शिवसेना
पत्रकार केशव सिताराम ठाकरे (प्रबोधनकार) दादरच्या मीरांडा चाळीमध्ये राहायचे. या चाळीत मोठ्या प्रमाणात मद्रासी लोकांची वस्ती होती. कामाच्या शोधात हे मद्रासी लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येऊन स्थायिक झाले होते व शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये मिळेल त्या पगारावर काम करण्यास तयार असायचे.
कामगार सहज मिळू लागल्याने, त्या जागांवर मिळणारा पगार कमी होऊ लागला. जसे की जूनियर स्टेनो टायपिस्टला महिन्याचा साठ रुपये पगार होता तो तीस झाला. स्थानिकांसाठी नोकऱ्यांची संधी कमी होणे व पगार कमी होणे या गोष्टींना विरोध करत, प्रबोधनकारांनी त्यांच्या वृत्तपत्रात अशा प्रकारे लिखाण केले की मद्रासी व मराठी लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते.
असंतोष या गोष्टीचाही होता की, महाराष्ट्रात मद्रासी लोकांना नोकऱ्या तर मिळत होत्या. परंतु, अगदी विदेशात शिकून आलेले मराठी तरुण जेव्हा मद्रास प्रांतात नोकरीसाठी अर्ज करायचे तेव्हा त्यांना दुर्लक्षित केले जायचे. बॉम्बे प्रांताच्या शासनाकडे प्रबोधनकारांनी, आपण सुद्धा स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य दिले पाहिजे असा कायदा करावा, ही विनंती केली.
प्रबोधनकारांच्या विरोधाला फारसे महत्त्व मिळाले नाही. त्यांचा मुलगा बाळ ठाकरे हा ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार होता. त्याच्या कार्यालयाचा प्रमुख हा मद्रासी व्यक्ती होता. त्या दोघांमध्ये सतत तंटे उत्पन्न होत. शेवटी 1959 साली बाळ ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नल सोडले.
आपला लहान भाऊ श्रीकांत याच्यासोबत त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले.
या साप्ताहिकामधून बाळ ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्यांवरील हक्कासाठी एक प्रकारची चळवळ उभी केली. मद्रासी व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांना मोक्याच्या जागांवर कामाला लावत होत्या. ही वशिलेबाजी सुद्धा मराठी तरुणांना अस्वस्थ करु लागली. या चळवळीचा फार उपयोग होणार नाही, हे प्रबोधनकार अनुभवांवरून जाणून होते.
त्यामुळे त्यांनी बाळ ठाकरे ना राजकारणात प्रवेश करण्याची सुचना केली.
त्यानुसार, १९ जुन १९६६ ला ‘शिवसेना’ या पक्षाची स्थापना झाली. हे नाव सुद्धा प्रबोधनकारांनी ठरवले. स्थापनेवेळी फक्त १८ लोक उपस्थित होते. काळ पुढे गेला तसे, शिवसेनेचा मद्रासी विरोध संपला.
नंतर या पक्षाने दलीत विरोध, मुस्लिम विरोध व उत्तर भारतीय विरोध असे राजकारण करत, आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला.
प्रबोधनकारांचे विचार एकतेचे व समतेचे होते, फक्त मद्रासी तरुणांमुळे मराठी तरूणांचे नुकसान होऊ नये, हे त्यांचे मत होते. दलितांवरील अत्याचारास त्यांनी विरोध केला. हिंसा त्यांना मान्य नव्हती. काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना खऱ्या अर्थाने प्रबोधनकारांच्या विचारांवर मार्गक्रमण करत होती.
मात्र, एका वर्षापूर्वी बसलेल्या धक्क्यातून हा पक्ष अद्यापही सावरला नाहीये. फक्त मुंबई पुरते मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना प्रबोधनकारांच्या विचारांसोबत पोहोचेल, तेव्हा च या पक्षाचे भवितव्य स्थिरस्थावर होईल.

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा