नात्याची गोष्ट
अतिशय जवळची नाती आपल्यासाठी खूप प्रिय असतात, त्यांची आपण सर्वात जास्त काळजी घेतो.परंतु, कधीकधी असं काही होतं की त्यामुळेच सर्व काही बिनसतं आणि नातं काही कळायच्या आत संपतं . . .
एका जंगलात एक खूप मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी, प्राणी व कीटक अवलंबून होते. ते तेथे आनंदात राहायचे. ते अतिशय घनदाट जंगल होतं. झाडाचा खुप आसरा वाटायचा त्यांना . . .
त्या झाडावर एकदा एक खारुताई रहायला आल्या. खारुताईचं इकडून तिकडून फिरणं, फांद्यांवर वेगवेगळ्या करामती करणं झाडाला खूप आवडलं. ती इकडून तिकडे पळायची, ते पाहून तर झाडाला खूप आनंद व्हायचा. या खारुताईने उडी मारली, की झाडाला हसायला यायचं. झाड काही बोलू शकत नाही. परंतु, ते मनातल्या मनात काहीतरी स्वतःशीच बोलायचं, हसायचं. झाडाचं हसणं एक दिवस खारुताईने ऐकलं . . .
पहिले तिला कळेना की नेमकं कोण हसतंय परंतु, नंतर कळलं की हे झाडंच हसतंय.
तिने विचारलं, “ काय रे झाडा, का हसतोय माझ्यावर?”
झाडाला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, “आजपर्यंत एवढी वर्षं होऊन गेलीत... परंतु, माझ्या मनातलं बोलणं, हसणं कोणाला कधी ऐकू नाही आलं . . . तुला कसं बर ऐकू आलं??”
खार म्हणाली, “मी सुद्धा कधी कोणत्या झाडाशी बोलले नाही . . . दुसऱ्या कोणत्या प्राण्याशी बोलले नाही..”
झाड म्हणाले, “माझ्या मनातलं तुला ऐकू येतं, म्हणजे विशेष म्हणावं लागेल.”
झाडाला खूप आनंद झाला कारण, त्याच्या मनातलं जाणणारं कोणीतरी आहे! खारुताईला सुद्धा याच गोष्टीचा खूप आनंद झाला!
ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले.
आता खारुताई त्या झाडाशी गप्पा मारत इकडून तिकडून फिरायची व झाड खारुताईला लागणारे सर्व खाद्य पुरवायचे व आसरा द्यायचे. त्यांची खूप चांगली मैत्री जमली होती.
काही वर्षांनी मात्र असे झाले, की खारुताईला झाडाने दुसऱ्या कोणालाही त्याच्या जवळ करणे आवडले नाही. त्या झाडावर कधी काही पक्षी आपले घरटे बांधायचे, तेव्हा खारुताई मुद्दाम ते घरटे तोडून टाकायची.
कोणी पक्षी त्या झाडाच्या जवळ येऊच नये म्हणून, झाडाच्या फांद्यांवर माती आणून टाकायची, तसेच आसपासच्या झाडांची उग्र वास असलेली पाने आणून, त्या झाडावर रोवून ठेवायची. कोणी प्राणी त्या झाडाजवळ येऊ नये म्हणून, तासनतास त्या झाडाच्या आजूबाजूला खड्डा खोदत बसायची.
आता या खड्ड्यांमुळे त्या झाडाच्या मुळांना सुद्धा नुकसान व्हायचे परंतु, झाड त्यावर काही बोलायचे नाही. या सर्व गोष्टीत झाडाला सुद्धा खूप शारीरिक यातना होत होत्या परंतु, झाड खारुताईचे मन जाणत होते आणि त्याने त्यामुळे तिला कधी रोखले नाही.
झाड कधी-कधी तिला बोलायचे की, “तु पूर्ण दिवस बाकी गोष्टींमध्ये गुंतलेली असते. आता तू माझ्याशी बोलतच नाहीस. आपलं पहिल्यासारखं निवांत बोलणं होतच नाही.”
तेव्हा, खारुताई म्हणाली की, “कारण, बाकीचे सगळे येतात आपल्याकडे . . . ते तुझ्याकडे आसरा घेतात. त्यामुळे आपलं बोलणं होत नाही. आता मी त्या सर्वांना दूर करेन, तेव्हा फक्त आपण दोघे राहू आणि मग बघ आपलं सगळं बोलणं किती व्यवस्थित होईल.”
खारुताईने, अगदी मुंग्यांनी सुद्धा झाडावर येऊ नये म्हणून त्या येण्याच्या ठिकाणी झाडाला ओरबाडले. झाडाला अतिशय तीव्र वेदना झाल्या. परंतु, तरीसुद्धा झाड काही म्हणाले नाही. आता झाडाला होणारे दुःख सुद्धा खारुताईला जाणवत नव्हते.
त्या झाडाकडे येणाऱ्या प्राण्यांचे, पक्षांचे व कीटकांचे प्रमाण निश्चितच खूप कमी झाले होते. मात्र ते पूर्णपणे थांबणे कधीही शक्य नव्हते व तरीही, खारुताई त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होत्या.
झाडाला ज्या वेदना होत होत्या, त्या मात्र झाड तिला सांगत नव्हते, सोबतच मानसिक वेदना होत्या, त्या प्रचंड होत्या, आता झाड रडून सुद्धा त्याचे दुखणे जात नव्हते.
झाडाला वेदना असह्य झाल्याने, त्याने खारुताई ला एकदा सांगितले की, “तू जे करतेयस ते थांबव आता . . .”
परंतु, खारुताईला आता झाडाचे बोलणे ऐकू जात नव्हते! त्याच्या मनातला आवाज ऐकू जात नव्हता व खारुताईच्या सुद्धा मनातले बोलणे झाडाला ऐकू येत नव्हते. आता त्यांच्यामध्ये मोठे अंतर तयार झाले होते.
त्यामुळे झाड अजुनच बेचैन झाले. मानसिकरित्या ते खचले आणि त्याच्याकडे आता जगण्याची काहीही इच्छा शिल्लक नाही राहिली.
एक दिवस ते उन्मळून पडून मरून गेले . . .
आपले जीवन हे असेच असते! आपण आपल्या नात्याला सुरेख बनवण्यासाठी इतर विषयांमध्ये गुंततो. मग ते काहीही असो, मात्र मनाचे मनाशी मिलन ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही त्यासाठी वेळ देऊ शकत नसाल, तर बाकी कोणत्याही गोष्टी करणे पूर्णपणे व्यर्थ आहे . . .

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा