भारत, हिंदुस्तान व इंडिया नावाचा इतिहास..


 

          आपण जेव्हा जन्म घेतो, तेव्हा आपल्याला ओळख देण्यासाठी, आपल्या मातापित्याकडून किंवा नातेवाईकांकडून एक नाव ठरवले जाते. जेव्हा एखादी वास्तू, एखादा प्राणी, एखादी जागा, असे काहीही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते, त्या गोष्टींनाही असे एक विशेष नाव आपण देतो. मानवी इतिहासाच्या हजारो वर्षांच्या काळात बहुधा राजेशाही असल्याने, कोणत्याही जागेवर ज्या राजाचे राज्य असायचे, त्याच्या नावाने त्या जागेला ओळखले जायचे. आधुनिक युगात मात्र राष्ट्र ही संकल्पना रुजू लागली. राजेशाही संपून लोकशाही आली तसे राष्ट्रभिमान वाढू लागला. बहुतेक देशांनी त्या जागांवर बोलत असलेल्या भाषेवरून स्वतःच्या देशाचे नाव ठेवले. आपल्या देशाचे नाव आपण भारत किंवा इंडिया या प्रकारे घेतो. सध्या वाद सुरू आहे की, यातील कोणते नाव घेणे योग्य??

त्यासाठी आधी पाहू की, ही दोन्ही नावे नेमकी आलीत कुठून??


         वरील चित्रात आपल्या देशाचा उत्तरेकडील भाग दिसतो. काश्मीर, पंजाब, हरियाणा, इत्यादी राज्यांपासून गुजरातपर्यंतचा प्रदेश आपल्याला दिसतो. तसेच बाजूचा पाकिस्तान हा देश सुद्धा दिसतो. या क्षेत्रातूनच भारत व इंडिया या दोन्ही नावांचा उदय झाला आहे.


भारत -

         मध्य आशियातून आर्य भारतात आलेत. मध्य आशियाचा प्रदेश हा बहुतेक करून वाळवंटी असल्याने, हे लोक तेथे टोळ्यांमध्ये राहायचे व शिकार करून खायचे. ही शिकार पुरेशी नसल्याने, त्यांनी स्थानांतर केले व भारतातील या क्षेत्रात येऊन ते वसलेत. प्रत्येक टोळीने ठराविक जागांवर आपला दावा दर्शवला. प्रत्येक टोळीचा एक इंद्र असे. इंद्र म्हणजेच राजा. तर भरत नावाच्या टोळीचा सुद्धा एक इंद्र होता त्याचे नाव सुदास. हा राजा इतर राजांपेक्षा बराच प्रभावी होता. याच्या वाढत्या प्रभावामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील १० टोळ्या एक झाल्या. त्यांनी सुदास विरुद्ध लढा देण्याचे ठरवले. लढाई झाली, मात्र यामध्ये सुदास व त्याची भरत ही टोळीच विजयी झाली. भरत टोळीला आपल्या प्रथा परंपरांवर अभिमान होता; मात्र त्यांनी इतरांच्या विचारांना कधी डावलले नाही व हस्तगत करत गेलेल्या प्रत्येक प्रदेशातील विचार, प्रथा - परंपरा स्वीकारल्या. या सर्वांच्या एकत्रीकरणातून भरत टोळीचं मोठं साम्राज्य तयार झालं, ज्याला भरतवर्ष असे म्हटले जाऊ लागले. या युद्धाचा व या नावाचा आपल्या वेदांमध्ये उल्लेख आहे. 


          काळ पुढे गेला तसे या टोळीच्या जागी विविध शक्तिशाली राजे येऊन आपली साम्राज्ये स्थापन करू लागले. त्यानुसार नावे बदलत गेलीत. तरी भरतवर्ष या नावाचा प्रभाव काही काळासाठी राहिला व ज्यावरूनच महाभारत या कथेसाठी भारत या शब्दाचा वापर झाला. ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की, वरील दाखवलेल्या चित्रातील अर्धा प्रदेशच भरतवर्षच्या साम्राज्यामध्ये होता. आजचा पूर्ण भारत या संकल्पनेखाली येत नाही. परंतु, हे ही खरे की राहिलेल्या भारतात त्याकाळी मानवी वसाहत फारशी नव्हती व होती ती आदिवासी स्वरूपात. त्यामुळे, सुसंस्कृत अशा भागाचे भरतवर्ष हे नाव महत्त्वाचे ठरते.



हिंदुस्तान -




        वेदिक काळातील निर्बंधांना दूर सारत महावीर जैन व बुद्ध यांनी नवे तत्त्वज्ञान मांडले.. ज्याच्या प्रभावाने भारतात व्यापार व उद्योगाला गती आली.. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे चीन, भारत व पश्चिमेकडे पर्शिया म्हणजेच इराणपासून ते अगदी युरोपपर्यंतच्या प्रदेशाचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू लागला. भारतीय लोक व्यापारासाठी पश्चिम आशियात जाऊ लागले. आपल्या प्रदेशाचे तेव्हा ठराविक असे काही नाव नव्हते. हा प्रदेश अनेक साम्राज्यांत विभागला गेला होता.


तेथील लोक जेव्हा विचारायचे की,"तुम्ही कुठून आलात?"

तेव्हा आपले लोक," सिंधू पार करून आलो" असे सांगायचे.

पश्चिम आशियातील, म्हणजेच आजच्या सौदी अरेबिया किंवा ईरान-इराक या भागातील लोकांना सिंधूचा स उच्चारता यायचा नाही. 


         ज्याप्रमाणे मराठी लोकांनी उच्चारलेल्या 'ळ' चे उत्तर भारतातील लोक 'ल' करतात, त्याचप्रमाणे पश्चिम आशियातील या लोकांनी सिंधूचा उच्चार 'हिंदू' याप्रमाणे करायला सुरुवात केली. यामुळे, सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना हिंदू असे म्हटले जावे लागले. मग ते वैदिक धर्माचे आचरण करणारे असोत, बौद्ध असोत, जैन असोत किंवा अजून कोणी. त्याचप्रमाणे या प्रदेशाला, हिंदुस्तान असे ओळखले जाऊ लागले. मध्ययुगात या प्रदेशातील राजांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर, हिंदुस्तान या त्यांना माहीत असलेल्या शब्दाचाच वापर जास्त झाला. भारत व इंडिया या नावाचा वाद आहेच; परंतु, वास्तविक पाहता मुस्लिम धर्मियांनी दिलेले हिंदुस्तान हे नाव जवळपास हजार वर्षे भारतासाठी वापरले गेले.


इंडिया -

         पश्चिम आशियातील व्यापारी जेव्हा युरोपमधील ग्रीस या ठिकाणी सामान घेऊन जायचे, तेव्हा त्यासोबतच त्यांनी आपल्या प्रदेशाचे नाव व विद्या या भागात पोहोचवली. ग्रीक लोकांना ह चा उच्चार करता यायचा नाही. त्यामुळे पश्चिम आशियातील व्यापाऱ्यांनी पोहोचवलेले हिंदूज(HINDUS) चे पुढे इंडस(INDUS) असे झाले. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना ग्रीक लोक, इंडियन्स व या देशाला इंडिया असे म्हणू लागले.

          अलेक्झांडर दि ग्रेट म्हणजेच, सिकंदर हा ग्रीक राजा भारताच्या वेशीपर्यंत येऊन धडकला. त्यामुळे, तेथील समाजात या प्रदेशाबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिले गेले ते इंडिया या नावाने. ग्रीक व लॅटिन भाषांपासूनच युरोपातील विविध भाषा तयार झाल्या. ज्यामध्ये इंग्रजीचाही समावेश होतो. त्यामुळे ग्रीकांनी या प्रदेशाला दिलेले ‘इंडिया’ हे नाव इंग्रजांनी जसेच्या तसे घेतले. भारतावर राज्य करताना ब्रिटिशांनी इंडिया हे नाव वापरले.


         हा इतिहास पाहता फक्त वेदिक कालखंडात भारत हे नाव या प्रदेशासाठी वापरले गेले आणि फक्त ब्रिटिश कालखंडात इंडिया हे नाव या प्रदेशासाठी वापरले गेले. मुस्लिम साम्राज्याच्या प्रदीर्घ राजवटी दरम्यान हिंदुस्तान या नावाचा वापर झाला. 


        भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान मुस्लिम राजवटीचा या प्रदेशावर असलेला वचक व भारतीयांच्या मनात असलेली ती गुलामी दूर करण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य योध्यांनी हिंदुस्तान या नावाचा वापर टाळून, त्यापेक्षा जुने असलेले व आपल्या संस्कृतीतील भारत हे नाव स्वीकारत,’भारत माता की जय’ या घोषणा देण्यास सुरुवात केली.


          यादरम्यान ब्रिटिश राजवटीमुळे संपूर्ण जगात या प्रदेशाचा इंडिया या नावाने पुरस्कार झाला होता. जरी आपण ब्रिटिश अंमलाखाली असलो, तरी या प्रदेशाचे व प्रदेशवासीयांचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले होते, ते इंडिया या नावाने.


         संविधान सभेत आपल्या देशाचे नाव नेमके काय ठेवायचे याबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा, मुस्लिम राजवटीतील नाव असल्याने हिंदुस्तान या शब्दाला पहिले वगळण्यात आले. भारत व इंडिया यापैकी एक निवडण्याचा विचार होता. भारत हा आपल्या संस्कृतीशी जोडलेला शब्द होता. परंतु, संपूर्ण जगात इंडिया या नावाला एक विशेष असा दर्जा प्राप्त होता. इंडिया या नावाने आपल्या देशाला होणारा फायदा विशेष असा होता व आहे; त्यामुळे हे नाव सोडण्यास संविधान सभेतील अगदी कट्टर हिंदू सदस्यही तयार नव्हते.


          त्यामुळे यावर तोडगा म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी पर्याय सुचवला की, या देशाला ‘भारत म्हणजेच इंडिया’ याप्रकारे उल्लेख करून, दोन्ही नावांनी बोलावले जावे. त्यानुसार भारतीय संविधानात या देशाचा दोन्ही नावांनी उल्लेख करण्यात आला.


जगभरात असे अनेक देश आहेत, ज्यांची या प्रकारे दोन नावे आहेत.

सर्व जग जरी जपानला जपान या नावाने ओळखत असले, तरी जपानवासी स्वतःच्या देशाला निप्पो असे बोलतात.

सर्व जग चीनला चीन या नावाने ओळखत असले, तरी त्या देशात झोंगुओ हे देशाचे नाव घेतले जाते.

इराणचे जुने नाव पर्शिया आज सुद्धा इराणवासी वापरतात.

जर्मन वासी स्वतःच्या देशाचे नाव डूईशलॅंड असे घेतात.

अजूनही बरीच उदाहरणे आहेत.

समस्या अशी आहे की, त्यांच्या भाषेत यांचा उच्चार थोड्या अजून वेगळ्या प्रकारे केला जातो. आता भारत हे नाव ब्रिटिश व्यवस्थित उच्चार करू शकतील का? नाही. त्याप्रमाणे आपण सुद्धा त्यांची ही वेगवेगळी नावे नीट उच्चारू शकत नाही. त्यामुळे या देशांनी स्वतःची दोन्ही नावे प्रचलित ठेवलीत व आपणही आजपर्यंत तेच केले आहे.


ज्याला भारत बोलायचे त्याने भारत बोला व ज्याला इंडिया बोलायचे आहे, त्यांनी इंडिया बोला. ही दोन्ही नावे हजारो वर्षांचा इतिहास व या प्रदेशाची समृद्धीच दर्शवतात.






टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट