नियंत्रित मन - सर्वोत्तम शक्ती
‘अलेक्झांडर दि ग्रेट’ बद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. ग्रीस पासून आपला विजयरथ सहज पुढे नेणारा हा योद्धा, भारतात येऊन मात्र गडबडला. त्यासाठी एक महत्त्वाचे कारण होते, भारतात आढळणारे हत्ती. हत्ती दलाचा सामना कसा करावा, याबाबत ग्रीसचे सैन्य अनभिज्ञ होते. पोरस सोबत लढताना ही गोष्ट ग्रीसच्या सैन्याला प्रकर्षाने जाणवली. पोरसच्या हत्तींनी ग्रीसच्या सैन्याला अक्षरशः तुडवले होते. परंतु, सम्राट अलेक्झांडर हार मानन्यास तयार नव्हता. एक क्षण असा आला की, तो आपल्या घोड्यावरून पडला. त्याचवेळी पोरसच्या सैन्यातील एक हत्ती त्याच्यासमोर आला. युद्ध सुरू होण्याआधी या हत्तींना खूप दारू पाजलेली असे. त्यामुळे हे हत्ती, समोर येणाऱ्या सैन्याची धूळधाण उडवत. अलेक्झांडरच्या सैन्याला त्याचा हा अखेरचा क्षण असेल असे वाटले. परंतु, महान अलेक्झांडरने आपल्या मनात भीतीचा लवलेशही येऊ न देता; हातातील भाला हत्तीच्या मानेकडे फेकला. त्यामुळे घायाळ झालेला हत्ती, पोरसच्याच सैन्यावर उलटला आणि तिथून युद्धाचे चित्र पालटले. अशा थरारक प्रसंगातसुद्धा युद्धाचे चित्र पालटणारा अलेक्झांडर, जर हे करू शकला; तर ते फक्त त्याच्या खंबीर मनामुळे.
मन म्हणजे नेमके काय? हा प्रश्नच असा आहे की, ज्यावर कितीही चर्चा केली, कितीही संशोधने झाली, तरी त्याचे नेमके उत्तर आजपर्यंत कोणासही देता आलेले नाही. हा शरीराचा भाग असूनही शरीरामध्ये न दिसणारा अवयव म्हणावा की फक्त मानवी मेंदूला जाणवणारी चेतना म्हणावी? जे काही असो. जरी मनाला शोधता आले नाही, तरी त्याची शक्ती मात्र मानवाने फार पूर्वीच ओळखली आहे.
मनाचे महत्त्व लहानपणापासून आपल्याला फक्त त्याची एकाग्रता राखण्यासंबंधी प्रकर्षाने विशद केले जाते. भारतातील शिक्षण पद्धती व स्पर्धाच अशी आहे की, मनाच्या एकाग्रतेस जेवढे महत्त्व आहे, तेवढे मनाच्या इतर कोणत्याही बाबींसंबंधी असेल असे वाटत नाही. ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की, मनाशी जोडलेल्या या एकाच गोष्टीला अतीमहत्त्व मिळाल्याने साध्य असे काही करता येत नाही. मन हे भावनांचा समुच्चय आहे. या प्रत्येक भावनेला समजून, तिच्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित करणे; हाच मनाची शक्ती वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे.
‘थॉमस अल्वा एडिसन’ हा आपल्या संशोधनांसाठी जगविख्यात आहे. एके दिवशी त्याच्या प्रयोगशाळेत मोठी आग लागली. त्यावेळी तिथे एडिसन, कमीत कमी ४० विविध विषयांवर संशोधन करत होता. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र आग विझवण्यात अपयश येत होते. त्याने कित्येक वर्षे केलेली मेहनत त्याच्या डोळ्यांसमोर बेचिराख होत होती. परंतु, एडिसनच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. तो त्याच्या मुलाला म्हणाला, ‘जा तुझ्या आईला बोलावून आण. तिने कधीच एवढी मोठी आग पाहिली नसेल. मला तिला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. या आगी सोबत, मी या संशोधनात करत असलेल्या सर्व चुका बेचिराख झाल्या.’
आपल्या अवतीभवती आपल्याला असे अनेक व्यक्ती दिसतात, जे छोट्या-छोट्या कारणांनी सुद्धा खचून जातात. निश्चितच त्यांसाठी ती गोष्ट छोटी नसते. परंतु, कितीही वाईट प्रसंग आला तरी त्यातून आपल्यासाठी काहीतरी योग्य असे शोधणे; हे मनाचे सामर्थ्य त्याच्या भावनांवर असलेल्या नियंत्रणामुळे शक्य होते. कोणताही राग न करता, काहीही चिडचिड होऊन देता, जेव्हा माणूस शांतपणे आपल्या होणाऱ्या नुकसानाचा अंदाज घेतो; तेव्हा नेमके काय राहिले आहे व त्यातून आपण कसे पुढे जावे, या गोष्टीची जाणीव त्याला होते.
नादिरशहाने जेव्हा भारतावर आक्रमण केले, तेव्हा पहिल्यांदाच त्याने सुद्धा हत्ती हा प्राणी पाहिला. युद्ध संपल्यानंतर जेव्हा तो महालात आला, तेव्हा हत्तीवर बसवून त्याची मिरवणूक काढली जावी, असे त्याच्या मंत्र्यांनी सुचवले. तो त्यासाठी तयार झाला. हत्तीवर बसताना मात्र त्याने माहुताला विचारले की, ‘याचा लगाम कुठे आहे?’
माहुताने उत्तर दिले की, ‘या प्राण्यास लगाम नसतो.’
तेव्हा नादिरशहाने हत्तीवर बसण्यास नकार दिला व सांगितले की, ‘ज्या गोष्टीला लगाम नाही, त्या गोष्टीला जवळ करणे मी उचित मानत नाही.’
नादिरशहा आपल्या भारतासाठी एक शत्रू. परंतु, यासाठी फक्त त्याचा द्वेष न करता, त्याने भारतीयांना कसे हरवले; याचे विश्लेषण केले तर त्याच्या व्यक्तिमत्वात आपणास उत्तर मिळते. मनाला भावणाऱ्या, त्यास मोह पाडणाऱ्या, अनेक गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येक क्षणाला उपलब्ध असतात. सोशल मीडिया सारख्या काही गोष्टी आपल्या मनाला, समोरील व्यक्तींना हवी तशी दिशा देण्याचे काम करत, आपले स्वतःवरचे नियंत्रण घालवण्यास जबाबदार ठरतात. राग, द्वेष, लोभ, अहंकार यास कोणीही व्यक्ती चुकलेला नाही. परंतु, त्यास ज्याने नियंत्रणात ठेवले, तो खऱ्या अर्थाने जिंकला.
अगदी काहीच नाही जमले, तरी एक साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवावी की, आपल्या मनाच्या भावनांवर दुसऱ्या कोणासही राज्य करता येऊ नये.
एकदा गौतम बुद्ध एका वनातून जात होते. एक डाकू त्यांची ख्याती ऐकून होता व त्यामुळे त्यांचा द्वेष करत होता. जंगलातील वाट संपेपर्यंत तो त्यांच्या मागे - मागे जाऊन त्यांना सतत शिव्या देत राहिला. जंगल संपत आले, तसे त्याने त्यांना थांबवले व म्हणाला की, ‘मी एवढा वेळ तुम्हाला अतिशय गलिच्छ शिव्या देतोय, तरी तुम्ही त्याचा एका अक्षराने ही प्रतिकार केला नाही. लोक तुम्हाला श्रेष्ठ मानतात. हा असा शिव्या ऐकून घेणारा व्यक्ती कसा श्रेष्ठ होऊ शकतो?’
गौतम बुद्ध त्याला म्हणाले, ‘जर तू मला सोन्याच्या मोहरांनी भरलेले ताट देत असशील व मी ते घेण्याचे नाकारले तर ते ताट कोणाकडे राहिले?’
डाकू म्हणाला, ‘ते माझ्याजवळच राहिले.’
बुद्ध म्हणाले, ‘त्याचप्रमाणे, तू दिलेली कोणतीही शिवी मी स्वीकारलीच नाही.’ त्याच क्षणी त्या डाकूने बुद्धांचे शिष्यत्व पत्करले.
आपल्या आजच्या आयुष्यात हे डाकू विविध रूपे घेऊन येतात. विविध परिस्थितींमध्ये त्यांचा हेतू एकच असतो की, आपण आपल्या मनावरील नियंत्रण हरवून आपले नुकसान करून घ्यावे. जर अशा प्रत्येक वेळी, मनातील प्रत्येक भावनेवर नियंत्रण ठेवत, आपण प्रतिसाद दिला, तर याहून अमूल्य अशी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात घडणे शक्य नाही.
आचार्य विनोबा भावे म्हणत,
‘हे जग एक वर्तुळ आहे व तुम्ही या वर्तुळाचे केंद्र. जर केंद्रच नसेल, तर त्या वर्तुळास काहीही अर्थ नाही.’
मनुष्य हा फक्त त्याच्या शरीराने नाही, तर त्याच्या विचारांनी व भावनांनी ओळखला जातो. त्यामुळे हे केंद्र म्हणजे निश्चितच आपले मन व बुद्धी असू शकते. त्यामुळे, जर या जगरूपी वर्तुळातील, प्रत्येक गोष्टीस सामर्थ्याने सामोरे जायचे असेल; तर हे केंद्ररुपी मन नियंत्रित ठेवणे, हीच सर्वोत्तम शक्ती ठरेल.

.jpeg)

👌
उत्तर द्याहटवाThank you 😊
उत्तर द्याहटवाGrate Amit....
उत्तर द्याहटवाThank you 🙏😊
हटवा