तुझे आहे तुजपाशी - गॅलिलिओ

 



        व्हिन्सेनझिओ हे इटलीतील पिसा या गावात राहणारे गृहस्थ. विविध कला तसेच व्यापार यांची उत्तम जान त्यांना होती. सर्वात मोठा मुलगा गॅलिलिओ व त्याच्या इतर भावंडांना त्यांनी व्यवस्थित सांभाळले होते. आपली संपत्ती या सर्व मुलांना पुरेशी पडणार नाही; त्यामुळे, त्या सर्वांच्या चरितार्थाचे लवकरात लवकर पहावे, हे त्यांच्या मनी असे.


       मोठा मुलगा गॅलिलिओ, सर्व बाबतीत अगदी हुशार. एक मोठा विद्वान होण्याची सर्व लक्षणे त्यात होती. परंतु, त्यांना आपल्या या मुलास शिक्षण देऊन विद्वान बनवायचे नव्हते. कारण त्याकाळी विद्वानांना मान तर असे, परंतु त्यांकडे पैसा नसे. पैसा मिळवण्याचे मुख्य साधन म्हणजे, व्यापार किंवा मग चर्चमध्ये पंडित होणे, हे सुद्धा पैसा मिळवण्याचे उत्तम साधन होते.


        गॅलिलिओला त्यांनी छोटेखानी व्यापार सुरू करून दिला. परंतु, आपल्या एवढ्या हुशार मुलाला शिक्षण न देऊन आपण त्याच्यावर अन्याय करतोय, अशी जाणीव झाल्याने नंतर त्यांनी त्याला चर्चच्या मठात पाठवले. बाकी काही नाही तर, धार्मिक ग्रंथांचा तरी हा अभ्यास करेल व पंडित म्हणूनही पैसा कमावेल, ही त्यांची अपेक्षा होती. 


        गॅलिलिओला संगीत, चित्रकला, वाचन, खेळ, इत्यादी गोष्टींमध्ये रस होता. कोणतीही गोष्ट तो मनाला पटली तरच स्वीकारे. धार्मिक ग्रंथांना तो फार महत्व देत नसे, मठात राहायचे म्हणून ते पाठ करावे लागत. आपला वेळ तो खऱ्या अर्थाने चित्रकला व संगीत यामध्ये घालवे. धर्मग्रंथात गती नसल्याने व काही शारीरिक समस्यांमुळे मठाने त्याला पुन्हा घरी पाठवले.


         त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला वैद्यकशास्त्रामध्ये घातले. ही एक गोष्ट अशी होती की, ज्यामध्ये गॅलिलिओला किंचितही रस नव्हता. गणित व भौतिकशास्त्राची पुस्तके वाचण्यात त्याला आनंद मिळे. ही पुस्तके वाचून तो विद्वान झाला असता; परंतु, त्यात पैसा नव्हता व त्यामुळे त्याच्या वडिलांचा यास विरोध होता. भौतिकशास्त्र व गणित यांकडे कुतूहलाने पाहण्याची त्याची दृष्टी मात्र जागृत होती.


         वैद्यकशास्त्राच्या त्या विद्यापीठात आठवड्यातून एक दिवस चर्चमध्ये धर्माचे प्रवचन ऐकण्यासाठी जाऊन बसावे लागे. कोणत्याही धार्मिक प्रवचनाप्रमाणे ते सुद्धा कंटाळवाणे असे व जमलेले विद्यार्थी बहुधा झोपा काढत. त्या चर्चच्या मध्यावर एक झुंबर लटकलेले होते. वाऱ्याचा झोत येई, तसे ते झुंबर झोका घेई. त्याकाळी एखाद्या गोष्टीचा झोका जेवढा लांब तेवढा वेळ अधिक लागणार; तसेच एखादी वस्तू जेवढी जड, तेवढी ती झोका घेण्यास वेळ अधिक घेणार अशी समजूत होती.


         गॅलिलिओने ते हलणारे झुंबर पाहून, याची सत्यता पडताळण्याचे ठरवले. त्याकाळी घड्याळाचा शोध लागला नसल्याने, हे मोजण्यात समस्या येत होती. अनेक वेळा हलणारे झुंबर पाहून, ते एक झोका घेण्यास किती वेळ घेते; हे पाहण्याचे त्याचे खूप मन होई. परंतु, मोजायचे कसे, हा प्रश्न त्याला पडे. अचानक एके दिवशी वैद्यकशास्त्राच्या निमित्ताने शिकलेली एक बाब त्याला या कामात उपयोगी पडली.


         मनगटावर बोट ठेवून, हृदयाचे ठोके कसे मोजायचे हे त्याला कळाले होते. हृदयाचे ठोके ठराविक अंतराने पडतात, हे ही त्याने अभ्यासले होते. झाले तर मग, याचा त्याने झुंबराचे झोके मोजण्यासाठी वापर केला. जोरात हवा येताच, झुंबर मोठा झोका घ्यायचे व नंतर ते हळूहळू छोटे झोके घेत शांत व्हायचे. गॅलेलियो प्रत्येक झोक्याचा वेळ मोजे. प्रस्थापित संकल्पनेप्रमाणे, मोठ्या झोक्यांना अधिक वेळ व छोट्या झोक्यांना कमी वेळ लागायला हवा होता. परंतु, मोठ्या झोक्यांना सुद्धा चार हृदयाचे ठोके व छोट्या झोक्यांना सुद्धा तितकेच ठोके, एवढा वेळ लागल्याचे गॅलिलीओला जाणवले.


         यावरून त्याने अनुमान काढले की, झोक्यांना लागणारा वेळ हा त्या वस्तूच्या वस्तुमानावर किंवा झोक्यांच्या अंतरावर अवलंबून नसून; ती वस्तू ज्या दोरीला लटकली आहे, त्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असतो.

मोठी दोरी असेल तर जास्त वेळ व छोटी दोरी असेल तर कमी वेळ. त्याच्या या संशोधनावरून नंतर लंबकाचे घड्याळ तयार करण्यात आले.


आपल्यासोबतही अनेकदा असे होते. काही करायचे असते; परंतु, त्यासाठी मार्ग सापडत नाही. काही प्रस्थापित संकल्पनांनुसार, अमुक गोष्ट करायची तर हेच हवे - तेच हवे, हे आपल्या मनाने किंवा डोक्याने जमेस धरलेले असते. कोणतीही गोष्ट करण्याचे एकापेक्षा अनेक मार्ग उपलब्ध असतात. निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. त्याने आपल्याला एक अशी गोष्ट दिली आहे की ज्यामुळे, आपण फार कमी प्रमाणात परावलंबी आहोत. ती गोष्ट म्हणजे, आपला मेंदू.


आपली विद्वत्ता व ज्ञानाच्या साह्याने अगदी कठीण गोष्टींना सुद्धा आपण सहजपणा प्राप्त करून देऊ शकतो. फक्त स्वतःकडे नीट पाहता आले पाहिजे व स्वतःला नीट समजून घेता आले पाहिजे.

कारण, तुझे आहे तुजपाशी..

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट