अंत
गर्द वनात घनदाट काळोखातील ते जनावर,
आज गगनभेदी उंचीवर दिव्यांच्या झगमगाटात पहातोय..
हा प्रवास नेमका कोणत्या अंताकडे जातोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
इतरांच्या चुकांसाठी त्यांना क्षणाक्षणाला जाळणारी ज्वाळा,
स्वतःचे गुन्हे मात्र निमुटपणे लपविताना पहातोय...
कोणी पवित्र म्हणतेय तर कोणी तिच्या मरणाचा स्तोत्र गातोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा तो जीव,
जीव संपविण्यास भाग पाडणारा विकृतीचा पुतळा होताना पहातोय...
त्याच्या अंतर्मनातील विषाणू त्याच्या चांगूलपणावर प्रभावी होत जातोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
शालीन, विवेकी आणि बुद्धिवादी निःस्वार्थी,
उद्धट, अविवेकी, अंधश्रध्दाळू आणि स्वार्थी झालेला पहातोय...
हा समंजसपणाचा बदल का बर हेलकावे खातोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
जगाचा जीव वाचविणारे ते हात,
त्या हातांनीच जगासाठी विष तयार करताना पहातोय...
त्यांची पुजा करावी कि तिरस्कार, मनाला हा प्रश्न सतावतोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
धर्माच्या नावाखाली तलवार उगारणारी ती आकृती,
धर्मनिरपेक्षपणे कधी दान करतानाही पहातोय...
भावनांच्या ओझ्याखाली तो मुक्तपणे वहावतोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
जगाने कुल्टा ठरविलेली ती स्त्री,
अनाथांसाठी तिला माता होताना पहातोय...
तिची दोन्ही रूपे मी मूकपणे स्वीकारतोय,
नेमका मी कोणाला पहातोय...
पूर्णतः काही पांढरं नाही की पूर्णतः काही काळं नाही,
देव आणि राक्षस यांची मेजवानी माझा अंतःचक्षू पहातोय...
या वाटचालीचा अंत माझा एकेक विचार आजमावतोय,
कारण... मी माणसाला पहातोय...
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा