मराठे मूळचे कोण होते?

 


सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात तापलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण. मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून, गेली अनेक वर्षे मराठा समाज प्रतिकार करत आहे. ही लढाई न्यायालयात जाण्यामागचे कारण की, मराठा समाजाला कायद्याने आरक्षण देता येऊ शकते की नाही हा पडलेला पेच. भारतातील कायद्यानुसार फक्त आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास समाजालाच आरक्षण देता येते. मराठा समाज या प्रवर्गात बसतो का, हे पाहण्यासाठी हा समाज तयार कसा झाला हे तपासणे महत्त्वाचे.


आज हिंदू धर्मामध्ये महाराष्ट्रात मराठा किंवा राजस्थानमध्ये राजपूत या जाती मानल्या जातात. भारतातल्या विविध भागांमध्ये अशा अनेक जाती आहेत, ज्या आज महत्त्वाच्या ठरत आहेत. परंतु, हिंदू धर्माच्या मूळ ढाच्यामध्ये या जातींचा उल्लेख नव्हता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या मूळ जाती व याच क्रमाने त्यांना मांडले जाते. यांच्या अनेक उपजाती होत गेल्या, काहींना समाजाने स्वीकारले तर काहींना बहिष्कार सहन करावा लागला. आता यात नेमके मराठे कसे आले, ते पाहू.


जात व्यवस्था -


प्राचीन काळापासून ते मध्ययूगापर्यंत ब्राह्मण व क्षत्रिय या जातींनी समाजावर वर्चस्व गाजवले. या वर्चस्वाच्या राजकारणात ब्राह्मण व क्षत्रिय यांचे एकमेकांसोबत कट्टर शत्रुत्व पाहायला मिळाले. वैदिक धर्माची सुरुवात उत्तर भारतात झाली व त्यानंतर आलेली मोठमोठी साम्राज्ये सुद्धा उत्तर भारतातच आपल्याला पाहायला मिळतात. हिंदू जातीव्यवस्थेतील या महत्त्वाच्या दोन जातींमधील जनसंख्या त्यामुळेच उत्तर भारतात जास्त पाहायला मिळते.


नर्मदा नदीखोऱ्याखालील प्रदेश म्हणजेच महाराष्ट्रापासूनचा दक्षिण भारत मुख्यत्वे शेतकरी व आदिवासी बांधवांचा होता. त्यामुळेच दक्षिण भारतात आज प्रामुख्याने OBC- शूद्र, SC- अस्पृश्य व ST- आदिवासी समाजाची जनसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते. प्राचीन भारतात सातवाहन, चालुक्य किंवा राष्ट्रकूट ही महत्त्वाची साम्राज्ये दक्षिण भारतात होऊन गेली. त्यांच्या राजांनी सुद्धा ब्राह्मणांना पैसे देऊन, आपली जात उंचावून घेतल्याचा उल्लेख आहे. मध्ययूग सुरू होईपर्यंत जातींची ही रचना खूप कट्टर होती व मराठा किंवा राजपूत सारख्या उपजाती अस्तित्वात नव्हत्या.



शहाजी राजे -


भारतीय इतिहासकारांच्या मते राजाच्या मुलानेच राजा व्हावे या आरक्षण व्यवस्थेमुळे अनेक निकृष्ट दर्जाचे राजे भारतात निर्माण झाले, ज्यांना बाह्य आक्रमणापासून स्वतःच्या जनतेचे संरक्षण करता आले नाही. शूद्र व अस्पृश्य समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्याने त्यांच्या गुणांना वाव मिळत नव्हता. कुतुबुद्दीन ऐबकपासून लोदी साम्राज्यापर्यंत अनेक सुलतानांनी भारतावर राज्य केले. त्यानंतर आलेत मुघल. ज्यांनी या सुलतानांची सत्ता संपवत आपले साम्राज्य स्थापन केले.


या इस्लामी सत्तेमुळे भारतीय समाजात एक बदल पाहायला मिळाला. या सुलतानांना तुम्ही कोणत्या धर्माचे व जातीचे आहात याच्याशी काहीही घेणे-देणे नव्हते. तुमच्यातील गुणांना ते महत्त्व देत. याचा परिणाम असा झाला की शुद्र समाजातील अनेक व्यक्तींना तलवारी हातात घेऊन सैन्यात सामील होता आले. त्यातीलच एक नाव म्हणजे शहाजीराजे भोसले.


आपल्या समाजातील एक गंमत सांगतो. शिवाजी महाराजांचे कुळ विचारताच, त्यांची आई सिसोदिया राजपूत घराण्यातील होती, हे सांगितले जाते. खरे तर हिंदू समाजाप्रमाणे मुलाला त्याच्या वडिलांची जात लागते. परंतु, शहाजीराजांची जात कोणीही व्यक्त करत नाही. एका शुद्राचं पोर मोठं होऊन छत्रपती झालं, ही कल्पना सुद्धा ज्या समाजाला असह्य होऊ शकते, त्यांना हे सांगताना त्रास होणारच.


तर शहाजीराजे भोसले व त्यांच्यासारख्या अनेक मागास प्रवर्गातील व्यक्तींनी आपल्या गुणांना वाव देणारी व समाजामध्ये मानमरातब देणारी अशी चाकरी विविध ठिकाणी पत्करली. शहाजीराजे स्वतः काही काळ अहमदनगर, काही काळ मुघल व काही काळ विजापूरच्या साम्राज्याखाली कार्यरत राहिले. अगदी या काळापर्यंत सुद्धा मराठा समाज तयार झाला नव्हता. एक वेगळी सांगण्यासारखी गोष्ट अशी की, 'शिवाजी महाराज नसते तर गुलाल झाला असता हिरवा' असे बोलले जाते. परंतु, त्यांच्या आधी या महाराष्ट्रावर जवळजवळ पाचशे वर्षे मुसलमानांची सत्ता असूनही गुलाल लालच राहिला.



छत्रपती शिवाजी महाराज -


दूरदृष्टी बाळगणाऱ्या एका पोराने, येथील सर्व शेतकरी व आदिवासी जातींना एकत्र केले. त्यास माहीत होते की, मी फक्त एका सुभेदाराचा मुलगा आहे; ज्या सुभेदारीला या मोठमोठ्या साम्राज्यात फारसे महत्त्व नाही. येथील जनता या साम्राज्यात सुखी नाही. त्यांचे जीवन बदलायचे असेल तर प्रतिकार करायला हवा व त्यासाठी यांना एक व्हायला हवे. वर नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या या भागात मुळचा क्षत्रिय समाज दुर्मिळ होता. त्यामुळे धनगर, रामोशी, डोंबारी यांसारख्या अठरापगड जातींना एक करत; त्यांतील धैर्य समजून घेत, या पोराने आपली सेना उभी केली. 


या काळापर्यंत वारकरी संप्रदायाने मराठी भाषा मोठ्या प्रमाणात या भागात रुजवली होती. शिवरायांच्या काळात संत तुकारामांनी मराठी भाषेला मोठेच वैभव प्राप्त करून दिले. आपल्या सैन्यामध्ये सर्वांची एकच भाषा असेल, तर त्यामध्ये आपुलकी वाढेल. तसेच राज्य जर एका भाषेला व्यवस्थित ओळखत असेल, तर शासन नीट चालवता येईल. या हेतूने शिवरायांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला.


मराठी भाषा बोलणारे शिवरायांचे हे सैन्य मराठे म्हणून ओळखले जाऊ लागले.


शिवरायांच्या काळात त्यांची उभी सेना फार कमी असायची. गरज लागेल तसे ते आपल्या विश्वासू व्यक्तींना बोलवून घ्यायचे. इतर वेळी हे सर्व सैन्य त्यांच्या शेती किंवा इतर व्यवसायांमध्ये गुंतलेले असायचे. पेशव्यांच्या काळात ही उभी सेना खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात पहिल्या बाजीरावाचे महत्त्वाचे योगदान आहे. 


राजाच्या दरबारी असलेल्या या सैनिकांना चांगले धन प्राप्त होत होते व त्यांची आर्थिक स्थिती सुधारत होती. त्यांच्या पुढील पिढ्या सुद्धा व्यवस्थित शिक्षण घेत चांगले राहणीमान उपभोगू लागल्या होत्या. आर्थिक स्तर उंचावल्याने व समाजातील मानमरातब वाढल्याने समाजातील मूळ जातींपेक्षा हे स्वतःला वेगळे मानू लागले व समाज सुद्धा त्यांच्याकडे आदराने पाहू लागला. याप्रकारे तयार झाला मराठा समाज.



मराठ्यांची स्थिती -


पेशव्यांच्या काळापासून ते आजपर्यंत मराठा समाज आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या प्रगत मानला गेला. मग त्यांना मागास समजायचे की नाही? त्यांच्यावर अत्याचार कधी झालाच नाही का?


अत्याचार तर स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा सहन केला.

खालच्या जातीतील असल्याने महाराष्ट्रातील कोणीही ब्राह्मण त्यांचा राज्याभिषेक करण्यास तयार नव्हता. अगदी आज ज्याला त्यांचा गुरु म्हणून दाखवले जाते, तो रामदास सुद्धा तयार नव्हता. त्यामुळे मुगल साम्राज्यातील एका पंडिताला धनाची रास वाहत इकडे बोलवावे लागले. कारण, हिंदू धर्माप्रमाणे ब्राह्मण संमतीशिवाय राज्याभिषेक पार पडू शकत नव्हता. जर राजानेच हा अत्याच्यार सहन केला होता, तर सामान्य मराठ्यांनी नक्कीच अनेक अत्याचार सहन केले असतील.


मराठा समाज कायम स्वाभिमानी राहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना आरक्षण मिळवून देताना, महाराष्ट्रातील व भारतातील इतर अनेक जातींबद्दल सुद्धा, यांना आरक्षण मिळायला हवे असे मत मांडले. त्यातील बहुतेक जाती आजच्या ओबीसी म्हणजेच शूद्र समाजातील होत्या. परंतु, आम्ही दलित नाही. असे म्हणत ओबीसींनी तेव्हा आरक्षण नाकारले. नंतर त्याच ओबीसींनी आरक्षण मिळावे यासाठी लढा दिला. आज सर्वात जास्त आरक्षण ओबीसींनाच आहे. स्वाभिमानी मराठा समाजावर सुद्धा तीच वेळ आली आहे. 


भारताची कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, वाढणारी बेरोजगारी व महागाई यामुळे प्रत्येक समाजाला आरक्षण हा एक उपाय वाटतो. काही वर्षांपूर्वी खुल्या गटातील आर्थिक मागासवर्गाने सुद्धा आरक्षण मिळवले. आरक्षण म्हणजे आर्थिक लाभ याप्रकारे पाहिले गेल्याने, आर्थिक स्तर खालावलेल्या मराठा समाजाला आज याची आवश्यकता वाटत आहे. 


वर नमूद केल्याप्रमाणे पेशवाईच्या काळापासून सामाजिक व आर्थिक स्थिरता लाभल्याने, मराठा समाजाचे मागासलेपण कायद्याने सिद्ध होणे ही कठीण बाब बनली आहे. दुसरीकडे ज्यांना अनेक वर्षांपासून आरक्षण मिळत आहे, त्यांची तरी स्थिती चांगली आहे का, याकडे कोणी लक्ष देत नाही. आरक्षण देताना खरेच त्या समाजाचा विकास व्हावा हा उद्देश कोणत्याही शासन काळात ठेवला गेला नाही. त्यामुळे, आरक्षण मिळो किंवा न मिळो मराठा समाजाची स्थिती सुधारणे ही कठीण बाब आहे.



उपाय -


१) एका ठराविक मर्यादेपर्यंत शिक्षण घेणे ही या समाजाची ठेवण झाली आहे. ती बदलत उच्चशिक्षणास या समाजाने प्राधान्य द्यायला हवे.


२) मुलींना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देत त्यांना रोजगार घेण्यास प्रवृत्त करायला हवे.


३) गुजराती समाज उद्योगांमध्ये पुढे राहण्यामागचे कारण त्यांत असलेली एकी. मराठ्यांनी सुद्धा उद्योग क्षेत्रात उतरत आपल्यातील एकी जोपासली पाहिजे.


४) काही मराठे अतिश्रीमंत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचाच दबदबा राहिला आहे. त्यांनी आपल्यातील गरिबांकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे.


५) शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत आरक्षण मिळाले तर उत्तमच, मात्र त्याची वाट न पाहता, प्रत्येक मराठ्याने स्वतःच्या आयुष्याचे नियोजन करत, आपल्या अंगी कौशल्यांचा विकास कसा होईल याची धडपड केली पाहिजे.



शिवरायांनी तयार केलेल्या या समाजाने महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला आहे. यांच्या वाटचालीला योग्य मार्गदर्शन मिळाले,तर पुन्हा मराठे महाराष्ट्राला सुवर्ण युगात नेतील यात शंका नाही.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट