शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराज
शब्द कमी पडावेत, अशी ती मूर्ती...
दाही दिशांना पुरून उरेल एवढी ती कीर्ती...
त्या तेजास मात्र आज ग्रहण आहे, त्या नजरेत आज एक चिंता आहे...
माझ्या स्वराज्याची ही दूर्दशा होण्यामागचे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

आयुष्य आव्हानांनी भरलेले होतं...
त्या प्रत्येक आव्हानास मी ताठ मानेने सामोरा गेलो...
माझे मावळे मात्र अपयशाने असे खचत आहेत,
की स्वतःची मान च फासाच्या स्वाधीन करत आहेत...
ही मने एवढी कमजोर होण्यामागचं कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

तलवार तर फक्त अत्याचाराविरूद्ध उगारली गेली...
अखंड आयुष्य प्रेमाचाच वर्षाव केला...
माझ्या मावळ्याकडुन आज द्वेषापोटी तलवार उगारली जात आहे...
प्रेमावर तर जणू बंदी लादली आहे...
हा एवढा द्वेष पसरण्यामागे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

रयतेची पितृत्वाच्या भावनेने काळजी घेतली...
स्वराज्यातील प्रत्येक वृक्षवेलींना सुद्धा मुलाबाळांप्रमाणे जपले...
माझे मावळे मात्र आज विकासाचा जप करत, या हिरव्या समृद्धीचा संहार करत आहेत...
ही एवढी निष्ठुरता असण्यामागे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

स्वराज्य प्रत्येक धर्मियाचे होते...
माझा लढा कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता...
आज माझे मावळे मुस्लिम द्वेषाने बेभान होत आहेत...
त्यासाठी माझं नाव वापरून, माझा अपमान करत आहेत...
मनांतील हा भेद एवढा विकोपाला जाण्यामागे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

स्वराज्याचे प्रशासन शिस्तबद्धपणे फक्त आणि फक्त रयतेच्या भल्यासाठी कार्यरत राहीले...
सत्तेत येणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडुन माझे नाव घेतले जाते...
माझी निती मात्र हेतुपुरस्पर बाजूला ठेवली जाते...
सत्ताधारी एवढे स्वार्थी होण्यामागचे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

समाजास मागे नेणाऱ्या प्रथांना मी मुठमाती दिली...
नवीन विचारांसाठी तोरण बांधून, पुरोगामी महाराष्ट्र घडविला...
माझे मावळे मात्र आज, अंधश्रद्धांना बळी जात आहेत...
त्याहून वाईट म्हणजे, अंधश्रद्धांसाठी बळी घेत आहेत...
तरुणाईचा हा उलट दिशेने प्रवास होण्यामागे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

फक्त अफजलखान वध म्हणजे शिवाजी नव्हे...
फक्त गड आणि किल्ले म्हणजे शिवाजी नव्हे...
शिवाजी म्हणजे, एक निश्चय...
शिवाजी म्हणजे एक संयम...
शिवाजी म्हणजे एक विश्वास...
शिवाजी म्हणजे अविरत प्रेम...
माझा मावळा हे विसरण्याचे कारण काय आहे...
हा प्रश्न आज शिवबाला छळत आहे...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट