देशाचे दुश्मन
एखाद्यावर राग आला तर आपण काय करू??
त्याला स्पष्ट शब्दात समज देण्यात येईल किंवा काही जण भांडण सुद्धा करतील..
दिनकरराव जवळकर हा असा माणूस होता की ज्याने, आपला राग व्यक्त करण्यासाठी एक पुस्तक लिहून काढले..
त्या पुस्तकाचे नाव - देशाचे दुश्मन.
महात्मा फुलेंबद्दल माहित नाही, असा मराठी माणूस नाही. जवळजवळ १०० - ११० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, पुण्यात त्यांचा एखादा पुतळा उभारावा असा प्रस्ताव पुण्याच्या महानगरपालिकेत मांडण्यात आला.
या प्रस्तावास चिपळूणकर व टिळक या नेत्यांनी विरोध केला.
टिळक जरी राष्ट्रवादी होते, तरी जातीभेद त्यांच्यात पुरता भिनला होता.
खालच्या जातीतील कोणत्याही व्यक्तीचे महत्त्व वाढणे, हा त्यांच्यासाठी टीकेचा विषय होता. त्यामुळेच, त्यांना तुरुंगातून सोडवणाऱ्या महात्मा फुलेंबद्दल सुद्धा त्यांचे विचार वाईटच होते.
महात्मा फुले यांचे निधन झाले असले तरी, त्यांचा सत्यशोधक समाज कार्यरत होता. केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर ही त्यातील काही अतिशय महत्त्वाची नावं.
सत्यशोधक समाजात या घटनेवर चर्चा झाली. चिपळूणकर व टिळकांची अक्षरशः लायकी काढण्यात आली. दिनकरराव जवळकरांनी ही चर्चा समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी, परमोच्च रागाच्या स्वरात टिळक व चिपळूणकरांविरुद्ध जे पुस्तक लिहिले त्याचे नाव आहे 'देशाचे दुश्मन'.
पुस्तकातील टीका मुद्द्यानुसार जरी योग्य असली, तरी त्यात टिळकांना व चिपळूणकरांना 'कुत्रा - नीच' असे शब्द वापरल्याने अनेकांची मने दुखावली. भाषा पाहून अनेकांना सुरुवातीला असे वाटले की, हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनीच लिहिले आहे. परंतु, नंतर स्पष्ट झाले की हे दिनकरराव जवळकरांचे आहे.
चिपळूणकरांच्या एक नातेवाईकाने दिनकरराव जवळकरांविरुद्ध कोर्टात एक खटला दाखल केला. त्यासाठी त्यावेळचे अतिशय नामांकित वकील भोपटकर त्याने नियुक्त केले.
या असभ्य भाषेसाठी दिनकरराव जवळकर यांना एक वर्षाचा तुरुंगवास व काही रकमेचा दंड अशी शिक्षा झाली. त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात झाली.
जवळकरांना सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजातील कार्यकर्ते विविध वकिलांची भेट घेत होते. परंतु, भोपटकर सारख्या नामांकित वकिलाविरुद्ध जाण्याची कोणाचीच तयारी नव्हती. अशा स्थितीत नुकतेच वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेला एक तरुण ही केस घेण्यास तयार झाला.
तो तरूण म्हणजे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेबांना सुद्धा या पुस्तकातील भाषा पटली नव्हती. परंतु, टिळक व चिपळूणकरांनी महात्मा फुलेंविरुद्ध घेतलेली भूमिका सुद्धा योग्य वाटत नव्हती. त्यात नवा नवा सुरू केलेला व्यवसाय. त्यामुळे ही केस स्वीकारावी अशी आंबेडकरांची भूमिका झाली.
असभ्य भाषा असल्याने त्याबाबतीत ते काही करू शकत नव्हते. परंतु, त्या काळच्या ब्रिटिश कायद्यानुसार ज्याच्या विरोधात असभ्य भाषा उद्गारली आहे त्यानेच किंवा त्याच्या अगदी जवळच्या नातेवाईकाने खटला दाखल करावा हा नियम होता.
बाबासाहेबांनी अशाच एका केसचा दाखला देत हे न्यायालयासमोर मांडले. सोबतच हे सिद्ध केले की, खटला दाखल केलेला व्यक्ती चिपळूणकरांचा जवळचा नातेवाईक नाही. त्यामुळे कोर्टात ही केस रद्दबातल होऊन दिनकरराव जवळकर सुटले.
या केसच्या माध्यमातून बाबासाहेब पहिल्यांदाच दलित चळवळीच्या नेत्यांशी जोडले गेले.
अगाध बुद्धिमत्ता असणारे व प्रचंड कर्तृत्व असणारे महात्मा फुले हे बाबासाहेबांचे आदर्शस्थान होतेच. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी एका प्रचंड गुणवत्ता असलेल्या तरुणास सामाजिक सुधारणेच्या प्रवाहात अप्रत्यक्षपणे खेचून आणले. पुढे जे काही घडले तो इतिहास आहे.
- अमित
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा