भारतीयांचा धर्म
भौगोलिक व आर्थिक ऐक्य आणि सामाईक इतिहास हे राष्ट्र म्हणून भारतीयांना जोडणारे घटक आहेत. विशेषत: हजारो वर्षांचा सामाईक इतिहास हा आपला सर्वांत दृढ, सामर्थ्यशाली बंध आहे. गेल्या दहा हजार वर्षांत या भूमीवर मध्य व पश्चिम आशिया, पश्चिम युरेशिया, तिबेट-बर्मा,इ प्रदेशांतून आर्य, मंगोलियन, कुशन, शक, ग्रीक, हूण, अरब, पर्शियन, तुर्क अशा वंशांचे लोक स्थलांतरित होऊन आले. इथेच स्थिर झाले. इथल्या लोकांत मिसळून गेले. गेल्या हजार वर्षांत इथे संतांनी आणि सुफी कवींनी सहिष्णुता, सुसंवाद आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण केले. जेव्हा हिंदू आणि मुस्लीम राजे सत्तेसाठी लढत होते, तेव्हा सर्वसामान्य लोक परस्परांचा द्वेष न करता एकत्र राहत होते. ऐतिहासिक काळात शासक असलेले मुस्लीम नंतर मात्र हिंदूंप्रमाणेच वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या शोषणाचे बळी ठरले होते. तेही स्वातंत्र्यलढ्यात उतरले.
भारतातील मुघल साम्राज्याचा अखेरचा शहेनशहा व नामांकित उर्दू शायर बहादुर शाह ज़फर (१७७५-१८६२) याने १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध सैन्याचे नेतृत्व केले. युद्धात हार झाल्यानंतर इंग्रजांनी त्याला बर्मा (आताचे म्यानमार) येथे पाठवले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास हिंदुस्तानात घेता यावा आणि आपल्या जन्मभूमीवर दफन व्हावे अशी बहादुर शाह ज़फरची अंतिम इच्छा होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. “कितना है बदनसीब ‘ज़फर’ दफ्न के लिए, दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार (प्यार की गली) में॥” या त्याच्या काव्यपंक्ती आजही त्याचे भाव व्यक्त करतात.
कबीर, गुरु नानक, अकबर या व्यक्तींचे विचार, भक्ती व सूफी चळवळ, उर्दू भाषा, अमीर खुस्रो, मिर्जा गालिब यांच्या कलाकृती आणि भारतीय तत्त्वज्ञान, चित्रकला, वास्तुशिल्प, संगीत, पाककला, पेहराव, उत्सव यांचा परस्परांवर मोठा प्रभाव पडला. गंगा-जमुना संस्कृती हा आपला एक सशक्त वारसा आहे. म्हणूनच तर देशाची फाळणी रोखण्यात अपयश आल्याची प्रचंड वेदना असूनही आपल्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तसे संविधान बनवले.
एरिक हॉब्जबॉम त्याच्या ‘ऑन हिस्टरी’ (१९९७) या ग्रंथात, इतिहास आणि धार्मिक मूलतत्ववाद व राष्ट्रवाद यातील संबंध उलगडून दाखवतो. तो म्हणतो की हेरॉइन या अंमली पदार्थाच्या व्यसनाचा जसा ‘अफू’ हा कच्चा माल असतो, तसा वांशिक, राष्ट्रवादी वा मूलतत्त्ववादी विचारधारांसाठी ‘इतिहास’ हा कच्चा माल असतो. ‘भूतकाळ’ ही त्यांच्यासाठी अत्यावश्यक बाब असते. भूतकाळ जर सोयीस्कर नसेल तर त्यांना तो हवा तसा रचता येतो. संपूर्णपणे सोयीचा भूतकाळ बहुधा नसतोच. कारण या विचारधारा ज्या घटितांचा दावा करतात, ती घटीते प्राचीन वा शाश्वत नसतात, तर ऐतिहासिकदृष्ट्या नवी असतात. भूतकाळाचा वापर ते त्यांच्या मांडणीला वैधता देण्यासाठी करतात. ज्या वर्तमानाकडे उत्साहाने साजरं करण्यासारखं काही नसतं, त्याला भूतकाळ अधिक मोहक पार्श्वभूमी देतो. हे धार्मिक मूलतत्त्ववाद आणि आधुनिक राष्ट्रवाद या दोन्हींना लागू होते.
प्राचीन सिंधु संस्कृतीतील शहरांचा अभ्यास मांडणाऱ्या एका संशोधनाचं शीर्षक ‘पाकिस्तानची पाच हजार वर्षे’ असे होते. वास्तविकत: १९३२-१९३३ पूर्वी पाकिस्तान हे नावही कुणी ऐकले नव्हते. १९४० पर्यंत त्याची राजकीय मागणी सुद्धा गंभीरपणे केली गेली नव्हती. पाकिस्तान हा देश १९४७ला अस्तित्वात आला. पण ‘पाकिस्तानची पाच हजार वर्षे’ हे ऐकायला छान वाटते. अभिमानास्पद वाटते. अशा परिस्थितीत इतिहासकारांवर अनपेक्षितपणे राजकीय भूमिका घेण्याची जबाबदारी येते. त्यांचे संशोधन स्फोटक ठरू शकते. ऐतिहासिक वस्तुस्थिती मांडण्याची आणि खास करून इतिहासाच्या राजकीय-विचारधारात्मक गैरवापराची समीक्षा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते.
असहिष्णुतेच्या विचारधारा काही साध्या असत्य विधानांवर किंवा कल्पित गोष्टींवर आधारित असतात. अशा विधानांचा पुरावा अस्तित्वात नसतो. इतिहासाच्या जागी मिथके व रचलेल्या गोष्टी पेरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. शालेय पुस्तकांत ती मिथके व रचलेल्या गोष्टी नव्या पिढीची मानसिकता घडवण्याचे काम करतात. ओळखीच्या व अस्मितेच्या राजकारणात याचा उपयोग होतो. आज लोकांचे गट वंश, धर्म, किंवा भूतकाळ किंवा राज्याच्या वर्तमान सीमा यानुसार स्वत:ची व्याख्या करतात आणि भोवतालच्या अनिश्चित, अस्थिर जगात काही निश्चितता शोधण्याचा प्रयत्न करतात. ‘आम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत’, अशी भावना जोपासतात. महत्त्वाचे म्हणजे अशी मिथके व गोष्टी रचणारे हे शिक्षित लोक असतात. अनेकदा साहित्य, चित्रपट, नाटक अशा कलाकृतींत ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि काल्पनिकता यांतील सीमारेषा धूसर बनवलेल्या असतात. ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळालेला ‘RRR’ हा चित्रपट या प्रकारेच इतिहास व कल्पनाशक्ती यातील सीमारेषा अतिशय धूसर करून प्रेक्षकांसमोर एक वेगळे सत्य मांडतो.
‘प्राचीन काळापासून हिंदू हा एकसंध धर्म होता’ किंवा ‘प्राचीन काळापासून या भूमीवर एकात्म हिंदू समाज अस्तित्वात आहे’ अशा प्रकारची मिथके जशी हिंदू मानसात रुजली आहेत. तशीच ‘जगातील सर्व धर्मांत इस्लाम हा धर्म श्रेष्ठ व पवित्र आहे’ किंवा ‘या देशात आपले वेगळेपण जपले नाही तर आपण नष्ट होऊन जाऊ’ हे मुस्लीम जनमानसातील समज जाणीवपूर्वक रुजवले जातात. अशा राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व इतर रचलेल्या मिथकांचा प्रतिकार केला पाहिजे. रोष पत्करूनही त्यांची असत्यता सांगितली पाहिजे.
आज भारतीय हिंदू समाज रामाच्या नावाने अतिशय प्रक्षोभित केला जातो. आपल्या कथांमध्ये राम - एक चांगला भाऊ, एक चांगला मित्र, एक चांगला शांतीप्रिय मानव दाखवला आहे. मात्र आज रामाला धनुष्य घेऊन लढतानाचे जे रूप आहे, त्याच स्वरूपात दाखवले जाते. रावणाला हरविल्यानंतर, त्याच रावणाच्या पायाशी बसून त्याचे ज्ञान घेण्याची सूचना रामाने लक्ष्मणाला केली होती. आज मात्र रामाला धार्मिक कट्टरतेसाठी व द्वेषासाठी वापरले जाते. आपल्याला हे कळायला हवे की,खरा राम हा एवढा द्वेषाने युक्त असू शकतो का? नाव रामाचे आणि फायदा नेत्यांचा. याप्रकारे अनेक देवांचे व महापुरुषांचे राजकीयीकरण आज घडवले जात आहे.
श्रद्धा आणि दिखाऊगिरी यामध्ये बरेच अंतर आहे. श्रद्धा ही स्वतःच्या मनाशी असते व मनापूरती असते. हिंदू धर्मामध्ये आपल्या श्रद्धांना चारचौघात मांडण्याची परंपरा नाही. मी म्हणजे आत्मा, माझा आत्मा ज्याच्याशी जोडला गेला आहे, तो परमात्मा. भगवद्गीतेनुसार हा आत्मा सुद्धा तोच आहे. जे जे मनात घडते, ते त्याच्यापर्यंत पोहोचते. कधी नव्हे ते हिंदू धर्मामध्ये दिखाऊगिरीचे उधान आले आहे. हे सामान्य माणसांकडून घडले नाही, तर राजकीय नेते यास पोषक वातावरण निर्माण करून, या प्रकारची कृती करण्यास सामान्य जनांस उद्युक्त करतात हे आपल्याला कळले पाहिजे. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा रोजा पाळण्याची सक्ती कोणावरही नाही. तरीसुद्धा मी रोजा पाळतोय म्हणजे मी काहीतरी खरंच जबरदस्त करून दाखवतोय हे दाखवण्यासाठी अनेक जण रोजा पाळतात. हे फक्त टीकात्मक स्वरूपातले विधान नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे- अनेक जण जे रोजा पाळतात ते इतर मुस्लिमांना विचारतात की, तू रोजा पाळला की नाहीस? समोरील उत्तर नाही असे आले; तर ते समोरील व्यक्तीला कमी लेखतात. रोजा पाळला म्हणजेच अल्लाची भक्ती केली, असे कुठे आहे का?
सोशल मीडियाच्या या युगात धार्मिक गोष्टींचा प्रसार करणे, म्हणजे आपण सुद्धा काहीतरी विशिष्ट आहोत ही भावना बाळगणे, याचे सुतोवाच करते. आपण रोजचे कपडे वापरतो, त्यात आपली संस्कृती दिसत नाही; आपण जे शिक्षण घेतो, त्यात आपली संस्कृती दिसत नाही; आपण जे खातो, त्यात आपली संस्कृती दिसत नाही; आपण ज्या ठिकाणी राहतो, त्यात आपली संस्कृती दिसत नाही; जर संस्कृती खऱ्या अर्थाने पाळायची आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करून स्वतःच्या विचारांमध्ये बदल घडवण्यास आपण का सुरुवात करत नाही? एखादा दिवस येतो आणि त्यावेळी आपण अचानक खूप धार्मिक होऊन जातो व तेही कुठे - तर फक्त सोशल मीडियावर.. याने नेमकं आपण काय साध्य करणार आहोत?
या गोष्टींचा आज भारतीय युवकांनी विचार करायला हवा. या गोष्टी ते स्वतःहून करतायत की, कोणाच्या प्रभावांमध्ये येऊन या त्यांच्याकडून करून घेतल्या जातात, याचेही त्यांस भान असायला हवे. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे भक्ती तीच जी पूर्णपणे समजून - उमजून व तात्विक दृष्ट्या विचार करून केली जाते. जर असे घडले तर भक्तीचा दिखाऊपणा करण्याची गरज राहणार नाही व आपल्यास भक्ती ही फक्त मन:शांतीसाठी व स्वतःच्या उद्धारासाठी करण्याची प्रेरणा मिळेल. ही खरी भक्ती, भारतीयांना त्यांचा नेमका धर्म काय, हे नक्कीच सांगेल.

.jpeg)

True
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
उत्तर द्याहटवा