ग्रहांचा प्रवास

 


       चांद्रयानच्या सफलतेने भारतीयांच्या मनात अवकाशयात्रा जागृत केली आहे. भविष्यकाळात पृथ्वीवरील जीवन कठीण होत जाणार, हे निश्चित. मग अशावेळी जर मानवाला पृथ्वी सोडायची वेळ आलीच, तर नेमक्या कोणत्या ग्रहावर तो व्यवस्थित जीवन जगू शकेल, ते आपण पाहूया. 

या प्रवासावर निघण्याआधी जेवढं पाणी सोबत घेता येईल तेवढं नक्की घ्या, कारण इतर कोणत्याही ग्रहावर तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नाही.


तर चला आपण जाऊया सौरमालेतील पहिल्या ग्रहावर :

'बुध' ज्याला इंग्रजीमध्ये 'मर्क्युरी' असे म्हणतात, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सौरमालेतील सर्वात छोटा ग्रह असून पृथ्वीच्या ५८ दिवसांएवढा याचा एक दिवस असतो.

जी बाजू सूर्यासमोर असते म्हणजेच जिथे दिवस असतो, तिथे तापमान ४५० पेक्षा जास्त असतं. तिथे तर आपण उतरू शकत नाही. रात्रीचे तापमान -१८० असते. म्हणजे आपला गोठून बर्फ व्हायचा.

त्यामुळे, उतरण्यासाठी आपल्याला ज्या भागात पहाट किंवा संध्याकाळ आहे; असं एखादं ठिकाण निवडावे लागेल. जिथे तापमान १० ते २० डिग्री च्या आसपास असेल.

या ग्रहावर ऑक्सिजन आहे; मात्र अतिशय कमी. तुम्ही वर दिलेल्या तापमानाच्या ठिकाणी उतराल. परंतु, तिथल्या हवेत फार तर दोन मिनिटे तुम्ही जगाल.

दुसरी गोष्ट अशी की, लवकरच हे ठिकाण अति जास्त तापमानाने किंवा अति थंड तापमानाने आच्छादले जाणार आहे. त्यामुळे, तुम्ही स्पेस सूट घालून जरी थांबलात तरी फार काळ थांबू शकत नाही.

निघा तर मग लवकर दुसऱ्या ग्रहाकडे.



दुसरा ग्रह आहे 'शुक्र' ज्याला आपण इंग्रजीमध्ये 'व्हिनस' बोलतो:

जर नर्क खरंच कुठे असेल, तर ते फक्त येथे आहे. कारण या ग्रहावर तुम्ही कुठेही उतरलात, तरी तुम्हाला ४५० डिग्री पेक्षा जास्त तापमान मिळेल.

आपले टोस्ट ज्याप्रमाणे असतात, तशी इकडची जमीन प्रचंड तापमानाने झाली आहे. 

आता तुम्ही म्हणाल की, रात्री सूर्यकिरणे येत नसूनही तिथे एवढे तापमान कसे?

कारण या ग्रहावर मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड आहे. हा वायू सूर्याच्या आलेल्या उष्णतेला ग्रहाबाहेर जाऊ देत नाही. सोबतच शुक्र ग्रहावर सल्फ्युरिक ऍसिडचे दाट ढग आढळतात.

जर तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल, तर या ग्रहावर गेल्यानंतर या रंगाबद्दल तुम्हाला द्वेष उत्पन्न होईल. पिवळ्या रंगाचे वातावरण असलेला हा ग्रह, तुम्हाला अगदी स्पेससूट सहित पाच सेकंद सुद्धा जिवंत राहू देणार नाही.

हवा एवढी जाड आहे की, चालताना तुम्हाला पाण्याखाली चालण्याचा भास होईल. स्वतःचे हात उचलताना कष्ट होईल आणि जास्त वेळ थांबलात तर तुमचे शरीर चेपून जाईल. स्पेससूट काढलात तर तुमची राख होईल.

इथे एक क्षण सुद्धा न थांबण्याचा सल्ला मी देईन.



तिसरा ग्रह आहे आपली पृथ्वी. आपले नंदनवन.

तिला ओलांडून आता आपण चौथ्या ग्रहाकडे जाऊ तो म्हणजे 'मंगळ' किंवा इंग्रजीमध्ये 'मार्स' :

या ग्रहावर तापमान जास्तीत जास्त २० ते २५ डिग्री सेल्सिअस आढळते. रात्री हेच तापमान -२०० च्या पलीकडे जाते. त्यामुळे या ग्रहावर राहण्यासाठी तुम्हाला दिवसाच उतरावे लागेल.

मातीमध्ये असणाऱ्या लोहाच्या जास्त प्रमाणामुळे हा लाल रंगाचा दिसतो व वातावरण ही काहीसे तसे आहे. इकडे तुम्ही स्पेससूट काढलात तरी तुम्हाला तापमानाचा त्रास होणार नाही.

परंतु, श्वसनाचे काय? ही एक गोष्ट त्रासदायक आहे; कारण या वातावरणात ऑक्सिजन नगण्य आहे. फार तर मिनिटभर तुम्ही कसेतरी जिवंत रहाल. 

या ग्रहावर वस्ती तयार करण्यासाठी मानव प्रयत्नशील आहे. 

पृथ्वीवरील रंगीबेरंगी दुनिया सोडून लाल रंगांमध्ये जाणे आणि ते ही अतिथंड तापमानात; मानवाला कसे जमेल, हा एक प्रश्नच आहे.

स्पेस सूट सोबत तुम्ही इथे कितीही वेळ राहू शकता.

परंतु, कधी ना कधी पाणी संपणारच आणि तुम्हाला निघावे लागेल.



पुढील ग्रह आहे 'गुरु' ज्याला इंग्रजी मध्ये 'ज्युपिटर' असे म्हणतात :

सौरमालेतील हा सर्वात मोठा ग्रह. या ग्रहावर एक वादळ कायमस्वरूपी वाहत आहे; हे वादळ पृथ्वीच्या आकाराएवढे आहे.‌ यावरून तुम्ही कल्पना करू शकता की, हा किती मोठा ग्रह आहे.

याचे तापमान -१०० च्या पलीकडे असते. म्हणजेच,जर तुम्ही तुमच्या यानातून बाहेर पडलात तर तुमचा बर्फ होईल हे निश्चित.

श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा नाही.

तरी उतरून पाहायचे आहे? परंतु, उतरणार कोठे? या ग्रहावर जमीनच नाही. सौरमालेत फक्त पहिल्या चार ग्रहांवर जमीन आहे. पुढील ग्रह फक्त वायूचे गोळे आहेत.

म्हणजेच, तुम्ही गुरूच्या एका बाजूने आत गेलात तर सरळ सरळ दुसऱ्या बाजूने बाहेर निघाल. परंतु, तुम्हाला जमीन भेटणार नाही.

हे वाक्य सुद्धा अतिशयोक्ती झाली. कारण गुरु ग्रहावरची प्रचंड वादळे तुम्हाला व तुमच्या यांनांना संपवतील. 

चक्रीवादळात अडकल्याप्रमाणे तुम्हाला भास होईल व हजारो वेळा भिंतीवर आपटल्याप्रमाणे, तुम्ही त्या दाट हवेमध्ये आपटून आपटून तुमचे तुकडे तुकडे होतील.

भीती वाटली ना? मग चला जाऊया पुढील ग्रहावर.



पुढचा ग्रह आहे 'शनि' ज्याला इंग्रजी मध्ये आपण 'सॅटर्न' बोलतो :

या ग्रहावर सुद्धा जमीन नाही, त्यामुळे इकडे तुम्हाला कुठे उतरता येणार नाही. तापमान -१४० च्या पलीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला यानाबाहेर पडता येणार नाही. 

येथे सुद्धा वादळी वारे वेगाने वाहत असतात. त्यामुळे, जी दशा तुमची गुरुवर होणार होती तीच शनिवर होईल किंबहुना अधिक तीव्रतेने.

या ग्रहाचा एक उपग्रह आहे टायटन. आपल्या चंद्रासारखाच. तेथे जमीन सुद्धा आहे. असे मानले जात आहे की, या उपग्रहाच्या जमिनीखाली पाणी असू शकते. परंतु, ऑक्सिजन मात्र उपलब्ध नाही.

मंगळावरील वस्तीचा प्रयत्न जर अयशस्वी झालाच, तर मनुष्य टायटनचा विचार करू शकतो.



पुढील ग्रह आहे 'युरेनस' -

या ग्रहावर सुद्धा जमीन नाही. त्यामुळे, उतरण्याची शक्यताच नाही. तापमान -२०० च्या पलीकडे आहे. त्यामुळे गोठून बर्फ होण्याची शक्यताच अधिक. गुरु व शनी प्रमाणे येथे सुद्धा वादळी वारे वाहतात. परंतु, याची विशेषता अशी की, हे वारे अतिथंड असतात.

म्हणजे तुम्हाला बर्फाच्या सुयांनी शरीर टोचून व पोखरून काढलेय, असा जर अनुभव घ्यायचा असेल तर इकडे नक्कीच जा.

नको ना? तर निघा मग पुढील ग्रहावर.



सौरमालेतील शेवटचा ग्रह 'नेपच्यून' -

युरेनस प्रमाणेच अतिथंड व जमीन नसलेला असा हा ग्रह आहे. फक्त विशेषता अशी की, या ग्रहावर वाहणारी वादळे ही २००० किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहतात. आपले फायटर प्लेन ज्या वेगाने जाते त्यापेक्षा जास्त वेगाने. येथे तुम्ही कधी कुठे फेकले जाल व कधी तुम्हाला मृत्यू आला, हे कळणार सुद्धा नाही.



तर असे होते, हे सौरमालेतील इतर ग्रह. या ग्रहांवर फिरून तुम्हाला कळले असेलच की, जीवन जर कुठे आहे तर ते फक्त पृथ्वीवर. बाहेर तुमच्यासाठी फक्त मृत्यू लिहिला आहे. त्यामुळे इतर कुठे जाण्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या पृथ्वीला नीट जपा. तिची काळजी घ्या. जल, वायू व भूमी प्रदूषण टाळा. जास्तीत जास्त झाडे लावा.

निसर्गाचा आदर करा व आपल्या या सर्वोत्तम ग्रहावरील आयुष्य मनसोक्त जागा.

टिप्पण्या

  1. Chann.. Agdi barobar... Chandryaan 3 nntr saglyanchi doki thikanawr ananara lekh👍✨

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बाहेर अवकाश कितीही शोधले तरी पृथ्वी सारखे नंदनवन नाही, हेच खरे.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट