शिवछत्रपती ते भीमा कोरेगाव - मराठा साम्राज्याचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. "मराठे मुळचे कोण होते" या लेखात, या साम्राज्य स्थापनेचा इतिहास मी नमूद केला आहेच. शिवाजी महाराजांनी हे साम्राज्य उभे करण्यासाठी नेमके काय कष्ट घेतले, यातील ठळक बाबी बहुतेक मराठी जनतेला ठाऊक आहेत. त्यानंतर मात्र काय झाले हे पाहू.
शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे छत्रपती झाले. अवघ्या नऊ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत या बलाढ्य राजाने जवळजवळ दीडशे युद्ध केलीत व त्यातील एकही युद्ध स्वराज्याचा हा छावा हरला नाही. तिकडे मुगल सम्राट औरंगजेबाची साम्राज्य विस्ताराची महत्त्वकांक्षा वाढली होती. हा वीर योद्धा स्वराज्याचा तारणहार असताना औरंगजेब दख्खन मध्ये पाऊल ठेवण्याची हिंमत करू शकत नव्हता. सरळ सरळ युद्ध करणे शहाणपणाचे नाही हे लक्षात घेऊन औरंगजेबाने संभाजीराजांना कपटाने मारले. हे कपट औरंगजेबाला करता आले, कारण यामध्ये स्वराज्याचे काही सेवक मुघलांना सामील झाले होते. ते नेमके कोण होते याबाबत इतिहास खुलासा करत नाही. परंतु, संभाजी राजे छत्रपती होऊ नयेत यासाठी अष्टप्रधान मंडळाने त्यांच्या सावत्र आईसोबत अडवणूक केली होती. त्यामुळे, संशय त्यांवरच जातो. दुसरी गोष्ट अशी की, संभाजी राजांच्या मृत्यूचे वर्णन मुघलांनी नाही, तर मराठी इतिहासकारांनी केले. संभाजी राजे मृत्यू वेदना सोसत असताना, असा जो पण मराठी साम्राज्याचा शिलेदार तिथे उपस्थित असेल, तो मुघलांसोबत या मृत्यूचा आनंद घेण्यासाठीच उपस्थित असणार हे निश्चित. खरा मराठा असता तर राजांच्या आधी स्वतःचा जीव देऊन मोकळा झाला असता. हा मृत्यू एक मोठे राजकीय षडयंत्र होते. आपण फक्त औरंगजेबाला शिव्या घालून आज मोकळे होतो. परंतु, त्यामागचा खरा सूत्रधार आपल्यापैकीच कोणीतरी होता हे विसरतो.
संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान भाऊ, 'राजाराम' छत्रपती पदावर बसला. युद्ध कौशल्य फारसे नसल्याने व प्रकृतीची तितकीशी साथ नसल्याने औरंगजेबाविरुद्धच्या लढाईत त्यांना माघार सहन करावी लागली. परंतु, तरीही या मराठ्याने हार नाही मानली. अगदी आजच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या जिंजी या किल्ल्याकडे जात मराठा साम्राज्याचे अस्तित्व जिवंत ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची दुसरी बायको ताराबाई यांनी हा लढा चालू ठेवला. त्यांचा मुलगा 'शिवाजी दुसरा' याला गादीवर बसवत राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला. संताजी व धनाजी सारखे पराक्रमी शिलेदार या काळात मराठा साम्राज्याला गवसले.
यानंतर इतिहासात दोन प्रकारच्या कथा आहेत.
१) स्वराज्यातील राजकारण व कपटाविरुद्ध बंड करत संभाजी राजांनी एकदा शिवरायांविरुद्ध विद्रोह केला होता. संभाजी राजे मुघलांना जाऊन मिळाले होते व तेव्हा त्यांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू त्यांच्यासोबत होते. चूक उमगल्यावर संभाजी राजे तर परत आले, मात्र येसूबाई व शाहू हे औरंगजेबाच्या कैदेत राहिले.
२) संभाजी राजांना मारल्यानंतर औरंगजेबाने त्यांची पत्नी व पुत्रास आपल्या ताब्यात घेतले.
यापैकी कोणतीही कथा खरी असली, तरी शाहू औरंगजेबाच्या ताब्यात राहिले ही गोष्ट मात्र खरी. औरंगजेब धूर्त होता. त्याने शाहू राजांना अगदी राजपुत्रासारखे वाढवले. मुघल मराठ्यांचे शत्रू नाहीत, हे त्यांच्या मनावर बिंबवले. त्यांना ऐशोआरामाची सवय लावली.
१७०७ ला औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू राजांना मुघलांनी आपल्या ताब्यातून सोडले. परत आल्यानंतर शाहू राजांनी, मराठा साम्राज्याचा छत्रपती होण्याची आकांक्षा जाहीर केली. ते संभाजी राजांचे पुत्र असल्याने, त्यांना तो हक्क होता. परंतु, छत्रपती राजाराम व ताराबाई यांनी मराठी साम्राज्यासाठी काही कमी कष्ट सोचले नव्हते. त्यामुळे, त्यांचा मुलगा 'शिवाजी दुसरा' हा सुद्धा छत्रपतीपदावर राहणे योग्य होते. मराठा साम्राज्यात हेवेदावे सुरू झाले.
अशावेळी पुढे आला बाळाजी विश्वनाथ. अतिशय चतुर व्यक्ती. याला अष्टप्रधान मंडळात जागा नव्हती. शाहू राजांना मदत केली तर पेशवा होता येईल, या आमिषाने त्याने बऱ्याच खटपटी केल्या. त्याने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले व मराठा साम्राज्याची फाळणी झाली.
१) साताऱ्याची गादी - यावर 'शाहू' महाराजांचा हक्क होता.
२) कोल्हापूरची गादी - इथे 'शिवाजी दुसरा' छत्रपतीपदावर बसले.
यापुढील मराठ्यांचा इतिहास हा सातारच्या गादीचा इतिहास ठरला. कारण, कोल्हापूरचे साम्राज्य फारसे वाढले नाही. परंतु, ते अगदी इंग्रजांच्या काळात सुद्धा टिकून राहिले. सातारच्या साम्राज्याने पेशव्यांच्या जोरावर मोठा इतिहास रचला व शेवटी इंग्रजांसमोर संपुष्टात आले.
ठरल्याप्रमाणे सातारच्या गादीच्या अष्टप्रधान मंडळात बाळाजी विश्वनाथ हा पेशवा झाला. शाहू महाराजांना मुघलांच्या सवयी असल्याने ते कर्तृत्ववान ठरले नाहीत. याचा फायदा घेत बाळाजी विश्वनाथने साम्राज्यचे सर्व कार्य स्वतःच्या हाती घेतले. छत्रपती हे पद फक्त नावापुरते राहिले. यापुढे भोसले घराण्यातील कोणत्याही राजाचे नाव महत्त्वाचे ठरले नाही. कारण छत्रपती फक्त नावाला होता. खरा कार्यभार पेशवाच चालवत असे.
मराठा साम्राज्यात छत्रपती सोडून कोणतेही पद वंशानुसार मिळत नव्हते. तरीही हा बाळाजी विश्वनाथचा प्रभाव म्हणा की, 'बाजीराव पहिला' ची बुद्धिमत्ता म्हणा, पुढील पेशवा बाळाजी विश्वनाथ चा मुलगा 'बाजीराव' झाला. या वीराने आपल्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्याला नवे क्षितिज गाठून दिले. परंतु, याच्या या असामान्य कर्तुत्वाने दुसरी गोष्ट अशी घडली की, मराठा म्हणजे पेशवा व पेशवा म्हणजे मराठा हे समीकरण झाले. सर्व अठरापगड जातींना एकत्र घेऊन निर्माण झालेले हे मराठा साम्राज्य, आता जातीव्यवस्थेला नीट आकार देऊ लागले. जातिभेद वाढले, अस्पृश्यता वाढली, महिलांची विटंबना वाढली.
बाजीरावच्या मृत्यूनंतर काहीही कर्तुत्व नसताना, फक्त बाजीराव चा मुलगा असल्याने 'बाळाजी बाजीराव' हा पेशवा झाला. याने आपलं पूर्ण आयुष्य, फक्त आराम व हौस-मौज पूर्ण करण्यात घालवले. याच्याच काळात पानिपतचे तिसरे युद्ध झाले. हा स्वतः युद्धात गेला नव्हता. मराठे अतिशय वाईट हरलेत. तो मेल्यानंतर, त्याचा भाऊ 'राघोबा' पेशवा होण्यास उत्सूक होता. मात्र त्याचा मुलगा 'माधवराव' यास पेशवा केले गेले. माधवराव कर्तुत्वान होता व त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारण्याचे महत्त्वाचे कार्य केले. परंतु, एका आजारामुळे त्यांचा वयाच्या २६ व्या वर्षी मृत्यू झाला. माधवरावास कोणी पुत्र नसल्याने, आता पुन्हा राघोबाची पेशवा होण्याची महत्वकांक्षा जागी झाली. परंतु माधवरावचा लहान भाऊ नारायणराव यास पेशवा केले गेले. क्रोधित राघोबाने पुण्याच्या 'शनिवार वाड्यात' नारायणरावचा खून करविला. फक्त पंधरा-सोळा वर्षांचा तो मुलगा राघोबावर एवढा विश्वास ठेवायचा की मरताना, 'काका मला वाचवा' अशीच आरोळी तो देत होता.
त्याच्या मृत्यूनंतर राघोबाला पेशवा केले गेले. मात्र राघोबाच खुनी आहे हे कळताच, त्याला पदावरून दूर केले गेले. बिचारा राघोबा, कितीही कपट करून सुद्धा पेशवे पदापासून दूरच राहत होता. त्यामुळे तो जाऊन मिळाला इंग्रजांना. इंग्रजांनी याप्रकारे मराठ्यांच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप केल्याने पहिले मराठा व इंग्रज युद्ध झाले. शेवटी कोणीही जिंकले नाही. परंतु, इंग्रज राघोबापासून दूर राहिलेत. याच काळात नारायणरावची बायको गर्भवती होती. तिला पुत्र झाला. त्याचे नाव 'सवाई माधवराव' ठेवले व त्याच्या नावाने 'नाना फडणवीस' व त्याच्या साथीदारांनी साम्राज्य सांभाळण्याचे ठरवले. घराणेशाहीची गुलामी मराठ्यांत एवढी मुरली होती की, ते घराणे सोडून इतर कोणास पेशवे पद द्यायचे त्यांच्या मनातही येत नव्हते. या फडणवीसच्या काळात मराठा साम्राज्याचा कारभार अतिशय खालच्या स्तरावर गेला. या कपटी माणसाने अनेक कर्तुत्ववान लोकांची अडवणूक केली व फक्त स्वतःकडे सत्ता कशी राहील हे पाहिले. याच्या कपटाला कंटाळून सवाई माधवरावने आत्महत्या केली. जातिभेद प्रचंड वाढला होता, सामाजिक समतोल पूर्णपणे ढळला होता, जनतेवरील अत्याचार अतिशय अमानूष स्तरावर पोहोचले होते.
नाना फडणवीसचा मृत्यू झाला. सवाई माधवराव सुद्धा मेला होता. त्यास कोणी पुत्रही नव्हता. त्यामुळे, मराठे नाईलाजाने पुन्हा राघोबाकडे पेशवेपद देण्यास गेले. परंतु, आता राघोबा सुद्धा वारला होता. त्यामुळे, त्याचा मुलगा 'बाजीराव दुसरा' याला पेशवेपद देण्यात आले. हा अतिशय रंगेल माणूस. मराठ्यांची सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रतिमा अजून घसरली. होळकर घराण्यासोबत झालेल्या वादात यशवंतराव होळकरांनी दाखवलेल्या तडाख्याने घाबरून जाऊन, आपल्या बापाप्रमाणेच बाजीराव दुसरा इंग्रजांना जाऊन मिळाला. यशवंतराव होळकर इंग्रजांसोबत लढला, परंतु हरला. या दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात अशा प्रकारे इंग्रजांनी जिंकून, बाजीरावकडून स्वतःसाठी अनेक महत्त्वाचे लाभ मिळवलेत.
बाजीरावला गादी तर मिळाली, मात्र इंग्रजांच्या धोरणांमुळे खजिन्यातला सर्व पैसा त्यांच्याकडे जात होता. नाईलाजाने बाजीराव मराठी सैन्याला देण्याचा पगार कमी व्हावा म्हणून त्यांना नोकरीतून काढत होता. यामुळे पिंडारी जमातीचे अनेक तरुण बेरोजगार झाले होते. इंग्रजांची करपद्धती सुद्धा जाचक ठरत होती. या सर्वांस विरोध करण्यासाठी पिंडारी समाजाने इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. याचे नेतृत्व बाजीरावने करण्याचे ठरवले. त्याने आपली पूर्ण फौज इंग्रजांविरुद्ध उभी केली.
इंग्रज भारतात आल्यापासून आपला व्यापार कसा वाढेल, या गोष्टीला फार महत्त्व देत होते. जर शासनात आपला वाटा असेल किंवा पूर्ण सत्ता आपली असेल तर व्यापार अजून सुलभ होईल, या महत्त्वाकांक्षेने त्यांनी अनेक साम्राज्य आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही लढाया पूर्णपणे ब्रिटिश फौजने लढल्या. परंतु, मराठा सारख्या भव्य साम्राज्याला टक्कर द्यायचे असेल तर ब्रिटिश फौज पुरेशी पडणार नाही; हे जाणून घेत त्यांनी या साम्राज्यातीलच तरुणांची सैन्यात भरती करण्यास सुरुवात केली. बाजीराव पहिला च्या कालखंडापासूनच मराठा साम्राज्यात सुरू झालेला जातीभेद हा खालच्या जातींसाठी व अस्पृश्यांसाठी अन्यायकारक व अमानवीय ठरत होता. मनुष्याचे जगणे त्यांच्या वाट्याला नव्हते. स्वाभिमानाने जगता येईल या अपेक्षेने शूद्र व अस्पृश्य समाजातील अनेक तरुण इंग्रजी सेनेत सहभागी झाले. अस्पृश्य वर्गातील महार या जातीचा मोठा भरणा या सेनेमध्ये होता.
तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात अनेक लढाया झाल्या. मात्र त्यात भीमा कोरेगावच्या लढाईने मराठा साम्राज्याचा अंत लिहिला गेला. या ठिकाणी मराठ्यांची भव्य सेना इंग्रजांसमोर उभी राहिली. इंग्रजी सेनेमध्ये महार तरुणांचा भरणा असलेली महार बटालियन या ठिकाणी तैनात होती. इतिहासकार दोन्ही सेनांचे खूप वेगवेगळे आकडे प्रस्तुत करतात. त्याची नीट अशी निश्चिती नाही; मात्र महार बटालियनच्या तुलनेत मराठा फौज अतिशय भव्य होती हे निश्चित. या युद्धात आपला टिकाव लागणे शक्य नाही, हे ओळखत ब्रिटिश अधिकाऱ्याने माघार घेण्याचा विचार केला. परंतु, महार बटालियनच्या सैन्याने झुंज देत या प्रचंड मराठा फौजेला नेस्तनाबूत केले. मराठा साम्राज्याचा अंत घडवला. आपल्या जीवावर उदार होत त्या परक्या इंग्रजांसाठी का बरे हे सैनिक लढले असतील?
याची विविध कारणे आहेत -
१) बाळाजी विश्वनाथच्या काळापासूनच वाढलेल्या जातीभेदाने व अन्यायाने संपवलेला स्वाभिमान त्यांना पुन्हा उभारायचा होता.
२) हे ते मराठा साम्राज्य नव्हते जे शिवछत्रपतींनी सर्व जनतेच्या भल्यासाठी उभारलेले. हे मराठा साम्राज्य फक्त काही माजलेल्या सत्ताधीशांची जहागीर होती.
३) हिंदू धर्माने कायमच तुच्छ मांनलेल्या समाजाला, आपले कर्तुत्व नेमके किती भव्य असू शकते; हे जाणीव करून देण्याची ती एक संधी होती.
याप्रकारे शिवछत्रपतींनंतरचा मराठा साम्राज्याचा इतिहास हा फक्त खालच्या पातळीवरच घसरत गेला. राजेशाहीचे प्रारूप लोकशाहीनुसार नसले तरी, समाजाचे नुकसान करून कोणतेही साम्राज्य फार काळ टिकू शकत नाही हे मराठा साम्राज्याने इतिहासास शिकवले.
- अमित
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा