आठवण

आज खूप एकटं वाटतय,
कदाचित तिची साथ हवी होती..
एकट्या बागडणाऱ्या या मनाला,
का कोणास ठाऊक.. तीच एक हवी होती..

मैत्रीण माझी ती,
खोडकर तरी सालस होती..
होत्या चोहीकडे ऊर्वशी, रंभा, मेनका,
मला मात्र.. तीच एक हवी होती..

जीवाला जीव लावणारी ती,
सर्वांचीच तिला काळजी होती..
स्वार्थी लोकांनी भरलेल्या या दुनियेत,
निर्व्याज प्रेम देणारी.. तीच एक हवी होती..

होती देहाने सुंदर,
नेत्रांत एक ओढ होती..
अहंकार नाममात्र नसलेली परी,
होय तीच.. तीच एक हवी होती..

मन होते तिचे पवित्र मंदिर,
मुर्खपणाला मात्र हद्द नव्हती..
स्वतःच्या भावना लपविणारी जगाची लाडकी,
मलासुद्धा.. तीच एक हवी होती..

करायची कमी दुःखाचे ओझे,
बोलण्यात तिच्या जादू होती..
माझ्या कवितांना समजणारी सखी,
कवितेला सुद्धा.. तीच एक हवी होती..

कधी आनंदी तर कधी नाराज,
चंचल मनाचे पाखरू होती..
अंधारात राहून प्रकाश देणारी ज्योत,
भोवताली येणाऱ्या सर्वांना.. तीच एक हवी होती..

शब्दांत होता आमचा सहवास,
भावनेत आमच्या जवळीक होती..
दूर राहुन ही माझ्या पासून,
माझे हीत चाहणारी.. तीच एक हवी होती..

नशीब नाही माझे थोर,
साथ कदाचित एवढीच होती..
अनंत काळच्या आठवणींत,
तिची एक आठवण.. आणि तीच एक हवी होती..

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट