते; परंतु त्यांना दख्खन कधीच जिंकता आले नाही. त्यामुळे, दख्खन जिंकून स्वतःचे महत्त्व वाढवावे हे औरंगजेबाच्या मनात होते. तरीही सुरुवात अशी अनेक वर्ष उत्तरेकडील सुभेदारांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यातच गेली. 



शिवाजी महाराजांचा मृत्यु :


अफगाणिस्तान, आजच्या आसाम जवळील पूर्व भारत व दक्षिण भारत हे तीन प्रदेश औरंगजेबासाठी डोकेदुखी होते. त्याला अफगाणिस्तान जिंकता नाही आला, मात्र कधी त्यांच्यावर आक्रमण करणार नाही व त्यांनीही करू नये अशी संधी करत तो प्रदेश शांत केला. पूर्व भारताच्या घनदाट अरण्याने औरंगजेबाच्या फौजांना हा प्रदेश आपल्या ताब्यात घेता आला नाही. येथील आदिवासी चिवटपणे लढा देत होते. 


दक्षिणेकडे निजामशाही व अदिलशाही हे मुख्य शत्रू होते. निजामशाहीच्या पतनानंतर एक शत्रू कमी झाला असे जेव्हा औरंगजेबास वाटले; तेव्हाच छत्रपती शिवाजीराजेंनी स्वराज्य स्थापनेचा आपला अट्टाहास दाखवत औरंगजेबाचा त्रास वाढवला. 

आदिलशाही व शिवाजी राजे एकमेकांविरुद्ध लढत स्वतःला संपवतील असे औरंगजेबाला वाटले. आज अनेकांना जो अफजलखान मुघल वाटतो, तो प्रत्यक्षात आदिलशाहीचा सेवक होता. अदिलशहाला शिवराय जुमानत नव्हते. त्यात मुघल प्रदेश लुटला जात होता. त्यामुळे औरंगजेबाची डोकेदुखी वाढत होती. राजपूत राजा जयसिंग व शाहिस्तेखाना सारखे आपले हुकमी शिलेदार दक्षिणेकडे पाठवत त्याने शिवरायांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. जयसिंग थोडाफार यशस्वी ठरला, तरीही राजे अगदी राखेतून पुन्हा भरारी घेत गेले. छत्रपती शिवरायांचा आकस्मिक मृत्यू औरंगजेबासाठी आनंदाची वार्ता ठरला.



औरंगजेबाची दक्षिण स्वारी :


औरंगजेबाच्या नीती धोरणांना विरोध करत त्याचा मुलगा अकबर दुसरा राजपुतांना जाऊन मिळाला. त्याच्या सुरक्षिततेसाठी राजपुतांनी त्याला संभाजीराजांकडे पाठवले. औरंगजेबाला भीती होती की राजपूत व मराठा यांनी अकबर दुसरा याला भारताचा बादशहा घोषित करत जर मोगल साम्राज्यावर स्वारी केली; तर आपले अनेक सरदार फितूर होऊन त्यांना जाऊन मिळतील व आपली सत्ता जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे जाऊन अकबर दुसरा चे आव्हान संपवणे व साम्राज्य विस्तार करणे हे त्याचे ध्येय बनले.

दक्षिणेकडे औरंगजेबाचे तीन प्रमुख शत्रू होते. मराठा, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतूबशाही.


औरंगजेब कट्टर मुस्लिम असला तरी तो फक्त सुन्नी पंथाला मान्यता द्यायचा. शिया पंथीयांना त्याचा विरोध होता. स्वतःच्या साम्राज्यातल्या अनेक शियांना त्याने संपवले होते. आदिलशहा व कुतूबशहा शिया पंथीय असल्याने या साम्राज्यांना संपवणे त्याची प्राथमिकता होती. दक्षिणेत आल्यानंतर त्याची पहिली सहा वर्ष आदिलशाही व कुतुबशाही संपवण्यात गेलीत.


या दोन्ही साम्राज्यांसोबत मराठ्यांचे पटत नसले तरी समान शत्रू असल्याने संभाजी राजांनी या युद्धांदरम्यान आदिलशहा व कुतुबशहाला सैन्यासह मदत केली. मराठा व मोगल या लढ्याला कायम हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देणाऱ्यांनी हे समजून घ्यावे की मुघलांशी लढताना दक्षिण भारताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे मोठे उदाहरण दाखवून दिले होते. आदिलशहाचा स्वतःचा सेवक मीर जुमला फितूर झाल्याने व आदिलशहाच्या स्वतः च्या मृत्यूने ते साम्राज्य संपुष्टात आले. कुतुबशहा फारसा ताकदवान नव्हताच. आता औरंगजेबाची नजर वळली ती मराठा साम्राज्यावर.



संभाजी राजे :


शिवरायांसारख्या थोर व्यक्तीच्या घरी जन्म घेत त्यांच्या सावलीत वाढल्याने संभाजीराजांवर खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांना सामोरे जात संभाजी राजांनी युद्ध कौशल्य व लेखनामध्ये प्रभुत्व मिळवले. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षीच साम्राज्याच्या प्रशासनावर आधारित 'बुधभूषण' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. यावरून त्यांच्या ज्ञानाची उंची कळते. आग्र्याचा भेटीवेळी शिवरायांसोबत कैदेतील थरार अनुभवला तर जयसिंग सोबत तहावेळी काही दिवस त्याच्याकडे ओलीस राहिले. स्वतःच्या जीवाची परवा न करता भिडायचे, हा अंगभूत गुणधर्म येण्यास असे प्रसंग महत्त्वाचे ठरले.


परकीयांशी लढण्यात तरबेज संभाजी राजांना स्वकीयांचा विरोध मात्र खात होता. शिवरायांच्या काही सरदारांना शिवरायानंतर या साम्राज्यावर अप्रत्यक्षपणे स्वतःचे नियंत्रण हवे होते. संभाजी राजांसारखा मातब्बर राजा असताना हे शक्य नव्हते. त्यामुळे, प्रकृतीने थोडे मवाळ व वयाने लहान राजाराम महाराज छत्रपती व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी, संभाजी राजांविरुद्ध अनेक कटकारस्थान रचली गेली. त्यांना दारूचे व्यसन आहे किंवा ते कोणास योग्य आदर देत नाहीत, दिलेल्या कार्यात कुचराई करतात, इत्यादी अनेक आरोप लावले गेले. शिवरायांच्या नजरेत त्यांना पाडण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे शिवराय व संभाजी राजे यांमध्ये थोडाफार दुरावा सुद्धा आला. 


शिवरायांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी मार्जितल्या काही सरदारांना सोबत घेत प्रशासनाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली घेत स्वतःला छत्रपती घोषित केले. विरोधी पक्षाला चतुराईने व बुद्धि कौशल्याने एक तर आपल्या बाजूने करायचे किंवा संपवायचे हे शिवरायांचे डावपेच. संभाजी राजे मात्र पूर्णपणे त्याविरुद्ध. 

जो विरोधी आहे, त्यावर सरळ सरळ एक घाव दोन तुकडे करून संपवून टाकायचे. 

हे बळ परकीयांसाठी चालणारे होते, मात्र स्वकीय दुरावत चाललेले व त्यांना संपवता येणे शक्य नव्हते. दुसरा अकबर ताब्यात असताना, अनेक डावपेच लढता येणे शक्य होते. सरळमार्गी संभाजीराजांना हा हुकमी एक्का वापरता आला नाही.


संभाजी राजांचा मृत्यू :


फितूरी अनेक जणांनी केली होती. इतिहास लिहिणाऱ्यांनी मात्र स्वकीयांची नावे बदनाम होऊ न देता फक्त मोरे, फर्जंद व शिर्के बंधूंना पुढे केले. स्वराज्याला लागलेली ही कीड वेळीच साफ झाली असती तर इतिहास वेगळा असता.

संभाजी राजांचा मृत्यू ही घटना इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.

संभाजी राजांच्या मृत्यूचे वर्णन करणाऱ्याने औरंगजेबाचा जणू काही अंतच लिहिला.


महाराणी येसूबाई व संभाजी राजांचा पुत्र शाहू ताब्यात आले असताना औरंगजेबाने येसूबाईंना निष्कलंक ठेवले व शाहूला सुद्धा हिंदू राहू दिले. औरंगजेबाला अनेक राजपूत राजांनी, आदिलशहाने, कुतुबशहाने मोठा विरोध करूनही त्यांना असा मृत्यू औरंगजेबाने दिला नाही, मग संभाजी राजांनाच का??

औरंगजेबाच्या सैन्यातील कोणीही या घटनेबद्दल लिहिलेलं नाही. याचा अर्थ लिहिणारा प्रत्यक्षदर्शी नव्हता. मात्र चतुर होता.


डोळे फोडणे, नखे उपटून काढणे, जखमांवरती मीठ लावणे या त्याकाळी देण्यात येणाऱ्या सामान्य शिक्षा. मात्र त्या एका राजाला देण्यात आल्या. मराठ्यांचा एकमेव आधार असणाऱ्या थोर छत्रपतीला देण्यात आल्या व सोबतच त्यांची शरीराची त्वचा सोलून काढली व इतर काही अनन्वित अत्याचार सोबत लिहित; लिहिणाऱ्याने जन माणसांमध्ये एक मोठा असंतोष तयार केला. सामान्य लोकांमध्ये पसरलेला हा असंतोषच औरंगजेबाला अयशस्वी ठेवण्यास कारणीभूत ठरला. कारण, स्वतःच्या राजाचा झालेला हा अपमानास्पद अंत ऐकून जवळजवळ सर्व सुभेदार साम्राज्याप्रती प्रामाणिक होत जीवाणीशी लढण्यास तयार झाले. सामान्य जनताही या लढ्यात मोठ्या प्रमाणात सामील झाली. 


त्यात राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई मुत्सद्येगिरीत अव्वल असल्याने, औरंगजेबाला मरेपर्यंत मराठा साम्राज्य संपवता आले नाही. दख्खन जिंकायला निघालेला बादशहा दख्खनेतच संपला.


औरंगजेबाच्या आयुष्यामधून आपण हे समजू शकतो की कटकारस्थान करून आपण काहीही मिळवले तरी त्याचे महत्त्व राहत नाही. तुमचा अहंकारच तुम्हाला संपवण्याचे सर्वात मोठे कारण ठरतो. 


संभाजी राजांबद्दल बोलायचे झाले तर आपल्या मराठी समाजाने त्यांच्यावर अन्याय केलाय. फक्त त्यांच्यावरच नाही तर अगदी शिवरायांवर सुद्धा.

कोणताही राजा फक्त शत्रूला कापून मोठा ठरत नाही. कारण जर तसे असते, तर औरंगजेब श्रेष्ठ ठरला असता. तरीही आपण शिवरायांच्या आयुष्यात अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे कापणे, आग्र्याहून सुटका व सुरतेची लूट या घटनांपलीकडे जात नाही. संभाजी राजांनी जवळजवळ दीडशे युद्ध केली. त्यांना तर त्या बाबतीत सुद्धा महत्त्व मिळत नाही. फक्त त्यांचा मृत्यू प्रसंग काय तो रंगवला जातो. 


या दोन छत्रपतींनी, 

मराठी समाजाला जाती-धर्माच्या बंधनातून मुक्त करत एक केले,

समानतेची शिकवण दिली,

वारकरी संप्रदायाला महत्त्व मिळवून दिले, 

मराठी भाषेला या प्रदेशाच्या प्रमुख भाषेचा दर्जा मिळवून दिला, 

देशमुख सारख्या हिंदू जमीनदारांकडून जनतेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी सरदेशमुखी सारखी पदे आणली, 

समाजात नीतिमत्ता रुजवली,

अन्याय करणारी शक्ती किती मोठी असो अयोग्य गोष्टी विरुद्ध आवाज उठवला पाहिजे व सर्वात महत्त्वाचे,

 कोणाचेही मानसीक गुलाम होता कामा नये ही शिकवण दिली..


आजचा मराठी समाज हे सर्व विसरत शिवरायांना व संभाजीराजांना काही हिंसक घटनांपर्यंतच मर्यादित ठेवतो. हा मृत्यू जास्त वेदनादायी आहे.



- अमित 








टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट