हजार वेळा हरलेला माणूस..
अमेरिकेतील इंडियाना येथे राहणारा एक छोटासा मुलगा..
लहानपणीच वडील वारल्याने त्याच्या आईला एका कारखान्यात कामाला जावे लागले. आई कामाला गेल्यावर तो त्याच्या भावंडांची काळजी घेत असे. अगदी लहान वयातच भावंडांचे पोट भरण्यासाठी तो जेवण करायला शिकला.
अभ्यासात फारशी प्रगती नव्हती. शिक्षकांचा सतत ओरडा खावा लागत असे. अनेक वेळा तो नापास होत असे. घरच्या गरिबीमुळे कधी कधी शेतात सुद्धा काम करावे लागे. पैशांची कमतरता व अभ्यासात अपयश, यामुळे लवकरच त्याच्यासाठी शाळा बंद झाली.
त्यानंतर त्याने टांग्यांना रंग देण्याचे काम सुरू केले. आपले वय जास्त दाखवून, संधी मिळताच त्याने अमेरिकेच्या सैन्यदलात प्रवेश मिळवला. तेथील अधिकाऱ्यांना हा शिस्तबद्ध व गुणी मुलगा फार आवडला. परंतु, नियमितपणे होणाऱ्या मेडिकल टेस्टमुळे याचे खरे वय समजून आले. त्यामुळे वर्षभरातच.. परंतु, उचित मानासहीत त्याला आर्मी सोडावी लागली.
त्यानंतर त्याने रेल्वे खात्यात मजुराचे काम सुरू केले. आपण कितीही कष्ट केले तरी, ज्ञान नसेल तर या कष्टाला किंमत नाही, हे त्याला समजून आले होते. त्यामुळे त्याने कायद्याच्या शिक्षणास सुरुवात केली. वकील झाल्यानंतर रेल्वे खात्यातील नोकरी सोडून कोर्टामध्ये केस लढण्यास सुरुवात केली. परंतु, सुरुवातीच्या काही केसमध्येच त्याला कळले की, आपली डाळ इकडे शिजणार नाही.
पुन्हा घरी येऊन, आपण आयुष्यात नक्की काय करू शकतो याबद्दल विचार करू लागला. या काळात त्याच्या आईने त्याला खूप धीर दिला. लवकरच अजून एक संधी चालून आली. जीवन विमा कंपन्या अमेरिकेत पसरत होत्या. त्यातील एका कंपनीमध्ये त्याला विमा विकण्याची नोकरी मिळाली. या कंपन्यांची धोरणे मात्र त्याला आवडत नसत आणि त्यामुळेच नियम न पाळल्याने त्याला काढून टाकण्यात आले.
पैशाची जमवाजमव करून, त्याने एक छोटीशी नौका विकत घेतली. पर्यटकांना त्या नौकेतून फिरवण्यात एक वेगळाच आनंद त्याला मिळत असे. त्याच्या गप्पांमध्ये पर्यटक सुद्धा हरवून जात. त्याची ती नौका प्रसिद्ध होऊ लागली, तसे त्याला भरपूर नफा होऊ लागला. या नफ्यातूनच त्याने एक विजेचा दिवा, अर्थात बल्ब तयार करण्याची कंपनी सुरू केली. परंतु इकडे मात्र त्याला अतोनात नुकसान झाले.
नौकेचा व्यवसाय सुद्धा आता अपयश दाखवू लागला होता. त्यामुळे, ते सर्व बंद करून, त्याने एका टायर कंपनीमध्ये सेल्समनची नोकरी स्वीकारली. लवकरच ती टायर कंपनी बंद पडल्याने, त्याची ती नोकरी सुद्धा गेली.
त्यानंतर अनपेक्षितपणे त्याची भेट एका पेट्रोल कंपनीच्या मालकासोबत झाली. त्याचे अनेक पेट्रोल पंप होते. या तरुणास त्याने एका ठिकाणी पेट्रोल पंप वर कामाला ठेवले. त्याचे येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधणे व पेट्रोल पंप वर इतर काही गोष्टी ग्राहकांना उपलब्ध करून देणे, यामुळे कंपनीला फायदा होत होता. परंतु, तो पेट्रोल पंप त्या कंपनीच्या मालकास बंद करावा लागला.
त्याला दुसरी संधी मिळाली. या कंपनीच्या स्पर्धक कंपनीचे यांच्या पेट्रोल पंप वर लक्ष होते. त्यामुळे, हा पेट्रोल पंप बंद पडताच, त्यांनी यास बोलावून त्यांच्या पेट्रोल पंप चे कार्य याच्या हाती दिले. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबद्दल त्याचा कटाक्ष होता. त्यामुळे, या ठिकाणी त्याने खास त्याच्या पद्धतीने तयार केलेले चिकन विकण्यास सुरुवात केली.
त्याच्या या चिकन मुळे, त्या संपूर्ण भागात तो प्रसिद्ध झाला.
त्यामुळे लवकरच पेट्रोल पंप वरील काम सोडून त्याने स्वतःचे हॉटेल उघडले. अप्रतिम स्वादामुळे हे लवकरच प्रसिद्ध झाले. परंतु, एके दिवशी ग्राहकाशी त्याच्या कर्मचाऱ्याच्या झालेल्या भांडणात, ग्राहकाने केलेल्या गोळीबारात त्याच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याचा परिणाम पुन्हा व्यवसायाच्या अपयशात झाला.
यावेळी मात्र त्याने अपयश मिळताच आपले काम थांबवले नाही. हे हॉटेल पुन्हा चालावे यासाठी तो कष्ट करत राहिला व काही वर्षातच पुन्हा यश मिळवत त्याने त्याच्या हॉटेल शेजारील वास्तू विकत घेतली व हॉटेलचा कारभार वाढवला. या ठिकाणी सुद्धा आग लागल्याने, त्याला अपयशाचा सामना करावा लागला. या जळालेल्या ठिकाणांना पुन्हा नव्याने उभारत त्याने यश मिळवण्यास सुरुवात केली.
लवकरच दुसरे महायुद्ध सुरू झाले व त्याला आपले हे हॉटेल बंद करणे भाग पडले. अमेरिकेतील मोठ-मोठी हॉटेल मात्र चालूच होती. या हॉटेलमध्ये जाऊन आपली चिकन तयार करण्याची कला त्यांना विकण्याचा प्रयत्न याने केला.
१००९ वेळा त्याच्या या पाककृतीला नाकारले गेले.
नंतर एका हॉटेल मालकाने त्याच्या पाककृतीला स्वीकारले. त्याने आपल्या या चिकनला 'केंटूकी फ्राईड चिकन' (KFC) असे नाव दिले.
हे चिकन खूपच प्रसिद्ध झाले. त्यामुळे, इतर अनेक हॉटेल मालकांनी ही पाककृती मिळण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली. या चिकनमुळे इतर हॉटेलमधून जरी त्याला थोडाफार नफा होत असला,तरी त्याचे स्वतःचे हॉटेल मात्र बंद पडले.
आता त्याला या सर्व गोष्टींची सवय झाली होती. परंतु, प्रयत्न करणे सोडायचे नाही ही समज सुद्धा त्याच्यामध्ये आली होती. त्याने अतिशय छोट्या जागेत स्वतःचे ऑफिस सुरू केले. अनेक हॉटेलंना ही पाककृती हवी असल्याने, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप पैसा मिळाला.
१९६५ साली वयाच्या ७५ व्या वर्षी त्याने KFC नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. अमेरिकेत प्रसिद्धी मिळताच, त्याने इतर देशांमध्ये सुद्धा या व्यवसायाचे बीज रोवले. विशेष म्हणजे पूर्ण जगभरात आपल्या ग्राहकांशी भेटून, त्यांची आवड-निवड जाणून घेण्यासाठी व प्रतिसाद पाहण्यासाठी तो वर्षभर प्रवास करत असे.
वयाच्या ९० व्या वर्षी तो वारला, तेव्हा KFC ही जगातील एक महत्त्वाची कंपनी म्हणून नावारूपाला आली होती.
आयुष्यात सतत पराभव स्वीकारून सुद्धा, नवनवीन प्रयोग करत; आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवण्याचे कसब असणाऱ्या या व्यक्तीचे नाव होते - हारलँड सँडर्स.
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा