शिवबा

 



छत्रपती शिवाजी महाराज..

संपूर्ण मराठी मुलखाचा स्वाभिमान.. कोणताही भेद असो, या नावापुढे सगळे एकत्र होतात.. हा आदर आहे राजांप्रती..

हा आदर व्यक्त करण्यासाठी छत्रपती व महाराज हे दोन शब्द वापरणे आज जणू बंधनकारक झाले आहे.. 

मजेची गोष्ट म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांनी 'महाराज' हा शब्द क्वचित ऐकला असेल; कारण त्या वेळेच्या मराठी भाषेतील उपलब्ध साहित्यानुसार शासकांना राजा किंवा राजं म्हटले जाई.. महाराज हा उत्तर भारतीय शब्द आहे.. जो आधुनिक इतिहासात पंजाबचा शासक रणजीत सिंह यांनी स्वतःची उपाधी म्हणून वापरल्याने प्रसिद्ध झाला.. त्यामुळे, त्यानंतर लिहिलेल्या इतिहासात बहुतेक सर्व महान शासकांचा उल्लेख महाराज या उपाधीने करण्यात आला..


शब्द कोणताही असो राजा, छत्रपती किंवा महाराज.. हा आदर दर्शवताना आपण शिवाजी महाराजांना नकळतपणे देव पण देऊन टाकतो..

खरी गडबड येथे होते..

एकदा त्यांना देवपण देऊन टाकले की मग त्यांच्यासारखे वागायची जबाबदारी आपल्यावर राहत नाही..

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात 'गोविंद पानसरे' यांनी ही व्यथा मांडली आहे..

बलात्कारी कोणत्याही धर्माचे असोत शिवरायांनी त्यांना कठोर शासन केले.

स्वधर्माचा अभिमान बाळगला मात्र परधर्माचा द्वेष नाही केला.

एवढे मोठे साम्राज्य असताना कोणताही दिखाऊपणा न करता फक्त कर्तृत्वास महत्त्व दिले.

तो देव माणूस, आपल्याला हे कसे जमणार??

वर्षातून दोन-तीन वेळा शिवजयंती साजरी करायची, वर्गणी गोळा करायची, जास्त खायची, थोडी खर्चायची, कपाळाला गंध लावायचा, गुलाल उधाळायचा आणि अंगात आल्यासारखे नाचायचे..

झालो आपण शिवभक्त..


वाईट वाटतं.. फक्त वापर करून घेतला जातो शिवरायांचा.. 

वर्षभर क्रॉप टॉप घालायचा आणि गुढीपाडवा-शिवजयंतीला साडी नेसून बुलेटवर वरात काढायची.. त्यातही टिळा हा अर्धचंद्रवालाच पाहिजे..

संस्कृतीसाठी नाही, स्टायलिश वाटतो म्हणून..

बरं त्या बुलेटचा आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध हे एक कोडेच आहे.. सगळं फक्त दिखाऊपणासाठी..

मराठी मुलांच्या रक्तात भगवा आणि विचारांत शिवाजी वाहतो, असा डायलॉग मारणारी पोरं; महाराष्ट्र बलात्कारांच्या यादीत चौथा कसा, हे सांगण्याचे धाडस नाही करत..

बरं.. या प्रकारचे कोणी बोलून दाखवले, तर हा मुद्दाम असा बोलतोय; याला फक्त टीकाच करायची असते, असे बोलून मुद्दा संपवतात..


कोणताही देश किंवा कोणताही व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही..

छत्रपती शिवाजी देव नाही तर एक माणूस होता आणि तरीही एवढा परिपूर्ण होता.. नैतिकतेच्या, आदर्शांच्या व विचारांच्या पातळीवर या मनुष्याची मजल किती उंच गेली असेल, याचा विचार करणे सुद्धा कठीण आहे..

हा माणूस होता, हा देव नव्हता आणि जर हा माणूस एवढा आदर्श होऊ शकतो; तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तो आदर्श गाठणे, ही आजच्या प्रत्येक मराठी व्यक्तीची किंबहुना त्यांना मानणाऱ्या प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे..


फक्त स्टेटसवर एखादा गड किल्ल्याचा व्हिडिओ, त्यात शिवरायांचे गाणे आणि मग टिळा लावून जय शिवाजी म्हणत दिवसभर मुर्खासारखे हिंडणे..

ही अशी शिवजयंती शिवरायांच्या नावाला कमीपणाच आणणारी ठरतेय..

मराठी माणसाने बदलण्याची गरज आहे..

शिवाजी या व्यक्तीला जाणून घेण्याची गरज आहे..

या व्यक्तीच्या आदर्शांना व कामगिरीला पडताळून पाहण्याची गरज आहे..

त्यांच्या धोरणांमागील कारणे समजण्याची गरज आहे..

शिवरायांना जाणून त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे..

झालीत आता साडेतीनशे वर्ष.. 

या मराठी मातीने तो आदर्शांचा व पराक्रमाचा महामेरू पुन्हा नाही पाहिला..

आपल्यातला शिवबा जागवण्याची गरज आहे..


- अमित


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट