मैत्रीतील प्रेमाची गोष्ट
रुद्र... अतिशय शांत,समंजस व अभ्यासू मुलगा.. भारतातल्या बहुतेक मध्यमवर्गीय घरातल्या तरुणांची स्वप्ने असतात; त्याचप्रमाणे एखाद्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा व आयुष्यात काहीतरी छान करून दाखवावे, हे स्वप्न उराशी घेऊन प्रयत्न करणारा..
मागील काही दिवस त्याच्यासाठी खास ठरले होते.. कारण बारावी मध्ये चांगले मार्क्स मिळवून व सीईटी मध्ये चांगला स्कोर करून, त्याने मुंबईतील नामांकित अशा सोमय्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला होता आणि इंजिनिअरिंग कॉलेज मधील त्याचे सुंदर दिवस सुरू झाले होते..
त्याचे अजून फारसे मित्र झाले नव्हते आणि याचे कारण होते इंग्लिश भाषा...येथे असणारी बहुतेक मुले इंग्रजी माध्यमात बोलायची आणि त्याला मात्र इंग्रजीत बोलण्याचा फारसा अनुभव नसल्याने, तो शांत असायचा.. मराठी माध्यमातून आलेल्या बहुतेक मुलांमध्ये हा न्यूनगंड असतोच.. विकास, राजेश, मुग्धा, रूपाली, जयेश हे सुद्धा असेच होते.. ज्यांच्या मनात ही भीती होती.. या सर्वांना रुद्राने हेरले आणि यांचा एक ग्रुप तयार झाला.. अल्पावधीतच हे सर्व खूप चांगले मित्र बनले..
आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवसाने त्याचे आयुष्य बदलले.. कॉलेज सुरू होऊन एक-दीड महिना झाला होता... रुद्रला चांगले मार्क्स असल्याने, पहिल्या यादीत त्याचे नाव झळकले आणि त्याने लगेच प्रवेश घेतला व कॉलेज सुरू झाले... मागील काही दिवसात शेवटची यादी झळकली होती व त्यानुसार त्या यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता...
सकाळी सकाळी पहिले लेक्चर चालू होते व हे अतिशय कंटाळवाणे असल्याने, काही जण झोपेतच ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते.. शिक्षिका बोलत असतानाच अचानक एक हळुवार आवाज आला,"may I come in madam.."
रुद्र ने दरवाजाकडे पाहिले.. अतिशय सुंदर अशी, गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली एक तरूणी दरवाजामध्ये उभी होती.. शिक्षिकेने उशिरा येण्याचे कारण विचारले.. तेव्हा तिने सांगितले की, आज तिचा पहिलाच दिवस आहे आणि तिला कॉलेजबद्दल फारसे माहित नाही, त्यामुळे शोधण्यास वेळ लागला...
त्यापूर्वी रुद्र ने कोणत्या सुंदर मुलीला पाहिले नव्हते असे नाही.. परंतु, तिचा आवाज आणि तिची बोलण्याची ती मोहक पद्धत त्याच्या मनात घर करून गेली.. तिचे मोकळे सोडलेले केस तिच्या या सौंदर्याला चार चांद लावत होते.. तिच्या चालण्यात शिष्टाई होती तर नजरेत एक निर्धार होता.. तिच्याकडे असे सारखे पाहणे त्याला अवघडल्यासारखे वाटत होते... परंतु, मनावरील नियंत्रण पूर्णतः सुटले होते.. घरी गेल्यावर सुद्धा तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता..
त्यापुढील अनेक दिवस त्याला तिच्याशी बोलण्याची इच्छा झाली; परंतु, तिच्या बद्दल काही माहिती नव्हते व ती मुलगी फारसे कोणाशी बोलायची नाही, त्यामुळे त्याची सुद्धा तिच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती...
ही मुलगी शिस्तबद्ध व अभ्यासामध्ये सुद्धा हुशार आहे असे रुद्रला वाटत होते.. एक दिवस ऑफ पिरियड असताना, रुद्र तिच्या मागेच बसला होता...
एका मुलीने तिला विचारले," where are you from??"
तिने ते नीट ऐकले नसावे..
ती म्हणाली," Electronics lecture.."
यावर ती मुलगी अतिशय विचित्र हसली व म्हणाली," तू कुठली आहेस, असे विचारले मी...तुला समजले नाही का??"
हे त्या मुलीसाठी अपमानकारक होते...
ती म्हणाली," मी कणकवलीची.."
रुद्रला सुद्धा वाईट वाटले.. त्याला हे कळले की, एवढा साधा सरळ प्रश्न तिला कळला नसेल असे नाही... ऐकण्यात गफलत झाली असेल.. परंतु, त्या मुलीने या प्रकारे हसून तिची थट्टा करायला नको होती... आज घरी जात असताना नेमकी लोकल ट्रेन मध्ये ती त्याला दिसली आणि मग त्याने हिम्मत करून दुरूनच हात हलवून तिला ओळख दिली.. त्यावर तिने सुद्धा प्रतिकात्मक हात हलवून स्मित हास्य केले..
रुद्र ला बरे वाटले.. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली..
त्यावर तिने तिचे नाव सांगितले," मी गार्गी.."
त्यानंतर काय बोलायचे हे दोघांनाही सुचले नाही.. तेव्हा रुद्र बोलला," आज जे काही झाले, ते मी पाहिले.. त्या मुलीने याप्रकारे हसायला नको होते.."
त्यावर गार्गी म्हणाली," अरे तो प्रसंग!!! तो तर मी कधीच विसरले... माझी ऐकण्यात थोडी गफलत झाली.. परंतु तिचीही काही चूक नाही... थोडीशी थट्टामस्करी तर चालतेच ना..."
रुद्र ने सांगितले की, इथे बहुतेक बहुतेक जणांची समस्या आहे ही.. इंग्रजी बोलण्यामध्ये मराठी माध्यमातील मुले कमी पडतात..
ती म्हणाली," यामध्ये फारसे काही अवघड नाही.. आपण एकमेकांशी इंग्लिश मध्ये संभाषण करत राहिलो तर हे नक्कीच शक्य आहे.."
दुसऱ्या दिवशी रुद्रने आपल्या ग्रुप सोबत गार्गी ची ओळख करून दिली... गार्गीने त्यांच्यासमोर स्वतःचे मत मांडले, "आपण दिवसातून जेव्हा आपापसात बोलू, तेव्हा जास्तीत जास्त वेळ इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू... आपल्या चुका आपल्याला कळतीलच.."
हे सर्व मित्र मैत्रिणी अभ्यासात अत्यंत हुशार होते आणि जसजसे ते एकमेकांशी जास्त इंग्रजी मध्ये बोलत होते, तसतशी भाषेची सुद्धा आता त्यांना फारशी अडचण येत नव्हती.. काळ जसा पुढे जात होता, तशी त्यांची मैत्री अतिशय घट्ट होत होती.. याच कालावधीत रुद्रच्या मनाला गार्गीने पूर्णपणे जिंकले होते.. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.. परंतु, गार्गी जवळ ते व्यक्त करण्याची हिंमत मात्र त्याच्याकडे नव्हती..
अनेकदा गार्गी ग्रुप पासून विभक्त होऊन कोणाशी तरी फोनवर बोलायची.. रुद्रला वाटायचे की, तिच्या आयुष्यात अजून कोणी असेल का??? मात्र एवढी शिस्तबद्ध मुलगी प्रेमाच्या वाटेवर चालेल का.. याबद्दल त्याला शंका होती... तरी त्याने मुग्धाला तिच्याशी याबद्दल बोलण्यास सांगितले...
मुग्धाला रुद्रच्या मनात काय चाललंय हे पक्के ठाऊक होते... त्यामुळे तिनेसुद्धा याबद्दल गार्गीशी चर्चा करण्याचे ठरवले...
एक दिवस मुग्धा व गार्गी दोघीच कॅन्टीन मध्ये चहा प्यायला आल्या असताना, मुग्धा तिला म्हणाली की," आपण सर्व अतिशय घनिष्ठ मित्र झालो आहोत.. त्यामुळे कोणी कोणापासून काहीही लपवलेले नाही... तुझे तर असे काही सिक्रेट नाही ना??? जे तू आम्हाला अजून सांगितले नाहीस.."
त्यास प्रत्युत्तरादाखल गार्गी लगेच, नाही म्हणाली.. परंतु, चहा पिता पिता गार्गीने यावर विचार केला आणि मग आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचे ठरवले...
तिने मोबाईल मधील एक फोटो काढून मुग्धासमोर धरला आणि सांगितले," विहान.. माझा प्रियकर.."
मुग्धाच्या चेहऱ्यावर आनंदाच्या आणि आश्चर्याच्या अशा दोन्ही छटा होत्या.. मात्र तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत.. गार्गीला तिची स्थिती कळाली, तेव्हा तिने सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या..
विहान व गार्गी शाळेमध्येच एकत्र होते... शाळेत असताना दोघांमध्ये आकर्षण निर्माण झालेले... ते व्यक्त करण्याची हिंमत मात्र नव्हती... कॉलेजमध्ये गेल्यानंतर अकरावीला असताना, विहानने गार्गीजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या... गार्गीने सुद्धा होकार दिला...
विहान चे आई - वडील दोघे कामावर जात असल्याने, त्याचे घर रिकामे असायचे.. विहान व गार्गी आपला काही वेळ कॉलेजमध्ये तर काही वेळ त्याच्या घरी व्यतीत करायचे.. प्रेम व तारूण्य यांचा सुंदर मिलाफ घडल्याने, आनंदाच्या क्षणांना काही ताळमेळ राहिला नव्हता.. हेच ते खरे आयुष्य, जे जीवनाचा प्रत्येक क्षण जिवंत ठेवते..
एक दिवस मात्र अचानक विहानची आई कामावरून लवकर घरी आली... त्यावेळी गार्गी त्याच्या घरी होती.. गार्गीने त्यावेळी कारण सांगितले की," विहान कडून एक पुस्तक घेण्यासाठी मी आले होते.."
मात्र विहानच्या आईला कळायचे ते कळले...
तिने गार्गीच्या आईला जाऊन हे सर्व सांगितले व आपल्या मुलीला नियंत्रणात ठेवण्याची सूचना सुद्धा दिली...
गार्गी चे बाबा शांत स्वभावाचे व समंजस होते.. मात्र आई अतिशय कठोर.. तिने बाबांना या सर्व गोष्टी न सांगता, गार्गीला जवळ-जवळ कोंडून ठेवले.. कॉलेज क्लास सर्व बंद... बारावीचे वर्ष असल्याने गार्गी ने सुद्धा अभ्यासाचे मनावर घेतले आणि जरी कोंडून ठेवले असले तरी, तो पूर्ण वेळ आपल्या अभ्यासात घालवला...
आनंदाच्या लाटांनी अचानक दुखाच्या खाईत लोटल्यासारखे झाले होते.. तडफड व्हायची.. विहान ची आठवण यायची... मात्र त्याला भेटणे शक्य नव्हते.. मन मात्र भविष्याचा वेध घेत होते व पुन्हा एक होण्यासाठी योजना आखत होते.. गार्गीची आजी मुंबईला राहायची.. तेव्हा बारावीला चांगले मार्क्स मिळवून मुंबईला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे व विहान ला सुद्धा तेथेच घेण्यास सांगायचे.. जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणी येणार नाही, हे गार्गीने ठरवले..
विहान सुद्धा अभ्यासात हुशार होताच... त्या दोघांनी बारावीला अतिशय उत्तम गुण मिळवले... गार्गीने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, तर विहान ला डॉक्टर व्हायचे असल्याने; त्याने MBBS ला प्रवेश घेतला...कॉलेज सुटल्यावर ते अधेमधे एकमेकांशी भेटत... गार्गी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे व आपले शिक्षण संपवून लवकरात लवकर नोकरीला लागून, विहानशी लग्न करण्याच्या तयारीत आहे..
हे सर्व ऐकून, एक मैत्रीण म्हणून मुग्धाला खूप आनंद झाला... विहानला घेऊन कधी ये कॉलेजमध्ये... अशी धमकीवजा सुचना तिने गार्गीला केली...
एकीकडे मुग्धा, गार्गीसाठी खूष होती; मात्र रुद्रसाठी तिला अतिशय वाईट वाटले... आता जे आहे, ते आहे.. हे सर्व तिने रुद्रला सांगितले...
रुद्रला हे सर्व ऐकून धक्काच बसला.. मात्र गार्गीच्या आयुष्यात कोणीतरी आहे, जो तिच्यावर खुप प्रेम करतो... याबाबत त्याला समाधान वाटले... त्याचे तुटलेले मन मात्र त्याला स्थिर राहू देत नव्हते... गार्गीसाठी तो खुश जरी असला, तरीही तो अतिशय उदास झाला... त्यादिवशी गार्गीला हे जाणवले सुद्धा की, नेहमी हसत खेळत असणारा रुद्र आज अतिशय शांत आहे...
तिने रुद्रला विचारले," काही समस्या आहे का.. तू आम्हाला सांगू शकतोस.."
रुद्रने स्मितहास्य करत, सर्व ठीक आहे असे सांगितले... तुटलेल्या मनाचे एक वैशिष्ट्य असते, ते फक्त अशा दिशेने धावत जाते जिथे त्याला अजून तुटता येईल.. रुद्रला एवढे तुटायचे होते की तो संपूनच जाईल..
काही दिवसातच विहान येऊन या सर्वांना भेटला... दिसायला अतिशय सुंदर व MBBS करतो, याचा अर्थ अतिशय अभ्यासू - हुशार असा तो व्यक्ती होता... रुद्रला त्याच्यासमोर काय बोलावे हे कळालेच नाही...
असे नाही कि रूद्रचे हे पहिलेच प्रेम होते... आतापर्यंत अनेक मुली त्याला आवडल्या होत्या... परंतु गार्गी सारखी उत्तम मैत्रीण त्यापैकी कोणीही झाली नव्हती... अशी व्यक्ती आयुष्यभर सोबत असावी, यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत होता... आता जे आहे, ते स्वीकारणे त्यास भाग होते... त्याच्यासाठी गार्गी त्याची होण्यापेक्षा, ती आनंदी राहणे हे जास्त महत्त्वाचे होते...त्यामुळे, आपली आहे ती मैत्री कायम जपावी हेच त्याने त्याच्या मनी ठरवले...
कॉलेजची दोन वर्षे आता संपत आली होती... रुद्र व त्याचा ग्रुप अभ्यासामध्ये अतिशय हुशार म्हणून नावाजला होता... रुद्र व गार्गी दोघेही शिक्षकांचे आवडते झाले होते... मात्र गार्गीचे रुद्र शी बोलणे हळूहळू कमी होत गेले... रुद्रला एकीकडे याबाबत चांगले वाटले की, गार्गी जास्त वेळ सोबत नसल्याने त्याच्या भावनांना आवर घालने त्याला सोपे जात असे.. मात्र ती फारच काळ जर दूर राहिली, तरी अस्वस्थता मनी दाटत असे... गार्गी त्याच्यापासून दुरावली आहे, हे त्याला हळूहळू जाणवत होते.. परंतु, त्याचे कारण कळले नाही.. त्याच्याकडून काही चूक होतेय का... किंवा त्याच्या भावनांना त्याला आवर घालता येत नाही का... या शंका त्याच्या मनात दाटत होत्या.. त्याचा आनंद व त्याची अस्वस्थता दोन्ही एका व्यक्तीशी जोडलेली होती.. आता ती व्यक्तीच दूर असल्याने आयुष्य भावनाहीन झाल्याचे त्याला वाटत होते..
एक दिवस रुद्र ने गार्गी ला विचारले" माझ्याकडून काही चूक होतेय का?? आपण आजकाल पहिल्यासारखे भरभरून बोलत नाही... तू मला टाळत तर नाहीस ना.."
या प्रश्नाचे उत्तर देताना गार्गीला अवघडल्यासारखे झाले...
तरीही तिने स्पष्टपणे सांगितले," रुद्र, तू माझा फार चांगला मित्र आहेस.. तू मनाने फार चांगला आहेस... परंतु, विहानला तुझ्या बाबतीत संशय येतो... त्याला असे वाटते की, तुला मी आवडते.. आणि त्यामुळे तो मला तुझ्यापासून दूर राहण्यास सांगतो.. मला याची जाणीव आहे की, तुझ्या मनात मैत्री शिवाय काहीच नाही.. परंतु, विहान सोबतचे नाते मला छोट्याशा कारणाने विस्कटू द्यायचे नाहीये... मला अपेक्षा आहे तू समजून घेशील..."
"विहान ला जे वाटते आहे, ते खरेच आहे... परंतु, गार्गी सोबतचे माझे मैत्रीचे नाते हे अतिशय पवित्र आहे व त्यास मी ठेच लागू देणार नाही, हे सुद्धा विहानला कळायला हवे होते..."रुद्रला मनोमनी वाटले.
आता रुद्र ने सुद्धा गार्गी सोबत स्वतःहून बोलणे कमी केले... बघता - बघता त्यांचे इंजीनियरिंग संपत आले.. मात्र शेवटच्या वर्षी जो प्रोजेक्ट करण्यास सांगितला होता, त्यामध्ये त्या दोघांचं नाव एकत्र आलं... त्यामुळे दोघांना दिवसातील काही वेळ का असेना सोबत घालवावा लागत असे.. सोबतच एका विषयासाठी त्यांनी जो क्लास लावला होता; त्यामध्ये सोमय्याच्या मित्रपरिवारातील हे दोघेच होते... तेव्हा ते सोबत घरी यायचे व येताना त्यांच्यामध्ये गप्पा व्हायच्या.. आपण कोणाला किती दूर करायचे व कोणास जवळ ठेवायचे हा निर्णय नेहमीच आपले मन करत नसते.. नियती किंवा निसर्ग यांचा खेळ वेगळाच असतो..
गार्गी चा स्वभाव असा होता की, ती विहान पासून कधी काही लपवायची नाही... मात्र विहानला जेव्हा जेव्हा समजायचे कि ती रुद्र सोबत बोलली, तेव्हा तो फार चिडायचा... तिच्याशी बोलणे बंद करायचा... विहानच्या अशा वर्तनाने व त्याच्या रागाने गार्गी चे मन अनेक वेळा अतिशय दुखावले जात असे... मात्र त्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले होते व या छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्त्व न देता, त्याची कायम साथ द्यायची हे तिने मनाशी ठरवले असल्याने, ती सहन करायची...
गार्गी व विहान यांच्या नात्यात थोडासा दुरावा निर्माण झालेला... त्याचे कारण रुद्र जरी असला, तरी रुद्रचा प्रत्यक्ष यामध्ये काही सहभाग नव्हता..
शेवटी कॅम्पस इटरव्ह्यू झाले व त्यामध्ये सुद्धा गार्गी व रुद्रला इन्फोसिस या कंपनीने निवडले..त्या दोघांना इन्फोसिसच्या बंगलोरच्या शाखेमध्ये नियुक्त केले गेले. हे सर्व समजल्यानंतर विहानचा रागाचा पारा आणखीच चढला..
" तो तिकडे तुझ्यासोबत असणार आणि मी इकडे मुंबईमध्ये, ही गोष्ट मला सहन होत नाही..." असे विहानने गार्गीला सांगितले...
गार्गी म्हणाली," गेली सहा वर्षे आपण एकमेकासोबत नात्यात आहोत... तू माझ्यावर एवढा तरी विश्वास नक्कीच ठेवू शकतो की त्याने जरी काहीही विचार केला, तरी मी मात्र तुझ्यावरच प्रेम करते..."
विहान चे गार्गीवर प्रेम होते.. मात्र कोणी दुसरा पुरुष तिच्या आयुष्यात येणे, त्याला खपायचे नाही.. त्याने गार्गीला परवानगी दिली.. काही पुरुष या प्रकारचे असतात की त्यांना स्वतःची स्त्री म्हणजे ताब्यातली एखादी वस्तूच वाटते.. त्या स्त्री वर आपल्या मनाचे राज्य असावे व तिचा प्रत्येक विचार फक्त आपल्या पुरताच राहावा हा त्यांचा अट्टाहास असतो.. अगदी मनाविरुद्ध जाऊन तिच्या भावनांना कधी महत्त्व दिलेच तर तिच्यावर उपकार केल्यासारखे ते दर्शवतात.. पुरुषांची ही मानसिकता तयार होण्यामागचे कारण, हे शक्य आहे असे सिद्ध करणाऱ्या व हे सर्व सहन करणाऱ्या स्त्रिया..
बेंगलोर मध्ये रुद्र, गार्गीपासून स्वतःहून दूर राहू लागला.. मात्र गार्गी समोर असूनही, आपण तिच्याशी बोलू शकत नाही, ही गोष्ट त्याच्या मनाला खायची.. गार्गीची अवस्था सुद्धा तो समजू शकत होता... हे सर्व मनात चालू असल्याने, त्याचे कोणी नवीन मित्र तयार झाले नाहीत... दुसरीकडे गार्गीला सुद्धा जे चालले होते, त्याची जाणीव होती... त्यामुळे तिने स्वतः एक दिवस त्याच्यासोबत बोलायचे ठरवले.. त्यानंतर मात्र ते एकमेकांशी बोलू लागले व जेवताना सुद्धा एकमेकांसोबत जेवायचे...
रुद्रची शांतता, त्याचा समंजसपणा, या सर्व गोष्टी गार्गीला खूप आकर्षित करायच्या.. त्याचे विविध विषयांवरील मत, इतरांच्या भावनांप्रती असलेला आदर व योग्य गोष्टींची जाणीव या गोष्टींनी तिला मोहून टाकले... असे नाही की, हे सर्व ती पहिल्यांदा ऐकत होती... कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिची सुद्धा रुद्रकडे एक विशेष ओढ होती... एक मित्र म्हणून, एक माणूस म्हणून, ती त्याचा प्रचंड आदर करायची... हे असे सर्व गुण विहानकडे असते, तर किती छान झाले असते!!! असे सुद्धा तिला वाटायचे... मात्र यामुळे ती विहानला सोडून रुद्रवर प्रेम करू शकत नव्हती.. आपण मानवाने बनवलेल्या या संस्कृतीरूपी जाळ्यात व या नितीमत्तारुपी नियमांमध्ये असे अडकून जातो की मनुष्य म्हणून हा एकच जन्म आहे व या पृथ्वीतलावर आपल्याला थोडीफार वर्ष अजून मिळणार आहेत; या पलीकडे काहीही नाही हे आपल्याला विसरायलाच होतं.. अशा स्थितीत आपण जगणे सोडून परिस्थितीशी जुळवून घेत राहतो..
गार्गी रुद्रशी बोलते हे विहानला समजल्यानंतर त्याच्या रागाचा पारा पुन्हा चढला... त्याने तिला त्याच दिवशी बेंगलोर सोडून येण्यास फर्मावले...
गार्गीला सुचेना काय करायचे ते... तिला अगदी रडायला आले..
तिने घरी आई - बाबांना फोन केला.. परंतु, फोनवर नेमके काय बोलायचे हेच तिला कळत नव्हते... तोंडातून शब्दच फुटत नव्हते...तिच्या बाबांना कळले की, आपली मुलगी काहीतरी मोठ्या संकटात आहे... त्यांनी लगेच गाडी केली व कणकवली वरून लवकरच बेंगलोरला पोहोचले... तिकडे रडून-रडून गार्गी चे डोळे सुजलेले... तिच्या बाबांनी ते पाहिले आणि तिला भेटल्यानंतर फक्त एकच वाक्य बोलले की," बॅग भर.. आता लगेच आपण गावी जाणार आहोत..."
गार्गीने इन्फोसिस सोडले... गावी तिचे मन फार काळ रमले नाही... तिने घरी सांगितले की, पुन्हा मुंबईस जाते व तिकडे एखाद्या दुसर्या कंपनीमध्ये प्रयत्न करते... वडिलांनी परवानगी दिली, तशी ती आजीकडे पुन्हा आली.. आता ती विहानला पुन्हा भेटू लागली... प्रत्यक्ष एकमेकांशी भेटल्यानंतर सर्व गोष्टी चांगल्या होतील व एकमेकांसोबत असलेले वाद संपतील असे गार्गीला वाटले.. विहानसाठी मात्र कामसुखापलीकडे आता या नात्याला फारसा अर्थ राहिला नव्हता.. कधी कधी मुलींना हा गैरसमज होतो की, त्यांचा सहकारी जर त्यांच्या शरीरावर प्रेम करतोय, तर याचा अर्थ तो त्यांच्यावर सुद्धा खूप प्रेम करतो.. विहानसाठी मात्र हे कामसुख त्याचा राग होता.. काही का असेना, आता ते दोघे पुन्हा एकत्र आले होते..
मात्र विहान आता पुन्हा त्या प्रकारे वागत नव्हता...जणु काही त्याच्या मनातील गार्गीबद्दलचे प्रेम संपले होते... विहानने जी खोली भाड्याने घेतली होती, त्या खोलीची अजून एक चावी गार्गीकडे होती... जेणेकरून तिला हवे तेव्हा ती त्याच्या घरी जाऊ शकत होती... एक दिवस विहानने ती चावी तिच्याकडून घेतली व आता आपण पुन्हा कधी भेटायचे नाही... असे तिला सांगितले... गार्गीला समजले की, आता हे नाते संपल्यात जमा आहे... तरीही त्यावेळी शांत राहून, तिने नंतर त्याच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला... कदाचित विहानच्या आयुष्यात अजून कोणीतरी आलेले.. ज्यामुळे, आता त्याला गार्गीबद्दल फारसे काही वाटत नव्हते आणि त्यामुळे त्याने तिच्या कोणत्याच प्रयत्नावर प्रतिसाद दिला नाही... गार्गीला आयुष्य निरर्थक वाटू लागले... विहानने फक्त एकदा तिच्याशी भेटावे, याचा आटोकाट प्रयत्न करत होती... मात्र विहानला तिच्याशी भेटायचे वा बोलायचे नव्हते... गार्गी मनाने खुप खचली.. अगदी तिच्या मनात आत्महत्या करण्याचे सुद्धा विचार आले... परंतु, हाच तो काळ होता, ज्या काळात तिने स्वत:ला कणखर बनवले... आयुष्यातील अतिशय अवघड प्रसंगाला ती धीराने सामोरी गेली.. जेव्हा अपेक्षा मरतात, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने जिवंत होतो.. त्याला जगणे खऱ्या अर्थाने कळते..
रुद्रचे आई-बाबा मुंबईमध्ये राहत असल्याने, रुद्रला लवकरात लवकर मुंबई मध्ये परत यायचे होते.. त्याने इन्फोसिस मध्ये एक वर्ष पूर्ण करून, मुंबईमध्ये काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला... त्यापैकी एका ठिकाणी त्याची निवड सुद्धा झाली... तेव्हा त्याने इन्फोसिस सोडले... मुंबईत परतल्यावर जेव्हा त्याला कळले की, गार्गी सुद्धा इकडेच आहे; तेव्हा त्याने फोनवरून तिच्याशी संवाद साधला... एक दिवस त्या दोघांनी भेटायचे ठरवले... कित्येक महिन्यानंतर ही भेट होत होती...रुद्रने शेवटचे गार्गीला पाहिले होते, तेव्हा तिचे रडून प्रचंड वाईट हाल झालेले.. त्यामुळे आता खरच भेटावे की नाही, याबाबत त्याचे मन कचरत होते... परंतु, गार्गीने भेटण्याचा विषय स्वतःच काढल्याने, रुद्रला रहावले नाही... ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये दोघांची भेट झाली...
दोघांनी जुन्या आठवणींबद्दल भरभरून गप्पा मारल्या.. गार्गीच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता... तेव्हा रुद्र ने विचारले की," विहान आता काही आक्षेप घेत नाही ना तुझ्यावर?? काही बंधने लादत नाही ना..??"
गार्गीने उत्तर दिले," विहान आता माझ्या आयुष्यात नाही.. सुरवातीला खूप त्रास झालेला.. परंतु, हे बंधनमुक्त आयुष्य खूप छान वाटत आहे... त्याच्यावरचे प्रेम कमी झालेले नाही... तरीही, त्याच्या शिवायचे जग सुद्धा फार सुंदर आहे व त्यामुळे मी आनंदी आहे.."
याप्रकारे गार्गी कधी व्यक्त होईल, याचा रुद्रने कधी विचारही केला नव्हता... गार्गीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग तिच्यापासून दुरावला होता आणि तरीही ती आयुष्यातला प्रत्येक दिवस दिलखुलासपणे जगत होती...
आता रुद्र व गार्गीच्या भेटी वाढू लागल्या... अगदी रुद्रच्या घरी सुद्धा ते जाऊन आले... गार्गी चे आई वडील सुद्धा रुद्रला चांगलेच ओळखायचे... समाजासाठी काही करायचे, या भावनेने गार्गीने M.S.W. या पदव्यूत्तर पदवी कोर्स ला ऍडमिशन घेतले व ते पूर्ण करून एके ठिकाणी नोकरीला लागली...
तिच्या आयुष्यातून विहान जाऊन आता जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले होते... आज सुद्धा तिचे विहान बद्दलचे प्रेम कमी झाले नव्हते... मात्र तो आयुष्यात परत येईल याबाबतच्या आशा कमी होत गेल्या... एकमेकांवर कितीही रागावले तरी, वाढदिवस व दिवाळी हे असे दोन दिवस असायचे... ज्यावेळी ते एकमेकांना शुभेच्छा द्यायचे आणि त्याचमुळे तो तिच्याशी दुरावल्यानंतर सुद्धा तिने मेसेज रूपाने का असेना... या काळात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या... त्याने मात्र तिच्या वाढदिवसाला काहीही पाठवले नाही.. मनाचे हे असे असते, जिथे ते रमत नाही, तिथे स्वर्ग आणला तरी ते दु:खी होणार आणि जिथे ते रमते त्या अशा नरकात सुद्धा ते आनंद शोधणार.. विहान परतणार नाही, हे मनाला समजावून ती कणखर झाली होती...
दुसरीकडे, रुद्र तिच्यावर प्रेम करतो... हे सुद्धा एव्हाना तिला कळले होते... जे प्रेम विहानवर होते, ते रुद्र सोबत करणे शक्य होईल का??? याबाबत ती साशंक होती.. शेवटी पहिले प्रेम विशेष असते.. ती पहिली ओढ, तो प्रत्येक आनंद, त्या आठवणी विशेष असतात.. त्यामुळे या प्रकारचे कोणतेही विषय ती रुद्रशी बोलताना काढायची नाही...
रुद्र मात्र कायम तिची वाट पाहत होता... कॉलेजमध्ये असताना तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे, हे कळून सुद्धा तिच्यावरचे प्रेम कमी झाले नाही... विहानला ते दोघे एकमेकाशी बोललेले आवडायचे नाही... त्यामुळे तो तिच्यापासून स्वतःहून दूर राहायचा... परंतु, तरीही ती फक्त एकदा दिसली, तरी त्याचा दिवस आनंदी होऊन जायचा... त्यानंतर कॉलेजमध्ये एकत्र प्रोजेक्टवर काम करताना किंवा बेंगलोरला इन्फोसिस मध्ये एकत्र नोकरी करताना, तिच्यासोबत त्याचे नाते आणखी घट्ट होत गेले... परंतु, त्याचे प्रेम कधीही त्याने तिच्यावर लादले नाही...
अगदी मुंबईत आल्यावर हे कळून सुद्धा की, विहान आता तिच्या आयुष्यात नाही; त्याने मैत्रीचे नाते कायम ठेवले व जोपर्यंत तिच्या मनात असे काही येत नाही, तोपर्यंत वाट पाहायचे असे ठरवले.. काही माणसे असतात अशी वेगळ्याच मातीची.. त्यांना नीट ठाऊक असते की आयुष्यात काय हवे आणि ते मिळावेच ही अपेक्षा न धरता शांतपणे वाट पाहण्याचा संयम त्यांच्यामध्ये भरभरून असतो..
आता रुद्रच्या घरचे त्याच्या लग्नाच्या मागे लागले होते.. त्यामुळे, एक दिवस त्याने गार्गीला विचारलेच," आपण गेली आठ वर्षे एकमेकांना ओळखतो.. तू माझी चांगली मैत्रीण आहेस व माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे... सध्या माझ्या घरी माझ्या लग्नाचा विचार चाललाय... लग्न ही संकल्पना समोर येताच, गेली अनेक वर्ष तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही मनी आला नाही... त्यामुळे, जर तुझी परवानगी असेल तर मला तुझ्याशी लग्न करायला व आयुष्यभर तुझी साथ द्यायला आवडेल... तुला आवडेल का ???"
गार्गीच्या मनात रुद्र बद्दल प्रेम निर्माण झाले होते... तरीही ते विहानच्या प्रेमाची जागा घेऊ शकत होते का??? तर नाही... परंतु, एक व्यक्ती म्हणून.. जेवढा आदर ती रुद्रचा करत होती; तेवढा कदाचित तिने कोणाचाही केला नसेल.. कदाचित प्रेमापेक्षा हे गुण आयुष्यभर एकमेकांना समाधानी ठेवण्यात, आनंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात..
अशा प्रकारचे अनेक विचार करून शेवटी गार्गीने रुद्रला लग्नासाठी होकार दिला... आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळतेच अशी नाही.. त्याहून महत्त्वाचे असे की, आयुष्याला आपल्याला नेमके काय द्यायचे आहे हे समजण्यास आपण पात्र नसतो..
रुद्रसाठी हा त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता... कधीकधी आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट अशक्य वाटते.. मात्र हे जीवन आहे आणि यामध्ये सर्व काही शक्य आहे... गार्गीचा होकार तर आला होता, परंतु, दोघांच्या जाती भिन्न असल्याने, घरच्यांकडून हे नाते स्वीकारले जाईल की नाही याबाबत शंका होती... रुद्रच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या पसंतीवर पूर्ण विश्वास ठेवत, लगेच होकार कळवला... तो खालच्या जातीचा असल्याने गार्गीच्या घरी थोडाफार गदारोळ झाला...
अशा प्रसंगांना कसे सामोरे जायचे, कुठे कणखर व्हायचे.. कुठे समजावून सांगायचे... आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या सर्व घडामोडींनी गार्गीला हे चांगलेच शिकवले होते व त्यानुसार आचरण करत तिने शांतपणे हा विषय सतत आई वडिलांसमोर ठेवला... वडील शांत मनाचे असल्याने व आपल्या मुलीवर विश्वास असल्याने, त्यांनी गोष्टी फारशा ताणून धरल्या नाहीत.. आई मात्र कठोर असल्याने तिचा नकार होता...
शेवटी वडिलांनी आईची सुद्धा समजूत घातली व गार्गी चे आई-वडील या लग्नास तयार झाले...
लग्न लागत असताना, आपल्या बाजूला बसलेली गार्गी पाहून रुद्रच्या मनात त्या सर्व गोष्टी येऊन गेल्या...
त्या कॉलेजच्या पहिल्या तासात," may I come in madam.." म्हणालेली ती सुंदर अशी मुलगी... जी त्याची अतिशय घट्ट मैत्रीण झाली व त्यानंतर घडलेल्या त्या सर्व गोष्टी.. ज्यांनी त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि तरीसुद्धा हे नाते घट्ट टिकून राहिले... लग्नाच्या सप्तपदी मध्ये घेतल्या जाणाऱ्या शपथा हे नाते सुरू होण्याआधीच त्यांनी मनापासून पाळल्या होत्या व यापुढील सुंदर भविष्याबद्दल तो निश्चिंत होता..
गार्गीच्या मनात आज विहान होता की नाही ही गोष्ट महत्त्वाची नव्हती.. प्रेमा पेक्षा सुद्धा मैत्री व मैत्री पेक्षा सुद्धा एकमेकांप्रती आदर, समंजसपणा, तसेच एकमेकांप्रती असलेला प्रामाणिकपणा... या गोष्टी नाते घट्ट करतात.. असा समंजस साथीदार मिळणे, ही अतिशय भाग्याची गोष्ट होती... गार्गी व रुद्र ने एकमेकांमध्ये तो साथीदार शोधला होता...जो त्यांचे पुढील आयुष्य स्वर्गाहुन सुंदर करणार होता...
- अमित
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा