पाकिस्तानी हिंदूंचा प्रश्न
![]() |
15 ऑगस्ट 1947 ला भारताची फाळणी झाली. या देशातील बहुसंख्य हिंदू व मुस्लिम नागरिकांना आपला देश स्वतंत्र तर हवा होता; मात्र त्याचे असे तुकडे होणे, त्यांना मंजूर नव्हते. परंतु, ही फाळणी अपरिहार्य होती. मोहम्मद अली जिना, त्याची संघटना मुस्लिम लीग व त्यांना पाठिंबा देणारे मुस्लिम नागरिक हिंदू विरोधात द्वेषाने भरले होते. दुसरीकडे विनायक दामोदर सावरकर, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांना पाठिंबा देणारे हिंदू, मुस्लिम द्वेषाने भरले होते. हे लोक एकमेकांसोबत एका देशात राहण्यास कदापि तयार नव्हते. ब्रिटिश शासनाला सुद्धा हेच हवे होते. फाळणी झाली.
आजचा बांगलादेश म्हणजे त्या वेळेचा पाकिस्तानच. आजच्या पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तान व बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हणायचे. 1971 ला इंदिरा गांधीने पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तान हाच आजचा पाकिस्तान राहिला.
तर या भागात 1947 ला फाळणीपूर्वी 14 टक्के लोकसंख्या हिंदू होती.
फाळणी झाल्यानंतर बहुतांशी हिंदू भारतात निघून आलेत. फक्त 1.6% हिंदू पाकिस्तान मध्ये राहिलेत. पाकिस्तानने या हिंदूंना स्वीकारले. त्यांना विधिमंडळात आरक्षण दिले, कायद्यामध्ये त्यांच्यासाठी विशेष तरतुदी झाल्या. तरीही पाकिस्तान हा अधिकृतरित्या इस्लामिक देश असल्याने, हिंदूंना पूर्ण स्वतंत्रता असणे मुश्किल होते.
स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटलीत. पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. उत्पन्न वाढले. आज पाकिस्तानच्या आर्मी, नेव्ही व एअर फोर्स मध्ये सुद्धा हिंदू पाकिस्तानची सेवा करत आहेत. त्यांच्या सिंध प्रांतात हिंदू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हिंदूंचे सर्व सण तेथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. तेथील मुस्लिम सुद्धा या सर्व सणांमध्ये सहभागी होतात. BBC ने तेथील हिंदूंची मुलाखत घेतली. यामध्ये तेथील हिंदूंचे पाकिस्तान बद्दलचे प्रेम व पाकिस्तानवर असणारे निष्ठा जाणवली. उलट त्यांनी भारत शासनावर आरोप केलेत की, भारत भेटीसाठी त्यांना मुद्दाम विसा नाकारला जातो.
एवढे सर्व आलबेल असताना, नेमकी समस्या काय उद्भवली??
हिंदू मुलींचे मोठ्या प्रमाणात होत असणारे धर्मांतर, हा सध्याचा विषय. पाकिस्तान शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास 1000 हिंदूंचे धर्मांतर होते. ही गोष्ट फक्त यावर्षीची नाही. अनेक वर्षांपासून हे होत आहे. बरं हे धर्मांतर फक्त इस्लाम मध्ये होतं का?? तर नाही. बरीच धर्मांधरे ख्रिश्चन धर्मामध्ये होतात.
दुसरी गोष्ट, धर्मांतर फक्त हिंदू मुलींचे होते का??
तर नाही. मुस्लिम व ख्रिश्चन मुलींचे सुद्धा धर्मांतर घडवले जाते.
हे घडवण्यात लग्न हे सर्वात मुख्य कारण आहे.
त्यामुळे बहुतेकदा या सर्व मुली स्वतःहून या धर्मांतरासाठी तयार असतात.
जी धर्मांतरे बळजबरीने होतात, त्यामध्ये 90% प्रकरणात व्यक्ती अधिकृतरित्या आपला जुना धर्म स्वीकारतात.
असे नाही की पुरुष धर्मांतर करत नाहीत किंवा त्यांचे धर्मांतर घडवून आणले जात नाही. मात्र मुलींचे धर्मांतर, ही गोष्ट जर बातमीद्वारे पसरवली गेली तर त्यास एक वेगळा दृष्टिकोन लाभतो. त्यामुळे मुद्दाम मुलींचे धर्मांतर हेच बातम्यांमध्ये ठासून सांगितले जाते.
पाकिस्तानी वृत्तपत्र Dawn ने, भारत शासनाने आणलेल्या CAA कायद्यावेळी पाकिस्तानी हिंदूंची मुलाखत घेतली होती. 'भारतात तुम्हाला आता सहज नागरिकत्व मिळेल. तर तुम्ही भारतात जाण्यास उत्सुक आहात का,' हा या मुलाखतीमधील मुख्य प्रश्न होता. बहुतांशी पाकिस्तानी हिंदूंचे उत्तर नकारार्थी होते. हे साहजिक सुद्धा आहे. आपण ज्या प्रदेशात, ज्या लोकांमध्ये, ज्या संस्कृतीमध्ये वाढतो, त्याच भागाशी आपले मन जोडलेले असते. जर खरंच पाकिस्तानी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असते, तर भारत शासनाने पुरवलेल्या या सुविधेचा लाभ तेथील सर्व हिंदूंनी घेतला असता.
तर मग तेथील होणारे सक्तीचे धर्मांतर हा ठळक मुद्दा नाही का??
तेथील नागरिकांसाठी, नाही. ज्याप्रमाणे भारतात आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या धर्मांतरांना विशेष महत्त्व देत नाही, तसेच तेथील नागरिकांचे सुद्धा आहे.
भारतात मात्र या मुद्द्याला खूप विशेष महत्त्व आज दिले जात आहे. परंतु,आत्ताच का?
पाकिस्तानमध्ये ही धर्मांतरे तर गेली अनेक वर्ष घडत आहेत. मग हे पाकिस्तानी हिंदूंबद्दलचे प्रेम आज का उफाळून आले??
याचे कारण इस्त्राईलने पॅलेस्टिनी नागरिकांची केलेली क्रूर हत्या.
संपूर्ण जगभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. मला कळत नाही भारतातील काही हिंदूंना नेमके काय झाले आहे. अगदी इस्त्राईलचे गुलाम असल्यासारखे वागतात. इस्त्राईल हा ज्यूधर्मीय देश आहे. यांचेच वंशज आजची इस्लाम जनता. आपला हिंदू धर्म माणुसकी शिकवतो, अत्याचाराचा विरोध शिकवतो. आतंकवादी संघटना हमासने गुन्हा केला. इस्त्राईलची सेना निरपराध पॅलेस्टिनी नागरिकांना मारून त्यांच्याहून मोठा गुन्हा करत आहेत. परंतु, मरणारे फक्त मुस्लिम आहेत या कारणाने भारतातले काही हिंदू इस्त्राईलचे बटीक असल्यासारखे वागत त्यांना पाठिंबा देत आहेत. लहान मुलांची प्रेते पाहून सुद्धा जर तुम्हाला काही वाटत नसेल, तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे.
मग कारण दिले जाते की, त्यांनी आतंकवादी हल्ला का केला?? मग यांनी असे केले तर काय चूक आहे?? हे प्रश्न कलुषित मने आणि राक्षसी प्रवृत्तीच दर्शवतात.
पाकिस्तानी हिंदूंबद्दल एवढे ममत्व ठेवणारे हेच सर्व लोक मणिपूर बद्दल का काही बोलत नाहीत?? याचे अजून एक कारण मला उमगले आहे.
पाकिस्तानी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारे बहुतेक लोक फक्त आपल्या पुढाऱ्यांचे किंवा धार्मिक संघटनांचे आदेश आलेत म्हणून किंवा इतर हिंदू स्टेटस ठेवतात तर आपण सुद्धा ठेवूया या भावनेने पाठिंबा देत आहेत.
आपण आपल्या संवेदना मांडताना फक्त राजकीय आणि धार्मिक विचार करायचा की खऱ्या अर्थाने माणुसकीला जिवंत ठेवायचे, यापैकी एकाची निवड आज मनुष्याला करायचे आहे. ही निवड जगाचे भविष्य ठरवेल.
- अमित
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा