रतन टाटा - सामान्यांतील असामान्य

 


मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ टाटा हाऊस नावाची एक इमारत आहे. या इमारतीबाहेर एक वृद्ध व्यक्ती आपल्या इंडिका कारमधून येते. अतिशय साधेसे दिसणारे असे कपडे व अतिशय नम्र मुद्रा. इमारतीत प्रवेश करून लिफ्टजवळ असलेल्या रांगेत हा व्यक्ती उभा राहतो. त्याच्यासमोर कंपनीचे काही कर्मचारी-कारकून वगैरे असतात. ते त्याला पुढे येण्यास विनंती करतात. मात्र हा व्यक्ती शांतपणे आपल्या जागी उभा राहतो. त्याच्या स्वभावाची सर्वांनाच कल्पना असते. लिफ्ट मधून वर जात ऑफिस सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी आजचे नियोजित काम या व्यक्तीने सुरू केलेले असते. रतन नवल टाटा, देशातील जुन्या व मजबूत उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला नवीन उंचीवर नेण्यास सिद्ध झालेले असतात.


२८ डिसेंबर १९३७ रोजी नवल आणि सूनू टाटा यांच्या पोटी जन्मलेले रतन टाटा आणि त्यांचा धाकटा भाऊ जिमी यांचे पालनपोषण त्यांच्या आजी नवजबाई आर टाटा यांनी मुंबई मधील टाटा पॅलेसमध्ये केले. रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रतन यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला.


टाटांचे बालपण अतिशय विलासी होते. रोल्स रॉयस कारमध्ये ते शाळेत जात असत. तेव्हापासूनच गाड्यांचा प्रचंड शौक. आपल्या भारतात सुद्धा अशीच एखादी गाडी बनावी हे स्वप्न. बालपणीच्या रतनला उच्चभ्रू वस्तूंनी जरी आकर्षित केले असले, तरी प्रौढ रतन मात्र सामान्यांच्या संवेदनांशी एकरूप झाला होता. त्यामुळे आधी इंडिका व नंतर सामान्यांना अगदी परवडेल अशी नॅनो कार रतन टाटांनी निर्माण केली.

या स्वप्नाला मात्र सोडले नाही. त्यामुळेच जगप्रसिद्ध कार कंपनी जग्वार ताब्यात घेतली. आज टाटा मोटर्सच्या एकूण लाभापैकी ८० टक्के लाभ त्यांना जग्वार मधून मिळतो.

आकाशात उत्तुंग भरारी घेत जमिनीवर पाय असणारे असे हे दुर्मिळ व्यक्तिमत्व.


श्री टाटा यांचे शालेय शिक्षण कॅम्पियन येथे झाले आणि नंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन (दोन्ही मुंबईत), जिथे त्यांनी त्यांच्या शालेय शिक्षणाची शेवटची तीन वर्षे घालवली. 

शाळेत असताना रतन टाटा अतिशय लाजाळू होते. त्यांचे जास्त मित्र नव्हते. तसेच सामूहिक गप्पांमध्ये किंवा भाषण-चर्चा अशा उपक्रमांमध्ये त्यांनी कधी भाग घेतला नाही. त्यांच्या गणिताच्या शिक्षकाचे हे ठाम मत होते की,'हा मुलगा आपले शिक्षण पूर्ण करणार नाही. हा अभ्यासात अतिशय कच्चा आहे.' सुदैवाने त्यांच्या शिक्षकाची भविष्यवाणी खोटी ठरली.


शाळा पूर्ण करून ते युनायटेड स्टेट्समधील कॉर्नेल विद्यापीठात गेले.

कॉर्नेल येथे त्यांनी आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 

अमेरिकेतील मनमोकळे वातावरण, समाजातील समानता, एकमेकांना आदर देण्याची प्रवृत्ती, बुद्धिवंतांना समाजमान्यता आणि प्रामाणिकपणा त्यांना खूप आवडला. जवळजवळ सात वर्षे त्यांनी अमेरिकेत घालवली. ते अमेरिकेच्या एवढ्या प्रेमात पडले होते की, लॉस एंजल्स या शहरात कायमचे स्थायिक होण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला. परंतु, आजीची तब्येत खराब झाल्याने त्यांना भारतात परत यावे लागले.


भारतात परत आल्यानंतर सुद्धा अमेरिकेतील अतिशय भव्य अशी कंपनी IBM मध्ये काम करण्यास त्यांची निवड झाली होती. त्या वेळचे टाटा समूहाचे अध्यक्ष जेआरडी टाटा मात्र यावर नाखुश झाले. भारतातील गुणवत्तेने भारताच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे, ही जेआरडी टाटांची विचारसरणी होती. या विचाराची सुरुवात घरातूनच व्हावी, हा अट्टाहास सुद्धा होता. आज विदेशात जाऊन तेथे स्थायिक होणारे आणि वर 'मेरा भारत महान' म्हणणारे विदेशी भारतीय पाहिलेत की अशा लोकांची महानता पटते.


रतन टाटांचे वडील नवल टाटा, समाजात मिसळणारे, मनमोकळेपणाने बोलणारे व प्रत्येकाशी सहज संवाद साधणारे असे व्यक्तिमत्व होते. रतन टाटांकडून सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांना हीच अपेक्षा होती. मात्र हे व्यक्तिमत्व अतिशय वेगळे होते. अमेरिकेतील सहवासाने समाजात मिसळण्याकडे थोडा कल आला होता मात्र अजूनही त्या आत्मविश्वासाची कमतरता होती. जे जमत नाही, ते शिकून घ्यायचं; या खाक्यामुळे रतन टाटांनी आपल्या या कमतरतेवर लवकरच मात केली.


टाटा समूहाच्या विविध विभागांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी शिक्षण घेणे मात्र सोडले नाही. यामुळेच जगाची मागणी काय आहे व पुढील व्यवसायाचा कल कोणत्या दिशेने आहे, हे जाणून घेण्यास त्यांना मदत झाली. 

१९८३ साली, टाटा समूहाने पुढील २५ वर्षे नेमके काय करावे जेणेकरून भारतातीलच नव्हे, तर जगातील एक मुख्य उद्योग म्हणून त्यांना उभारी कशी घेता येईल, याचा आराखडा त्यांनी मांडला.

टाटा समूहाबाहेर सुद्धा त्यांचे कर्तुत्व होतेच. पाच वर्षे ते एअर इंडियाचे अध्यक्ष राहिले.


जेआरडी टाटांनंतर १९९१ साली टाटा समूहाची अध्यक्षसूत्रे हाती घेण्यास ते तयार झाले.

अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या उदारीकरण्याच्या धोरणाचे लाभ कशाप्रकारे घेता येतील, हे समजण्यासाठी नवीन नेतृत्वाची आवश्यकता होतीच. रतन टाटांकडे यासाठी योजना तयार होत्या. हे अध्यक्षपद मात्र अगदी सहजासहजी त्यांच्याकडे आले नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली. एकदा त्यांच्यावर गोळीबार सुद्धा झाला. या सर्व टीकांना व द्वेषाला अतिशय शालीनतेने व शांतपणे उत्तर देत त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.


जर आपण जागतिक शांततेची अपेक्षा करत आहोत तर याची सुरुवात स्वतःच्या मन:शांतीने करायला हवी, हे रतन टाटांचे मत. अतिशय श्रीमंत असल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका सुद्धा झाल्या. 

त्यांच्या मते, 'गरिबी व निरक्षरता जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यात असणारा द्वेष आर्थिक सदगुणांना सुद्धा गुन्हेगार ठरवतो.' याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने आपल्या हिमतीने व सरळमार्गाने जरी बराचसा पैसा कमावला असेल, तरी समाजातील गरीब वर्ग त्याच्याकडे गुन्हेगारासारखेच पाहतो.

यासाठी रतन टाटा गरीब वर्गाला दोषी मात्र मानत नसत. त्यांच्या या द्वेषाला प्रेमामध्ये बदलण्यासाठी आपल्याकडील अतिरिक्त असं सर्व त्यांना देणे, हे त्यांनी आपले कर्तव्य मानले.


शिक्षणाने ते आर्किटेक्चर होते. या अभ्यासात व या कलेत त्यांना विशेष असा रस होता.

परंतु, आपल्या कलेचा त्यांना जास्तीत जास्त वापर करून घेता आला नाही. काही इमारती मात्र त्यांनी बांधल्या. जसे की, त्यांनी त्यांच्या आईसाठी डिझाइन केलेले घर, अलिबागमधील निवासस्थान आणि मुंबईतील त्यांचे स्वतःचे समुद्रकिनारी घर यापैकी सर्वात प्रमुख होते.

स्वतः गाडी चालवणे, संगीत शिकणे, स्कूबा डाइव्ह करणे अशा इतर गोष्टींचा छंद सुद्धा त्यांना होता व अनेक छंद त्यांनी व्यवस्थित जपले. छंद मनुष्यातील प्रयोगात्मकता व साहस वाढवतात, याची प्रचिती रतन टाटांना पाहून येते.


त्यांना कोणत्याही गोष्टीचे व्यसन नव्हते. 'एखादे व्यसन झेपेल, एवढा मी श्रीमंत नाही', हे त्यांचे म्हणणे आजच्या मध्यमवर्गाने अगदी मनावर कोरून घ्यायला हवे असे.

त्यांनी अविवाहित राहणे पसंत केले. 

काही मिथकांनुसार त्यांचे एका मुलीवर प्रेम होते, मात्र तिच्याशी विवाह होऊ न शकल्याने त्यांनी अविवाहित राहणे पसंत केले. हे किती खरे, ते सांगणे कठीण. 

आपला कुत्रा वारल्यानंतर त्याच्या रिकाम्या जागेकडे पाहून उदास होणारे रतन टाटा, काही दिवसांनी एक नवीन पिल्लू आणून त्याच जागी ठेवत व त्याला प्रेमाने वाढवत. 

'मला कल्पना असायची की काही वर्षांनी हा सुद्धा आपल्याला सोडून जाणार आहे, तरी आपल्या आयुष्यातील एखादी जागा रिकामी ठेवणे निश्चितच योग्य नाही.' ही विचारसरणी असणारे रतन टाटा एखाद्या व्यक्तीची ती जागा, या कारणाने तसेच ठेवत असतील हे मान्य करणे जरा कठीण.


एक काळ असा होता की, ब्रिटिशांनी भारतात येऊन आपले सर्व उद्योग ताब्यात घेतले होते. भारतातील उद्योगांना संपवले होते. रतन टाटांनी काळाची चक्रे उलट फिरवली.

टेटले ही ब्रिटिश चहानिर्मिती कंपनी, कोरस ही अँग्लो-डच पोलादनिर्मिती कंपनी, जग्वार लँड रोव्हर ही ब्रिटिश आलिशान मोटारनिर्मिती कंपनी अशी टाटांनी अधिग्रहित केलेली काही बड्या कंपन्यांची नावे. 

२००४मध्ये एका मुलाखतीमध्ये रतन टाटा म्हणाले होते, की येत्या १०० वर्षांमध्ये आमच्या पाऊलखुणा जगभर दिसून येतील, याविषयी मी आशावादी आहे. भारताप्रमाणेच जगातही आम्ही आत्मविश्वासाने वावरताना दिसू. जगात भरारी घेण्याचे टाटांचे धोरण अत्यंत धाडसी होते.


अशा या महान व्यक्तिमत्त्वाला भारत शासनाने २००८ साली पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरवले. रतन टाटांसारखे मनुष्य क्वचितच समाजात घडत असतात. त्यांचा आदर सन्मान होणे अपेक्षितच, सोबतच त्यांच्याकडून काही शिकणे व ते कृतीत आणणे प्रत्येकासाठी लाभदायक ठरू शकते. एका उद्योजकाने आपल्या मुलाच्या लग्नात केलेल्या प्रचंड खर्चानंतर लगेच, आपल्या मोबाईल कंपनीचे दर वाढवले. दुसरीकडे टाटा समूहाने मात्र रतन टाटांच्या मृत्यूनंतर पुढीलच दिवशी, सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आगाऊ जाहीर केला. हा फरक असतो तत्त्वानिशी वावरणाऱ्या एका उद्योजकामध्ये आणि फक्त पैशाच्या मागे धावणाऱ्या एका व्यापाऱ्यामध्ये.


कधी अंबानी तर कधी अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले जातात. शासनाला हाताशी धरून जवळजवळ प्रत्येक उद्योग व भरमसाठ नफा या दोन्ही व्यापाऱ्यांनी घशात टाकला आहे. हे करणे रतन टाटांना शक्य नव्हते का? 

कधी कधी स्वप्न व ध्येय माणसांना वेगळी करतात.

स्वतः सर्वात श्रीमंत होण्यापेक्षा या देशाला प्रगतीकडे कशाप्रकारे घेऊन जाता येईल व जगभरात भारताचा ठसा कसा उमटवता येईल, हे उंच शिखर पादाक्रांत करण्याचे ध्येय ठेवणारा एक वीर निश्चितच भारताने गमावला आहे.


- अमित 



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट