मासिक पाळी - वरदान की व्यथा?
मुंबईचा एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करणारी लक्ष्मी. ऑफिसमध्ये मोजून काम करणारे दहा-पंधरा जण. त्यात लक्ष्मी एकटी स्त्री. बाकी सर्व सहकारी पुरुष असले, तरी वागायला अतिशय चांगले व त्यामुळे लक्ष्मीला कधीही असुरक्षित वाटत नाही. परंतु, महिन्यातील काही दिवस असे येतात की लक्ष्मीचा स्वभाव पूर्णपणे बदलून जातो व या काळात लक्ष्मी, बाकी सहकाऱ्यांच्या चेष्टेचा विषय होऊन जाते. मासिक पाळीचे हेच ते चार-पाच दिवस . . . तिला इतर स्त्रियांप्रमाणे शारीरिक त्रास फारसा होत नाही. परंतु, मनाची घालमेल व अस्वस्थता यावर तिचा ताबा राहत नाही व तिच्या या मानसिक कलहास तिचे सहकारी समजून घेत नाहीत.
भारतात आज सुद्धा, उघडपणे मासिक पाळी या विषयावर बोलणे टाळले जाते. स्त्रिया - त्यांना हा त्रास होतोय, हे सांगण्यास लाजतात व पुरुष - ही गोष्ट नेमकी काय आहे, हे समजून घेण्यात कमी पडतात.
एकीकडे, हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे; ज्यामुळेच मानव टिकून आहे, असे बोलले जाते व दुसरीकडे मात्र, अगदी या दिवसात सुद्धा स्त्रियांसोबत दुर्व्यवहार केला जातो. मासिक पाळी म्हणजे नेमके काय, याची चर्चा करण्यास कोणी तयार नसते. तर आज त्यावर चर्चा करूया.
मासिक पाळी काय असते :-
स्त्रीचे गर्भाशय व योनी ही तिची जननअंगे असतात. मानवाच्या नवीन जीवाची उत्पत्ती होण्यासाठी पुरुषांमधील वीर्य तर स्त्रियांतील स्त्रीबीज यांचा संगम होणे आवश्यक असते. पुरुषांमध्ये वीर्य तयार होण्याचे कार्य सतत सुरू असते. पुरुषांच्या वृषणामध्ये ते साठत राहते. वेळोवेळी संभोगाद्वारे, हस्तमैथुनाद्वारे किंवा अगदी स्वप्नदोषानेही वीर्यस्खलन होते. पुरुषांसाठी ही प्रक्रिया आनंददायी व शारीरिक त्रास नसलेली अशी असते.
स्त्रियांमध्ये जन्मापासूनच अनेक स्त्रीबीज असतात. स्त्री वयात आल्यानंतर त्यांतील स्त्रीबीज गर्भाशयात गर्भधारणेच्या जागी सरकू लागतात. हे स्त्रीबीज जेवढे जुने होईल, तेवढे अपरिपक्व व निरोपयोगी होत जाते. अशा स्त्रीबीजामुळे गर्भधारणा होणे शक्य नसते. त्यामुळे स्त्रियांचे शरीर दर महिन्याला या प्रकारचे स्त्रीबीज गर्भाशयातून बाहेर टाकते व त्याची जागा नव्हे स्त्रीबीज घेते.
दर महिन्याला ही स्त्रीबीज बाहेर निघण्याची प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी.
मासिक पाळीत रक्तस्त्राव कशामुळे होतो :-
बीजांडातून गर्भाशयात आलेल्या स्त्रीबीजाच्या वाढीसाठी तिथे एक विशिष्ट रचना तयार झालेली असते. ते जुने झाल्यावर मात्र अगदी त्या रचनेसह त्याला शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असते. हे काम स्त्रीचे शरीर त्या भागात रक्तस्त्राव घडवून करते. त्यामुळेच, अनेकदा काळसर असा गुठळ्या असलेला रक्तस्राव होतो. ज्यामुळे, घाबरून जायची गरज नसते. परंतु, अशा काळसर रक्ताचे प्रमाण वाढले तर डॉक्टरना दाखवावे.
मासिकपाळी चालू असताना, पूर्ण विश्रांतीची गरज असते का :-
मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची गरज नाही. अतिकष्टाची कामे करू नयेत. पण घरातील नेहमीची कामे करावीत. जर पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल, तर मात्र विश्रांती घ्यावी.
पाळी लवकर आली नाही तर काय करावे :-
मुलीला १६ वर्षांपर्यंत जर पाळी आली नाही तर डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जर मुलगी अतिशय अशक्त असेल तर तिच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. भारतात मुलींना लहानपणापासूनच कमी आहार घेण्याची सवय लावली जाते. काही मुली चांगल्या दिसण्यासाठी हे मुद्दाम करतात. परंतु, यामुळे त्यांना मासिक पाळीमध्ये त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
मासिक पाळी किती दिवसांनी येते :-
मासिक पाळी दर २८ दिवसांनी येते. परंतु, त्यात २४ ते ३० दिवस असा फरक पडू शकतो. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ती अगदी नियमितपणे येईल असे नाही. त्यातही दोन दिवस अलीकडे-पलीकडे असा फरक पडू शकतो. पण पुढे काही दिवसांनी त्यात नियमितपणा येतो. सुरुवातीला कमी किंवा जास्त रक्तस्त्राव हा अनियमितपणा सुद्धा पाहायला मिळतो. त्यात सुधारणा होते.
मासिक पाळी पुढे ढकलता येते का? तसे करणे कितपत योग्य आहे :-
कुटुंब नियोजानाकरिता वापरण्यात येणाऱ्या गोळ्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी घेतल्याने मासिक पाळी पुढे ढकलता येते, परंतु असे करणे योग्य नाही. कारण या गोळ्यांचे स्त्रियांवर दुष्परिणाम होऊ शकतात. हल्ली धार्मिक सोहळे असल्याने किंवा प्रवासात जायचे असल्याने सुद्धा हे प्रकार केले जातात. परंतु, ते शरीरावर दुष्परिणामच घडवतात.
मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवणे योग्य की अयोग्य :-
गर्भाशयाची आतील बाजू शरीरात जंतूप्रवेश करू देत नाही. मासिक पाळीच्या वेळी संरक्षक आवरण निघून गेल्यामुळे हा भाग नाजूक बनलेला असतो. अशा वेळी जननेंद्रियाचा सांसर्गिक रोग असलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास हे जंतू प्रथम योनीमार्फत गर्भाशयात प्रवेश करतात. त्यामुळे स्त्रीला संभोगामध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तसेच रक्तस्त्रावामुळे स्त्री कमकुवत झालेली असते. त्यामुळे या काळात शारीरिक संबंध ठेवणे टाळावे.
मासिक पाळी व आहार :-
पाळी फक्त गर्भधारणेशी संबंधित नसून मासिक पाळीचं चक्र नियमित राहिलं तर महिलांचं इतर आरोग्यही चांगलं राहातं.
समतोल आहारामुळे पाळीचं चक्र नियमित राहातं. पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्यानं फायदा होऊ शकतो. जंक फूडमुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी उशीरा येणं किंवा वेळेपेक्षा जास्त लांबणं असे प्रकार घडू शकतात.
अन्नात हिमोग्लोबिनची कमतरता असेल पाळीच्या वेळी कमी रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो.
पाळी संदर्भात आहाराचं खूपच महत्त्व आहे, पण अनेक महिलांना हे माहितीच नसतं की आपण जे खातोय त्याने आपल्या पाळीवर परिणाम होतोय. सतत शिळं अन्न खाणं किंवा चौरस आहार न घेणं यामुळे त्यांची पाळी अनियमित होते, उशीरा येते.
मासिक पाळी नियमित असावी यासाठी आहारातलं फॅट्सचं प्रमाण कमी करायला हवं. जेवणात खूप तेलकट पदार्थांचा समावेश असेल तर त्याने हार्मोनल बदल होऊन पाळीवर परिणाम होतो.
मासिक पाळीच्या काळात पाणीही जास्त प्यायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. या काळात जास्त पाणी प्यायलत तर अतिरक्तस्राव होत नाही. तसंच पाळीच्या काळात ज्या कळा येतात त्याही कमी होऊ शकतात.
अल्कोहोल घेणे ही आजच्या अनेक स्त्रियांसाठी मनोरंजनाची बाब झाली आहे. परंतु, मासिक पाळीत अनियमितता व जास्त त्रास होत असेल तर अल्कोहोल टाळणे उत्तम.
माझा एक मित्र आहे शैलेश. त्याला हेमोफिलीया हा आजार आहे. हा आजार असा आहे की, माणसाला जखम झाली तर रक्तप्रवाह थांबत नाही. तो थांबण्यासाठी विशिष्ट औषध किंवा इंजेक्शन घ्यावे लागते. रक्त गोठण्याची प्रक्रिया त्याच्या शरीरात स्वतःहून होत नाही. एक दिवस सकाळी फळं कापताना शैलेशचं बोट कापलं आणि रक्तप्रवाह सुरू झाला. शैलेशला ऑफिसला जायचं असल्यामुळे त्याने बोटाला कापड गुंडाळलं, पण रक्तप्रवाह थांबत नव्हता. तो सारखं कापड बदलत होता पण त्याचा त्याला खूप त्रास होत होता. आता विचार करा जर प्रत्येक महिन्याला लागोपाठ चार दिवस असाच त्रास होणार असता आणि तेही जवळजवळ अर्ध आयुष्य . . . तर?
आपण कधी विचार केलाय का-महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमध्ये नेमका असाच त्रास होतो. त्यांचे ते चार-पाच दिवस त्या कसे सहन करीत असतील?
ही प्रक्रिया मानवासाठी एक वरदान आहे. ज्यामुळे त्यास त्याची पुढील वंश-उत्पत्ती शक्य आहे. मानव स्वार्थी असल्याने कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातही भारतीय समाजात पुरुषांनी या प्रकारची व्यवस्था करून ठेवली आहे, की स्त्रिया पूर्ण स्वातंत्र्य उपभोगू शकत नाहीत. मानव प्राण्याचे अस्तित्व कायम राहण्यासाठी स्त्रिया दर महिन्याला हा त्रास भोगत असतात. पुरुषांची ही जबाबदारी आहे की, किमान याबाबतीत तरी, स्त्रियांच्या मनाचा आसरा होऊ शकत नसाल, तर किमान त्यांना त्रास होईल अशी कृती करणे टाळावे. भारतीय समाजातील अजून एक वाईट पैलू म्हणजे, स्त्री हीच स्त्रीची मोठी शत्रू ठरते. या काळात स्त्रियांनी एकमेकांना समजून घ्यावे हे महत्त्वाचे.
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे ‘मासिक पाळीची देवी’. या देवीची भक्ती करण्यासाठी पूर्ण भारतातून दरवर्षी लाखो भक्त येथे भेट देतात. आपण देवीला श्रेष्ठ ठरवून तिची पूजा तर केली. स्त्रियांना या काळातील त्यांच्या विश्रांतीचा हक्क देणे मात्र त्याहून महत्त्वाचे.
संदर्भ :- माहितीचा गुगलस्त्रोत

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा