ऑलिम्पिक
"ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवणं नाही, तर सहभाग घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे, आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वांत महत्त्वाचं आहे."
आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानले जाणाऱ्या "पिएर द कुबेर्तान" यांच्या या विधानात खेळांचंच नाही, तर जगण्याचं सूत्रही सामावलं आहे.
प्राचीन ग्रीस देशातील ऑलिम्पिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिम्पिक क्रीडासामने हे नाव पडले. ग्रीकांच्या शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षण, आहार व आरोग्यसंवर्धन यांवर विशेष लक्ष दिले जाई.
ग्रीस मध्ये चार महत्त्वाच्या ठिकाणी खेळांची मोठी जत्रा भरायची :
ऑलिम्पिक खेळ - ऑलिम्पिया
दडेल्फी - पायथियन गेम्स
निमिया - निमीयन खेळ
तेकरिंथ - इस्थमियन गेम्स
नंतर रोम, नेपल्स, ओडेसस, अँटिओक आणि अलेक्झांड्रिया सारख्या जवळपास १५० शहरांमध्ये असे उत्सव छोट्या प्रमाणात आयोजित केले गेले .
ग्रीकांसाठी ऑलिम्पिक हा एक धार्मिक उत्सवही होता. ग्रीक संस्कृतीत झ्यूस हा देवांचा राजा मानला जायचा. त्याच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया इथे या खेळांचं आयोजन केलं जायचं. इथेच झ्यूसचं मंदिर होतं आणि त्यात त्याची सोनं आणि हस्तिदंतानं मढवलेली मूर्ती होती. तिथे धार्मिक विधीही होत असत, प्राण्यांचा बळी देण्याचीही प्रथा होती.
त्या काळी विजेत्यांना पदक किंवा पैसे नाही, तर ऑलिव्हच्या फांदीपासून तयार केलेला मुकुट दिला जायचा आणि ते त्यांच्या गावी परतल्यावर मोठा मानसन्मान मिळायचा. खेळाडू आपल्या नगरराज्याची शान राखण्यासाठी खेळायला उतरायचे.
एरवी या नगरराज्यांमध्ये युद्धं, लढाया, भांडणं व्हायची. पण ऑलिंपिकच्या काळात 'पवित्र युद्धबंदी' लागू केली जायची. खेळाडू आणि प्रेक्षक ऑलिम्पियाला जाऊन सुखरूपपणे परत येऊ शकतील, यासाठी ही युद्धबंदी व्हायची. ऑलिंपिक स्पर्धा हे तेव्हापासूनच शांतीचं प्रतीक मानलं जातं. या सामन्यांचा कालावधी सामान्यत: दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास चारपाच दिवसांचा असे.
या खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू नग्नच असत. याची विविध कारणे असू शकतात -
१) नग्नता ही एका पवित्र प्रथेप्रमाणे होती.
२) मानव अश्मयुगीन कालापासून, म्हणजेच त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये नग्न होता.
३) ग्रीक लोकांची ही मान्यता होती की, नग्नतेमध्ये कोणतीही हानी टाळण्याची एक जादुई शक्ती असते.
४) विशेषतः उच्चवर्गीय लोकांना सार्वजनिक नग्नता दाखवणे आवडायचे. ते त्यांची शक्ती व सौंदर्याचे लक्षण मानायचे.
मुख्य शर्यतीचे मैदान व प्रेक्षागृह फारच भव्य होते. त्यात एका वेळी ५०,००० लोक सहज सामावले जात. क्रीडांगणावर सामान्यत: भुसभुशीत वाळू पसरलेली असे व भाग घेणारे खेळाडू अनवाणीच धावत असत. ऑलिम्पिक क्रीडासामन्यांत भाग घेणाऱ्या खेळाडूंना सामन्यांपूर्वी १० महिने व्रतस्थ राहून नियमितपणे तयारी केल्याचा दाखला घ्यावा लागे. प्रथमत: फक्त शुद्ध ग्रीक रक्ताच्या ३० वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूसच या सामन्यांत भाग घेता येत असे. सामन्यांच्या प्रारंभी खेळाडूंना आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या समवेत शर्यतीत, ‘सचोटीने भाग घेऊ व खेळास कमीपणा आणणारे कोणतेही वर्तन करणार नाही’, अशी शपथ घ्यावी लागे. सामन्यांची व्यवस्था पाहणाऱ्या पंचांनासुद्धा शपथ घ्यावी लागे.
खेळात जेव्हा राजकारण येते, तेव्हा तो संपतो; हे ग्रीकांनी सुद्धा अनुभवले. उच्च क्षमतांचा विकास करणारा खेळ मागे पडून, एकमेकांना शत्रुत्वाचे आव्हान देत साजरी केली जाणारी दंगल; असे या खेळाचे स्वरूप पालटले. कालांतराने ग्रीक परंपरा नष्ट झाल्या व रोमन लोकांच्या कारकीर्दीत तर सामन्यांना रानटी व हिंस्र स्वरूप प्राप्त झाले. धावण्याच्या व उड्या मारण्याच्या शर्यती, कुस्त्या, द्वंद्वे यांऐवजी घोड्यांच्या व रथांच्या शर्यती सुरू झाल्या व प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करून नामोहरम करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. नंतर, रानटी प्राणी - विरुद्ध मनुष्य, अशा स्पर्धा सुरू झाल्या. तसेच मनुष्यांच्या लढाईमध्ये समोरील स्पर्धकाला ठार मारण्याची प्रवृत्ती वाढली. या सामन्यांतील वीर समाजातील पुढाऱ्यांपेक्षाही बलवान झाले व त्यामुळे समाजस्थैर्याला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे ३९४ साली त्यावेळच्या थीओडोशियस या रोमन बादशहाने कायद्याने या सामन्यांवर बंदी घातली.
ग्रीस देशातील अथेन्स शहरात १८९६ साली आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात झाली.अँटवर्प (बेल्जियम) येथे १९२० साली भरलेल्या सातव्या ऑलिम्पिक क्रीडासामन्यात भाग घेण्यासाठी सर दोराबजी टाटा यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे २ कुस्तीगीर व ४ खेळाडू यांचा पहिला अनधिकृत भारतीय संघ पाठविण्यात आला. पण त्यांच्यापैकी कोणालाच यश मिळाले नाही. १९२८ च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांसाठी श्री. सोंधी यांच्या नेतृत्वाखाली २५ खेळाडूंचा संघ पाठविण्यात आला. त्यांतील भारतीय हॉकी संघाने सर्व संघावर मात करून जागतिक अजिंक्यपद मिळविले. हे भारताचे ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक.
पॅरिस ऑलिम्पिक हे एका कारणाने खास आहे. कारण, १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये महिला पहिल्यांदा सहभागी झाल्या. हे दुसरंच ऑलिंपिक होतं.
या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ९९७ स्पर्धकांपैकी २२ महिला होत्या.
१४५ करोड लोकसंख्येच्या भारताने या ऑलिम्पिक मध्ये केवळ ११७ अथलीट्स पाठवले आहेत. भारतात खेळांच्या संघटनांमध्ये आलेले राजकारण व क्रिकेट सारख्या क्षूल्लक खेळांना दिले गेलेले महत्त्व आपल्या अपयशाचे कारण ठरते. भ्रष्टाचार तर भारताच्या पाचवीलाच पूजला आहे. प्रतिभावान खेळाडूंना डावलून, श्रीमंतांच्या किंवा ओळखीच्या खेळाडूंना दिले जाणारे स्थान, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर ठेवते.
आज देशाला गरज आहे, क्रीडा क्षेत्रात मोठी मजल मारण्यासाठी पुढील २० ते ५० वर्षांचे लक्ष ठेवत एक प्रभावी क्रीडाधोरण आखाण्याची. तरच भारत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपली मोहर उमटवू शकेल.
- अमित

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा