डब्बेवाल्यांचे काय झाले??

 


मुंबईचे डब्बेवाले तसे जगभरात प्रसिद्ध..

डब्बेवाल्यांचा हा कारभार जवळजवळ १२५ वर्ष जुना आहे. मुंबईतील काही उद्योगपतींनी आपल्याला घरचं गरम -गरम जेवण मिळावं म्हणून काही लोकांकडे डब्बा आणून देण्याचे काम सोपवलं, यातूनच हा कारभार सुरू झाला. पूर्वी गिरणी कामगारांना व नंतर सेवा क्षेत्रात आलेल्या नवनवीन कंपन्यांतील नोकरदारांना डब्बे पोहोचवत हा उद्योग मोठा होत गेला.


हजारो लोक जोडले गेले असून सुद्धा, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार करणारा हा जगातील एकमेव उद्योग असावा. या संघटनेचा कोणीही मालक नाहीये. जो कोणी डबेवाल्यांच्या संघटनेत सामील होतो, त्याला या कारभारात मालकाप्रमाणे हक्क मिळतात. त्यासाठी संघटनेत सामील होण्यापूर्वीच फी स्वरूपात काही रुपये संघटनेला देऊ करायचे. त्यामुळे, ग्राहकासोबत सौदा करताना स्वतःच्या अटींवर निर्णय घेता येतात.


काम करताना हे वीस ते पंचवीस जणांच्या समूहात काम करतात. सकाळी नऊ वाजेपर्यंत डब्बा प्रत्येक घरातून घेऊन यायचा, नंतर अकरा वाजेपर्यंत तो योग्य त्या ठिकाणी पोहोचवायचा. या संघटनेत सामील होणारा प्रत्येक जण स्थानिक स्थळांची अतिशय व्यवस्थित माहिती ठेवून असतो. आज झोमॅटो वरून आपलं खाद्य घेऊन येणारे पाच वेळा आपल्याला फोन करून विचारतात. ती गरज यांना भासत नाही.


डब्बा घेऊन येणारे व पोहोचवणारे वेगवेगळे असतात. त्यामुळे अगदी मिनिटाचा हिशेब ठेवत, वक्तशीरपणा जपावा लागतो. जे लोक उशिरा डब्बा देतात त्यांना दोन वेळा समज दिली जाते, तरीही ते उशीर करत असतील तर अशा ठिकाणाहून डब्बा स्वीकारणे बंद केले जाते.

संघटनेतील बहुतेक कामगार फारसे शिकलेले नसल्याने, डब्ब्यांवरती अंक व अक्षरांच्या स्वरूपात कोड लिहिलेले असतात. या कोड वरून हा डब्बा नेमका कुठे न्यायचा आहे, हे पुढील कामगाराला कळून जाते.


दुपारी तीन ते पाच या कालावधीत जेवण करून रिकामे झालेले डब्बे, जेथून आणले तेथे पुन्हा पोहोचवले जातात. सकाळी नऊ ते अकरा व दुपारी तीन ते पाच या वेळेत मुंबईतील लोकल असो अथवा रस्ते, यांवर फारशी रहदारी नसल्याने यांना यांचे काम व्यवस्थित करता येते. डब्बा एका विशिष्ट आकाराचा असावा हा दंडक असल्याने, त्यांची हाताळणी सोपी होऊन जाते.


डब्बेवाल्यांच्या या संघटनेस पहिल्यांदा तोटा होऊ लागला, जेव्हा झोमॅटो व स्विगी यासारख्या कंपन्या घरोघरी स्वस्तात हॉटेलमधील अन्न पोहोचू लागल्या. डबेवाल्यांचे ग्राहक हे मुख्यत्वे कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत. या कामगारांना ऑनलाइन खाद्य मागवायची सोय उपलब्ध झाल्याने व ते अतिशय ताजे व गरम असल्याने डब्बेवाल्यांकडून डब्बा स्वीकारणे कमी होऊ लागले.


दुसरा तडाखा या संघटनेस कोरोनाने दिला. २०२०-२१ या काळात बहुतेक कंपन्या बंद पडल्याने त्यांच्याकडे कामच नाही राहिले. कोरोना संपल्यानंतर सुद्धा बहुतेक लोकांनी घरातूनच काम करणे चालू ठेवले, त्यामुळे त्यांचे ग्राहक कमी झाले. याच काळात ही संघटना पूर्णपणे कोलमडली. अनेक डब्बेवाल्यांनी हे काम सोडत, वडापाव चे गाडे किंवा त्यासारखे दुसरे प्रकार सुरू केले. वयोवृद्ध डब्बेवाल्यांनी मुंबई सोडत आपले गाव गाठले.


आज जेमतेम हजार डब्बेवाले मुंबईत कार्यरत आहेत. मुंबई बदलत आहे व बदलणाऱ्या मुंबईत डब्बेवाल्यांची ही पारंपारिक व प्रामाणिक सेवा कुठे व्यवस्थित बसत नाही. अशा परिस्थितीत हा उद्योग पूर्णपणे बंद करणे किंवा त्यामध्ये विशिष्ट प्रयोग घडवून आणत, नव्या पद्धतीने मुंबईस सेवा देणे, हेच पर्याय डब्बेवाल्यांसमोर आहेत.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट