राजा असावा तर असा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज
एकदा एक भाजी विकणाऱ्या आजीबाई बाजार संपवून आपल्या सामानाची आवराआवर करत होत्या. त्या काळात दळणवळणाची वाहने अतिशय कमी आणि मोजकी होती. कोल्हापूरकडील भागात जीप हे दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून पुढे येत होते. बाजार संपवून नेहमीची जीप पकडण्यासाठी आजीबाई गेल्या. परंतु, तोपर्यंत ती निघून गेलेली. आता पुढची गाडी कधी येईल; येणार पण की नाही, या काळजीत त्या होत्या. तोपर्यंत तिथे एक जीप त्यांना येताना दिसली व त्यांनी हात केला. जीपमध्ये इतर कोणी प्रवासी नव्हते, याचे आजीबाईंना आश्चर्य वाटले. तरीही, त्यांनी ड्रायव्हरला ठराविक गावाचे नाव घेऊन, जाशील का म्हणून विचारले. ड्रायव्हरने होकार दिला तशा त्या गाडीत बसल्या. गाडी खूपच व्यवस्थित जपलेली. सीट सुद्धा अगदी गादीसारखी मऊ होती. ड्रायव्हरचा वेश सुद्धा अतिशय व्यवस्थित होता. आजीबाईंना अवघडल्यासारखे वाटले.
‘गडी श्रीमंत घरातला दिसतोय . . . तरी हा धंदा का करावा’, हा त्यांच्या मनात प्रश्न येत होता. अर्ध्या तासात त्यांचे गाव आले. त्या गाडीतून उतरल्या व सामान सुद्धा काढून घेतले. आजूबाजूचे लोक त्या गाडीकडे जमा झालेत. आजीबाईंनी किती पैसे झाले म्हणून विचारले.
‘एवढी चांगली गाडी आहे, तर हा पैसे सुद्धा जास्त घेईल’ या काळजीत त्या होत्या. परंतु, त्या ड्रायव्हरने ‘पैसे नको फक्त आशीर्वाद राहूदेत’, असे म्हटले तसे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
गाडी निघून गेली तसे बाजूचा एक माणूस आजीबाईजवळ आला आणि म्हणाला, ‘लय मोठी वळख दिसती तुझी . . .’
आजीबाई म्हणाल्या, ‘वळख-बिळख काय न्हाई पण माणूस मनाचा मोठा व्हता. देव त्याच भलं करो.’
तो माणूस म्हणाला, ‘म्हंजी तुला माहित नाही व्हय . . . तू कुणाच्या गाडीत बसून आलीस?’
ती म्हणाली, ‘नाही . . . कुणाच्या?’
तो माणूस म्हणाला, ‘आगं राजं हुतत ते!’
थाटात जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या गाडीकडे, त्या आजीबाईने हात जोडून आपल्या भावना व्यक्त केल्या.
- प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखमालीकेतून घेतलेला एक प्रसंग.

एकदा महाराज एके ठिकाणी जात असताना मध्ये विश्रांतीस एका गावाजवळ थांबले. गावात काही गडबड गोंधळ चाललेला त्यांना दिसला. महाराज आलेले पाहून सर्व लोक शांत झाले. महाराजांनी प्रकरण नेमके काय आहे, हे विचारले असता . . .
एका व्यक्तीने सांगितले की, ‘ही समोर उभी असलेली स्त्री शुद्र असून सुद्धा, आमच्या ब्राह्मणवाड्यात येऊन तिने पाणी भरले.’
त्यावेळी जातीव्यवस्था अतिशय कठोर असल्याने, खालच्या जातीच्या लोकांना याप्रकारे दूर ठेवले जायचे. आजचे OBC म्हणजेच शूद्र व‌ SC म्हणजेच अस्पृश्य, हे समाजापासून अंतर ठेवूनच असायचे. यांची घरे गावाच्या वेशीवर वगैरे असायची. गावाच्या मध्यभागात उच्च वर्णीयांची घरेच असायची. त्यामुळे यांना इतर सोयीसुविधा कमी असायच्या.
जर आता आपण समजावण्याचा प्रयत्न केला, तर कोणी नीट समजून घेणार नाही. हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी, त्या स्त्रीवर जोरात ओरडण्यास सुरुवात केली. बाकी लोकांना हे अनपेक्षित होते. परंतु, सर्वांना त्याबद्दल चांगले वाटले. ओरडता ओरडता, महाराजांना जोरात ठसका लागला. ती बाई पाणी घेऊन उभी असल्याने तिच्याजवळच महाराजांनी पाणी मागितले.
एका शूद्र स्त्रीच्या हातून महाराजांनी पाणी पिल्याचे सर्वांना आश्चर्य वाटले. पाणी पिल्यानंतर महाराज म्हणाले, ‘आता मी तिच्या हातून पाणी पिले आहे. मी तिच्यावर कसा ओरडू? तिच्या हातून पाणी पिऊन माझ्यात काहीच बदल झाला नाही. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा काही होणार नाही. त्यामुळे तिला जाऊ द्या.’
याप्रकारे एखादी परिस्थिती हाताळण्यात महाराजांचा हातखंडा होता.

कोल्हापूरमधील उद्योगधंदे त्या काळात फारसे प्रसिद्ध नव्हते. ते उद्योगधंदे कसे वाढतील, यावर महाराजांचे विशेष लक्ष असायचे. महाराज एकदा एका गावातून जात असताना, त्यांना एक मोठे चपलांचे दुकान दिसले. त्यांना कौतुक वाटले. गाडीतून उतरून त्यांनी त्या दुकानास भेट दिली. दुकानदाराची विचारपूस केली. महाराज व त्यावेळचे इतर सर्व राजे बूट घालायचे. त्या दुकानात फक्त चपला मिळत होत्या. तरीही, त्या दुकानदाराचा विश्वास वाढवण्यासाठी महाराजांनी चपलांचा जोड घेण्याचे ठरवले. त्या दुकानदाराने महाराजांना त्याच्या जवळील सर्व प्रकारच्या चपला दाखवल्या. त्यात एक प्रकारची चप्पल अतिशय भरभक्कम व कडक अशी होती. ती घालून चालण्यास कठीण असल्याने, कोणी फारसे त्या चपलेला विकत घ्यायचे नाही.
महाराजांना नेमकी ती चप्पल आवडली. त्यांनी ती विकत घेतली व वापरण्यास सुरुवात केली. चालताना तिचा होणारा आवाज, महाराजांना प्रफुल्लित करे. महाराजांमुळे ती चप्पल वापरणे ही एक नवीन फॅशन ठरली. अल्पावधीतच कोल्हापुरी चप्पल या नावाने ती भारतभरात प्रसिद्ध झाली.
शिक्षणाचे प्रमाण कमी आहे कारण ते परवडत नाही. हे पाहून महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले, त्याचप्रमाणे शाळेत व्यवस्थित हजेरी असणाऱ्या बालकांना उपस्थिती भत्ता देण्याची सुरुवात केली.
उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांनी अनेक हॉस्टेल बांधले.
विधवांना संपूर्ण आयुष्यभर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. कोणीही त्यांचा उपभोग घेतो व त्यांना समाजात जरासुद्धा मान मिळत नाही, हे पाहून त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला.
अनेक स्त्रियांना आपल्या सासरी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हिंदू धर्मानुसार, एकदा लग्न झाले की स्त्रीने तेच आपले घर मानावे. तिथून तिचे प्रेतच परत येते. या भावनांमुळे हिंदू स्त्रियांना अनेकदा हुंडाबळी व इतर अत्याचारास सामोरे जावे लागे. त्यांना माहेरचा आसरा नसे. कारण माहेरी आल्या तरी सासरच्या व्यक्तींचाच त्यांच्यावर अधिकृत हक्क असायचा. हे टाळण्यासाठी महाराजांनी घटस्फोटाचा कायदा केला. स्त्रियांची अशा विकृत नवरदेवांच्या तावडीतून सुटका केली.
फारसे आयुष्य न मिळून सुद्धा व कोणतेही युद्ध न लढता, या राजाने मोठी किर्ती कमावली. कानपूरच्या जनतेने त्यांना राजर्षी हा बहुमान दिला. एकदा सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करून झाल्यानंतर, त्यांच्या सहका‌ऱ्याने त्यांना सांगितले की, तुमचे पंडित तुमच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. परंतु, क्षत्रियांसाठी वेदोक्त मंत्र म्हणावे अशी परंपरा आहे. फक्त शूद्रांसाठी पुराणोक्त मंत्र म्हटले जातात.
याबाबत राजांना कळले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. नंतर हे सुद्धा कळाले की, तो पंडित राजांची पूजा करण्यासाठी अंघोळ करून नाही यायचा.
याचा त्याच्याकडून जबाब मागण्यात आला.
तो म्हणाला की, ‘राजे हीन कुळातले असून, त्यांना क्षत्रिय घराण्याने दत्तक घेतले आहे. जन्माने शूद्र असल्याने, ते शूद्रच राहतात व त्यांना क्षत्रियांचे हक्क मिळत नाहीत.’
महाराजांना या प्रसंगाचे अतिशय वाईट वाटले. त्यांनी त्यास ताबडतोब या पदावरून दूर केले. टिळकांसारख्या कर्मठ लोकांनी त्या पंडिताची बाजू घेत, राजांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या लोकाभिमुख कार्यामुळे जनमानस महाराजांच्या सोबत होते व टिळकांना याबाबत तोंडघशी पडावे लागले.

स्वतःविरुद्धची लढाई महाराजांनी जिंकली. परंतु, सोबत त्यांनी हा विचार केला की राजा असून माझ्यासोबत एवढा भेदभाव होतोय, तर सामान्य प्रजेचे काय होत असेल? या एका प्रश्नाने त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सांगितले. आपल्या लहानशा कारकिर्दीत सुद्धा या महान, विचारी व दूरदर्शी राजाने, ते ध्येय बऱ्याच अंशी पूर्ण करून दाखवले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट