अद्भुत
केशवला आज कोणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. विदेशातील या प्रयोगशाळेत येऊन ३ वर्षे झाली होती. परंतु, गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या. त्याला व त्याच्यासारख्याच काहींना हे कळत होते की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. तरीही प्रयत्न मात्र चालूच होते. आज प्रयोगाबद्दल सभा झाली ज्यामध्ये वरिष्ठांनी ठरवलेल्या बदल करावयाच्या गोष्टींना मांडण्यात आले. हे बदल पुरेसे नाहीत, याची अनेकांना जाणीव होती. तरीही फक्त तिघांकडून यावर प्रतिवाद झाला. केशवला तर काही बोलण्याची इच्छाच नव्हती. इकडे आपण फक्त वेळ वाया घालवतोय, हे त्याचे स्पष्ट मत होते. जे विरोधात बोललेत, त्यापैकी दोघे त्याला स्वदेशी वाटलेत. त्यामुळे, त्यांच्याशी एकदा भेट घ्यावी असे त्याने ठरविले.
पहायला गेले तर खुप महत्वाचा व क्रांतिकारी असा हा प्रयोग होता. सर्व वैज्ञानिकांचे एकच ध्येय होते, विश्वाचे कोडे उलगडणे. मुलभूत दैवी कण शोधून काढणे हे ध्येय होते. यासाठी भूमी अंतर्गत मोठी प्रयोगशाळा वसविण्यात आली होती. २७ किलोमीटरच्या रिंगणाकृती बोगद्यात प्रोटॉनच्या कणांना चुंबकीय बंदुकीद्वारे एकमेकांवर आदळले जात होते, ज्याद्वारे विश्वातील सर्वात मुलभूत कण मिळेल - ज्यापासून विश्व तयार झाले, हा प्रयत्न होता. केशवला मात्र ही गोष्ट काम करणार नाही, याची खात्री होती.
त्याने जाऊन त्या तिघांशी भेट घेण्याचे ठरविले.
इथे देशोदेशीचे जवळपास १००० वैज्ञानिक कार्यरत होते. अनेकांचे विभाग वेगवेगळे असल्याने सर्वच एकमेकांना ओळखत नव्हते. सर्व वैज्ञानिक कामात अतिशय व्यग्र असायचे. केशव त्या तिघांपैकी एका वैज्ञानिकास भेटला.
केशव : हाय, माझे नाव केशव.
समोरील व्यक्ती म्हणाला, ' मी सिद्धार्थ'.
केशव : सिद्धार्थ!!! अरे वाह!!! असं विदेशात कोणी स्वदेशी भेटले की छान वाटते.
सिद्धार्थ : हो, खरंय. तसंही आता इथे मन रमत नाहीये.
केशव : माझे सुद्धा तेच हाल आहे. परंतु, परत जाऊन तरी काय करणार?? त्यापेक्षा इथे काही बदल होऊ शकतील का हे पाहण्याचा विचार आहे.
सिद्धार्थ : इथून काही आशा ठेवण्यात अर्थ नाही. आपल्याच देशाचा एक खूप श्रीमंत वैज्ञानिक तिथे जाऊन एक असाच प्रयोग करणार आहे. त्याने मला त्याचा निर्णय सांगितला व मला पटला, त्यामुळे आम्ही चाललोय.
केशव : क्या बात है!! कोण तो??
सिद्धार्थ : चल तुला भेटवतो.
जेवणाची वेळ झाली होतीच. सर्व कॅन्टीन मध्ये जमलेले.
एका व्यक्तीला शोधत दोघे बराच काळ फिरलेत. शेवटी तो भेटला.
सिद्धार्थ : हा आहे महेश. महेश, हा माझा नवा मित्र केशव.
महेशने हलकेसे स्मितहास्य केले.
केशव : मला तुमचा निर्णय पटला आणि त्यात मला सुद्धा सामिल करून घ्या ही विनंती.
महेश : विनंती कशासाठी? विश्वाच्या रहस्याला जाणून घेणे सोपे नाहीच. जेवढे जास्त मेंदू तेवढं जास्त बळ. आपण सर्व उत्तम प्रयत्न करू.
केशव : तुम्ही अजून कोणाची अपेक्षा करताय का?
महेश : तुम्ही नको, तु बोल. मानापमान ही भेदभावाची जननी आहे, असे मी मानतो.
केशव : बरोबर आहे तुझं. परंतु, सवयी सुटत नाहीत. आपल्याच विचारांचे अजून दोघे आहेत. त्यांना ही भेटून पाहू.
सिद्धार्थ : मी भेटलो त्यांना. एकाचे नाव आहे, कन्फू. तो आज रात्री त्याच्या देशासाठी निघतोय. त्याला बोलून उपयोग नाही. दुसरा विचार करून कळवतो म्हणाला.
महेश : खरे तर प्रोजेक्ट प्रमुख ख्रिस्टीन खूप भला माणूस. विचारी सुद्धा आहे. त्याच्या चुका सांगणारा कोणीतरी त्या पातळीवर हवा होता.
सिद्धार्थ : मुख्य प्रकल्प नियोजक महमूद आहे, त्याला काही गोष्टी खटकल्या. तरी काही करू शकत नाही तो. संपूर्ण प्रयोगास त्याचा पाठिंबा आहे.
केशव : तो त्याच्या जागी अगदी योग्य आहे. पर्याय नाही या प्रयोगाशिवाय. जर आपण काही वेगळं करणार असू तर फार विचार करावा लागणार.
सिद्धार्थ : त्यावर चर्चा होईलच. आपल्याला आधी येथून निघायला हवे.
महेश : आज रात्रीच निघूया.
आपल्या पदाचा राजीनामा देऊन, हे तिघे विमानतळावर भेटतात.
केशव : चला तर निघूया. एक नवी सुरुवात करण्यास!!
सिद्धार्थ : आपल्यासोबत एक व्यक्ती अजून जोडला जाणार आहे. थोडा वेळ वाट पाहू.
तितक्यात दोन व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन उभे राहतात. एक तरुण तर दुसरा म्हातारा.
सिद्धार्थ : मित्रांनो, हा आहे वर्धमान.
असे थोडेसे वेगळे नाव ऐकून केशव म्हणाला, ' मी तुला वर्धा म्हणालो, तर हरकत नाही ना?'
महेश : तो काय स्त्री आहे का केशव?
वर्धमान : काही हरकत नाही. स्त्री असो की पुरुष मनुष्याला मनुष्य समजणे महत्वाचे.
सिद्धार्थ : वाह! अगदी बरोबर म्हणालास. तुझ्यासोबत असणारे हे गृहस्थ कोण आहेत?
वर्धमान : हे आहेत ब्रम्हानंद. या प्रयोगशाळेच्या मुख्य समितीतील सदस्य. माझ्या बाजूलाच रहायचे. माझा विचार पटला, त्यामुळे आपल्यासोबत येत आहेत.
सर्व आनंदाने निघाले. वर्धमानला वर्धा बोलणारा केशव, या ब्रम्हानंदच्या नावाचे काय करायचे या विचाराने मात्र त्रस्त झाला.
मायदेशी परतल्यावर महेश त्यांना एका पर्वताच्या ठिकाणी घेऊन गेला.
केशव : कुठाय तुझा बंगला?
महेश : बंगला! एक झोपडे व शेतजमीन होती, ती सुद्धा शिक्षणासाठी विकली. आता इथे माझे काही नाही.
सिद्धार्थ : जर तुझ्याजवळ पैसा नाही, तर ती प्रयोगशाळा तू कसा उभारणार आहेस महेश?
केशव: मित्रांनो, एक जबरदस्त सुंदर मुलगी आहे तिकडे. चला ओळख करून घेऊ. जेवणाची सोय होतेय का पाहू.
महेश : जेवणाची नाही, प्रयोगशाळेची सोय करायला आलीये आदिती.
सर्वांना अतिशय आनंद झाला.
आदिती त्यांना घेऊन एका भव्य गुहेमध्ये घेऊन गेली. प्रयोगशाळा नैसर्गिक होती. प्रोटॉन कणांऐवजी एका छोट्याश्या बिळातून येणाऱ्या ताऱ्याच्या किरणांना दिशा देण्यात येणार होती. दोन्ही बाजूंनी तशी सोय होती. इथे किरणांचा प्रवासमार्ग रिंगणाकृती नसून आडव्या इंग्रजी आठ (∞) प्रमाणे होता. अनंताला सुचवणारे चिन्ह.
आदिती : ताऱ्यांची किरणे कधी तरंग तर कधी कणांसारखी वर्तणूक करतात. किंबहुना एकाच वेळी ती दोन्ही स्वरूपात असतात. बिळांच्या आत असणारे आरसे त्यांना परावर्तित करून इथे मध्यभागी आपल्यासमोर एकमेकांवर आदळवतील.
सर्वांना योजना समजली. राहणे व खाण्यापिण्याची सोय गुहेच्या बाजूलाच होती. दुसऱ्याच दिवशी काम सुरू झाले. इथेसुद्धा तेच घडत होते, जे तिकडे घडले.
ब्रम्हानंद : आपल्याला प्रारूप बदलण्याची गरज आहे. याप्रकारे आपण फार काही वेगळे करत नाही आहोत.
आदिती: काय करायला हवे?
ब्रम्हानंद : असे काही, ज्यामुळे आदळणे नाही, तर एक होणे जमू शकेल.
सिद्धार्थः यासाठी त्यांचा मार्ग अगदी एकमेकांसमोर न ठेवता थोडा बाजूने हवा.
वर्धमान : अगदी बरोबर, त्यांचे गुरुत्वाकर्षण त्यांना एकमेकांभोवती फिरवेल. परंतु, काय ते एक होतील?
आदिती : काही गोष्टी नियंत्रणाबाहेर राहूदेत. त्या उत्स्फूर्तपणे घडल्या तरच योग्य होतील.
केशव : आणि या सर्वातून असे काही तयार झाले, जे धोकादायक असेल तर?
ब्रम्हानंद : तर आपल्यातील सर्वात शांत व्यक्तीला, ते संपविण्याची जबाबदारी देऊ. महेश त्या प्रारुपाला नष्ट करेल.
केशव : ब्रम्हा अगदी योग्य बोलतोय. आपण भावनेच्या भरात काही चुकीचा निर्णय घेऊ किंवा तयार केलेल्या प्रारूपाकडून अपेक्षा ठेऊ. महेश योग्य वेळी ते नष्ट करेल.
केशवने वापरलेला ब्रम्हा हा शब्द सर्वांना आवडला व यापूढे ब्रम्हाच बोलायचे ठरले.
ठरल्याप्रमाणे किरणांना काही वेळाने मागे-पुढे असे सोडण्यात आले. अपेक्षित तो परिणाम होऊन ते किरण एक झालेत.
एवढी वर्षे विदेशात न जमलेला प्रयोग काही दिवसांतच यशस्वी झाला.
लगेचच त्यातून प्रखर किरणे बाहेर पडू लागली, तसे महेशने त्याला नष्ट केले.
केशव : बापरे!! मित्रांनो तुम्हाला कळतंय का, आपण एक नवे जग तयार केले आहे!!!
सिद्धार्थ : हो. आता आपली जबाबदारी वाढली आहे. हे तयार करणे पहिली पायरी होती. खरे आव्हान तर पुढे आहे.
आदिती : सर्वात पहिले आव्हान, या विश्वाला गुहेच्या चौकटीत कसे बांधून ठेवायचे??
वर्धमान : त्यासाठी पुन्हा काचांचा वापर करत एक वर्तुळ तयार करू. जो आतील किरणांना आतल्या आत परिवर्तित करून फिरवत राहील.
सर्वांना कल्पना आवडली.
त्याप्रमाणे करून पाहिले असता, अपेक्षित गोष्टी घडत गेल्या.
मूलभूत कणाचा विस्फोट. किरणांची प्रखरता व त्यानंतर तयार झालेली गुढ अंधारमय शांतता.
केशव : सर्व किरणे कुठे नष्ट झालीत??
महेश : ती नष्ट नाही झालीत. ती वेगाने फिरत एवढ्या वेळा एकमेकांसमोर येत आहेत की, आपल्यासमोर असणारी ही प्रत्येक जागा त्या किरणांमधील बिंदू झाला आहे. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी अंधार दिसतोय, तर काही ठिकाणी काहीच दिसत नाहीये.
आदिती : आता दुसरे आव्हान, आपल्याला जीवसृष्टी असणारा ग्रह तयार करायचा आहे.
सिद्धार्थ : त्यासाठी आपल्याला या विश्वात तयार होणाऱ्या इतर कणांना एक होण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल.
ब्रह्मा : काचेच्या आत घडणाऱ्या या गोष्टींना आता नियंत्रित करणे कठीण आहे.
सिद्धार्थ : फारसे नाही.
त्याने काचेच्या प्रतिकृतीला एका बाजूने विद्युतधारेचा प्रवाह जोडला. यामुळे आतील भागात विद्युत चुंबकीय आकर्षण निर्माण होत बदल घडून येऊ लागलेत.
आत असलेले धुळीचे कण एकत्र होत छोटे छोटे गोळे तयार होऊ लागले.
हेच ते ग्रह.
सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
परंतु, हे ग्रह अगदी विराट रूप घेऊ लागलेत; तसे महेशने हे प्रारूप नष्ट केले.
काही दिवसांनी पुन्हा नव्याने सुरुवात करत त्यांनी विश्व तयार केले.
ग्रहांनी नियंत्रित राहावे ही गरज होती.
त्याचा या दिवसांत नीट अभ्यास करत केशवने सिद्धार्थ सोबत विद्युत प्रवाह देण्याचे असे काही बिंदू शोधून काढले की, ज्यामुळे विश्व नियंत्रित राहील.
आदिती : आपल्या या विश्वाला सुद्धा असेच कोणी तयार केले असेल का?
ब्रह्मा : शक्यता नाकारता येत नाही.
महेश : हे प्रारूप विश्व छोटेसे आहे. आपले अनंत अमर्याद असे.
वर्धमान : महेश तू कधी भुलभुलैय्याच्या बागेत गेला आहेस का??
महेश : हो. का विचारलेस.
वर्धमान : ती बाग छोटीशीच असते. परंतु, त्यातील वाटा या प्रकारे तयार केलेल्या असतात की आपण फिरत राहतो व ती कधी संपेल अशी वाट पाहत राहतो.
महेश : याचा अर्थ आपले ब्रम्हांड, अनेक वाटा असणारी एक छोटीशीच प्रतिकृती आहे??
वर्धमान : निश्चितच. आपण त्या वाटा अजून शोधून काढलेल्या नाहीत.
आदिती : हे पहा वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास आपल्याला या प्रतिकृतीचे वेगवेगळे रूप दिसते. असे किती कोन असावेत??
वर्धमान : हे शोधून काढणे कठीण आहे. आता हे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. याची सुरुवात कुठून झाली व शेवट कुठे होईल हे ठरवण्यापेक्षा त्यातील गोष्टी उत्स्फूर्तपणे होऊदेत.
केशव : तेवढा वेळ असता तर निश्चितच होऊ दिले असते. आता मात्र जर सर्व नियंत्रणात आहे, तर जीवसृष्टी असणारा ग्रह आपण लवकरात लवकर तयार करायला हवा.
आदिती व ब्रम्हा ने विविध कोनांतून याचा अभ्यास करत, जीवसृष्टीसाठी उपयुक्त असलेले कण शोधून काढत त्यावर विद्युत चुंबकीय तरंग पोहोचतील अशी सुविधा केली.
यामुळे, काही दिवसांनी पाच ग्रह असणारी एक सौरमाला तयार झाली.
परंतु, त्यातील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी होणे शक्य वाटत नव्हते.
तेव्हा केशवने तेथून थोड्या अंतरावर असणाऱ्या एका ग्रहाला विद्युत चुंबकीय प्रावरणांनी दिशा देत या सौरमालेकडे पाठवले. त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे उपस्थित ग्रहांमधील अंतर वाढले. याचा परिणाम असा की, एका ग्रहावर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण तयार झाले.
सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लवकरच तिथे जीवसृष्टी तयार झाली.
परंतु, यातील जीव अतिशय विध्वंसक असल्याने; महेशने विद्युत प्रावरणांचा वापर करत, या ग्रहाबाहेर तयार झालेल्या दगडांना येथे पाठवत या ग्रहाला नष्ट केले.
महेश : असे सारखे करता येणार नाही. याप्रकारे जीवसृष्टी असणारा ग्रह आपण सतत तयार करू शकत नाही.
ब्रम्हा : मी पाहतो, अजून कुठे शक्यता आहे का.
सिद्धार्थ : संपूर्ण नष्ट जरी करू शकत नसलो, तरी त्याला अबाधित ठेवणे सुद्धा हानिकारक आहे.
आदिती : त्यासाठी या ग्रहावर आपल्याला जीवसृष्टीसाठी मृत्यूची योजना साकारावी लागेल. हे जीव असे अमर असून चालणार नाहीत. त्यामुळेच हा विध्वंस घडतोय.
ब्रम्हाने तोपर्यंत अजून एक ठिकाण शोधले होते; जेथे जीवसृष्टी तयार होऊ शकते.
नेमके त्याचवेळी वर्धमान तेथील कणांचा नीट अभ्यास करत होता.
वर्धमान : येथे आपण विविध आकारांचे जीव तयार करू व सर्वात जास्त शक्ती मोठ्या नाही तर छोट्या जीवांकडे असेल. ते शरीराने बलशाली नसतील. परंतु, विश्वाला संपवण्याची शक्ती त्यांमध्ये असेल.
केशव : वाह.. कल्पना छान आहे. छोटेसे जीव, सूक्ष्मजीव.
सर्वांना नाव आवडले. त्याप्रमाणे पुन्हा नवीन ग्रह तयार करण्यात आला.
येथे विविध प्राण्यांसोबत सृष्टी तयार झाली.
वाटत होते त्याचप्रमाणे घडले. जेव्हा मोठे प्राणी विध्वंसक ठरण्याच्या मार्गावर असत, तेव्हा सूक्ष्मजीव त्यांना संपवायचे.
हळूहळू प्राणीसृष्टीत बदल घडत, या सर्वांना हवा तो प्राणी तयार झाला - मानव.
ब्रह्माचे डोळे आनंदाश्रूने तरळले.
सर्वजण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ होते.
परंतु, आता पुढे काय हे कोणासच ठाऊक नव्हते.
केशव : आपण या विश्वात जिथे आहोत, तिथपर्यंतच्या गोष्टी आपण तयार केलेल्या विश्वात घडवल्या आहेत. विश्वाचे हे कोडे उलगडण्यासाठी येथे काय करायला हवे, हे समजणे आता कठीण.
महेश : जर आपण दिलेल्या विद्युत प्रारणांमधून आतील वस्तूंमध्ये बदल घडत आहेत, तर त्याच प्रारणांमधून काय आपण या जीवसृष्टीपर्यंत संदेश पोहोचवू शकतो??
आदिती : नक्कीच. परंतु, हा मानव त्या संदेशांना नीट समजून घेईल का?
केशव : प्रयत्न करण्यास हरकत नाही.
वर्धमान : हा प्रयत्न न करणे उचित. जर आपण नियंत्रित करणार असू, तर तेच होईल जे येथे होतेय. काही गोष्टी उत्स्फूर्तपणे होऊ द्या. ज्यावर आपले नियंत्रण नसेल.
या विश्वातील फक्त सजीवच नाही, तर निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा योग्य ते साकारण्याची ताकद आहे. तुम्ही त्यांना थोडे नियंत्रणाबाहेर ठेवा.
महेश : नियंत्रणाबाहेर ठेवले तर निर्मिती व विनाश हे चक्रच चालू राहील. आपल्याला हवी ती गोष्ट या मानवाकडून घडणार नाही.
वर्धमानला हे पटले.
त्यांनी तयार केलेल्या ग्रहातील मानवाला आपल्या विद्युत चुंबकीय प्रारणांमधून वेळोवेळी संदेश देण्यास सुरुवात केली. कधी केशव, कधी सिद्धार्थ तर कधी वर्धमान हे संदेश देत होते. त्यानुसार काही मानव त्या ग्रहावर बदल घडवून आणत होते.
ही सृष्टी प्रगत होत चालली होती.
तंत्र विकसित होत होते.
नीतिमत्ता काळानुरूप बदलत होती.
जे कोणालाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे त्रासदायक नसेल व ज्यामुळे स्वतःचे नुकसान होणार नाही ते सर्व योग्य अशी मूल्ये या जीवसृष्टीत असणाऱ्या मानवात वसवली गेलीत.
अतिशय परमोच्च बिंदूला ही मानवी सभ्यता पोहोचवली गेली.
अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांचा हा मानव अतिप्रगत झाला होता.
परंतु, जिथे अती होते, ते निश्चितच नष्ट होण्याच्या मार्गावर असते.
यावेळी मात्र मानवाने अगदी सूक्ष्मजीवांवर सुद्धा ताबा मिळवला होता.
ही अनियंत्रित शक्ती त्यांच्या या विश्वाच्या प्रारूपाच्या मुळावरच घाला घालणार होती.
मानव हे ब्रम्हांड संपवणार होता.
त्यांना अपेक्षित असे विश्वाचे कोडे ना उलगडता मानवाने ते नष्ट करायला घेतले होते.
तरीही केशव अजूनही त्याकडून अपेक्षा करत होता.
अपेक्षा सर्वांचीच होती. मात्र फार वेळ दवडणे नुकसानकारक ठरले असते.
त्यामुळे महेशने पुन्हा एकदा जीवसृष्टीस नष्ट केले.
एवढ्या अत्यूच्च पातळीवर पोहोचल्यानंतर येणाऱ्या पराभवाने जवळजवळ सर्वच खचलेत.
आदिती : कदाचित यापुढे कोणतीही गोष्ट साकारणे अशक्य आहे.
ब्रह्मा : आपण आहे त्या स्थितीपेक्षा पुढे जाणे निश्चितच अशक्य आहे.
सर्व शांत बसले होते. परंतु, वर्धमान एका ठिकाणी खूप वेळ निरखून पाहत होता.
अचानक त्याने सर्वांना तिथे बोलावले.
सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
एक सौरमाला तयार झाली होती.
केशव : हे कसे घडले?? कोणी केले??
महेश : आपल्या सर्वांचे लक्ष तेथे असताना, येथे कधी ही सृष्टी तयार झाली आपल्याला कळलेच नाही.
वर्धमान : मी म्हणालेलो ना, काही गोष्टी उत्स्फूर्तपणे होतात त्यांना नियंत्रणाबाहेर राहू द्यावे.
आदिती : तुझं बरोबर आहे. या सौरमालेतील हा तिसरा ग्रह जीवसृष्टीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तरीही त्यावर फार कमी जीव आहेत व त्यांपासून मानव तयार होण्याची शक्यता नाही. आता काय करायचे??
सिद्धार्थ : नष्ट झालेल्या त्या ग्रहावरील अतिप्रगत मानवांपैकी काहीजण नक्कीच सुज्ञ होते. त्यांनी तो नष्ट होण्याआधीच काही जिवांना अंतरिक्षात पाठवले ज्यामध्ये मानव सुद्धा आहे. आपल्याला त्यांना येथे आणायचे आहे.
केशवने पुढील चर्चेची वाट न पाहता विद्युत चुंबकीय प्रावरणांचा वापर करत त्या अंतरिक्षयानांना योग्य वाटेवर नेत या ग्रहापर्यंत पोहोचवले.
ते सर्व जीव आता या ग्रहाचा भाग झालेत.
त्यांच्या प्रयत्नांविना तयार झालेल्या या ग्रहाचे सर्वांनाच खूप कौतुक सुद्धा होते व प्रचंड आशा सुद्धा होती.
ब्रम्हा : मला अपेक्षा आहे की, येथील मानव विश्वाचे कोडे नक्कीच उलगडेल.
आदिती : हो, कदाचित यासाठीच या जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे.
सिद्धार्थ : आता आपणास काही संदेश सुद्धा देण्याची गरज नाही. आपले संदेश या मानवाच्या कणाकणांत भिनले आहेत. ते वेळोवेळी समाजात येत राहतील.
त्यातूनच मानव विश्वाचे कोडे उलगडेल.
वर्धमान : हो नक्कीच. त्याची घाई मात्र नको. निर्मिती व विनाशाचे चक्र अनेक वेळा चालेल. संस्कृतीचे अनेक ताळेबंद प्रयोगात येतील. विचारांची व आचारांची प्रचंड घुसळन होईल व त्यातूनच कधीतरी एके दिवशी एक अमृतरुपी झरा पाझरेल.
विश्वाला जाणणाऱ्या त्या अत्युच्च विचाराची आपण शांतपणे वाट पाहू.
महेश : माझे काम संपले तर आता आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा माझ्याप्रमाणे शांतता बाळगायला आता हरकत नाही.
हा ग्रह खऱ्या अर्थाने आपल्या मेहनतीचे चीज आहे.
आपल्या आकांक्षाचे प्रतीक.
केशव, तुला सर्वांना नाव देण्याची खूप चांगली सवय आहे.
या ग्रहाला सुद्धा एक छानसे नाव देशील?
केशव : निश्चितच. या ग्रहाचे नाव असेल - पृथ्वी.
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा