२१ व्या शतकातील आईसाठी 'त्यांचा' संदेश..
आई - हा दोन अक्षरी शब्द प्रत्येकासाठी अतिशय मौल्यवान. आपल्या लेकरांसाठी जगातील कोणतीही लढाई लढण्यासाठी तयार असणारी असामान्य व्यक्ती म्हणजेच आई. कोणताही मनुष्य जेवढे महत्त्व देवाला देणार नाही, तेवढे स्वतःच्या आईला देत असतो. भारतीय संस्कृतीत अतिशय पूज्य असे हे स्थान. परंतु, शेवटी तीही एक माणूसच आहे. २१ व्या शतकातील आई आता बऱ्यापैकी बदलली आहे. त्यातील काही बदल अनपेक्षित असे आहेत. त्यामुळे या २१ व्या शतकातील आईला मार्गदर्शन करण्यासाठी एक असामान्य आई अवतरली आहे.
पुढील लेख त्यांच्याच शब्दात..
नमस्कार..
स्वामी तिन्ही जगाचा| आईविना भिकारी||
बायांनो, आपल्या संत महात्म्यांनी सुद्धा हे सांगून झाले आहे. जबाबदारी तशी मोठी आहे. किंबहुना, असाधारण म्हणता येईल अशीच!! संसाराच्या रहाटगाड्यात सुखा-दु:खाला तोंड देता देता, ही जबाबदारी पेलणे येरागबाळ्याचे काम नव्हे. प्रत्येक मूल वेगळं आणि त्यानुसार आईची भूमिका वेगळी.
माझ्या आया-बायांना हा समाज हीनवतो. पुरुषप्रधान संस्कृती कमी लेखते. एक पोर सांभाळण्यासाठी स्त्रीला, मोठी कलाकार व्हावं लागतं, ज्ञान नसले तरी त्याचा आव आणावा लागतो आणि असले तर त्याला सांभाळून पोहोचवण्याचा संयम बाळगावा लागतो, काळजीवाहू सुद्धा व्हावे लागते आणि कधीतरी काळजाला दूर सारत दगडही व्हावे लागते.
आई म्हणजे फक्त उत्तम स्वयंपाक करून पोरा-बाळांना खाऊ घालणारी व त्यांच्या कपड्यांचा व स्वच्छतेचा भार उचलणारी बाई, तिची ही भूमिका तयार करून समाजाने कायम आपला अपमानच केला. त्यामुळेच स्वतःच्या आईबद्दल एक वेळ आदर असेल; परंतु, दुसऱ्यांच्या आईला शिव्यांची लाखोली वाहणारी ही संस्कृती बदलण्याचा विडा आम्ही उचललेला. आमच्या कार्याचा सन्मान तर झाला; मात्र विचार कोणी फारसे समजून घेतले नाही. हरकत नाही. चालायचंच.
येणारा काळ वाईट. त्यात सांभाळून राहा असे सांगणारे खूप भेटतील. आमची भूमिका ती कधीच नव्हती आणि नसणार.
त्यामुळे, तुमच्या पोरांना सुद्धा योग्य गोष्टीसाठी लढायला शिकवा.
१) 'एखाद्या गोष्टीशी आपला संबंध नाही तर आपण त्यात कशाला पडायचे?? कोणाचं काय होत असेल ते होऊ दे, तू स्वतःच नुकसान करून घेऊ नको.'
हे असले बुळचट विचार शिकवून आज तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला सुरक्षित ठेवाल. पण प्रसंग कधीतरी त्यांच्यावरही येईल. तेव्हा काय कराल??
त्यामुळे, जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवणे हे पहिले कर्तव्य तुम्ही तुमच्या बाळांना शिकवा. मी माझ्या मुलाला हेच शिकवले.
२) माणूस आज दुरावत चालला आहे. त्यातील माणुसकी टिकवणे हे आईच्याच हातात असायला हवे. एक आई कधीही स्वतःच्या मुलावर प्रेम आणि इतरांच्या मुलांचा तिरस्कार करूच शकत नाही. जर कोणाचे काही चुकत असेल तर त्याला मायेने समजावा. जर एखादे मूल खचले तर त्याला मायेने आधार द्या. स्वतःच्या पाल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या कोणाचे बाळ पुढे जात असेल तरी त्याचा गौरव करा.
या जगात व्यवस्थित राहायचे आहे तर व्यक्तींना स्वीकारणे कसे आवश्यक आहे, हे तुमच्या कृतीतूनच तुम्ही तुमच्या बाळांना दाखवून द्या.
माझ्याकडे सुद्धा माझी अशीच अनेक बाळे फक्त मायेचा हात पाठीवरून फिरवून घेण्यासाठी दाखल व्हायची.
३) आई झाल्यावर पोरी स्वतःच अस्तित्व पुसायला सुरुवात करतात. नोकरी सोडणं, त्यासाठीचे प्रयत्न सोडणं, कर्तुत्वाचा संधींना दूर करणं व फक्त आई ही एकच भूमिका घेऊन बसणं अतिशय वाईट. कधी हे नवऱ्याकडून लादले जाते, कधी परिस्थितीकडून, तर कधी स्वतःच्या नाकर्तेपणामुळे.
आम्ही सुद्धा असेच केले असते, तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. तुमच्या कर्तुत्वातून तुमच्या बाळांना एक वेगळे बळ मिळत असते. तुमचे यश त्यांच्या पंखांना भरारी देण्यासाठी ऊर्जा पुरवत असते. त्यामुळे कर्तुत्ववान व्हा.
४) कोणती गोष्ट आपण स्वीकारावी व कोणती नाही हे आपली सद्विवेकबुद्धी आपल्याला सांगत असते. तुम्ही आज ज्याप्रकारचे अन्न खाता, ज्या प्रकारच्या मालिका किंवा मनोरंजनाच्या गोष्टी पाहता, आळशी होण्याचा कल वाढवणाऱ्या ज्या सवयी स्वीकारता; त्या सर्व गोष्टी पाहता तुम्ही एक चांगले मूल घडवाल ही अपेक्षा का करावी?? किंबहुना, या सर्व गोष्टी तुमच्याच जीवनाचा स्तर खालावतात मग बाळाचे काय?? एक आदर्श मनुष्य होण्यास वाटचाल करणारी व्यक्तीच दुसरा आदर्श मनुष्य घडवू शकते.
आमच्या काळात सवयी बिघडवणाऱ्या गोष्टी नव्हत्या असे नाही. प्रत्येक काळ काहीतरी चांगले व काहीतरी वाईट घेऊन येत असतो. आपल्या हातात असते की आपण काय स्वीकारावे.
५) लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचे नाही तर दोन परिवारांचे बंधन असते. अनेक पोरींना सासू - सासरे, नणंद - भावजय असे कोणीही नको असते. असतात काही व्यक्ती ज्या आपल्याला नीट समजून घेत नाहीत. अशा व्यक्ती तुमच्या पोरा-बाळांच्या आयुष्यात येणार नाहीत का?? व्यक्तींपासून दूर होता होता एक सामाजिक मनुष्य घडवणे तुम्हाला कसे जमणार??
माझ्या अवतीभवती जे कोणी होते, त्या सर्वांना मी माझे कुटुंब मानले. कारण जीवाचा सखा बराच काळ दूरच राहिला. त्या अवतीभवती असणाऱ्यात अशी टाळकी सुद्धा होती, ज्यांची चाल जरा वाकडी असायची. पण तरीही त्यांना दूर न करता आहेत तसे स्वीकारणे आणि कधीतरी त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देणे, ही भूमिका एक आईच निभावू शकते.
पोरींनो, सांगण्यासारखे खूप आहे. सर्वच सांगत बसण्याचे काही कारण नाही.
या पाच गोष्टी जरी तुम्हाला नीट समजल्या तरी इतर सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातील.
पुन्हा कधीतरी भेट होईलच.
आज थांबते.
तुमचीच,
स्वराज्यजननी.. राजमाता.. जिजाबाई शहाजीराजे भोसले..
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा