मनुस्मृति नेमकी काय आहे..

 






स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती, देवल स्मृती अशा अनेक स्मृती हिंदू धर्मात आहेत. मनूने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या २६८४ आहे.


सम्राट अशोकाच्या कालखंडात बौद्ध धर्म वेगाने भारतात पसरला. त्यानंतर ३००-४०० वर्ष बौद्ध धर्माची वाढ होत राहिली व तो भारतातील एक प्रमुख धर्म झाला. यामुळे जातीव्यवस्थेचे महत्त्व कमी होऊ लागले. याचा सर्वात मोठा तोटा उच्चवर्णीयांना आणि मुख्यत्वे ब्राह्मणांना झाला. ही परिस्थिती बदलण्यासाठी मनुस्मृती व त्याच्यासारखे इतर काही ग्रंथ लिहिले गेले आणि ब्राह्मण हा सर्वांत श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला. या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे.


हा भेद साधासुधा नव्हता. स्त्रियांच्या बाबतीत तर अनेक कठोर गोष्टी लिहिल्या गेल्या. मनुस्मृतीतील काही श्लोक जाणून घेऊ.

(या नियमांमध्ये स्त्री म्हणजे प्रत्येक जातीतील व अगदी ब्राह्मण स्त्री सुद्धा समजली जावी. शुद्र म्हणजे आजचा ओबीसी समुदाय. अस्पृश्य म्हणजेच दलित समुदाय हा प्रत्येक दृष्टिकोनातून हीन मानला गेला असल्याने, त्यांना या ग्रंथात स्थानच देण्यात आले नाही.)


१) लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीच्या, पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं. पण कोणत्याही परिस्थिती महिलेनं स्वतंत्र असू नये -

मनुस्मृती ५ वा अध्याय १४८ वा श्लोक.



२) या जगात पुरुषांना फूस लावणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे; या कारणास्तव, ज्ञानी लोक स्त्रियांच्या सहवासात कधीही सुरक्षित नसतात - 

२ रा अध्याय 


३) सुज्ञ लोकांनी आई, मुलगी किंवा बहिणीसोबत एकटे बसणे टाळावे. दैहिक इच्छा नेहमीच प्रबळ असल्यामुळे ती प्रलोभनाला कारणीभूत ठरू शकते.


ब्राह्मण पुरुष ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि अगदी शूद्र स्त्रियांशी लग्न करू शकतात पण शूद्र पुरुष फक्त शूद्र स्त्रियांशीच लग्न करू शकतात.

जो ब्राह्मण एखाद्या शूद्र स्त्रीशी विवाह करतो तो स्वतःची आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची अधोगती करतो, नैतिकदृष्ट्या अध:पतन होतो, ब्राह्मण दर्जा गमावतो आणि त्याची मुले देखील शूद्र दर्जा प्राप्त करतात.


जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणांना धर्माचा उपदेश करण्याचा अभिमान बाळगला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात जळते तेल ओतावे. 


त्या राजाचे राज्य, जो शूद्र कायद्याचे पालन करत असताना पाहतो, ते दलदलीतील गायीसारखे खाली बुडेल.

- ८ वा अध्याय 



४) जो शूद्र शिष्यांना शिकवतो आणि ज्याचा गुरू शूद्र आहे तो श्राद्धासाठी आमंत्रित केल्याबद्दल अपात्र ठरतो. 

- ३ रा अध्याय


५) ज्या देशात राज्यकर्ते शूद्र आहेत, त्या देशात राहू नये.

- ४ था अध्याय



६) महिलांना कोणतेही धार्मिक विधी करण्याचा, नवस करण्याचा किंवा उपवास करण्याचा कोणताही दैवी अधिकार नाही. तिचे एकमात्र कर्तव्य आहे की तिच्या पतीची आज्ञा पाळणे आणि त्याला संतुष्ट करणे आणि त्या कारणास्तव तिलाच स्वर्गात उंच केले जाईल.


७) कोणत्याही स्त्रीने तिच्या पतीच्या कर्तव्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन केले तर ती बदनाम होते आणि ती कुष्ठरोगाची रुग्ण बनते. 


८) धार्मिक विधी करण्यात काही अडचण आल्यास, २४ ते ३० वयोगटातील पुरुषांनी ८ ते १२ वयोगटातील स्त्रीशी लग्न करावे.


९) तिच्या पतीसोबत संतती निर्माण करण्यात अयशस्वी झाल्यास, तिला तिच्या मेव्हण्यासोबत किंवा तिच्या सासरच्या बाजूच्या इतर नातेवाईकांच्या सहवासाने संतती प्राप्त होऊ शकते.


१०) पुरुषांबद्दलची त्यांची उत्कटता, अपरिवर्तनीय स्वभाव आणि नैसर्गिक निर्दयीपणामुळे ते त्यांच्या पतीशी एकनिष्ठ नाहीत.


११) आपल्या पत्नींवर पूर्ण नियंत्रण ठेवणे हे सर्व पतींचे कर्तव्य आहे. शारीरिकदृष्ट्या कमकुवत पतींनीही आपल्या पत्नींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


१२) जर स्त्रिया, तिच्या उत्कृष्टतेच्या महानतेचा अभिमान किंवा तिच्या नातेवाईकांनी, तिच्या पतीबद्दलच्या तिच्या कर्तव्याचे उल्लंघन केले तर, राजाने तिला सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांसमोर फेकण्याची व्यवस्था करावी



असा हा मनुस्मृती ग्रंथ भारतीयांना कधीच वंदनीय नव्हता. विविध राज्यांमध्ये राजांच्या मतानुसार कायदे बनत असत. जसे मराठा साम्राज्यामध्ये शिवाजी महाराजांचे कायदे हे मनुस्मृतीवर आधारलेले नव्हते. गावपातळीवर मात्र खालच्या जातींना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांकडून धर्मशास्त्राच्या नावाने मनुस्मृतीचा वापर केला जात असे.



इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं की, ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया ग्रंथ आहे; त्याप्रमाणे मनुस्मृती हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाणग्रंथ आहे. त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे, असा प्रचार करावा. त्या आधारावर देशात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे.



या ग्रंथातील कायद्यानुसार एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या जातीप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई. ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यांचे वाईट होईल असं सांगण्यात येत असे. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा, अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे. 


मनुस्मृती जाळण्यासंबंधी आंबेडकरांचे नाव जरी प्रसिद्ध असले तरी पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं. आधुनिक शिक्षणासोबत व मेकॉलेने आणलेल्या ब्रिटिश कायद्यामुळे मनुस्मृतीचे महत्त्व कमी झाले होते. परंतु तरीही खेडो पाळण्यात हा ग्रंथ शूद्र, अस्पृश्य व सर्व जातींमधील स्त्रियांवरील अन्यायाचे कारण ठरत होता.


महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली. या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे; ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते वर्णन करत. "चातुर्वण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं," असं डॉ. आंबेडकर म्हणत.



तरीही आज अनेक जण मनुस्मृती या ग्रंथास वंदनीय मानतात. हे मानण्याची वेगवेगळी कारणे आहेत.


१) मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की, जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती-मनू-भृगू या परंपरेतून आला आहे; त्यामुळे तो मान्य करावा.


२) मनुस्मृतीचे इतर काही समर्थक असे म्हणतात की, स्मृती या वेदांवर आधारित असतात आणि मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे. 

पीठांचे शंकराचार्य, मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात. 


३) आधुनिक शिक्षण घेतलेले मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की, किरकोळ बाबी वगळल्या तर मनूची भूमिका ही समाजकल्याणकारी होती.



इतिहासाच्या अभ्यासातून कळते की, स्थानिक पातळीवर का असेना शेकडो वर्ष हा देश मनुस्मृतीच्या कायद्यांवर चालला आणि त्यामुळेच समाजाचा अध:पात झाला. 


स्मृति व पुराणे ही वेदसंगत असल्याच्या फक्त वल्गना केल्या जातात. खरेतर वेदांमध्ये स्त्रियांबाबत अशा हीन प्रवृत्तीचे लिखाण केले गेलेले नाही. सोबतच जातीव्यवस्था सांगणारे पुरुषसूक्त हा मूळ वेदांचा भाग नाही. त्यामुळे मनुस्मृती ही वेदसंगत नाही. 


सर्वात जास्त कुचंबणा होते, ती आधुनिक शिक्षण घेतलेल्या व योग्य-अयोग्य याची पारख असणाऱ्या व्यक्तींची. त्यांना हिंदू धर्मातील कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे कळत तर असते; मात्र आपल्याच धर्मातील गोष्टींना विरोध कसा करायचा, हा यक्षप्रश्न सुद्धा समोर उभा असतो.

त्यामुळे एक साधे सोपे उत्तर त्यांच्याकडे तयार असते की, प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी असते. मनुस्मृतीचा ह्या ठराविक गोष्टी वगळल्या तर बाकी भाग चांगलाच आहे. 

या आधुनिक सुशिक्षित लोकांनी स्वतः कधीही मनुस्मृति वाचलेली नसते.


त्यांना हे कळत नाही, एकदा का तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारली तर ती त्याच्या चांगल्या व वाईट तत्वांसोबत स्वीकारली जाते. मनुस्मृतीमध्ये नेमके काय चांगले आहे व नेमके काय वाईट, हे कोण सांगणार व त्याचे कोणीही का ऐकणार?


कोणाला हा प्रश्न का पडत नाही; 

बाबासाहेबांना हिंदू धर्माचा विरोध करायचाच होता, 

तर सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी असणारे वेद का नाही जाळले?? 

भगवद्गीता का नाही जाळली?? 

उपनिषदे का नाही जाळलेत??

मनुस्मृती हाच ग्रंथ का जाळला??



हिंदू धर्म असो किंवा इतर कोणताही धर्म असो, त्या धर्मांच्या पुस्तकात काळाप्रमाणे नवनवीन गोष्टी जोडल्या जात असल्याने, त्यात कुप्रवृत्तींची वाढ होत, हे ग्रंथ चुकीचे उपदेशांनी भरले जातात.

जे जे धार्मिक ते ते सर्व पवित्र व योग्य, अशी मानसिकता असल्याने मनात नसतानाही अनेकांना चुकीच्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात.


समाजाला विरोध करायची हिंमत नसते. 

आलिया भोगासी असावे सादर.. या मानसिकतेसोबत, आहे ते निमुटपणे सहन करीत आयुष्य पुढे ढकलायचे असते..


परंतु, 

मग एक तरूण - डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर येतो..

नेमके काय योग्य व काय अयोग्य हे फक्त इतरांकडून ऐकून न घेता, स्वतः नीट त्या ग्रंथांचा अभ्यास करतो..

समाजातील प्रत्येक जातीतील समविचारी व्यक्तींना एकत्र करत, ज्या ब्राह्मणांसाठी हा ग्रंथ मुळात लिहिला गेलेला; त्या ब्राह्मणांस याची अयोग्यता पटवून देत त्यांच्याद्वारेच या ग्रंथाचे दहन घडवतो..


मनुस्मृतीचे दहन.. हा कोणत्या धर्मास विरोध नव्हता किंवा कोणत्या धर्मास पाठिंबा नव्हता.. हा विरोध होता त्या मागास विचारांना ज्याने भारतास गुलामीच्या गर्तेत ढकलले.


- अमित 







टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट