नात्यांचे समीकरण

नात्यांचे समीकरण
या जगात अनेक प्राणी आहेत, त्यापैकी मानव एक. जे इतर प्राणी आहेत त्यांमध्ये आणि मानवात मेंदूच्या सक्रियतेचे वेगळेपण नेहमी नमूद केले जाते. प्रतिभाषाली मेंदूमुळे मानव स्वतःला इतर प्राण्यांहून वेगळा समजतो. त्यासोबतच मानव व इतर प्राण्यांमध्ये एक महत्त्वाचे वेगळेपण आहे, जे कदाचित या मेंदूतूनच उत्पन्न झाले - संस्कृती व त्यामधून निर्माण झालेले नातेसंबंध.
असे नाही की, इतर प्राण्यांमध्ये नातेसंबंध नसतील. अनेक प्राणी कळपात राहतात, याचा अर्थ ते एकमेकांशी स्नेह ठेवतात. प्रत्येक प्राणी आपल्या पिल्लाची काळजी करतो. मानव मात्र या नातेसंबंधात एक पाऊल पुढे गेला आहे. लग्न या सांस्कृतिक मान्यतेमुळे.
पहायला गेले तर इतर नाती सुद्धा आहेतच.
आई-वडील, काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावशी, आजी-आजोबा, इत्यादी. परंतु, मानवी संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून सर्वात वादास्पद ठरलेलं आणि म्हणूनच महत्त्वाचं ठरलेलं नातं म्हणजे नवरा व बायको. इतर प्राण्यांमध्ये हे नातं आढळत नाही. इतर प्राण्यांमध्ये काका-काकी, मामा-मामी ही नाती सुद्धा आढळत नाहीत. याबाबत त्यांना सुदैवी समजावे की दुर्दैवी, हा वेगळा प्रश्न आहे. लग्नाच्या नात्याने मात्र मानव जमातीमध्ये खूप मोठा बदल घडवून आणला. फक्त सामाजिक नाही, तर आर्थिक सुद्धा. या नात्याच्या भांडवलावरच अनेक दिग्दर्शकांनी लोकांचे मनोरंजन करत, करोडो रुपये कमावले आहेत.
भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या नात्यास प्रचंड महत्व दिले आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात असे मानले जाते. परंतु, हकिकत मात्र वेगळी आहे. या लग्नाच्या गाठीचे धागे;

दोघांचा धर्म काय आहे?
जात काय आहे?
आर्थिक स्थिती कशी आहे?
स्वतःचे घर आहे की नाही?
नवऱ्याला बहीण आहे की नाही?
मुलीला किती बहिणी आहेत?
हुंडा किती मिळणार?

इत्यादी गोष्टींनी तयार झालेले असतात.

कोणताही मुलगा किंवा मुलगी पहिल्यांदा जेव्हा मनात लग्नाचा विचार आणतात तेव्हा आपला जीवनसाथी चांगल्या विचारांचा/विचारांची असावी यास प्राधान्य देतात. नंतर मात्र त्याचं दिसणं सुद्धा महत्त्वाचं ठरत जातं. सोबतच चार चौघात त्याला किंवा तिला किती मान आहे हे सुद्धा पाहिलं जातं. या सर्व गोष्टीतून निभावून नेलं, तरी मग घरातील ज्येष्ठ व्यक्ती वरील प्रश्नांनी गाळून-गाळून त्या नात्याचा चहा करून टाकतात. सिरीयल मधील प्रेमाच्या गोष्टी डोळ्याची पापणी न लवता पाहणारे व त्यास योग्य ठरवणारे म्हातारे, प्रत्यक्ष जीवनात मात्र समाजाला घाबरून, प्रेमाला नाकारून आपल्या मुला-मुलींचा बळी देत असतात.
भारतीय संस्कृतीप्रमाणे नेहमी सत्याचा विजय होतो किंवा जे योग्य असेल ते नेहमीच तरुन जाते. प्रत्यक्षात हे नेहमीच होत नसले तरी,त्यासाठी लढाई करता ते साध्य होण्यास अनुकूल असते. जर खऱ्या मनाने प्रेम करणं योग्य आहे, तर ते यशस्वी सुद्धा व्हायलाच हवे, नाही का? परंतु, खरी मेख येथेच आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, याबाबतच्या सर्वांच्या संज्ञा वेगवेगळ्या ठरत आहेत. त्यात कबीर सिंग सारखे चित्रपट व instagram सारख्या सोशल मीडियावर वायरल होणारे व्हिडिओ आता नात्यांच्या परिभाषा ठरवू लागले आहेत.
हे पहिल्यांदा होतेय असे नाही. रामायणात सीतेच्या अग्नीपरीक्षेच्या कथेनंतर, स्त्रीच्या शारीरिक पवित्रतेवर समाज जोर देऊ लागला. जर देव सुद्धा त्याच्या बायकोची अशी अग्निपरीक्षा घेतो तर आम्ही का नाही? रामाने लोकांविरुद्ध जाऊन सीतेची साथ दिली, अशी कथा असती; तर समाजाने त्याला किती महत्त्व दिले असते याबाबत शंकाच आहे. आजची समाजमाध्यमे सुद्धा लोकांना नेमके काय आवडेल, हे हेरून त्यांच्यापर्यंत पोहोचवतात.
तर मग प्रेम म्हणजे काय - समोरील व्यक्तीचा आदर करणे व त्यास नीट समजून घेणे. अगदी एवढे सुद्धा पुरेसे आहे.
आजकाल एक नवीन नातं निघालं आहे - ‘Best Friend’. म्हणजे बाकीच्या सर्वांनी स्वतःला ‘Waste friend’ समजावं असं काहीसं. लोकांनी स्वतःचं जीवन फिल्मी करून घेतलं आहे. त्या कथा लिहिणाऱ्याच्या नियंत्रणात असतात, प्रत्यक्ष जीवन मात्र आपल्या नियंत्रणात नसते आणि त्यामुळे आपल्या नात्याच्या संकल्पना जेव्हा गैरलागू ठरतात, तेव्हा आपल्याला प्रचंड त्रास होतो. कथांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये मैत्रीचं नातं वेगळ्या प्रकार दाखवलं जातं. सोबत काहीतरी विचित्र प्रकार करणारे, मस्ती-मजा करणारे म्हणजे मित्र. मैत्री मधील समजूतदारपणा संपून ती फक्त मौजमजेसाठी राहिलीये. जर ते शक्य नाही झाले, तर मैत्रीच संपते.
सध्या दारू या गोष्टीला जास्त महत्व मिळतेय; दारू लोकांच्या जीवनाचा असा अविभाज्य भाग झाली आहे की, जर मस्ती मजा करायची आहे; तर ते दारू शिवाय शक्यच नाही, असे मानणारा एक मोठा समुदाय आज भारतात तयार झाला आहे. अशा मैत्रीत वाटोळं होणं साहजिक आहे. आधी स्वतःच भावनांमध्ये वाहत काहीतरी चुकीचं वागायचं आणि मग त्याचे खापर मित्रांवर फोडायचं की मित्रांमुळे मी वाया गेलो.
लग्नाचे नाते खूप वेगळी गोष्ट ठरते ते यासाठी की, हे नाते इतर सर्व नात्यांची भूमिका निभावते. नवरा बायकोला एकमेकाचे मित्र होणे आवश्यक असते तसेच एकमेकांचे आई-वडील होणे सुद्धा आवश्यक असते. बाकी कोणत्याही नात्यात घटस्फोट ही गोष्ट उपलब्ध नसली, तरी तो न सांगता आपसूकपणे घेतला जातो. लोक याप्रकारे न सांगता दूर होऊन जातात, की कळूनही येत नाही की नाते कधी संपले. लग्न हे नाते मात्र तसे नाही. यात वेगळे होणे ही सहज साधी गोष्ट नाही. लग्न टिकवणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. समाज मान्यतेनुसारच्या प्रथांना धरून लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यात मानसिक त्रास व एकाकीपणा या गोष्टी स्वाभाविक आहेत. दुसऱ्या बाजूने विचार करता, जर एकमेकांना समजून घेत बाकी समाजाला फारसे महत्त्व न देता आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, तर हेच नातं आपल्यासाठी जगातलं सर्वोत्कृष्ट नातं ठरून जातं.
शासकीय आकडेवारीनुसार, भारतात जेवढी लग्न होतात; त्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण फक्त एक टक्के आहे. नॉर्वे व स्वीडनसारख्या प्रगत व शांत देशांमध्ये हे 40 ते 50 टक्क्यांदरम्यान आहे. यात आपण आपल्या भारतीय संस्कृती बद्दल अभिमान मानू. परंतु, भारतात हुंड्यामुळे किंवा इतर कारणांनी विवाहितांच्या जेवढ्या हत्या होतात, त्याच्या एक टक्के सुद्धा हत्या इतर कोणत्याही देशात होत नाहीत. ज्यांचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला जातो, त्यांची तर गणनाच होऊ शकत नाही. लग्न फक्त मुलांसाठी चालवायचे म्हणून चालवायचे ही अनेकांची भावना असते आणि त्यासाठी लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर मुले व्हावीत हा समाजाकडून जोडप्यावर दबाव असतो. समाजाची खरी स्थिती सर्वांना माहीत आहे आणि त्यासोबतच जगणे हे सर्व आपले प्राक्तन मानतात.
हे बदलू शकते. लग्न ही व्यवस्था जरी समाजाचे अविभाज्य अंग झाली असली, तरी ती सर्वात त्रासदायक अशी व्यवस्था म्हणून टीकास्पद ठरली आहे. या नात्याची अनेकदा खिल्ली उडवली जाते. हे थांबवता येईल.
जर या चर्चेत सांगितल्याप्रमाणे -

कोणत्याही प्रकारच्या सामाजिक किंवा समाजमाध्यमांवरील संकल्पनांमध्ये वाहत न जाता,
मनाला योग्य वाटेल अशा व्यक्तीला आपला/आपली साथीदार निवडत,
त्यास एक माणूस म्हणून समजून घेत,
स्वतंत्र विचारांनी सामाजिक रूढींना नात्यामध्ये न आणता,
अपेक्षांचे ओझे न लादता,
एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत,
जीवन एकदाच मिळाले आहे याचे भान ठेवत,

जर स्वच्छंदीपणे जगण्याचा व आपल्या साथीदाराला जगू देण्याचा निश्चय केला, तर हे नाते आयुष्यात फक्त आनंद आणेल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट