पहाडीया आदिवासी वीरांचे आंदोलन
सांज झाली होती. जंगलात प्रकाशाचा काळोख होण्यास फार वेळ लागत नाही. मात्र, ‘चंपाई’ला या काळोखाची भिती नव्हती. जंगल हेच त्याचे घर. मध्य भारतातील दाट वनांनी बहरलेल्या राजमहाल टेकड्यांच्या अंगाखांद्यावर खेळूनच तो मोठा झालेला. येथील प्रत्येक वनस्पती, पक्षी व प्राणी त्याला नेमके ठाऊक होते. यांना तो कधीच घाबरला नाही. कारण, जसे याला मुक्त - स्वच्छंद जीवन जगावेसे वाटे, त्याचप्रमाणे तेही स्वातंत्र्याचे उपभोक्ते होते. मानवी जीवनाची खरी अनुभूती, चंपाईला या जंगलात मिळत होती. हे सृष्टीचे सौंदर्य अगदी नजर लागण्याजोगे होते व नजर लागली सुद्धा . . .
“ते गोऱ्या कातडीचे . . . आज त्यांच्या लोखंडी बाणांमधून आमच्यावर कित्येक लोखंडी दगडे भिरकावून गेलेत . . . त्यांचा सूड नाही घेतला, तर हाडाचा पहाडिया नाही मी . . .” चंपाई अत्यंत अस्वस्थ होता. झाडांमुळे व आडवाटांमुळे कित्येक पहाडियांचे प्राण वाचलेत. त्याचा मित्र बादल त्याच्याकडे आला आणि त्याने त्याची चौकशी केली . . . चंपाई ठीक होता; परंतु, तो मनाने अत्यंत अस्वस्थ होता कारण त्यांचे कित्येक लोक मारले गेले होते व पुन्हा उद्या इंग्रज जेव्हा आपल्यावर चालून येतील, तेव्हा आपण किती टिकाव धरू शकू, याबद्दल त्याच्या मनात शंका होती.
बादल म्हणाला, ‘आपण पुन्हा एकदा ‘कुमारभाग’ पहाडीयांकडे मदत मागितली पाहिजे. कदाचित त्यांचे मन वळले आणि त्यांनी उद्या मदत केली, तर आपण इंग्रजांवर कुरघोडी करू शकू. जर उद्या इंग्रजांनी आपल्याला हरवले तर निश्चितच ते कुमारभागवर हल्ला करतील; हे कुमारभागवाल्यांना माहीतच आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी एकत्र होऊन लढण्याची गरज आहे.’
चंपाईला याची जाणीव नव्हती असे नाही. परंतु, त्याच्याकडून एक चूक झाली होती. त्याने माल पहाडिया जमातीतील एका मुलीशी लग्न केले होते. दुसऱ्या जमातीतील पोरीशी लग्न करणे म्हणजे त्या ठिकाणी महापाप समजले जाई. स्वजमातीमध्येच मुलांची व मुलींची लग्ने लावली जात असत. त्यामुळे, कुमारभाग व माल पहाडियांनी सौरिया पहाडियांवर बहिष्कार टाकला होता.
जंगलातल्या अंधारामध्ये युद्ध चालू ठेवण्याची धमक इंग्रजांमध्ये नव्हती. त्यांच्यासाठी हे क्षेत्र अनोळखी होते. अंधार असल्याने त्यांना काही कळलेही नसते व आदिवासींसोबतच जंगलातील प्राण्यांना तोंड देण्याएवढी त्यांमध्ये हिंमत नव्हती. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी प्रभात होताच पुन्हा येऊन ते पहाडियांवर हल्ले करणार होते.
इंग्रजांसाठी या प्रदेशावर ताबा अत्यावश्यक होता. अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध हा प्रदेश, त्यांच्या उद्योगांसाठी बहुमोल होता. त्याचप्रमाणे ईशान्य भारतात सहज पोहोचण्यासाठी त्यांना हा प्रदेश ताब्यात आणणे आवश्यक होते. या प्रदेशावर पहाडियांचे आदिम काळापासून राज्य होते. त्यांनी कोणत्याही शासकांना तिथे येऊ दिले नाही व कोणी फारसा प्रयत्नही केला नाही. परंतु, इंग्रज हा प्रदेश बळकावूनच थांबणार होते.
चंपाई वस्तीमध्ये परत आला. अनेकांची शरीरे रक्तबंबाळ झालेली. पाय तुटला तरी बेहत्तर, आदिवासींची खरी ताकद त्यांच्या हातात होती. एका जागी बसून सुद्धा आपल्या बाणांनी शत्रूंना जेरीस आणणारे एकलव्यचे वंशज आहेत ते. आजपर्यंत म्हणूनच कोणी दुःसाहस करत नव्हते, मात्र या इंग्रजांकडे लोखंडी दगडे भिरकावणारे लोखंडी बाण होते. त्यांसमोर यांना कठीण जात होते. बादल कुठे दिसत नव्हता.
“मघाशी तर सोबत होता, गेला कुठे?” चंपाई काळजी करू लागला.
त्याने पत्नीला हाक मारली, “जोबा . . . बादल सांगून गेला का काही, कुठे चाल्लाय?”
जोबा म्हणाली, “नाही तर . . . तो आलाच नाहीये अजुन . . . ” तोपर्यंत पाड्याच्या वेशीवर गडबड गोंधळ सुरू झाला. चंपाई तिकडे पोहोचला व पाहतो तर काय, कुमारभागचे काही तरूण तिथे उभे होते व त्यांसोबत बादल.
बादल त्यांना म्हणाला, “पाहताय ना . . . तुमचेच भाऊ आहेत हे . . . हजारो वर्षे आपण एकमेकांना मदत केलीये. आज इकडे कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय, तर काही मारले गेलेत . . . आज आमचे हे हाल आहे; आमचा प्रदेश बळकावल्यावर तुमचे ही हेच होणार. आता तरी शत्रुत्व मिटवा . . . ही वेळ ऐक्याची आहे . . . ”
चंपाई पुढे झाला, “त्यांच्या समोर जाऊन गुडघे टेकले व समोर तलवार धरत बोलला . . . आता या क्षणी माझी मान धडावेगळी करा. तुमचा राग माझ्यावर आहे, माझ्या बांधवांना त्याची शिक्षा का म्हणून? काहीही होऊदे, पहाडिया टिकले पाहिजेत . . . ” त्यातील एक होता जागर . . . तो पुढे सरसावला व चंपाईकडून त्याची तलवार घेतली. चंपाईने डोळे मिटले. कोणत्याही क्षणी आघातासाठी तो समाधानाने व शांत मुद्रेने तयार होता.
मात्र जागरने त्याचे खांदे पकडत त्याला उठवले व त्याच्या हाती तलवार देत म्हणाला, “ही हिम्मत उद्या इंग्रजांविरुद्ध दाखव. आपण मिळून उभे फाडू त्या गोऱ्या कातडीवाल्यांना . . . ”
सगळे आनंदाने जयघोष करू लागले.
जागरला जाणीव होती, अगदी दोघांनी एकत्र येऊनही, लढा अवघड आहे . . .
त्याने बादलला सांगितले, “कुमारभाग तुमच्या सोबत आहे, परंतु ‘माल’ पहाडियांशिवाय ही लढाई कठीण आहे . . . ” बादल म्हणाला, “ते सुद्धा येतील . . . तु चल माझ्यासोबत . . . ” जरी सौरियांना मदत करत नसले, तरी माल पहाडिया काळजीत होते. त्यांना इंग्रजांच्या क्रूर हल्ल्याची जाणीव होती व त्यांपैकी कोणीच आज झोपले नव्हते. अचानक खोपट्याबाहेर बसलेल्या काहींना धूर दिसला. एकाने ओरड ठोकली, “कोणीतरी वनदेव जाळला! उठा रे उठा!” वेशीजवळ असणारे वडाचे झाड, त्यांचा देव होते . . . गेली हजारो वर्षे ते तिथे उभे आहे, अशी त्यांची श्रद्धा होती . . .
सर्व जागेच होते. उठून पळतच वडाजवळ गेले. झाडाला आग लागली नव्हती. कोणीतरी आजुबाजूला पाने पेटवून धूर तयार केलेला. हे असे कोण करेल! प्रत्येकजण विचारात पडला.
जागर पुढे आला व म्हणाला, “आज नाही जळले, मात्र फक्त कल्पनेनेच आपले काय हाल झाले आहे पहा . . . उद्या ते इंग्रज आम्हाला संपवतील, मग तुम्हाला व शेवटी या आपल्या वनदेवतांना . . . ”
बादल सुद्धा पुढे झाला व आपल्या शरीरावरील जखमा दाखवून म्हणाला, “आज हे रक्तबंबाळ शरीर घेऊन मी उभा आहे, उद्या मात्र माझे कापलेले धडच तुमच्या हाती लागेल . . . आमची वनदेवता वाचवता वाचवता ४ जणांनी आज प्राण सोडले. उद्याचा दिवस आयुष्यातील शेवटचा ठरेल . . . तुम्ही साथ द्या, तरच आमचे जगणे संभव आहे . . .”
माल पहाडिया प्रमुख हेमंत तलवार घेऊन पुढे आला. या तिन्ही पाड्यांत हा सर्वांत वृद्ध तरीही एक उत्तम योद्धा होता . . .
हेमंत म्हणाला, “या बाहुंमध्ये आज ही शत्रूला उभा चिरण्याची ताकद आहे . . . मग ते कोणीही असो . . . पोरगी पाया पडली म्हणून, नाहीतर तिला पळवणाऱ्या अख्ख्या सौरिया पाड्याला एकट्याने संपवले असते . . . आम्ही आमचे पाहून घेऊ . . . आम्हाला आमची परंपरा प्रिय आहे . . . तिच्याशी गद्दारी करणाऱ्यांची आम्ही साथ देत नाही . . . संपलो तरी बेहत्तर . . . ”
बादल म्हणाला, “मान्य आहे, आमच्याकडून चूक झाली . . . माझ्या मित्राने पळवून आणले जोबाला . . . परंतु, स्त्रीच्या निर्णयाचा मान राखणे, ही सुद्धा आपली परंपरा आहे . . . तो तुम्ही राखला व कोणास मारले नाही . . . त्याआधी तो मान चंपाईने राखला . . . जोबाला माहीत होते, त्या दोघांचे लग्न तुम्ही कोणी होऊ देणार नाही, त्यामुळे तिने त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला . . . चंपाईला यातील जोखीम माहीत असूनही, त्याने जोबाचा निर्णय मान्य केला . . . आज फक्त आम्ही नाही, तुमच्या मुलीचा जीवसुद्धा धोक्यात आहे . . . तिचे आईवडील नसल्याने, सर्व पाडा तिला आपली मुलगी मानतो . . . तुमच्या मुलीसाठी चला . . . ”
बादलच्या या वक्तव्यावर सर्व शांत झाले . . . परंतु, कोणी सहमती सुद्धा देत नव्हते . . . जागर म्हणाला, “इकडे जास्त वेळ घालवून उपयोग नाही, आपल्याला तेथे पोहोचून नीट व्यूहरचना आखावी लागेल; जेणेकरून आपण कमी शस्त्रांनी सुद्धा इंग्रजांना धूळ चारू.”
बादल व जागर त्यांच्या पाड्यांमध्ये निघून गेले. कुमारभाग पाडेवाले सर्व सौरिया पाड्यामध्ये आले आणि त्या सर्वांनी मिळून एक योजना आखली, जेणेकरून इंग्रजांना लवकरात लवकर मात देता येईल.
बादल सांगत होता,
“तिरंदाजांनी जंगलाच्या सीमेवरील सर्व उंच झाडे हेरून त्यावर ठाण मांडायचे. जेणेकरून, इंग्रज येताच जास्तीत जास्त इंग्रजांचे जीव बाणांनीच घेता येतील.
जरी इंग्रजांकडे लोखंडी बाण असले तरी, या झाडांमुळे आपण कुठे आहोत, हे त्यांना नीट कळू शकणार नाही व त्याचा लाभ जास्तीत जास्त तिरंदाजांनी मिळवायचा.
त्यातून पुढे आलेल्या इंग्रजांसाठी खड्डे खोदायचे, ते त्यात नक्की पडतील. तिथे आपल्या कुत्र्यांना सोडायचे, जे त्यांना पूर्णपणे फाडून काढतील . . .
आपल्याकडे फार चांगले तलवारबाज नाहीत, त्यामुळे या दोन गोष्टींवर आपला भर राहील . . . आपल्यावर इंग्रजांसोबत प्रत्यक्ष लढण्याची वेळ येऊ नये व जास्तीत जास्त इंग्रज या प्रकारे मारले जावेत . . . तरी, त्यानंतर पुढे आलेल्या इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी आपण भाले घेऊन तयार असू. जेणेकरून ते पुढे येताच, त्यांना आपण दुरूनच भाला फेकून ठार मारू . . .
शेवटी आपण तलवारीने त्यांना संपवू . . . ”
ही योजना प्रत्येकाला पसंत पडली. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवला. रात्रभर कोणी झोपले नव्हते, त्यामुळे अंगात थोडाफार थकवा होताच. परंतु, हा जीवन-मरणाचा प्रश्न होता आणि सर्वांनाच त्यासाठी आपले रक्त सांडायचे होते. आता थकून चालणार नव्हते. हा लढा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता.
ठरल्याप्रमाणे सर्व तिरंदाज आपल्या बाणांनी सज्ज होते. इंग्रजांनी आपल्या शिस्तबद्ध तुकडीसह, त्यांच्या जंगलावर हल्ला केला. परंतु, पहिल्याच हल्ल्यामध्ये तिरंदाजांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. एवढे बाण येताहेत नेमके कुठून . . . हे त्यांना कळत नव्हते. इंग्रज अंदाजे हवेमध्ये गोळीबार करू लागले व त्यात काही पहाडिया मरणही पावले. तरीही मृत इंग्रज सैनिकांची संख्या जास्त ठरली. त्यातून काही सैनिक पुढे गेले व योजनेनुसार खड्ड्यांमध्ये आदळले व त्यांच्यावर सोडण्यात आलेल्या कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतला. अनेक इंग्रजांना शिकारी कुत्र्यांनी फाडून काढले.
त्यातून सावरून पुढे गेलेला इंग्रजांसाठी भाले तयारच होते व अनेक इंग्रजांनी आपल्या छातीवर भाला झेलत वीरगती पत्करली. याप्रकारे फार थोडे इंग्रज सैन्य राहिले, जे पुढे जाऊ शकले. या घटनेला अनपेक्षित वळण असे मिळाले की, इंग्रज आणखी पुढे न येता माघारी जाऊ लागले व पळू लागले. हे आदिवासींसाठी अनपेक्षित होते. कारण, त्यांनी ऐकले होते की इंग्रज कधीच हार नाही मानत.
आदिवासी वीर जयजयकार करू लागले. घोषणा देऊ लागले. परंतु, बादल व चंपाई यांना जाणवत होते की, हे काहीतरी वेगळेच घडले. आपण काहीतरी चूक नक्कीच केली आहे.
बादलने ओरडून, सर्वांना शांत होण्याचा आदेश दिला व चंपाई-जागर सोबत काही जणांना पुढे जाऊन इंग्रजांची माहिती घेण्यास सांगितले. नेमके घडले काय? एवढे कमी इंग्रज हल्ला करण्यास आले कसे आणि त्यांनी माघार घेण्याचे नेमके कारण काय आहे . . .
चंपाई आणि जागर त्वरित काही जणांना घेऊन गेले . . . बऱ्याच वेळाने ते पुन्हा आले आणि त्यांनी भयभीत मुद्रेने बादलला सांगितले की, ‘इंग्रज एक मोठी पलटण घेऊन येत आहेत’.
याचा अर्थ असा होता की, इंग्रजांनी आपली छोटीशी तुकडी आपली व्यूहरचना जाणून घेण्यासाठी पाठविली होती.
आता, आहे त्या योजनेसोबत लढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे सर्वांनी एकच आरोळी ठोकली व आहे त्या शस्त्रांनिशी व योजनेशी आपण लढू आणि विजय मिळवू या उमेदीने इंग्रजांवर हल्ला करण्यास तयारी दर्शवली. यावेळी मात्र भालेफेक करणारे तलवारी सुद्धा घेऊन सज्ज झाले. यावेळी त्यांना माहीत होते की, खूप मोठा हल्ला होणार आहे.
इंग्रजांनी सुरुवातीच्या भागात धूर सोडणारे काही बॉम्ब टाकले. त्यामुळे तिरंदाजांना, ते नेमके कुठे आहेत हे कळले नाही व त्यांनी अंदाधुंद बाण मारण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांचे अनेक बाण खर्च झाले. त्यानंतर इंग्रजांच्या तुकडीने जोरदार गोळीबार करत पुढे चाल केली. यामध्ये त्यांचे अनेक शिकारी कुत्रे मरण पावले. आता सर्वांनाच तलवारी घेऊन इंग्रजांवर तुटून पडण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि हा आपला शेवटचा दिवस याची सर्वांच्याच मनाला जाणीव होत होती.
इंग्रज तलवारबाजांसमोर येताच, त्यांच्यावर मागून तिरंदाजांकडून हल्ला झाला. इंग्रजांना समजले नाही; आपण तर बहुतेक तिरंदाजांना संपवले आहे. मग हे एवढ्या संख्येने नवीन तिरंदाज कुठून आले? सौरिया तसेच कुमारभाग जमातीच्या पहाडीयांना सुद्धा कळले नाही, की इंग्रज नेमके कसे मरत आहेत . . .
इंग्रज पलटणीला आपली दिशा बदलून पुन्हा मागच्या बाजूस हल्ला करणे भाग पडले. माल पहाडिया प्रमुख हेमंत पुढे आला आणि म्हणाला, “गोऱ्या कातडीवाल्यांनो तुम्हाला या जमिनीच्या एका इंचावर सुद्धा उभा राहू देणार नाही, सर्वांना एकटा कापून काढेन.”
हेमंतची आरोळी ऐकताच, सौरिया आणि कुमारभाग जमातीच्या आदिवासींमध्ये नवा जोश संचारला. ते सुद्धा इंग्रजांवर तुटून पडले. आता इंग्रजांसमोर पेचप्रसंग उभा राहिला. ते मध्ये सापडले होते आणि दोन्ही बाजूंनी पहाडीया आदिवासी त्यांच्यावर तुटून पडले होते.
या जंगलामध्ये इंग्रजांच्या बंदुका फारशा कामाच्या नव्हत्या. कारण आदिवासी झाडांआडून हल्ले करून इंग्रजांचे मुडदे पाडत होते. घनघोर युद्ध झाले.आता सर्वांनीच तलवारी उपसल्या होत्या. रक्ताचे सडे पडत होते. या त्वेषाने, आक्रोशाने, जंगलातील जनावरे सुद्धा घाबरून गेली होती. आदिवासींच्या आक्रोशासमोर इंग्रज भयभीत होत होते, दिवस ढळण्याची ते वाट पाहत होते. दिवस ढळला, तसे इंग्रजांनी माघार घेण्यास सुरुवात केली . . .
इंग्रज परतले व पहाडीयांचा विजय झाला. मात्र हा विजय त्यांच्यासाठी आनंददायी नव्हता. त्यांचे अनेक वीर - हेमंत, चंपाई, जागर, इ. मृत पावले होते. जोबा सारख्या वीरांगणांनी सुद्धा त्यांच्या मातीसाठी आपले प्राण दिले होते. . . अनेकांना अपंगत्व आले होते . . . आता पुन्हा जर हल्ला झाला, तर मात्र पहाडियांचा टिकाव लागणार नाही, हे स्वाभाविक होते . . .
बादलला आपला मित्र व आपले अनेक साथीदार गमावल्याचे दुःख होते . . . आता उद्याच्या दिवसाचे काय करायचे, हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न होता. तिन्ही पाड्यांचे सर्वच आदिवासी आता त्याच्याकडेच आपला सरदार या नात्याने अपेक्षेने पाहत होते . . . लढाई अंतिम होती . . . सर्व आपला जीव देण्यास तयार होते . . . परंतु, या बलिदानाचे सार्थक व्हावे, हे बादलला वाटत होते . . .
काय करावे या विचारात तो पडला होता. तेव्हा त्याला त्याच्या बाबांनी सांगितलेले बोल आठवले, “जंगलावर कोणीच राज्य करू शकत नाही. जंगल स्वतः स्वतःचा राजा असतो.”
त्याला हे ठाऊक होते की, आजच्या या सर्व घडामोडींत इंग्रज नक्कीच घाबरले असणार . . . ते जंगलात येण्यापूर्वी खूप वेळा विचार करणार . . . तेव्हा त्याने राहिलेल्या सर्व साथीदारांना एक सुचना केली की, तुमच्या ताब्यात जेवढे हत्ती असतील त्या सर्वांना घेऊन या . . . त्या सर्वांच्या ताब्यात मिळून जास्तीत जास्त सहा हत्ती होते . . . त्या सहा हत्तींनी इंग्रजांच्या मोठ्या पलटणी समोर टिकाव लागणे हे अशक्य होते . . . बादलच्या मनात मात्र वेगळीच कल्पना होती . . .
पहाट होण्यापूर्वी त्या सहा हत्तींना घेऊन जंगलाच्या वेशीवर पहाडी आदिवासी आले. हत्ती जोरजोरात चित्कार काढत होते; जणूकाही इंग्रजांवर हल्ला करून त्यांना उध्वस्त करण्याची संधी हत्तींना सुद्धा हवी होती. परंतु, इंग्रजांकडे अजून सुद्धा फार मोठे सैन्य होते. आपल्याकडे हे सहा हत्ती सोडले तर काहीच नाही, याची जाणीव बादल व त्याच्या साथीदारांना होती. बादलच्या मनात नेमके काय आहे हे मात्र त्यांना कळत नव्हते.
बादल आपल्या घोड्यावर बसून दोन साथीदारांसह इंग्रजांच्या तुकडीकडे निघाला. इंग्रज त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर बंदूक रोखून उभे राहिले. मात्र तो पांढरा झेंडा घेऊन इंग्रजांकडे येत होता, त्यामुळे इंग्रजांनी त्याच्यावर हल्ला केला नाही व त्याने तिथे येऊन त्यांच्या मुख्याशी भेटण्याची विनंती केली . . .
त्याची भाषा समजून घेण्यासाठी इंग्रजांनी एका दुभाषीला आणले व त्यांच्या प्रमुख कॅप्टन समोर त्याला उभे केले.
बादलने असे सांगितले की, “आमचे मुख्या हेमंत यांचा, तुम्हाला असा आदेश आहे की; जर तुम्ही इथून निघून नाही गेलात तर आम्ही तुमच्यावर, आमच्या सर्व प्राण्यांसहीत आत्ता लगेच हल्ला करु व तुम्हाला सर्वांना फाडून काढू. . . आमचे काही सैनिक मृत्यू पावले आहेत, आम्हाला अजून जीव जाऊ द्यायचे नाहीत . . . आम्ही शांती करार करण्यास तयार आहोत; मात्र तुमचे इथले अस्तित्व मात्र आम्ही खपवून घेणार नाही. . . ”
इंग्रज कॅप्टन व त्याच्या साथीदारांनी यावर चर्चा केली . . . आदिवासींप्रमाणेच इंग्रजांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सैन्य मृत्युमुखी पडले होते व त्यांच्याकडे अजून हल्ला करण्याची क्षमता फारशी राहिली नव्हती . . . त्यामुळे, इंग्रज कॅप्टनने बादल समोर एक प्रस्ताव ठेवला की, या जंगलाचा जो सीमा भाग आहे त्याला ‘दामीन-इ-कोह’ या नावाने मुघल काळापासून ओळखले जाते . . . या भागातील उत्पन्न पहाडीया आदिवासी मुघलांना स्वतःहून देत असत. इंग्रजांचे म्हणणे असे होते की, यातील फक्त काही भाग आदिवासींनी इंग्रजांना पूर्णपणे दिला, तर इंग्रज . . . बाकी कोणत्याही भागावर आपला हक्क सांगणार नाहीत . . .
थोडासा भाग जरी इंग्रजांनी घेतला तरी, बाकी भागावर ते आपला हक्क कधीच सांगणार नाहीत असे होणार नाही . . . याची बादलला जाणीव होती . . . मात्र आता, आहे तो प्रस्ताव मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते . . . कारण इंग्रजांना जर समजले की, आपल्याकडे त्यांच्याशी लढण्याएवढी ताकद नाही, तर ते संपूर्ण जंगलच बळकावतील . . . ते होऊ द्यायचे नव्हते . . . तेव्हा बादलने परत येण्याचे नाटक केले व पुन्हा इंग्रजांकडे जाऊन हा प्रस्ताव मान्य असल्याचे इंग्रजांना सांगितले . . .
याप्रमाणे इंग्रजांना जंगलाच्या वेशीवरील काही भाग आपल्या उद्योगांसाठी मिळाला व बाकी संपूर्ण जंगल पहाडीया आदिवासींच्या ताब्यात सुरक्षित राहिले . . . इंग्रजांनी सुद्धा या गोष्टीतून धडा घेत, पुन्हा आतमध्ये जाऊन हल्ला करण्याचे प्रयत्न केले नाहीत व शेवटपर्यंत हा भाग पहाडीया आदिवासींच्या ताब्यात राहिला . . . आजही हा भाग पहाडीया आदिवासींसाठी ओळखला जातो . . .
बादल व त्याच्या साथीदारांनी वाहिलेल्या रक्तामुळे हे जंगल कायम सुरक्षित राहिले . . . आता आपली जबाबदारी आहे की, या आदिवासींचा मान राखत व त्यांच्या परंपरेचा आदर करत त्यांना हवे तसे जगू देण्याची . . .

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा