आयुष्यात लेखकांचे महत्त्व
लेखक म्हणजे एका पानात या पृथ्वीचा, तेथील निसर्गाचा, विविध प्रकारच्या व्यक्तींचा, परिस्थितींचा व युक्तींचा प्रवास घडवून आणणारी व्यक्ती.
वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. परंतु, हे वाचवण्यासाठी आधी चेतना निर्माण करणारे लेखकच असतात. प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीच्या आयुष्यात कायमच लेखकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे व प्रत्येकाचे काही विशेष आवडते लेखक असतात.
अर्थात आवडता लेखक ठरवणे काही सोपी गोष्ट नाही.कारण प्रत्येक लेखक जीवनास काही ना काही शिकवून जातो. ही शिकवण आपला आयुष्यरुपी झरा कायम वाहत ठेवण्यास मदत करते. माझे अनेक आवडते लेखक आहेत. परंतु, निवड करायचीच झाली तर मी दोन लेखकांची नावे विशेष नमूद करेन. ते म्हणजे - वि स खांडेकर व चेतन भगत.
तसं पाहिलं तर दोन्ही लेखक विरुद्ध टोकाचे आहेत.
खांडेकर खेडूत जीवनाची ओळख करून देणारे, गरिबीमुळे मनुष्याच्या होणाऱ्या हालअपेष्टांचे दर्शन घडवून देणारे, साधारण गृहस्थांचे आयुष्य समोर ठेवून लेखन करणारे आहेत.
तर दुसरीकडे चेतन भगत हे अत्यंत श्रीमंत, शहरी व आधुनिक जीवन जगणाऱ्या प्रेमीयुगूलांच्या माध्यमातून आपले लेखन करणारे लेखक आहेत.
या दोघांनी टिपलेला समान गुण म्हणजे 'नैसर्गिक मानवता'!!
हा असा गुण आहे, जो मनुष्यातल्या भावनांची पारख करून, त्यांना महत्त्व देऊन, त्या भावनांच्या गुंतागुंतीला समजून घेऊन, मनुष्य जीवन मुक्तपणे जगण्यास वाव देतो.
या दोन्ही लेखकांचे महत्त्व हे की, अगदी सहजपणे सुरू असलेल्या गोष्टीत मनुष्य जीवनात एकमेकांत असलेल्या चांगल्या वाईट गुणांची ओळख ते करून देतात व हे दाखवण्यात यशस्वी होतात की, आपल्याला जे वाईट वाटतं ते नेहमीच वाईट नसतं व आपल्याला जे चांगलं वाटतं ते प्रत्यक्षात वाईट असतं. हे ओळखू न शकल्यामुळे मनुष्याने त्याचे जीवन दिवसेंदिवस बंदिस्त करून घेतले आहे व या जीवनाला संस्कृती हे गोंडस नाव दिले आहे. ही संस्कृती या दोन्ही लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला, जिने मनुष्यातून नैसर्गिक मनुष्यत्व हिरावून घेत एक नवा समाज निर्माण केला.
रोजच्या आयुष्यातून काही विसाव्याचे क्षण म्हणून एखादी कादंबरी वाचणे हे कायमच आनंद देणार ठरतं. इतर वेळी काही गोष्टींमध्ये मन रमतं, मग ते मैदानी खेळ असोत, मोबाईल असो किंवा अगदी फक्त गप्पा मारून देखील आपण चिंतामुक्त होतो. परंतु, कादंबरी वाचताना आपल्याला फक्त आनंद मिळत नाही. त्यासोबतच इतरांच्या किंवा बहुतेक वेळा आपल्या आयुष्यातल्या दुःखाची जाणीव देखील आपल्याला होते. विशेष असे, की हे दुःख आपल्याला कवटाळून धरण्यास नाही, तर त्यातून मार्ग काढून पुढे जाण्यात, आयुष्याचा गुंता सोडवण्यात मदत करते.
अनेक वेळा आपण आपले दुःख व समस्या इतक्या कवटाळून ठेवतो की इतर जगात काय सुरू आहे, याची जाणीव देखील आपल्याला नसते. खांडेकरांच्या कादंबऱ्या जसे की - 'दोन मने, अश्रू व अमृतवेल', यांचे वाचन करताना एखाद्याचे आयुष्य वरवरुन उत्तम दिसत असले तरी त्यातील नेमके मर्म आपल्यासमोर ठेवतात. आपले आयुष्य किती सुंदर आहे, याची जाणीव करून देतात. सोबतच जर मनुष्याने 'जगा व जगू द्या' या तत्त्वाचे पालन केले, तर सगळ्यांचे आयुष्य अगदी सोपे होईल; ही भावना सुद्धा जागृत करतात.
गेल्या जन्माचे किंवा ह्या जन्माचे पाप- पुण्य अशा चक्रात अडकवून न ठेवता, मनुष्यच इतर मनुष्यासाठी देव व राक्षस ठरत असतो याची जाणीव करून देणारे लेखक म्हणजे, वि स खांडेकर.
तरुणाईत असलेल्या प्रेमाच्या संकल्पना, जसे एकमेकांना महागडी भेटवस्तू देणे, रुसवे-फुगवे याला प्रेम समजणाऱ्या जगात चेतन भगत हे शारीरिक आकर्षणापासून एकमेकांचे जीवन उंचावण्यापर्यंतच्या कहाण्यांमधून खऱ्या प्रेमाची ओळख करून देतात. समाजात असलेल्या खऱ्या प्रश्नांची ओळख करून देतात. सोबतच विवाह अथवा प्रेम संबंध हे मनुष्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असून, ते किती महत्त्वाचे आहे व ते नाविन्यतेने कसे निभावू शकतो हे शिकवतात.
कादंबऱ्या वाचण्यातले रहस्य कायम ठेवत, उत्तम अशी माहिती देता येते. प्रत्येक घडामोडीमध्ये एखादा प्रसंग समोर ठेवून आपल्याला विचार करण्यास भाग पाडणे व या विचारांना योग्य अशी दिशा देणे हे या दोन्ही लेखकांचे कसब. त्यामुळेच त्यांचे महत्त्व अधिक वाटते.
वेगळ्या वाटेने प्रवास करत असताना, अचानकपणे विचारांना शुद्धतेच्या चाळणीतून चाळून, त्यांना अधिक प्रखर करणे; हे काम अगदी चोखपणे एखाद्या लेखकाशिवाय इतर कोणीही करणे कठीण आहे..
लेखिका - अंकिता भोईर

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा