क्रिकेट नावाची कीड
क्रिकेट नावाच्या खेळामुळे, आपल्या देशाचे नेमके काय नुकसान होत आहे याचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न.
तसे पाहायला गेले, तर क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांचा आणि आपल्या देशामध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याची खूप प्रसिद्धी झाली आणि अनेकांच्या हाती बॅट दिसू लागली.
परंतु, खरं वैभव या खेळाला मिळालं ते सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या उदयानंतर. हा खेळ खेळाडू केंद्रित झाल्यामुळे, त्याच्यासारखीच प्रसिद्धी किंवा ते वलय लाभावे असे अनेकांना वाटू लागले व अनेक तरूण या खेळासाठी आपले प्राण ओतू लागले.
आज भारतीय अर्थव्यवस्थेतील काही महत्त्वाच्या गोष्टी या खेळावर अवलंबून आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा महसूल क्रिकेट या खेळातून मिळतो. आयपीएल नावाची सर्कस व त्यामधील वाटाघाटीतून होणारे व्यवहार, यातून भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठा नफा कमावीत आहे आणि सोबतच अनेक खेळाडूंचा जीवनस्तर उंचावला आहे. तरीही, एकूणच हा खेळ आपल्या देशासाठी किती हानीकारक आहे, याचा परामर्श घेतला तर हे कळते की, सामाजिक व्यवस्थेला बाधा आणणारा असा हा खेळ आता होत चालला आहे.
याचे वेगवेगळ्या बाबतीत विश्लेषण करता येईल :-
१) भारतातील अनेक तरुण हे क्रिकेटच्या मागे वेडे आहेत, त्यामुळे कोणत्या खेळाची सुरुवात करायची म्हटलं, तर फक्त क्रिकेट सोडून त्यांना काही सूचत नाही, त्यामुळे ऑलम्पिकमध्ये आपली झोळी रिकामी राहते.
असं नाही की या देशातील तरुणांकडे गुणवत्ता नाही. परंतु, त्या गुणवत्तेचा योग्य वापर होत नाहीये. क्रिकेटमध्ये सारे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याच्या मागे लागत असल्याने, त्यांच्याकडे असणारी खरी गुणवत्ता झाकोळून जाते. एक अपयशी क्रिकेटर कधीतरी एक उच्च प्रतीचा भालाफेकपटू किंवा फुटबॉलपटू होऊ शकला असता. परंतु, फक्त या खेळाच्या मागे तो आपले खरे कौशल्य दूर करतो.
२) क्रिकेट हा खेळ राजकारण्यांचा खेळ आहे, हे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. गुणवान खेळाडू मागे राहतात व ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असतो तेच पुढे निघून जातात. अशाने खेळाडूंसोबत अन्याय होत आहे. तरीसुद्धा अनेक तरुण या खेळासाठी आपले आयुष्य देतात आणि शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडते.
३) इतर कोणताही खेळ असा नाही, जो दिवसातील एवढा वेळ व्यापत असेल. क्रिकेटमुळे कधीकधी अख्खा दिवस वाया जातो. आता त्याचे t-20 सारखे प्रकार आल्यामुळे वेळ कमी जातो. परंतु, ते सुद्धा तीन-चार तास चालत असल्याने व त्याचे सामने रोज-रोज असल्याने, वेळ वाया जातो.
इतर सामन्यांचे तसे नसते, ते काही मिनिटांचे किंवा तासभराचे असतात.
हाच वेळे जर लोकांनी आपल्या विशिष्ट कामासाठी वापरला, हाच वेळ जर टीव्हीसमोर बसण्यापेक्षा इतर उचित कार्यासाठी वापरला गेला, तर अनेक अंगांनी काहीतरी चांगले घडू शकते.
मुलांना अभ्यास करा असे म्हणत काही पालक दिवसभर क्रिकेटच्या मॅचेस बघत राहतात. कधीकधी कौटुंबिक कलह सुद्धा निर्माण होतात.
या सर्व गोष्टी आपल्याला अनपेक्षित रित्या क्रिकेटमुळे मिळतात, त्याचा आपल्याला साधा अंदाजही नसतो.
४) तसे पाहायला गेले तर हा खेळ शारीरिक दृष्ट्या सुद्धा फार चांगला असा नाहीये. कारण, इतर खेळांमध्ये पूर्णवेळ खेळाडूंना आपले शारीरिक क्षमता दाखवावी लागते. या खेळात मात्र खूप सारे खेळाडू फक्त एका जागी उभे असतात. त्यामुळे अपेक्षित शारीरिक व मानसिक उन्नती आपणांस खेळामुळे प्राप्त होणे गरजेचे असते, ते या खेळामुळे होत नाही.
इतर खेळांमध्ये आपल्याला ती उन्नती पाहायला मिळते.
५) सर्वात वाईट परिणाम म्हणजे, हा खेळ आता भारतीयांच्या भावनांशी जोडला गेलाय.
कोणताही खेळ तोपर्यंत खेळ म्हणून चांगला असतो, जोपर्यंत त्याला खिलाडूवृत्तीने घेतले जाते. भारतीयांना हार सहन होत नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे. ती खिलाडूवृत्ती आपण गमावली आहे. आज जर आपण पाहिले, तर एकदा का क्रिकेटमध्ये खेळाडू हरले. तर त्यांच्या घरावर आक्रमण करण्यापर्यंत भारतीयांची मजल जाते. धोनी-कोहली यांच्या छोट्याशा पोरींवर विकृत व्यक्तींनी टिप्पणी केली आहे.
जर मुस्लिम खेळाडू असेल, तर त्याच्या देश प्रेमावर शंका घेतली जाते. अनेक जण हरलो की, आत्महत्या करतात किंवा अटॅक येतो. हे कोणत्याही देशात होत नाही. हे होणे चुकीचे आहे. त्यामुळे ह्याला फक्त खेळ म्हणता येणार नाही.
६) आज या खेळाच्या आडोशाने काळाबाजार खूप मोठ्या प्रमाणे वाढला आहे. जरी भारतात अधिकृत नसला, तरी सट्टा मोठ्या प्रमाणावर लावला जातो. मोठ्या प्रमाणावर काळया पैशाचे अधिकृतीकरण केले जाते. नवनवीन आलेले बेटिंग अप्लिकेशन फुटकळ पैसा सामान्यांच्या पदरात पडतात, त्यावर आजचे तरुण-तरुणी खुश सुद्धा होतात. खरे तर हे बॅटिंग अप्लीकेशन धनाढ्यांचा काळा पैसा कायदेशीर करण्याचे मोठे स्त्रोत आहेत.
या सगळ्या गोष्टी, गुन्हेगारी प्रवृत्तीला वाट करून देतात. त्यामुळे, खेळाचे गुन्हेगारीकरण आणि तेसुद्धा वैध मार्गाने या प्रकारे केले जाते. यामध्ये अनेक तरुण होरपळले जातात याची आपल्याला जाणीव नसते. हा खेळ त्यांना या प्रकारच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. असे नाही की, इतर कोणत्याही खेळांमध्ये हे शक्य नाही. परंतु, या खेळामध्ये या गोष्टी सहज शक्य आहेत.
७) आपण आयपीएल सामन्यांना जेवढे महत्त्व देतो, तेवढी ऑलम्पिकला तरी देतो का? ऑलिंपिक चालू असताना किती जण पाहतात? कोणते खेळाडू आपले प्रतिनिधित्व करताहेत, हे तरी कोणाला माहित असते का?
या गोष्टी इतर खेळांना मागे ठेवतात, जे खऱ्या अर्थाने देशाची मान उंचावतात.
हे सर्व समजल्यानंतर, आपल्याला आता क्रिकेटला महत्व देणे थांबवायला पाहिजे. आधीच मोठ्या प्रमाणात तरुणाईचे नूकसान झाले आहे. आता हे सर्व संपायला हवे.

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा