सीक्रेट सर्विसेस
सकाळी साडेसातची वेळ... पुण्यातील जे डब्ल्यू मॅरिएट या खूप भव्य आणि महागड्या हॉटेलमध्ये, रमण कोणाची तरी वाट बघत बसला होता...तसं ती व्यक्ती आठ वाजता येणार होती,परंतु तो कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नव्हता...हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता...या दिवसाने त्याला संपूर्ण आयुष्यभराची कमाई होणार होती...अगदी त्याच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा काहीही कमवायची गरज लागणार नाही, असे धन तो जमवू शकणार होता आणि त्याचे स्त्रोत होता एक पेन ड्राईव्ह...हा पेन ड्राइव्ह फक्त समोरील येणाऱ्या व्यक्तीने विकत घ्यायला हवा होता...तर तो पेन ड्राईव्ह त्याच्यासाठी भरपूर महत्त्वाचा होता...आपल्या कोटच्या आतल्या खिशामध्ये त्याने तो व्यवस्थित जपून ठेवला होता...
वेळ कसा घालवायचा हे त्याला समजत नव्हते, तरी तो इकडे तिकडे पाहत होता... बाजूच्या टेबलवर त्याला एक तरुणी काहीतरी रेकॉर्डिंग करताना दिसली... तिने पदार्थांचे काही प्रकार मागवले होते व प्रत्येक पदार्थ चाखून ती काहीतरी रेकॉर्ड करत होती... परंतु, मध्येच काहीतरी चूक घडायची... ती ते रेकॉर्डिंग रद्द करून पुन्हा बोलणे सुरु करायची...
तिला जाणवलं की रमण तिच्याकडे बघतोय,तेव्हा ती उठून रमण जवळ आली व तिने विनंती केली, "जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही मला मदत करू शकता का?" रमण कडे तशी अजून पंचवीस मिनिटे होती व इथेच बसून त्याला वाट पाहायची होती त्यामुळे त्याने होकार दिला..
तिने सांगितलं की ती एक फूड ब्लॉगर आहे आणि तिला या पदार्थांचे व्हिडिओ बनवून युट्युब वर टाकायचे आहेत...तिने तिचे युट्युब चॅनल सुद्धा रमणला दाखविले.. रमण खुश झाला... कारण रमणला या प्रकारचे व्हिडिओज आवडत होते... त्यामुळे त्याने त्वरित होकार दिला व तिने सांगेल त्या प्रकारे कॅमेरा पकडून शूटिंग करण्यास सुरुवात केली... यावेळी मात्र रेकॉर्डिंग अगदी व्यवस्थित झाली आणि तिने सर्व पदार्थ चाखून त्याविषयी तिच्या दर्शकांना सांगितले... त्यातील काही पदार्थ अगदीच न खाण्यासारखे होते, परंतु तरीही तिने खाल्लेत... आता राहिलेल्या पदार्थांचं करायचं काय?
रमणला तिने विचारले," जर तुम्ही काही मागवणार असाल, तर त्यापेक्षा हेच पदार्थ आपण संपवूया का?"
रमणला त्यातील बरेच पदार्थ आवडत होते... त्यामुळे त्याच्याने रहावले नाही व त्याने होकार दिला... आता ज्या व्यक्तीची तो वाट पाहत होता,ती व्यक्ती येण्याची वेळ झाली याचे भानच नाही राहिले..
अचानक एक आवाज आला,"मिस्टर रमण तुम्हीच का?"
त्याने वरती पाहीले तर ज्या व्यक्तीची तो वाट बघत होता,तीच व्यक्ती त्याच्यासमोर उभी होती...रमण त्वरित उठून उभा राहिला व त्याला सांगितले की,आपण दोघे शेजारच्या टेबलवर बसुया... तुम्ही सांगितलेली गोष्ट मी आणली आहे...
आलेल्या व्यक्तीने त्या फुड ब्लॉगरला ओळखले व विचारले, की, "तुम्ही त्याच का, ज्या युट्युब वर येता पदार्थांची माहिती घेऊन?"
त्या तरुणीने होकार दिला आणि स्मितहास्य केले... रमणने सांगितले की,आज मी तिला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली आहे...त्या व्यक्तीला हे खूप आवडलं...
ती तरुणी म्हणाली," जर तुम्हाला दोघांना काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या सोबत बसून हे पदार्थ संपवू शकता, नाहीतरी मला एवढं संपणार नाही आणि तुमचं काम सुद्धा तुम्ही करू शकता."
त्या व्यक्तीला यामध्ये काही अडचण वाटली नाही. ते दोघे तिथेच बसले... रमणला त्या व्यक्तीने त्याचा पेन ड्राईव्ह मागितला...रमणने तो दिला..
त्याने लॅपटॉप मध्ये पेन ड्राईव्ह लावून काही गोष्टी बघितल्या व रमणला म्हणाला," ठीक आहे, सर्व व्यवस्थित आहे."
रमण हे ऐकून खुश झाला... त्या व्यक्तीने पेन ड्राइव्ह आपल्या जवळ ठेवला आणि राहिलेले पदार्थ त्यांनी मिळून संपवले...
सर्व खाऊन झाल्यानंतर त्या तरुणीने सांगितले,"आता मला निघायला हवे. मला कात्रजला जायचे आहे"
तेव्हा रमण बोलला की,"आम्ही दोघेही तिकडे चाललोय,हवं तर तुम्हाला सोडतो"
तिला आनंद झाला... ती म्हणाली, "ठीक आहे...मी तयार होऊन येते किंवा असं करा तुम्ही माझ्यासोबत चला माझ्या रूम मध्ये,थोडा वेळ थांबा..मी तयार होते आणि मग आपण तिघे निघू."
ही कल्पना त्या दोघांना आवडली.. रमण व त्याचा सहकारी त्या तरुणीच्या रुम मध्ये गेले.. ते बाहेर हॉलमध्ये बसले.. तिने आत जाताना सांगितलं की, स्त्रियांना तयार होण्यासाठी वेळ लागतो तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाचं करायचं असेल तर करून घ्या.. यावर सगळेच हसलेत... ती निघून गेली.. रमण व त्याच्या सहकार्याने मग ज्या गोष्टीसाठी त्यांना जायचं होतं त्यावर लॅपटॉप उघडून अतिशय हळू आवाजामध्ये बोलण्यास सुरुवात केली...जवळजवळ वीस मिनिटांनी ती तरुणी बाहेर आली व त्यानंतर ते तिघे मिळून कात्रजला गेले... कात्रजला एका मॉल जवळ ती तरुणी उतरुन निघुन गेली.. रमण व त्याचा सहकारी तिथून पुढे आलेत...
रमण 'इन्फो सेल्युलर' कंपनीमध्ये काम करत होता... उद्याचा दिवस महाराष्ट्रातील सर्वच आयटी कंपन्यांसाठी महत्त्वाचा होता... कारण 'रॉयल अरामको' सारख्या मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्याची एक खूप मोठी संधी या कंपन्यांना मिळणार होती व त्यासाठी या कंपन्यांना आपलं काम व आपण काय करू शकतो याबद्दल ची सर्व माहिती प्रेझेंट करायची होती...कोणत्याही कंपनीची क्षमता, तिचा अनुभव व तिने मागितलेली रक्कम..या तीन गोष्टींवर टेंडर मिळण्याची शक्यता होती व या तीन गोष्टी रमणने दुसऱ्या एका कंपनीला विकलेल्या होत्या आणि त्याने दिलेल्या या माहितीच्या बदल्यात त्याला ५०० करोड रुपये मिळणार होते...मात्र त्याच्या मनात थोड्या शंका-कुशंका होत्याच... त्यामुळे तो दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.. दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये होणाऱ्या सर्व गोष्टींवर त्याची बारीक नजर होती...
त्याच्या कंपनीतर्फे,त्याच्या कंपनीचे मालक, तो आणि अजून काही साथीदार तेथे उपस्थित होते... सर्व कंपन्यांनी आपली माहिती सादर करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा यांच्या कंपनीची माहिती सादर करण्याची वेळ आली,तेव्हा त्यांच्या मालकाने उभे राहून जी माहिती सादर केली ती रमणने दिलेल्या माहितीपेक्षा पूर्ण वेगळी होती... रमण आश्चर्यचकीत झाला...असं कसं झालं!!!.. कारण जी माहिती त्याने तीन दिवसापूर्वी कंपनी मीटिंगमध्ये डिस्कस केलेली होती, ती काही वेगळीच होती आणि तीच माहिती त्याने दुसऱ्या कंपनीला विकलेली... मात्र आता मालकाने सादर केलेली माहिती पूर्णपणे वेगळी होती.. सहाजिकच ही माहिती अशी होती की ज्यामुळे यांच्या कंपनीला ते टेंडर मिळाले आणि यामध्ये रमणला खूप मोठं नुकसान झालं... कारण ५०० करोड तर यामुळे मिळणार नव्हतेच,परंतु आता दुसऱ्या कंपनीचे लोक त्याच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचवू शकणार होते...मात्र हे कसे घडले हे त्याला कळलेच नाही...
कॉन्फरन्स झाल्यानंतर बाहेर पडताना त्याच्या मालकाने त्याच्याकडे एक पाकीट दिले आणि सांगितलं की,तुला कंपनी मधून काढून टाकण्यात येत आहे,याचे कारण तुला माहित आहे...तु जाऊ शकतोस...रमण खूपच नाराज झाला आता काय करावे हेच त्याला सुचेना...दिवसभर तो बेचैन राहीला...जवळच्याच एका बारमध्ये रात्री जाऊन,तो दारू पीत बसला होता...तेव्हा, जे डब्ल्यू मॅरिएट मध्ये भेटलेली ती तरुणी त्याला तिथे सुद्धा दारूवर व्हिडिओ बनवताना दिसली...
तिने सुद्धा रमणला पाहीले आणि ती त्याच्याजवळ आली आणि विचारलं,"कसे आहात? तुमचं त्यादिवशीचं काम नीट झालं का?"
रमणने नाही असे उत्तर दिले..तो खूपच उदास दिसला,तेव्हा त्या तरुणीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले की, "काही हरकत नाही..तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे काम करत रहा, तुम्हाला यश नक्की मिळेल."
ती तरुणी निघून गेली...रमणला थोडेसे विचित्र वाटले...कारण त्याच्या कामामध्ये प्रामाणिकपणा तर नव्हता आणि नेमकं ह्याच गोष्टीवर तिने कसा काय जोर दिला, याचे आश्चर्य वाटून तो हा विचार करत बसला की, माहिती नेमकी बदलली कशी??
थोड्यावेळात ती तरुणी त्या बार मधून बाहेर पडली आणि तिच्या मोबाईल मध्ये एक मेसेज आला की तिच्या अकाऊंट मध्ये पन्नास करोड रुपये टाकले गेले आहेत...या तरुणीने तिच्या रूम मध्ये जेव्हा रमण आणि त्याच्या साथीदाराला बसवलेले, तेव्हा त्यांच्या मागेच एक कॅमेरा लावलेला होता..जो त्यांच्यासमोरील लॅपटॉपच्या सगळ्या गोष्टी बघत होता,तसेच त्या खुर्चीला एक मायक्रो माईक होता, जेणेकरून ते जे बोलत होते ते सर्व कोणीतरी ऐकत होते..
अशा या गोष्टींद्वारे त्या तरुणीने सर्व माहिती मालकास पोहोचवली होती व त्यानुसार मालकाने आपल्या प्रेझेंटेशन मध्ये बदल केले होते...आणि या प्रकारे त्यांची कंपनी एका मोठ्या तोट्यातून वाचली होती...
ही तरुणी होती मेघा...मेघा गुप्तहेर होती...सोबत ब्लॉगिंग सुद्धा करायची की, जेणेकरून कोणाला तिच्यावर संशय येऊ नये...तसेच ब्लॉगिंग मुळे ती लोकांमध्ये प्रसिद्ध झाली होती व त्यामुळे कोणाशीही जवळीक साधताना तिला अडचण येत नसे...अशाप्रकारे खरी ओळख लपवून ती बऱ्याच शिताफीने बरीच काम करत होती...ऑनलाईनच ती सर्व कामे स्वीकारायची...
'सिक्रेट सर्विसेस' या नावाने तिचे पोर्टल होते व यावर ज्याला काम करून घ्यायचं आहे, तो सर्व माहिती द्यायचा...मात्र यामध्ये एक गोष्ट अशी होती की,कोणताही गैरप्रकार मेघा कडून खपत नव्हता...जर जे काम करायचे आहे, ते चांगल्या गोष्टीसाठी असेल तरच ती काम स्वीकारायची,नाही तर त्या कामाला नकार द्यायची... अशा प्रकारे अनेक गोष्टींमध्ये तिने लोकांना मदत केली होती व त्याच्या बदल्यात तिने भरपूर रक्कमसुद्धा मिळवली होती...ती आधीच प्रसिद्ध झाली होती... मात्र या सर्व पैशांचे तिने ब्लॉगिंग द्वारे रूपांतरण करून, हा पैसा आपल्याला त्याद्वारेच मिळतोय असं दाखवलं होतं... त्यामुळे तिची खरी ओळख लपून होती...
आज खूप महिन्यांनी एवढी मोठी रक्कम मिळाली असल्याने,ती प्रचंड खुश होती व हा आनंद साजरा करण्यासाठी,ती पुन्हा एका दुसऱ्या डिस्कोथेक मध्ये गेली व धुंद होऊन नाचू लागली...दारू पिऊ लागली...या सर्व गोष्टी महिलांसाठी जरी समाजमान्य नसल्या, तरी लहानपणापासूनच बेधडक स्वभावाची मेघा त्या सर्व गोष्टी करायची,ज्याचा तिला मनापासून आनंद मिळायचा...त्यास समाजाने कितीही चुकीचे ठरवले असले, तरीसुद्धा त्याची तिला पर्वा नव्हती...एक गोष्ट ती कटाक्षाने पाळायची की तिच्यामुळे कोणालाही त्रास अथवा कोणाचाही तोटा होईल असे कोणतेही काम करायचे नाही...डान्स करत असताना तिची नजर एका तरुणावर गेली, तोसुद्धा तिच्याकडेच पाहत होता...थोड्या वेळाने तो तिच्याजवळ आला...आता दोघे सोबत मिळून नाचू लागले... तर आजचा वन नाईट स्टॅन्डचा प्लॅन मेघाच्या डोक्यात पक्का झाला... असे बरेच तरुण तिच्या आयुष्यात येऊन गेले होते...ती बिलकुल भावनिक नसल्याने,कोणाच्याही कधीही प्रेमात पडली नाही...मात्र आयुष्यातील प्रत्येक आनंद उपभोगायचा या दृष्टीने तिने कोणास नाकारले ही नाही...असे अनेक तरुण तिच्या आयुष्यात येत जात राहिले...
पावसाळ्याचे दिवस म्हणजे, ट्रेकर्ससाठी पर्वणीच जणू... मेघाने सुद्धा ठरवले आणि तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली...ती एकटीच होती.. मात्र हा ट्रेक फक्त ट्रेक नसून तिला एका व्यक्तीची भेट घ्यायची होती...ती व्यक्ती कोण होती हे तिला माहिती नव्हते...परंतू,तिच्या पोर्टलवर या व्यक्तीचा संदेश आलेला व त्या व्यक्तीने सांगितलेले की, जर हे रहस्य उलगडलं तर तुला अमाप पैसे मिळतील व तुला फूड ब्लॉगिंग सुद्धा करावे नाही लागणार...पैशाशी मेघाला काही घेणंदेणं नव्हतं...मात्र त्या व्यक्तीने खरी ओळख काढली याचा अर्थ ते निश्चितच कोणीतरी महत्त्वाचे आहेत; हे तिने जाणले व भेट घ्यायचे ठरविले...त्यासाठी तिने तोरणा गड निवडला,कारण येथे येणारे फार कमी असतात...तोरणा किल्ल्यावर एक छोटेखानी मंदिर आहे, जिथे त्या व्यक्तीला तिने येण्यास सांगितले व तिथे जाऊन त्या व्यक्तीची वाट पाहत बसली...थोड्यावेळात एक म्हातारा माणूस काठी टेकत टेकत वरती आला... त्याने बऱ्यापैकी चांगले कपडे घातले होते...मात्र वृद्ध वाटत होता...मेघाला कळले नाही की हा खरच वयोवृद्ध आहे की, हा म्हातारा होण्याचं नाटक करतोय...ती या गोष्टीत तसेही फारशी उत्सूक नव्हती...तिला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की, त्या व्यक्तीने तिला कसे ओळखले...
त्या व्यक्तीने आल्यानंतर मेघाला सांगितले की,"मी कोल्हापूर मधील एका कंपनीत गेली ३० वर्षे कामास आहे, सुरूवातीपासूनच बरेचसे आर्थिक व्यवहार मी सांभाळत असल्याने, मला दिवाण साहेब बोलतात"...
त्या कंपनीला सांभाळणारे अडनाईक घराणे अतिशय श्रीमंत व प्रसिद्ध होते...त्यातील प्रमुख व्यक्ती श्रीपाद अडनाईक यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला...याचा शोध घेण्यासाठी तो वृद्ध मेघाजवळ आला होता...
मेघाने सांगितले की, "जर मला संपूर्ण माहिती मिळणार नसेल, तर मला ह्या केसवर काम करता येऊ शकणार नाही...मला पूर्ण माहिती हवी,तसेच तुम्ही हे सर्व कसे जाणता हे सुद्धा मला माहित असायला हवे...सर्व गोष्टी नीट माहीत असतील तरच मी काम करेन..."
त्या कारकुनाने मग एक पेन ड्राइव्ह तिच्या जवळ दिला आणि सांगितले की,"मी दिवाण आहे आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टींचे व्यवहार असतात... मात्र मागील काही महिन्यांत ही कामे दुसऱ्यांना देण्यात येत आहेत...एका विदेशी कंपनीसोबत झालेल्या करारापासून कंपनीचा लाभ खुप वाढला आहे... पण त्याचा अधिकृत हिशेब मला दिला गेला नाही...त्याची जबाबदारी दुसऱ्यांना दिली...त्यानंतर हा खून झाला... हे सर्वच विचित्र आहे.. तो खून कोणी केला याचा शोध घेतलास, तर तुला या पेन ड्राइव्ह मध्ये मिळणाऱ्या नोंदी आणि त्या व्यक्तीशी जोडलेले संबंध शोधता येतील आणि त्यातून तुला सर्व रहस्य कळेल"...
मेघाने विचारले की, "मला ओळखले कसे ते सांगा."
मात्र त्या व्यक्तीने सांगितले की, "आधी खुनी शोधा, मग नक्की सांगेन"
मेघाने हे काम करायचं ठरवलं व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या केस ला स्वीकारले...या केसनुसार अडनाईक घराणे त्या भागातील एक प्रतिष्ठित घराणे होते व त्यांचा खूप मोठा कोल्हापुरी चपलांचा तसेच साड्यांचा व्यवसाय होता...या व्यवसायामधून त्यांच्या वाडवडिलांनी बक्कळ पैसा कमविला होता व खूप मोठ्या प्रमाणात जमीन जुमला घेतला होता...
तर या अडनाईक घरामधील प्रमुख व्यक्ती श्रीपाद अडनाईक यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी कोल्हापूर वरून पन्हाळगडावर जाताना,जो हायवे रस्ता लागतो त्या रस्त्याच्या बाजूला सापडला...त्यांना अतिशय अमानुषरित्या चाकूचे वार करून ठार मारण्यात आले होते...तर ह्या खुन्याचा शोध अजून लागला नव्हता आणि या खुनाबद्दल जास्तीत जास्त माहिती काढून मेघाला खुनी कोण आहे व त्याने खुन का केला हे समजून घेणं गरजेचं होतं...सोबतच त्या पेन ड्राइव्ह मध्ये अशा काही नोंदी होत्या,की ज्यांनी ती संभ्रमात पडली...
तसं तर यांचा व्यवसाय चपला आणि साडी यांचा होता व या चपला आणि साडी अगदी परराज्यात व परदेशात जात असल्याने त्यांनी भरपूर फायदा मिळवला होता व मिळवत होते...मात्र अचानक काही महिन्यांपूर्वी या व्यवसायात त्यांनी एका विदेशी कंपनीला भागीदार करून घेतले व ही भागीदारी झाल्यापासून यांच्या कंपनीच्या लाभात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली...पहिले सुद्धा हा लाभ कधी कधी करोड मध्ये जायचा...परंतु, एक ते दोन करोड पेक्षा जास्त लाभ कधी झाला नव्हता...आता मात्र कमीत कमी पन्नास करोड एवढा तिमाहीला लाभ व्हायचा...एवढी मोठी रक्कम लाभामध्ये कशी मिळते याचा जो पुरावा होता, त्यावर विश्वास बसणे कठीण होते...कारण हा लाभ त्याच कंपनीमुळे दाखवला गेलेला ज्या कंपनीसोबत भागीदारी झाली आहे...त्या कंपनीला यांची कंपनी चपला व साड्या निर्यात करत होते...असं दाखवण्यात आलं की विदेशामध्ये यांच्या चपला व साड्या खूप मोठ्या किमतीला विकल्या जात आहेत...तसं तर त्या कंपनीकडूनच यांच्या चपलांसाठी सामान मागवण्यात येत होते. कारण की, देशामध्ये गोहत्या बंदी कायदा आल्याने स्थानिक शेतकऱ्यांकडून भाकड जनावरे घेण्यास बंदी होती आणि त्यामुळे चामड्याची आयात करणं हे क्रमप्राप्त होतं....त्यामुळे ते या कंपनीकडून आयात करत होते व ही आयात अतिशय नाममात्र दरात होत होती...निर्यात मात्र खूप मोठ्या दरात...प्रश्न असा होता की त्या विदेशी कंपनीला यातून लाभ कसा काय होत होता...नेमकं विदेशी कंपनी यांच्यासोबत का भागीदारी करत होती?? कुठे तरी पाणी मुरत होतं...परंतु, ते शोधून काढणं गरजेचं होतं आणि जसे दिवाण साहेब म्हणाले होते की,या खुनाचा शोध लागला तर सर्व रहस्ये उघडतील... त्यामुळे मेघा दुसऱ्याच दिवशी कोल्हापूरला गेली...
तिथे गेल्यानंतर तिने ब्लॉगरच्या आपल्या रूपात दिवाणशी संवाद साधला आणि दिवाणना सांगितले की, मला तुमच्या बंगल्यामध्ये घेऊन चला...तिथे त्यांना सांगा की, मला कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांच्या संबंधी काही फुड व्हिडिओज बनवायचे आहेत...
दिवाणची मुलगी अमेरिकेत सासरी होती...दिवाणांनी त्या मुलीची मैत्रीण आहे असे सांगून, मेघाला त्या बंगल्यामध्ये ठेवले...ते स्वतः एका खोलीमध्ये राहत होते,त्याच्या बाजूच्या खोलीमध्ये त्यांनी मेघाला राहायला सांगितले...यास बंगल्यातील कोणाचीही काहीही हरकत नव्हती...उलट एक युट्युब सेलिब्रेटी बंगल्यात रहायला आल्यामुळे काही जण खूपच खूश होते...मेघाने घराचे आणि घरच्यांचे निरीक्षण केले...
श्रीपाद अडनाईक यांची तीन मुलं होती व त्या तिघांच्या तीन बायका तसेच त्यांची काही मुलं...मोठ्या मुलास दोन मुले होती...एक मुलगा व एक मुलगी...ते दोघेही कॉलेजमध्ये शिकत होते...दुसऱ्या मुलाची एकच मुलगी होती जी कॉलेजमध्ये शिकत होती व तिसऱ्या मुलांची दोन मुलं ही अजून शाळेमध्ये होतेयी...तर हा असा मोठा परिवार या बंगल्यामध्ये राहायला होता...सोबतच खुप नोकर-चाकर कामासाठी होते... त्यांना सुद्धा तिथेच रहायची वेगळी सुविधा होती, ज्यामध्ये ते सर्व राहत होते आणि दिवाण साहेब जे त्यांचे तीस वर्षापासूनचे विश्वासू होते,त्यांना सुद्धा यांनी आपल्या बंगल्यामध्ये ठेवून घेतलं होतं...कारण दिवाण साहेबांची मुलगी लग्न करून अमेरिकेला गेली होती व दिवाण साहेब अमेरिकेत जाण्यास तयार होते, मात्र श्रीपाद अडनाईक यांना हे मान्य नव्हते...त्यांना दिवाण साहेब आत्तासुद्धा कामांमध्ये हवे होते,म्हणून त्यांनी मुलीकडे न पाठवता व बाकी त्यांचे कोणी नसल्याने स्वतःच्या घरचे सदस्य करून घेतले...घरामध्ये त्यांना राहण्यास खोली दिली व तेव्हापासून दिवाण साहेब इथेच राहतात...
बहुतेकांना खुनाचा संशय हा मधल्या मुलावर होता कारण, त्याचे बहुतेक गोष्टीत श्रीपाद अडनाईक यांच्याशी पटायचे नाही...त्यामुळे हा खुन त्याने केला असावा अशी काहींची धारणा होती...परंतु, मेघाच्या आजपर्यंतच्या अनुभवावरून तिला हे कळत होते की, ज्याच्यावर संशय जास्त तो शक्यतो खुनी नसतोच...मात्र तरीही काही शिल्लक ठेवायला नको होते...तिने सर्व अभ्यास केला व तिने पाहिले की ज्या कंपनीसोबत त्यांचा करार झालेला त्या कंपनी करारामध्ये या तिन्ही मुलांच्या सह्या होत्या याचा अर्थ श्रीपाद यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या कराराला पूर्णत्वास नेले आणि त्यामुळे यांचा त्याबद्दल काही विरोध असणे शक्य नाही....त्यासोबतच जर या कंपनीकडून अजून काही गोष्टी होत असतील तर त्यामध्ये या तिन्ही मुलांची तेवढेच भागीदारी आहे जेवढी श्रीपाद अडनाईकांची...
तिने दिवाण साहेबांकडून त्यांच्या कंपनीचे काही डिटेल्स घेतले...दिवाण साहेबांना सर्व नव्हते देता येणार...परंतु, त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या सर्व गोष्टी तिच्याकडे सुपूर्त केल्या...तिने कॉम्प्युटर वर सर्व डेटाबेस चेक केला...त्याच्यामध्ये गोंधळ होण्यासारख्या काही गोष्टी होत्या... ज्या कंपनीसोबत हा करार झालेला,त्या कंपनीची तिने इंटरनेटवरून चौकशी केली आणि त्यानंतर तिने आपल्या परदेशातील काही मित्रांशी संपर्क साधून त्या कंपनीबद्दल अजून विस्तृत माहिती काढण्यास सांगितले...
त्यानंतर तिने या घरातील लोकांसोबत संवाद साधण्याचे ठरवले,जेणेकरून तिला अजून काही माहिती मिळेल... संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी सर्व एकत्र बसले होते व तेव्हाच सर्वांची एकमेकांसोबत बरीच चर्चा झाली...सर्व तिला चांगल्या प्रकारे ओळखून होते... जवळजवळ प्रत्येकाने तिचे युट्युबवरील व्हिडीओ पाहिले होते...त्यातील जे कॉलेजचे तरुण-तरुणी होते त्यांनी तर अगदी तिच्या सोबत सेल्फी वगैरे व ऑटोग्राफ घेण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही... कोणत्याही परिवाराची जर अंतर्गत माहिती काढायची असेल तर ती सर्व माहिती त्या परिवारातील स्त्रीपेक्षा चांगलं कोणी दुसरं सांगू शकत नाही...जर माहिती मागणारी व्यक्ती सुद्धा एक स्त्री असेल, तर ती त्या स्त्रीकडून मिळण्याची शक्यता खूप जास्त असते... मेघाला हा रस्ता खुपच सोपा वाटला...
त्या घरातील ज्या तीन प्रमुख स्त्रिया होत्या, त्या तीन मुलांच्या बायकांचे एकमेकांशी पटत नव्हते...लहान मुलाची बायको कंपनीच्या कामात सक्रिय होती,त्यामुळे इतर दोघींना तिचा जास्त द्वेष होता..मेघाने ठरवलं की, प्रत्येकीकडून एक पदार्थ शिकून घेण्याचा बहाणा बनवायचा आणि त्यावेळी माहिती काढून घ्यायची...त्यांना सांगितले की,मी तुमचा व्हिडिओ बनवून अपलोड करेन...एक खास पदार्थ मला तयार करून दाखवा... प्रत्येकीने त्याच जोमाने तयारी सुरू केली व हा पदार्थ बनवताना तिने घरच्यांबद्दल व बाकी गोष्टींबद्दल त्यांच्याशी बरीच चर्चा केली...तिला अनेक गोष्टी अगदी सहजपणे समजून आल्या...
त्या तिघींनी दिलेल्या माहितीत बरीच एकवाक्यता होती... त्यामुळे त्यांच्या माहितीवर संशय घेण्यासारखं तिला काही कारण वाटलं नाही...त्या तिघींच्या म्हणण्यानुसार जरी मधल्या मुलाचे संबंध श्रीपाद अडनाईक यांच्यासोबत खराब होते तरीसुद्धा,तो खुन करेल या पातळीवर जाणं अशक्य वाटतं...सोबतच त्यांनी त्यांच्या व्यवसायातील काही गोष्टी तिला गुप्तपणे सांगितल्या...तसेच घरांमध्ये कोणाचे संबंध कोणाशी कसे आहेत याबाबत सुद्धा सांगितले....जसं प्रत्येक घरात असतं, त्याचप्रमाणे या घरामध्ये काही कुरबुरी होत्या... मात्र घरातील जे युवक होते किंवा दोन लहान मुले होती ते मात्र एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे,घट्टपणे मैत्री राखून होते आणि त्यामुळे घरामध्ये आनंद असायचा...
हे सर्व करताना तिला सतत जाणवत होतं की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवत आहे...ही व्यक्ती कोण असेल हा अंदाज करता येणे कठीण होते... तरीही, ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याचे तिच्याकडे काही उपाय जरूर होते...
त्यानंतर तिने आपला मोर्चा वळवला घरातील युवावर्ग व दोन लहान मुले यांच्याकडे...त्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली ती मोठ्या मुलाची मुलगी...जी कॉलेजला होती...ही मुलगी अतिशय मनमिळावू परंतु तेवढीच भावनिक सुद्धा होती...त्यामुळे अशा व्यक्तींकडून माहिती काढणं सहज सोप्पं जातं...
तिने विचारलं की, "कोल्हापूर मध्ये फिरण्यासारखी काही ठिकाणी आहेत का?"
तेव्हा मोठी मुलगी म्हणाली की, "मी घेऊन जाते तुम्हाला.."
दोघी स्कुटीवर बसून दुसर्या दिवशी संध्याकाळी रंकाळा तलाव फिरायला गेल्या... रंकाळा तलाव हा नेहमीच तरुणाईने गजबजलेला असतो....मनमोहक वातावरण तसेच खाण्याची सोय आणि गप्पा-टप्पांसाठी कोल्हापूरकरांची ही आवडती जागा आहे...तर या ठिकाणी त्या दोघी आल्या व त्यांनी गप्पा मारण्यास सुरुवात केली...
या गप्पांमधून तिला ती एक गोष्ट मिळाली, ज्याने उलगडा होणार होता खऱ्या खुन्याचा...
तरीही एक शेवटचा तपास म्हणून तिने घरी गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट नीट न्याहाळली...तिने दोन दिवस जाऊ दिले आणि या दोन दिवसात नक्की घरात काय काय घडत होतं, त्याचं बारीक निरीक्षण केलं आणि त्यानंतर दिवाण साहेबांना बोलावून सांगितलं की, खुनी कोण आहे ते...
श्रीपाद नाईक यांचा खुनी कोण आहे, हे मेघा हे फुड ब्लॉगरच्या तिच्या रूपात सर्वांना सांगू शकत नव्हती व तिथे असताना काही घडावं हे तिच्यासाठी योग्य नव्हते...त्यामुळे तिने सांगितले की मी इकडून गेल्यानंतर पोलिसांना बोलवा व मी सांगेल त्या प्रकारे शोध घ्यायला सांगा....लगेच खुनी कळेल,तसेच त्यांच्या व्यापारातील वास्तव्य सुद्धा सर्वांसमोर येईल...दिवाण साहेबांना तिने पोलिसांना देण्यासाठी काही पुरावे दिले व इथे या पुराव्यांचा शोध घेतला असता सर्व गोष्टी नक्की काय आहे ते समजून जाईल असं सांगितलं...
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती तिथून निघून गेली...त्यानंतर दिवाण साहेबांनी पोलिसांकडे जाऊन त्या सर्व गोष्टी पोलिसांसमोर ठेवल्या आणि त्यानुसार पोलिसांनी त्या त्या जागेवर छापे टाकून पाहिले असता आणि शोध घेतला असता खरा खुनी त्यांच्या समोर आला...तो त्यांच्या बंगल्यात राहणारा एक विश्वासू नोकर होता...हा दिवाण साहेबांसाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता...या नोकराचा आणि श्रीपाद अडनाईक यांचा नेमका काय संबंध???एवढे खून करण्यापर्यंत याने का हा विचार केला असेल???एवढी काय दुष्मनी???हा विचार दिवाण साहेब करू लागले... पोलिसांना श्रीपाद अडनाईक यांच्या खुनाचे हत्यार कंपनीच्या गार्डनमध्ये पुरलेले आढळले व त्यावर असलेल्या बोटांचे ठसे हे त्या नोकराचे होते...त्यामुळे त्यांसाठी, हा पुरावा त्याला अटक करण्यासाठी पुरेसा होता...
त्यांच्या कंपनीतर्फे बहुतेक अमली पदार्थांचा व्यापार होत होता...यासाठी त्यांच्या तिन्ही मुलांना अटक करण्यात आली...या सर्व गोष्टीमुळे अख्खे कोल्हापूर शहर हादरले...त्यासोबतच त्या नोकराकडून काही गोष्टी समजून घेण्यासाठी पोलिस घेऊन गेले, मात्र नेमक्या काय गोष्टी त्याने पोलिसांना सांगितल्या ते बाहेर येऊ शकले नाही...
त्यांच्यावर कोर्टामध्ये केस सुरू झाली...कोर्टामध्ये सुद्धा त्या नोकराने फक्त ह्या अमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध म्हणून श्रीपाद अडनाईक यांचा खून केल्याचे सांगितले...यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली...तरीही त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली व श्रीपाद अडनाईक यांच्या तीन मुलांवर पुढे अमली पदार्थांच्या व्यापाराबद्दल वेगळी केस चालवून त्यांना काही वर्षांच्या शिक्षा देण्यात आल्या...
परंतु,दिवाण साहेबांना या सर्व गोष्टी तंतोतंत वाटत नव्हत्या...अजून काहीतरी रहस्य असावे हे त्यांना सतत जाणवत होते व त्याचा उलगडा करण्यासाठी त्यांनी मेघाला एकदा भेटण्याची विनंती केली...मेघाने सुद्धा त्यास होकार दिला....
ते पुण्याला निघून आले आणि त्यांनी विचारले की, "हे सर्व कसं घडलं ते सांग...मला वाटत नाही की फक्त अमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध म्हणून हा नोकर असं करेल...कारण तो स्वतः खूप वेळा पैसे खायचा,नीट हिशेब द्यायचा नाही त्यामुळे हे मला पटत नाहीये"...
मेघा म्हणाली,"आधी तुम्ही सांगा की,तुम्ही कसं ओळखलं की फुड ब्लॉगर मेघा हीच सीक्रेट सर्व्हिस ची गुप्तहेर आहे...मग मी तुम्हाला या गोष्टीचं रहस्य सांगेन"...
तेव्हा दिवाण साहेब म्हणाले की,"मला या क्षेत्रांमध्ये पहिल्यापासून आवड आहे...या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके तर मी वाचतोच, सोबत मी पोलिसांनी सोडवलेल्या केस तसेच कोणत्या गुप्तहेरांची घेतलेली मदत यांवर सुद्धा देखरेख ठेवत असतो...कोल्हापूर पोलिसांचा आणि माझा चांगला परिचय असल्याने त्यांच्याकडून बहुतेक गोष्टी मी जाणून घेत असतो...कंपनीच्या काही गोष्टींमध्ये पोलिसांकडून मदत व्हायची, तर काही वेळा पोलिसांना मी विचारायचो की चांगले गुप्तहेर कोण आहेत...त्यांच्याद्वारे आमच्या नुकसानामागील व्यक्तींना आम्ही शोधुन काढायचो...मागील काही वर्षांत,महाराष्ट्रात बहुतेक केसेस कोणीतरी गुप्तहेर सोडवत होता...मात्र तो गुप्तहेर नेमका कोण, याचा पोलिसांना सुद्धा अंदाज नव्हता...त्यामुळे मी ठरवलं की शोधून काढायचं, एवढ्या अव्वल दर्जाचा गुप्तहेर कोण आहे....त्या प्रत्येक केसेस मध्ये नेमकं काय घडलं हे मी तपासलं आणि त्या प्रत्येक केस मध्ये मला एक समान लिंक मिळाली...ती म्हणजे,फुड ब्लॉगर मेघा...या प्रत्येक केसेस मध्ये कुठे ना कुठे तुझा कोणाशी ना कोणाशी संबंध येत होता...त्यावरून मी अंदाज लावला की ही फुड ब्लॉगर मेघा, हीच कदाचित गुप्तहेर असावी...हा माझा अंदाज होता, परंतु मी नक्की काही सांगू शकत नव्हतो आणि तुझा समोरून योग्य प्रतिसाद आल्याने ती गोष्ट खरी झाली...मग मला जाणवलं की तुच ह्या केसचा तपास व्यवस्थित करू शकते आणि जो खरा खुनी आहे तोच शोधू शकते"...
मेघाला ही गोष्ट पटली आणि हेसुद्धा समजलं की, यापुढे या गोष्टीची काळजी घ्यायला हवी...कारण अशा प्रकारे जर प्रत्येकाने ओळखलं की फुड ब्लॉगर मेघा ही गुप्तहेर सुद्धा आहे,तर या पुढच्या केसचा तपास करणे तिच्यासाठी कठीण जाईल...
त्यानंतर मेघाने आपल्या तपासा बद्दल सांगितले...सर्वात पहिले तिने त्या विदेशी कंपनी ची माहिती तिच्या मित्रांकडून मागवली व त्यांनी सांगितलं की ही कंपनी कोणत्याही वस्तूच्या विक्रीकरता अस्तित्वात नाही...परंतु, याच नावाच्या एका कंपनीचे नाव काही महिन्यापूर्वी अमली पदार्थांच्या विक्रीसाठी पुढे आलेले...त्याचा पोलीस तपास अजूनही सुरू आहे...त्यावरून मेघाला कळलं की ही काहीतरी अमली पदार्थांच्या तस्करी बद्दलची गोष्ट असावी...त्यानुसार तिने ह्या गोष्टीचा तपास सुरू केला...त्यानंतर तिने या कंपनीच्या विक्रीची ठिकाणे पाहिली तर चपला व साड्या, अशा ठिकाणी भारतामध्ये पोहोचवल्या जात होत्या, जेथे कोल्हापुरी चपला वापरणारे मोजके कोणी असेल किंवा नसेलच...कारण शहरांमध्ये कोणी कोल्हापुरी चपला वापरत नाही...पैठणी साड्या होत्या त्या पंजाबसारख्या प्रदेशांमध्ये किंवा पूर्वोत्तर भारतामध्ये पोहोचवल्या जात होत्या...जिथे या साड्या घालणारे कोणी अस्तित्वात नाही...
त्यावरून तिला कळलं की या विदेशी कंपनीचा व्यापार एखाद्या पदार्थाची तस्करी करणं हाच आहे आणि त्या तस्करीसाठी या कंपनीच्या चपला व साड्या ते लोक वापरतात...मात्र ते नक्की अमली पदार्थच आहेत की अजून काही हे तिला माहीत नव्हते...मेघाने कोणत्या गोडावूनमध्ये खास परराज्यांत किंवा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये माल पुरवला जातो यासंबंधीची माहिती दिवाण साहेबांच्या कागदपत्रांतून मिळवली...
आता या गोष्टीला कोणत्या मुलाचा विरोध असता तर त्यातील कोणत्याही मुलाने या करारावर सही केली नसती...मात्र तिघांनी केलेली सही,हे दाखवत होतं की हे सगळे मिळून,या अमली पदार्थाची तस्करी करण्यास तयार होते...त्यानंतर मात्र संशयाची सुई या तीन मुलांवरून बाजूला झाली...कारण मग खुन करण्याचा कोणताही प्रश्न राहत नाही...जेव्हा ती त्यातील मुलांच्या बायकांसोबत विचारपूस करत होती तेव्हा कोणीतरी तिच्यावर लपून-छपून नजर ठेवत होते हे तिने हेरले...तिने आपल्याकडे असलेला मायक्रो कॅमेरा अशा ठिकाणांवर फिट केला की जेणेकरून तिला कळेल की तिच्यावर नजर कोण ठेवते... मुख्य कॅमेऱ्याचा रोख मात्र आपल्या संभाषणावर ठेवला...हे त्या व्यक्तीला समजू शकले नाही आणि त्यानंतर तिने रात्री जेव्हा त्या क्लिप्स बघितल्या तेव्हा कळले की घरातील नोकर हा तिच्यावर नजर ठेवतोय...तिला हे माहीत नव्हते की, हा स्वतःहून असं करतोय की, कोणाच्या सांगण्यावरून हा आपल्यावर नजर ठेवतोय...मात्र त्यावरून हे नक्की होतं की या तिघींचा या प्रकरणाशी संबंध नाही... तर मग असं कोण करणार???तो नोकर स्वतः असं करेल किंवा त्याच्याकडून करून घेणारा बाहेरचा कोणी असेल...
त्यानंतर तिने सांगितले, जेव्हा मोठ्या मुलाच्या मुलीसोबत ती फिरायला रंकाळ्याला गेली, तेव्हा अनेक गोष्टींबद्दल तिने त्या मुलीकडून जाणून घेतले.. त्यातच तिला कळले की लहान मुलाच्या बायकोसोबत श्रीपाद अडनाईक यांचे काही वाद झालेत...काही महिन्यांपूर्वी काही वाद झाले व त्यानंतर त्यांनी तिच्याशी बोलणे जवळजवळ बंद केले...त्यानंतर त्यांनी तिच्यावर अनेक बंधने लादलीत... ऑफीसला सुद्धा येऊ दिले नाही... त्यानंतर तिने त्या नोकराचे फोन कॉल्स डेटा चेक केला आणि त्यात तिला समजलं की त्या नोकराने लहान मुलाच्या बायकोला खूप वेळा फोन केले होते आणि सध्या सुद्धा करत आहे....मेघा समजायचे ते समजून गेली...त्यानंतर तिने दोघांवर नीट नजर ठेवली असता, तिला कळले की रात्रीचे किंवा संध्याकाळच्यावेळी हे दोघे भेटतात...
फोनचा बॅलन्स संपला हा बहाना करून तिने लहान मुलाच्या बायकोचा फोन घेतला व त्याला हॅक करून परत दिला... तिने लॅपटॉप मध्ये जेव्हा त्यांचे मेसेज तपासले, तेव्हा त्यात तिला नोकराचे मेसेज दिसले, ज्यात त्याने सांगितलं होतं की," त्या खुनाचे हत्यार हे कंपनीच्या गार्डन मध्ये मी पुरून ठेवलंय आणि जर तू माझ्यासोबत आली नाहीस,तर ते हत्यार मी पोलिसांसमोर दाखवून हे मान्य करेन की मीच खुन केलाय आणि या खुनात माझी साथीदार तू सुद्धा आहेस"
लहान मुलाच्या बायकोने त्यात सांगितलं होतं की, "खुन करून तु मोठे पाप केले आहेस...आपल्यात जे झालं ती माझी चुक होती...ही चूक मला पुढे करायची नाहीये...त्यामुळे जे झालं ते विसरून जा"
मात्र तो नोकर ते ऐकण्यास तयार नव्हता...तेव्हा या दोघांचेही नाव पुढे येणं चुकीचं होतं...कारण तिचा खुनाशी संबंध नव्हता आणि तिला आता सामान्य आयुष्य जगायचं होतं...
तिला ही चूक पुन्हा करायची नव्हती...तेव्हा फक्त नोकराला कसं फसवता येईल या दृष्टीने मेघाने प्लॅन केला...
लहान मुलाच्या बायकोला स्वतःहून सांगितलं की,"सगळ्या गोष्टी मला माहित आहेत...परंतु, जर तुला वाटत असेल तर तू फसणार नाहीस..."
मी शेवटी सर्व पुरावे तुमच्याकडे दिलेत...त्यानंतर ठरल्याप्रमाणे तुम्ही ते पोलिसांना देऊन त्यांना पकडले...ते होण्याच्या आधीच लहान मुलाच्या बायकोने ठरल्याप्रमाणे त्या नोकराला सांगितले होते की,"पोलीस येऊन आता तुला पकडणार जर तू माझं नाव घेतलं तर तुझ्या घरचे जिवंत नाही राहणार...आणि जर तू माझं नाव न घेता हे सांगितलं की अमली व्यापारास विरोध म्हणून मी त्यांचा खून केला, तर तुझा फायदा आहे...कारण यामुळे तुझ्या घरच्यांना मी एक खूप मोठी रक्कम पोचवेन...सोबतच सर्व लोकांच्या नजरेत एक चांगला व्यक्ती म्हणून तु पुढे येशील"...
नोकराने हे ऐकलं.. त्या नोकराचे व श्रीपाद अडनाईकांच्या लहान मुलाच्या बायकोचे संबंध होते.. यास कारण श्रीपाद अडनाईकांचा लहान मुलगा स्वभावात अतिशय विक्षिप्त व रागीट असणे आणि आपल्या बायकोला नीट न वागवणे हे होते.. ती उच्च शिक्षण घेतलेली, आधुनिक विचारांची, स्वातंत्र्य व आदर जोपासणारी तरुणी होती.. नवऱ्याच्या स्वभावाने तिच्या मनाचा कोंडमारा होत होता.. ऑफिसमध्ये जाताना अनेक वेळा त्या नोकरासोबत तिचे संभाषण चाले.. दोघे एकमेकांना आवडू लागले व त्यांनी एकांतात तसे काही क्षणही घालवले.. एक दिवस ही गोष्ट श्रीपाद अडनाईकांना समजली.. त्यांनी तिचे ऑफिसमध्ये येणे बंद करून टाकले.. तिने तिच्या मनाचा कोंडमारा त्यांच्यासमोर व्यक्त केला.. तरीही त्यांचे म्हणणे झाले की, स्त्रीला हे सर्व सहन करावंच लागतं.. नवरा कसाही असला, तरी परिवार चांगला होता व या परिवारासोबत आपल्या करिअरसाठी होणारी मदत तिच्यासाठी महत्त्वाचे होती.. तिला आयुष्यात खूप नाव कमवायचे होते.. त्यामुळे प्रेम व इतर भावनांवर सध्या तिने नियंत्रण ठेवणे आवश्यक होते.. त्या नोकराला हे सर्व समजावून, ह्या गोष्टी सध्या आपण काही काळ थांबवूया असे सांगितले.. तो मात्र तिच्यासाठी कासावीस झाला होता.. त्यात, मालक आपल्याला कामावरून काढणार आहेत, ही खबर त्याला मिळाली.. त्यामुळे, त्याने हा खून केला होता..
लहान मुलाची बायको आयुष्याकडे खूप समजूतदारपणे पाहत होती.. तिला यश तर हवं होतंच, सोबत जे आपुलकी किंवा काळजी करणारं, समजून घेणारं कोणी असावं ही भावना मनात होती.. त्यामुळे ऑफिसमध्ये ती मन लावून काम करत होती.. सोबतच या नोकराचे पद न पाहता एक माणूस म्हणून तिने त्याला जवळ केले होते.. मात्र एखादी गोष्ट कुठेपर्यंत ताणायला हवी ही समज तिच्याकडे होती, त्यानुसार तिने आपल्या अपेक्षांना लगाम घातला.. सोबतच अपेक्षा ही होती की, समोरील व्यक्ती सुद्धा हे करेल.. परंतु, तसे झाले नाही..
मेघाला हे सर्व समजले.. भारतातील अनेक स्त्रियांची हीच कथा आहे.. त्यात त्या स्त्रीचा दोष नाही.. दोष परिस्थितीचा आहे.. त्यामुळे तिला शिक्षा होणे उचित नाही.. हे समजून मेघाने तिला असं करण्यास सांगितले.. नोकराने पैशाची ऑफर मान्य करत, खुनाचा गुन्हा अमली पदार्थांच्या व्यापाराशी जोडला..
दिवाण साहेबांना ही गोष्ट पटली नाही...ते म्हणाले," ठीक आहे ती पुढे चूक करणार नाही किंवा तिचा कोणाशी संबंध होता ह्या गोष्टीमुळे तू तिला यामध्ये फसू दिले नाही...परंतु, आता जेव्हा तिन्ही मुलं अटकेत आहेत तेव्हा ही कंपनी चालवणार कोण? ही कंपनी चालणार कशी... बाकी सर्व मजूर आहेत त्यांचं काय? या गोष्टीचा सुद्धा तू विचार करायला हवा होता...कारण त्या तीन मुलांचा सुद्धा या खुनाशी काहीही संबंध नव्हता"
मेघा म्हणाली,"जरी त्या तीन मुलांचा त्या खुनाशी संबंध नसला,तरी ते असं काम करत होते ज्यामुळे भारताची अख्खी पिढी खराब होईल...भारतामध्ये अमली पदार्थांचा नशा घेणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढत आहे आणि हे असे काम करणारे लोक स्वतः बक्कळ पैसा कमावून लोकांना मात्र दारिद्र्यात लोटत आहेत...त्यांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत...हे सर्व माहित असून सुद्धा, त्या तीन मुलांनी ही चूक केली...त्यामुळे मी त्यांना शिक्षेसाठी जबाबदार धरले... जेव्हा त्या तिन्ही स्त्रियांचे मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा, त्या लहान मुलाच्या बायकोने मला सांगितले होते की, हे लोक काहीतरी चूक करतायत...तिने हे सांगितलं नाही की, अंमली पदार्थांचा व्यवसाय करतात...परंतु, तिला ही गोष्ट ठाऊक होती व तिचा याला विरोध होता...ऑफिस मध्ये काम करत असल्याने याबाबतची तिला माहिती सुद्धा होती... या विरोधामुळे व त्यात नोकरासोबतचे संबंध समजल्यामुळे श्रीपाद अडनाईक तिच्यावर रागावले होते.. त्यांनी तिला घरी कोंडले होते...
मी तिथे घर सोडण्याआधी तिला हे सांगितले की,ह्या सर्वांना अटक होणार आहे आणि माझी इच्छा आहे की यापुढे कारभार तू पहावास आणि कंपनीला या सर्व अनधिकृत कामांमधून बाहेर आणून एक चांगली दिशा द्यावी...तिने ते कबूल कले आणि त्याप्रमाणे ती आता कंपनीचा व्यवहार अतिशय व्यवस्थित चालवेल...परंतु, जर काही चुकीचं घडलं तर पोलिसांची सुद्धा त्या कंपनीवर आता नजर आहे आणि तुमची सुद्धा नजर आहे त्यामुळे तिला चांगलं काम आहे तेच करावे लागेल...
दिवाण साहेबांना ते पटलं..याप्रकारे मेघाने अजून एक केस सोडविली होती आणि यापुढे तिला आता एक ब्रेक हवा होता...पुढच्या केसेस मध्ये मात्र ती अजून दक्षता घेऊन काम करणार होती...कदाचित आता फुड ब्लॉगर म्हणुन न जाता तिला वेगळा कोणत्या प्रकारे जाण्याचे पर्याय शोधावे लागणार होते...परंतु,त्याआधी पुन्हा हा विजय साजरा करण्याची वेळ होती...मनाला शांत करण्याची वेळ होती...त्यामुळे नकळतच सर्व समस्या विसरून, सर्व चिंता विसरून तिची पावले नकळत तिच्या आवडत्या पबकडे पुन्हा वळालीत...

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा