दलितांनी आंबेडकरांना कसं संपवलं..

 





हो, अगदी बरोबर वाचलंत. ज्या दलितांसाठी बाबासाहेब आपले पूर्ण आयुष्य खर्ची घालून गेले, त्यांच्यामुळेच आज बाबासाहेब संपल्यात जमा आहेत. बाबासाहेबांनी आज धम्मचक्र प्रवर्तन घडवले होते..

आज धम्मचक्र प्रवर्तन दिन. याचा नेमका अर्थ काय? धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना आज अनेक दलित दिसतील. परंतु, हे नेमके काय व कशासाठी याची दखल कोणी नाही घेणार.


धम्म म्हणजे, माणसाने नैसर्गिक तत्त्वानुसार कशाप्रकारे जीवन जगावे याची बुद्धाने दिलेली शिकवण. ही शिकवण गेल्या पंधराशे वर्षात जवळजवळ नष्ट होत आली होती. परंतु, बाबासाहेबांनी त्याच धम्माला पुन्हा महत्त्व देत, प्रवर्तन करून - म्हणजेच त्या स्थितीत बदल करत, भारतात एक मुख्य विचारप्रणाली म्हणून समोर आणले; म्हणून आजचा हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन.

किती दलितांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल?


एकमेकांशी भेटताना जय भीम बोलायचेच, हा आग्रह आज दलितांमध्ये दिसतो. बाबासाहेबांनी आपल्या संविधानात मूलभूत हक्कांना खूप महत्त्व दिले. त्यात कलम 19 नुसार, प्रत्येकाला आपल्या मनातील हव्या त्या भावना व्यक्त करण्याचा हक्क आहे. मग दुसऱ्यावर या प्रकारची जबरदस्ती करणे, हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे उल्लंघन नाही का?

हे त्यांच्या विचारांना संपवणे नाही का?


शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा..

हा न्याय मिळवण्याचा व स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. अजूनही दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे.

खराब आर्थिक परिस्थिती, हे कारण तर आहेच. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव हे दुसरे कारण दलितांना आज घातक ठरत आहे. 

नोकरी करण्यापूरते शिक्षण मिळवणे, हे काय शिक्षण झाले?

नोकरी करणारा नोकर असतो व तो आयुष्यभर त्याच गुलामी मानसिकतेत जगतो. मुबलक शिक्षण, त्याला या नोकरीतून बाहेर काढून मालक बनवू शकते. त्यासाठी दलितांनी नोकरी लागल्यावर सुद्धा आपले शिक्षण चालू ठेवणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी हेच केले होते.

परंतु दलित, बाबासाहेबांच्या या मार्गावर चालत आहेत का? नाही.


संघटित होणे, हे तर कधी दलितांना जमलेच नाही. आज कोणी काँग्रेसी असतो, कोणी मोदी भक्त असतो, कोणी ठाकरेंचा सैनिक असतो तर कोणी एखाद्या अमुकतमुक संघटनेचा कार्यकर्ता. हिंदुत्ववाने प्रेरित भाजप शासनाला दिवस-रात्र ओवाळणारे, आम्ही आंबेडकरांनाच मानतो असे म्हणतात, तेव्हा खूप हसू येते.

जशा लाटा येतात, तसे दलित वाहत जातात.

स्वतःचे असे काय यांनी ठेवलेच नाही आणि त्यामुळेच आंबेडकरवाद लोप पावला. मग यांनी आंबेडकरांना संपवले, असे म्हणण्यात काय चूक?


बाकी संघर्ष तर नक्कीच चाललाय..

भारतातल्या मंत्रिमंडळापासून, सचिवांपासून ते कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत दलितांची पोहोच अजून गेलेलीच नाही.

शासनाची भक्ती करणाऱ्या एका क्षुल्लक कवीला, दलितांची मते मिळवण्यासाठी मंत्रिपद दिले गेले, ही अपवादात्मक गोष्ट.

मुख्य निर्णय घेणाऱ्या कोणत्याही पदांत दलित नसूनही, देश मागे राहतोय हे दलितांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे, ही आरोळी मात्र सतत उमटत राहते.

ज्यांना आरक्षण मिळून एखाद्या संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश मिळतो, त्यांना सुद्धा ही हीनत्त्वाची वागणूक देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते.

या अशाच शासकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी संविधानात मतदानाचा अधिकार दिला गेला. परंतु, पाचशे रुपयाची नोट घेऊन विकले जाणारे मतदार बाबासाहेबांचे विचार कुठे समजणार? प्रत्येक निवडणुकीत हे बाबासाहेबांना संपवतात.


बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले ही गोष्ट जरी खरी असली, तरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ती पाने जाळणारा एक ब्राह्मण होता..

कट्टर हिंदुत्ववादी टिळकांचा मुलगा, आंबेडकरांना आपला आदर्श मानत होता..

विसाव्या शतकातील रयतेचा राजा - राजर्षी शाहू महाराज, आंबेडकरांना फक्त दलितांचा नाही, तर अवघ्या हिंदू समाजाचा उद्धारक समजत होता..

काँग्रेसला एवढा विरोध करूनही, गांधी व नेहरू ने आंबेडकरांना महत्त्वाचे स्थान दिले..

समाज व्यवस्थेविरुद्ध एवढा विरोध करणारे डॉक्टर आंबेडकर या सर्वांना का हवे होते, याचा कधी विचार केलाय का?


डॉक्टर भीमराव आंबेडकर, या व्यक्तीने कधी कोणाची उगाचच प्रशंसा नाही केली की विनाकारण विरोध नाही केला. आपल्या जीवनाचे ध्येय समजून घेत, विचारांत प्रगल्भता आणत हा माणूस सतत आपले कार्य करत राहिला. त्यांच्या या विचारांना व कार्याला दुर्लक्षित करणे कोणास जमलेच नाही. 

आजच्या दलितांमध्ये विचाराची ही प्रगल्भता अभावानेच दिसून येते. विनाकारण एखाद्या समुदायाला केला जाणारा विरोध किंवा स्वार्थासाठी होणारा लाळघोटेपणा, दलितांना त्याच स्थितीत कायम ठेवत आहे. 

या पूर्ण लेखात मी दलित हा शब्द वापरला. हा लेख वाचणाऱ्या दलितांना याचे काही विशेष वाटले नसेल. परंतु, बाबासाहेब या शब्दाच्या सुद्धा विरोधात होते. कारण स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारा हा शब्द आहे. परंतु, आजचे दलित अभिमानाने स्वतःला दलित म्हणवतात.

हे आंबेडकरांना संपवणे नाही का?


आंबेडकरवाद, आंबेडकर हा विचार, पूर्णपणे संपणे कधीच शक्य नाही. कारण, तो फक्त एखाद्या समुदायाशी नाही तर संपूर्ण देशाशी व मानवतेशी जोडला गेला आहे. तरीही ज्या समाजासाठी या व्यक्तीने आयुष्यभर लढा दिला, त्याच्या विचारांचे चिंतन करणे, त्याला व त्याच्या संविधानाला नीट समजून घेणे, ही आज काळाची गरज आहे.

या देशाचा उद्धार फक्त आणि फक्त तेव्हाच शक्य आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट