पैसा आणि शिक्षण.. काही संबंध आहे का??

 


सुरुवातीलाच एक सत्य घटना सांगतो..

मध्ययुगीन काळात भारताचा अरब व्यापाऱ्यांशी मोठा व्यापार चालायचा. अनेक अरब व्यापारी इकडे किंवा अनेक भारतीय अरेबियामध्ये जाऊन स्थायिक होत असत. अशाच प्रकारे केरळमध्ये अनेक अरब व्यापारी येऊन स्थायिक झाले. येथील स्त्रियांशी त्यांनी लग्न केलीत. केरळमध्ये त्यांना मोपला बोलले जाऊ लागले. मोपला म्हणजेच मल्याळम भाषेत जावई. याप्रकारे मोपला मुस्लिम समुदाय तयार झाला. घरची श्रीमंती व व्यापार, यामुळे हा सुख-समृद्धीने संपन्न असा समुदाय होता. 


काही काळानंतर इंग्रजांचे राज्य आले. आपला अरेबिया सोबतचा व्यापार थांबला. केरळमध्ये याचा सर्वात मोठा फटका मोपला मुसलमानांना बसला. हिंदू समुदायाने स्वतःमध्ये बदल घडवत आपले जुने ग्रंथ-पुराणे बाजूला सारून इंग्रजी शिक्षण घेतले, इंग्रजांशी जवळीक साधली, जमीनदार झाले व पैसा कमावला. मोपला इंग्रजी शिक्षणापासून दूर राहिलेत. त्यांचे वैभव जाऊन, सामान्य शेतमजूर, ही मोपलांची नवीन ओळख तयार झाली.


तर हो.. शिक्षणाचा पैशाशी संबंध तर आहेच..


परंतु, आपण नेमके कोणते शिक्षण घेतोय, कशाप्रकारे घेतोय, या सर्व गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात.

मागील वर्षी एक बातमी वाचली होती. शिपाई पदासाठी हजारो पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्ज!! आता पीएचडी केलेल्या विद्यार्थ्याने एक तर संशोधन करावे किंवा शिकवावे. मग ही नामुष्की त्यांच्यावर का आली??

आज तुम्ही कोणतेही शिक्षण घ्या, पैसा कमावणे कठीण होत चालले आहे. 

यात दोष शिक्षणाचा आहे का??

की अजून काही आहे, जे तुम्हाला मागे ठेवतेय??


आज भारतातील कोणत्याही मुलाला/ मुलीला विचारले की, तुला भविष्यात काय व्हायचे आहे??

तर उत्तरादाखल तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी, शिक्षक किंवा फारतर क्रिकेटर ही उत्तरे ऐकायला मिळतील.

प्रयत्न सुद्धा यासाठीच होतात.

कोणी नाही बोलणार की, मला आचारी(शेफ) व्हायचे आहे, अपिकल्चरिस्ट व्हायचे आहे किंवा आर्किऑलॉजिस्ट व्हायचे आहे.

अनेकांना तर याप्रकारच्या काही गोष्टी असतात, हेच माहीत नसते.


प्रथमतः यास कारणीभूत आहे, भारतीय पालकांची मानसिकता. 

आम्हाला जे जमले नाही, ते आमच्या मुलांकडून आपण करून घेऊ..

अमक्याचा मुलगा हे करतोय, तमक्याची मुलगी ते करतेय तर आपल्या मुलांना पण तेच करायला सांगू..

असं कसं त्यांना जमत नाही, हवे तेवढे पैसे घालू पण त्यांच्याकडून तेच करवून घेऊ..

भारतात पाहिली जाणारी ही अतिशय सामान्य मानसिकता. या मानसिकतेमुळे अनेक बालकांचे गुण व कौशल्य संपतात. 

'थ्री इडीयट्स' मूव्ही मधल्या फरहान चे उदाहरण आठवून पहा..


मुलांबाबत बोलायचे झाले, तरीही तेच दिसून येते..

माझा हा मित्र हे करतोय, ती मैत्रीण ते करतेय, मग आपण सुद्धा तेच करू..

युट्युब किंवा त्यासारख्या सोशल मीडियावर पाहिले जाते की काही विशिष्ट नोकरी असणाऱ्या व्यक्तींना मान व पैसा भरपूर मिळतो, मग ते पाहून निर्णय घेतले जातात..


या दोन्ही बाबतीत होते असे की, रडतखडत का असेना, ठरवलेली पदवी कशीतरी मिळून जाते. त्यानंतरच्या संघर्षास मात्र अनेक जण तयार नसतात. मग जसं जे झेपेल ते करत रहायचं. तोपर्यंत लग्न-संसार इत्यादी जबाबदाऱ्या येतातच. त्यात रमून आपल्या अपयशाचे दुःख कमी करायचे. हे एकवेळ होऊन जाते. 


परंतु, पैशाचे काय??

ज्या श्रीमंतीची अपेक्षा होती.. स्वप्न होती.. ती कुठे गेली??

मध्यमवर्गीय दारिद्र्याच्या सापळ्यात कायम अडकून राहतो..

याचे महत्त्वाचे कारण, घेतलेल्या शिक्षणाचा अनेक जण एकांगी विचार करतात. त्यातून पैशाची निर्मिती करण्याचे हजारो मार्ग दुर्लक्षित केले जातात.


पुन्हा एक कथा.. यावेळी काल्पनिक..

इसवी सन पूर्व ८००० -

साम त्याच्या मुलावर प्रचंड रागावला होता. टोळीतील इतर तरुण व तरुणी भाले घेऊन कुटुंबीयांसाठी शिकार आणून देत असत. त्यांच्या शौर्याचे व बहादुरीचे किस्से रात्री टोळ्यांमध्ये गौरवाने गायले जात. त्याचा मुलगा बीजान मात्र काही ठराविक रोपट्यांच्या मागे आपला वेळ वाया घालवत असे. 

'त्या रोपट्यांना ठराविक प्रकारे उगवून त्यापासून एवढी अन्ननिर्मिती करेन की आपल्याला शिकार करावी लागणार नाही', हे बीजानचे मत.

या असल्या कल्पनांवर सामला विश्वास तर नव्हताच आणि असे झाले तरीही, शौर्य मानमरातब या गोष्टी असतात की नाही?? रोपांची लागवड करणारा 'दुर्बळ' अशी आपल्या मुलाची ख्याती सामला नको होती.

बीजान मात्र संशोधन करत राहिला. जे शिकला, त्यातून नवनवीन गोष्टी साध्य करत 'शेती' हा प्रकार टोळीवाल्यांसमोर आणला.

त्याच्या या प्रयोगाने संपूर्ण मानवजातीचा इतिहास बदलला.


आजच्या तरुणाईची गफलत हीच होते की, त्यांना एकाच वेळी मानमरातब व पैसा दोन्ही हवे असतात. दुष्काळात तेरावा तो असा की रिस्क नको, कष्ट नकोत. सर्व काही सहज झाले पाहिजे. 

कंटाळा हा मनुष्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यात हातात असलेल्या मोबाईलने एखाद्याचा किती वेळ वाया जातो, हे त्याचे त्याला कळत नाही.

मग पैसा कमावण्यासाठी हवे असलेले धोरण, ते घडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ओळखी किंवा उचलली जाणारी पावले योग्य वेळी योग्य दिशेने पडत नाहीत.


समाज काय विचार करेल?? 

एखाद्याला मागे ठेवणारा किंवा संपवणारा, यापेक्षा दुसरा विषारी प्रश्न असण्याची शक्यता नाही. सर्व हे मानतात सुद्धा की, हा प्रश्न निरर्थक आहे. परंतु, वागणूक तीच, जी समाजाला अभिप्रेत आहे.

समाज अनेक ढंगाचा असतो. आपण विचार करत बसायचे नाही. 

हा लेख वाचणारे अनेक जण मला ओळखतात. 

अनेक विद्या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत, त्या क्षेत्रामध्ये शिकवण्याचे काम मी सध्या करतो.

'किती प्रयत्न केले तरी, हा काही यशस्वी होतच नाही' हे वाक्य स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेकांना ऐकावे लागतेच.

कारण समाजातील एक मोठा भाग याप्रकारे विचार करतो.

माझा एक मित्र आहे योगेश पाटील. एका प्रतिष्ठित कंपनीत तो चांगल्या पदावर कामाला आहे.

त्याच्या घरी मी असताना एकदा तो त्याच्या बायकोला म्हणाला,' आम्ही दिवसभर घासून जेवढं कमवत नाही, तेवढं हा दोन तासाच्या एका लेक्चर मध्ये कमावतो.'

समाज या प्रकारचा सुद्धा असतो. तुमच्या पात्रतेला नीट ओळखणारा.

माझ्यासारखे अनेक शिक्षक या क्षेत्रात आहेत. परंतु, सर्वांची परिस्थिती किंवा त्यांना असणारी मागणी समान आहे असे नाही. विविध क्षेत्रात मी घेतलेले शिक्षण येथे मला उपयोगी पडते.

माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत, जे व्यक्ती स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा शिकवण्याचे सोडत नाहीत. याचे कारण या क्षेत्रात असलेला पैसा. आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर करत, पैसा कसा मिळवायचा हे यांना नीट माहित आहे.


शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे किंवा एखाद्या संधीमुळे भारतातील तरुण एखाद्या कामाशी जोडला जातो. तिथे मिळणारी सुरक्षितता व ठराविक पैसा त्याच्याने सोडवत नाही. खरेतर हा एक सापळा असतो, त्याला त्याच परिस्थितीत आयुष्यभर ठेवण्याचा.

'पैसा हेच सर्वस्व नसतं' अशी वाक्य बोलायला हरकत नाही. परंतु, ती बोलण्याआधी अब्जाधीश व्हा. मग ती बोलण्यातील मजा पहा. नाहीतर या वाक्यास काहीच अर्थ नाही.


अनिल कुंबळे, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला व्यक्ती. क्रिकेट या खेळात बॉलर व्हायचे ठरवले. स्पर्धेत अनेक व्यक्ती होत्या. परंतु, अनिलने आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण आपल्या बॉलिंग मध्ये उतरवत त्यास एक वेगळा पैलू दिला. जगातील एक महान बॉलर होऊन दाखवले. बक्कळ पैसा कमावला. 

तुम्ही दहावी पास असाल, एखाद्या शाखेतले पदवीधर असाल, डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा एमबीए केलेला असाल..

पहिली चूक ही टाळा की, ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतले आहे, त्याच क्षेत्रात तुम्हाला करिअर घडवायचे आहे.

तुमची स्वतःची आवड पहा आणि उपलब्ध असणाऱ्या संधींना नीट शोधा. 

युट्युब जे दाखवतेय ते पाहू नका, तुम्हाला जे पहायचे आहे ते शोधा आणि तेच पहा.

कष्ट करण्याची तयारी, वेळेचा अपव्य होऊ नये याची दक्षता आणि नजीकच्या काळची व दीर्घकाळची धोरणे ठरवता यायला हवीत..

सर्वात महत्त्वाचे, जे करायचे ठरवले आहे, त्यासोबत प्रामाणिक राहत ते घडवण्याची इर्षा दाखवा. धरसोड वृत्ती नको. 

जे कराल, ते करण्यात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. 


शिक्षण व पैसा यांचा खूप जवळचा संबंध आहे. 

तुम्ही तो कसा जुळवून आणताय, यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे.


- अमित 








टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट