भारतीय मुसलमान
मी व माझे मित्र एकदा गप्पा मारत बसलो होतो. गप्पा धार्मिक गोष्टींकडे वळल्या. माझ्या एका मैत्रिणीने विचारले, 'अमित, देव ही संकल्पना कशी अस्तित्वात आली?'
तसे तर या प्रश्नाचे लांबलचक उत्तर आहे.
मात्र मी थोडक्यात सांगितले, ' हिंदू धर्मामध्ये नैसर्गिक शक्तींना देवाचे स्वरूप दिले. तसेच काही महान माणसे होऊन गेली, ज्यांनी लोकांसाठी अशी कामे केली की त्यांना देवत्व मिळाले असावे.'
मैत्रीण - ' असे कोणते देव आहेत?'
मी - ' हे सांगणे कठीण आहे. परंतु, आपल्या शिवाजी महाराजांचेच उदाहरण घे. ते आपल्यासाठी देवापेक्षा कमी आहेत का? आज आपण त्यांना देवासमान मानतोय. पुढची पिढी कदाचित त्यांना देवच म्हणेल. याप्रकारे काही देवांना देवत्व मिळाले असावे.'
मैत्रीण - 'कदाचित याप्रकारेच मग बहुतेक देव तयार झाले असतील. शेवटी मानवी भावना ज्यांना आदर देतात त्यांना देवत्व मिळतेच.'
मी - ' हो. शक्यता आहे. कारण हीच गोष्ट प्रत्येक धर्मात पाहिली जाते. इस्लाम मध्ये मोहम्मद पैगंबर असो किंवा ख्रिश्चनिटीमध्ये जीजस ख्राईस्ट. त्यांना देवाचा दर्जा आहेच.'
तिथे माझा एक मित्र 'झायेद' बसला होता.
झायेद - 'मोहम्मद पैगंबर देव नव्हते.'
मी - ' हो. मी सुद्धा तेच बोलतोय. त्यांना मनुष्य असून देवाचा दर्जा तर दिला जातो ना?'
झायेद - ' ते मनुष्य नव्हते.'
मी - ' त्यांचा जन्म व मृत्यू झाला ना?'
झायेद - ' नाही, त्यांचा मृत्यू नाही झाला.'
मी - ' मग तर त्यांना देवच म्हणावं लागेल.'
झायेद - 'नाही. ते रसूल होते. देवाचे दूत होते. एक पवित्र आत्मा.'
मी - ' बरं ठीक आहे.'
इस्लाममध्ये काही वेगळ्या संकल्पना आहेत. त्याक्षणी मला जाणीव झाली की, मला या सर्वच संकल्पना नीट माहीत नाहीत. चर्चेचा मुद्दा सुद्धा तो नव्हताच. त्यामुळे त्याच्याशी पुढे न बोलता मी मूळ विषयावर पुन्हा आलो. माझी एक दोन वाक्य बोलून झाल्यावर, तो आम्हाला म्हणाला की, 'मला आता निघावे लागेल, पुन्हा भेटू.'
मला समजले की, झालेल्या चर्चेने त्याचे मन दुखावले व त्यामुळे तो जातोय.
मी - ' मला या सर्व गोष्टी नीट माहीत नव्हत्या. असं उठून निघून जाण्यापेक्षा, ज्या तुझ्या मान्यता आहेत; त्या तू आमच्यासमोर खुलेपणाने मांडायला हव्या.'
झायेद - ' त्याचा काय उपयोग, तू ते मान्य करशील का?'
मी - ' मानवाने तयार केलेल्या कोणत्याही देवावर किंवा देवदूतावर अजून तरी माझा विश्वास नाही. हा विश्वास न ठेवणे, हे माझे स्वातंत्र्य आहे आणि जर बळजबरीने किंवा भावनिक अपेक्षा ठेवून मला तो विश्वास ठेवायला भाग पाडण्यात आले; तर त्यामुळे जो धर्म असे करेल त्या धर्माचीच हानी होणार आहे. कारण मग त्या धर्मात असा एक मनुष्य असणार आहे, जो खऱ्या मनाने त्या धर्माचा नसेल.'
झायेद - ' बरोबर. मग अशा व्यक्तीसमोर या धार्मिक गोष्टी सांगण्याचा काय उपयोग?'
मी - ' धार्मिकतेमध्ये उपयोग कधीपासून येऊ लागला? धार्मिकता म्हणजे नि:स्वार्थीपणा नव्हे काय? किंबहुना तुमचे आचरण, तुमची धार्मिक शिकवण सांगत असते. याप्रमाणे रागावून निघून जाणे, हे मनाची दुर्बलता दर्शवते. एखाद्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे, ही धर्माची शिकवण नाही का?'
झायेद - 'आम्ही मुसलमान कधी तुमच्या हिंदू देवांची नावे सुद्धा काढत नाही; मग तुम्ही आमच्या देवाबद्दल किंवा प्रेषिताबद्दल का बोलता?'
मी - ' अरे वा! आपल्या दोघांमध्ये आता भेद तयार झाला तर! काही हरकत नाही.
मला वाटले इस्लाम मध्ये विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे; म्हणून ईदला शीरखुर्मा खायला सर्व धर्मीयांना बोलावले जाते.'
झायेद - ' आहेच विश्वबंधुत्वाची संकल्पना व सर्व चांगले व्यक्ती मग ते कोणत्याही धर्माचे असो माझे बंधूच आहेत. माझ्या शब्दांबद्दल मला माफ कर. मात्र माझ्या प्रेषिताबद्दल जर कोणी काहीही बोलत असेल, तर ते न ऐकण्याचा अधिकार मला सुद्धा नाही का?'
मी - ' हा 'काहीही' शब्द फार वाईट. मी मोहम्मद पैगंबरांबद्दल काढलेला एक सुद्धा अनुचित शब्द मला सांग.'
तो काही बोलला नाही.
मी - 'झायेद, धार्मिकता आपली शक्ती असावी, दुर्बलता नाही. ख्रिश्चन समुदाय सुद्धा या प्रकारे भावनांना धरून होता. परंतु, त्यांनी दृष्टिकोन बदलला. त्यांचा देवदूत हा मनुष्यच होता, हे सांगणारा आज एक मोठा ख्रिश्चन समुदाय आपल्याला आढळतो आणि यामुळेच ते प्रगत आहेत. हा दृष्टिकोन सत्य तपासतो. बुद्धीला पटेल त्याचाच स्वीकार करतो.'
झायेद - ' मग माझ्या भावनांना काहीच महत्त्व नाही का?'
मी - ' तुझ्या भावना तुला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत, हे तपासणे तुझे कर्तव्य आहे. कारण भावनांचा बहुतेकदा वापर करून घेतला जातो. भारतात असे अनेक राजकारणी आहेत, ज्यांनी व्यक्तींच्या धार्मिकतेचा खूप छान वापर करून घेतला आहे. धर्माशी संबंधित भावना व विश्वास या स्वतःपुरत्या मर्यादित असायला हव्यात. कोणी, कोणाबद्दल, काय म्हणाले; याने जर एखाद्याचे मन दुखावले जात असेल, तर त्याला धर्म समजलाच नाही असे मी म्हणेन.'
झायेद यावर काहीच बोलला नाही. शांत बसला. त्याला माझे म्हणणे पटले असेल किंवा नसेल, ती पुढची गोष्ट. मात्र एक असा तरुण, जो आपल्या धार्मिकतेवर असहनशील होता; त्याने काही काळ का असेना त्यावर चर्चेची सहनशीलता दाखवली याचाच मला आनंद झाला.
भारतीय मुस्लिम तरुणांचा हा एक गोंधळ उडतो. खासगी धार्मिक मान्यता वेगळ्या व सामाजिक वेगळ्या. त्यामुळे त्यांना त्या स्पष्ट प्रकट करता येत नाहीत. हे प्रकट न करता येणे, त्यांना कमीपणाचे वाटते. कधीतरी आपल्यावर अन्याय होतोय, ही जाणीव सुद्धा होऊ शकते. त्यात भारतातील राजकारण वातावरण आणखी खराब करते. आपल्या धार्मिक मान्यतांना समोरचा विरोधच करेल, हा नकारात्मक भाव सुद्धा मुस्लिम तरुणांमध्ये तयार झाला आहे. धर्म ही दोन व्यक्तींना जवळ आणणारी गोष्ट ठरली पाहिजे. जर यामुळे ते समाजापासून दुरावत असतील, तर याहून वाईट ती गोष्ट काय?
भारतात प्रत्येक धर्मात असे अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना आपल्या धर्माबद्दल, देवाबद्दल इतर कोणी काही चुकीचे म्हणाले तर राग येतो. मग अर्वाच्च शिव्या, मोडतोड, मारहाण अशा घटना सामान्य आहेत. धर्म हे मन शांत करण्याचे साधन आहे. जर हाच धर्म आज भारतीयांचे मन अशांत करत असेल, तर भारतीय धर्मापासून दुरावत आहेत हे मला खेदाने नमूद करावे लागेल.
- अमित
.jpeg)
.jpeg)

👌
उत्तर द्याहटवा🙏
हटवा