कोरियन संगीतामागील कपट

 




BTS (Bangtan Boys) हे नाव तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. भारतीय तरुणाईमध्ये या ग्रुपमधील पोरं व त्यांनी गायलेली गाणी आज खूपच प्रसिद्ध आहेत. अनेकांसाठी हे फक्त व्यक्ती नसून, त्यांच्या भावनांशी जोडले गेलेले दैवत ठरत आहेत. यांच्याप्रमाणेच K-Pop (Korean Popular Music) ची बाकी गाणी सुद्धा भारतीय तरुणाईमध्ये प्रसिद्ध होत आहेत. पाच ते सात वर्षांपूर्वी कोरियन संगीताचा मागमूसदेखील भारतात शोधून सापडत नव्हता. आज मात्र प्रकरण एवढे वाढले आहे की, भारतात अनेक ठिकाणी या कोरियन गायकांचे वाढदिवस सुद्धा धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत.अचानक कोरियन संगीताची लहर येऊन, आज भारतातले जास्तीत जास्त लोक याकडे वळले आहेत, याचे नेमके कारण काय असावे?


Duolingo या वेगवेगळ्या भाषा शिकवणाऱ्या संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात भारतात कोरियन भाषा शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण साधेसुधे नाही, तर ४०० पटीने वाढले आहे.

भारतातल्या विविध शहरांत कोरियन खाद्यपदार्थ पसंत केले जात आहेत. एवढेच नव्हे तर काही रेस्टॉरंट खास कोरियन खाद्यपदार्थांसाठी उघडली जात आहेत.

Al Jazeera या वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणानुसार खास कोरियन प्रकारच्या नूडल्सची विक्री मागील एकाच वर्षात २०० पटींनी वाढली आहे.

कोरियन चित्रपट व वेब सिरीज पाहण्याचे प्रमाण सुद्धा भारतीयांमध्ये वाढत आहे. Netflix कडून मिळालेल्या माहितीनुसार मागील एका वर्षात भारतात 50 हुन जास्त कोरियन अल्बम किंवा वेब सिरीज व चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत; जे फक्त काही वर्षांपूर्वी बिलकुलच उपलब्ध नव्हते.


आता या सर्व गोष्टी भारतीयांनी स्वतःहून स्वीकारल्या असत्या किंवा या सर्व गोष्टींमुळे भारतीयांना काही लाभ होत असता आणि त्यामुळे त्या स्वीकारल्या असत्या किंवा खरंच भारतीयांच्या भावना या गोष्टींशी जोडल्या गेल्या असत्या तर यास काही हरकत नव्हती. परंतु, हे सरळ सरळ घडलेले नाही; हे घडवण्यात आले आहे.


हे सर्व घडवणारी सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे शासन.

कोणत्याही देशाच्या शासनाला आपल्या देशाने प्रगती करावी असे नक्कीच वाटत असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेशी चांगले संबंध असल्यामुळे दक्षिण कोरिया हा देश पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान व शिक्षणामध्ये अफाट वेगाने प्रगती करत राहिला. आज तो जगातील एक प्रगत देश म्हणून गणला जातो. प्रगत झाल्यानंतर मात्र जसे इतर देशांचे होते त्याप्रमाणे दक्षिण कोरियाची वाटचाल सुद्धा हळू होऊ लागली. अमेरिकासारख्या अवाढव्य देशाने हळुवार केलेली प्रगती सुद्धा अवाढव्यच असते. मात्र दक्षिण कोरियासाठी ही हळुवार वाटचाल खडतर भविष्याचे संकेत ठरू लागली होती.


परिस्थिती बिघडण्याआधीच पाऊल उचलणे, हे उत्तम शासनाचे कर्तव्य असते. दक्षिण कोरियन शासनाने हे पाऊल उचलले, ते आपल्या संस्कृतीची मदत घेत. आपली संस्कृती जगभरात जास्तीत जास्त प्रसिद्ध व्हावी व त्यामुळे आपल्या लोकांना, आपल्या कलेला, आपल्या खाद्यपदार्थांना व आपल्या वागणुकीला जगभरात जास्तीत जास्त मान्यता मिळत त्याची मागणी वाढावी व त्यामुळे आपली अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी; या प्रकारची योजना दक्षिण कोरियन शासनासमोर होती.

या योजनेला The Hallyu Strategy म्हणतात.


या योजनेनुसार जगभरातील तरुणाईच्या भावना आपल्या संस्कृतीसोबत जोडत, आपल्या देशातील सर्व गोष्टींची मागणी वाढवणे; हा उद्देश समोर ठेवला गेला.

खास त्यासाठी दक्षिण कोरियाच्या शासनाने भारतातील तरुणांना मोफत कोरियन भाषा शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

दक्षिण कोरियाचे किंग सेजाॅंग इन्स्टिट्यूट, भारतामध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांच्या सहाय्याने कोरीयन शिकण्यास मदत करते. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी आपले केंद्र स्थापन केले आहेत; तसेच इंटरनेटवर ऑनलाईन कोर्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

इंग्लिश भाषा शिकण्यासाठी सुद्धा असे अनेक कोर्स उपलब्ध आहेत. मात्र यातील वेगळेपण असे की, हे कोरियन भाषा शिकण्याचे कोर्स पूर्णपणे मोफत आहेत.

भारतीयांना कोरियन भाषा शिकण्याची सवय लावायची, कोरियन भाषा भारतात जास्तीत जास्त प्रमाणात पसरली की त्यानंतर मागणी वाढताच त्यातून पैसा कमवायचा हे सुद्धा सहज शक्य आहे.

एखाद्या संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी भाषा हे खूप महत्त्वाचे माध्यम ठरते. कोरियन भाषा शिकणारे भारतीय तरुण त्यांच्या संस्कृतीतील इतर गोष्टी स्वीकारणार नाहीत, हे अशक्य.


जगभरात जर सहज लोकांपर्यंत पोहोचायचे असेल, त्यांच्या मनात जागा करायची असेल, तर सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे संगीत.

दक्षिण कोरियाच्या मंत्रालयाने या गोष्टीवर भर देत, चेंगवान के-पाॅप फेस्टिवल २०११ पासून सुरू केला. या संगीत जत्रेनिमित्ताने जगभरात पोहचून तरुणाईला वेड लावण्याचे ध्येय जणू दक्षिण कोरियाच्या मंत्रालयाने ठरवले.

यामध्ये समावेश करणारे तरुण कोणत्या देशाचे आहेत व तिथे आपल्या संस्कृतीला किती चालना मिळू शकते हे पाहून विजेतेपद दिले जाते.

दरवर्षी भारतात अनेक शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. भारतीयांची या स्पर्धेत सहभागी होण्याची संख्या वाढत चालली आहे.

यावर्षी झालेल्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीयांची संख्या ११००० होती. 


या स्पर्धांना मुद्दाम या प्रकारे रचण्यात आले आहे की, जास्तीत जास्त भारतीय यात भाग घेतील. 

जसे - पहिली फेरी ही ऑनलाईन असते. त्यामुळे थोडाफार रस असणारे स्पर्धक सुद्धा यात नक्कीच भाग घेतील.

तिसऱ्या फेरीत पोचणाऱ्या स्पर्धकांना स्वतः कोरियन पाॅप स्टार स्वतः येऊन ट्रेनिंग देतात. त्यामुळे या स्पर्धेची क्रेझ खूप वाढते.

चौथ्या फेरीत तर स्पर्धकांना कोरियात जाण्याची संधी मिळते.

आता हे सर्व कोणत्याही प्रकारची फी न भरता.

कोरियन पाॅप स्टार स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वर या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांची स्तुती करतात. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले हे पाॅप स्टार याप्रकारे सामान्य भारतीयांबद्दल बोलतात तेव्हा, भारतीय तरुण यांकडे जास्त आकर्षित होतात.


जर एखाद्या देशाची तरुणाईच एका विशिष्ट गोष्टीला फार महत्त्व देत असेल, तर त्याद्वारे त्या तरुणाईला व पर्यायाने त्या देशाला नियंत्रित करता येऊ शकते. कोरिया या देशाकडे पायाभूत सुविधांसोबत उद्योग जगतात मोठी वाढ घडवण्याची संधी आता कमी होत जाईल आणि त्यामुळेच याप्रकारे जगभरात पसरत आपल्या संस्कृती द्वारे आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न दक्षिण कोरिया बाळगत आहे.


हे सर्व तितकेसे सोपे नव्हते. यासाठी त्यांनी मागील काही वर्षात तयार केलेल्या चित्रपटांमध्ये अतिशय वेगळे विषय घेण्यात आलेत. नक्कीच तेथील लेखकांनी लोकांना ही गोष्ट कशी आवडेल या दृष्टीने उत्तम मेहनत घेतलेली दिसून येते. 

जगात आपण कोठेही गेलो तरी मनुष्याच्या भावना समान असतात. या भावनांना कुरवाळले जाईल व ताब्यात घेतले जाईल या प्रकारची गाणी लिहून, त्यांना विशिष्ट प्रकारे सादर करून, BTS सारख्या समूहाने तरुणाईला वेड लावले.


चूक त्यांची नाही. आपली संस्कृती सुद्धा कोरियाप्रमाणे अत्यंत जुनी आहे. आपल्या देशाने असे काही ठरवले आणि दुसऱ्या देशांसोबत केले तर ते सुद्धा चुकीचे ठरणार नाही. इथे प्रश्न आहे तो व्यक्तिगत स्तरावरचा.

या कोरियन वेडामुळे आपण आपले किती नुकसान करून घेतोय हे तरुणाईला समजत नाही.

अनेक तरुणांना खरेतर ही गाणी कळतच नसतात. परंतु, BTS ची गाणी पाहणे, हे समाजाच्या दृष्टीने 'Cool' ठरत असल्यामुळे आपणही तेच करायचे ही त्यांची भावना असते.

ज्यांना ती समजतात, ते त्या शब्दांमध्ये व भावनांमध्ये गुंतत जातात. या काल्पनिक जगाला आपल्या खऱ्या जगाशी जोडून प्रत्यक्षात सुद्धा असेच होईल, ही आस धरून स्वतःला त्रास करून घेतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोरियन वेडापाई त्यांच्याशी संबंधित वस्तूंना हव्या त्या किमतीला खरेदी करण्याचा अट्टाहास धरून स्वतःचे व देशाचे नुकसान करतात.


चीन या देशाने सुरुवातीला खाद्यपदार्थांसोबत घुसखोरी करून नंतर भारतीय बाजारात इतर वस्तूंसोबत प्रवेश करत भारताच्या अर्थव्यवस्थेचे बरेच शोषण केले.

कोरियाच्या बाबतीत सुद्धा असे होण्याचे संकेत आहेत; त्यामुळे तरुणाईने सावध रहावे हीच अपेक्षा.


- अमित




टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट