भारत भाग्यविधाता..


 आपण भारतीय खूप उत्साहाने व अत्युच्च भावनेने अनेकदा वंदे मातरम, भारत माता की जय किंवा इन्कलाब जिंदाबाद सारख्या घोषणा देतो. अगदी या शब्दांचा अर्थ माहित नसेल, तरीही देशप्रेमाची ती भावना, हे शब्द बोलताना आपल्या शक्तीला किंचितही कमी पडू देत नाहीत.

परंतु, या शब्दांचा नेमका अर्थ काय व यांचे अस्तित्व आजच्या भारतात नेमके किती आहे, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते.


१) 'इन्कलाब जिंदाबादचा' अर्थ आहे क्रांती चिरायू राहो. म्हणजेच क्रांती मधून जी तत्वे आलेली आहेत, या तत्त्वांची जोपासना सदैव केली जावो.

आता ही नेमकी कोणती क्रांती?? तर कामगार वर्गाने, मजुरांनी, शेतकऱ्यांनी व पीडित वर्गाने सर्व प्रकारच्या जुलूमाविरुद्ध व भांडवलशाही विरुद्ध उभारलेला लढा किंवा दिलेली झुंज म्हणजेच क्रांती. ही एक साम्यवादी संकल्पना आहे. रशियन राज्यक्रांतीची प्रेरणा या संकल्पनेमागे आहे.


जेव्हा क्रांती घडते, तेव्हा एका रात्रीत शासकीय उलटफेअर होत सामाजिक संरचनेमध्ये अमुलाग्र बदल होतात. भारतात या प्रकारची कोणतीही क्रांती कधीही घडली नाही. भगतसिंग व त्याच्यासारख्या अनेक साम्यवादी नेत्यांचा दृष्टिकोन धर्म, जात, वंश या सर्वांपासून मुक्त असा समाज तयार करणे आणि गरीब-श्रीमंत हा भेद सुद्धा संपवणे या प्रकारचा होता. त्यामुळे असे अनेक साम्यवादी नेते क्रांती घडवण्यासाठी आग्रही होते. ही क्रांती घडवण्यासाठी 'इन्कलाब जिंदाबाद' हे शब्द त्यांना प्रेरणा देत असत. आज मात्र कायद्याने स्थापित लोकशाही असलेला स्वतंत्र भारत देश समाजातील सर्व घटकांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करत असताना, इन्कलाब जिंदाबाद हे शब्द या देशात लागू होत नाहीत.


२) वंदे मातरमचा सरळ सरळ अर्थ आहे की, हे माते मी तुझे वंदन करतो, अर्थात तुला प्रणाम करतो.

रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या 'बंदे मातरम' या काव्यातील हे दोन शब्द भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी फार महत्त्वाचे ठरले. 


३) भारत माता की जय या वाक्याचा सुद्धा सरळ सरळ अर्थ तोच अभिप्रेत असला तरी भारत माता ही संकल्पना थोडी वेगळी ठरते. 


फरक असा आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत लिहिताना, हा देश त्यांच्या डोळ्यासमोर एका देवी प्रमाणे उभा राहिला. ते स्वतः हिंदू असल्याने, त्यांच्या भावना या प्रकारच्या असणे सहाजिक होते. या देशाला एका तेजस्वी देवीच्या स्वरूपात पाहत, तिचे गुणगान करत व वंदन करत तिच्याकडून तिच्या स्वातंत्र्यासाठी शक्ती मागणारे हे गीत अतिशय प्रभावी ठरले. 


परंतु, रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा जाणवले की, आपल्या धार्मिक भावनांना या देशाप्रती आदर दाखवत जरी आपण मुक्तवाट करून दिली असली; तरी या देशाच्या विविधतेस हे गीत न्याय देत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढा फक्त एका धर्माने लढून यशस्वी होण्यासारखा नाही. सर्व भौगोलिक, सामाजिक तथा धार्मिक भेद दूर सारूनच हा देश स्वातंत्र्य मिळवू शकेल. हा देश फक्त एका धर्माची माता नसून, सर्व धर्मीयांना ती वंदनीय आहे व त्या स्वरूपात हे दाखवणे आवश्यक ठरते.


 हे समजून घेत 'भारतो भाग्यविधाता' हे गीत त्यांनी पुढील काळात लिहिले. ज्याला नंतर आपण राष्ट्रगीत म्हणून सुद्धा स्वीकारले. या गीतामध्ये त्यांनी भारतमाता ही फक्त कोणा एका धर्माची नसून सर्व भारतीयांची आहे, सर्व भौगोलिक किंवा सामाजिक भेद दूर सारत आपण एकत्र आलेलो आहोत व अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या या स्वातंत्र्यलढ्याच्या वाटेचे भागीदार होत आपण आपल्या मातेला गुलामगिरीतून मुक्त करू, हा विश्वास त्यांनी या गीतामध्ये दाखवला. या गीताचे फक्त पहिले कडवे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. पुढील काही ओळी मी तुम्हाला येथे सादर करत आहे.



अहरह तव आह्वान प्रचारित, सुनि तव उदार बाणी..

हिन्दु, बौद्ध, सिख, जैन, पारसिक, मुसलमान, खृष्तानी..

पूरब पश्चिम आसे..

तव सिंहासन-पाशे..

प्रेमहार हय गाथा..

जनगण-ऐक्य-विधायक जय हे भारतभाग्यविधाता..


सर्व धर्मांचे, अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उपस्थित सर्व भारतीय एकत्र येत एक प्रेमाचा बंध तयार करत आहेत.. आमची भारतमाता आमच्या सर्व बांधवांना एकत्र आणत, एकतेचे प्रतीक बनत आहे.


रात्रि प्रभातिल, उदिल रविच्छवि पूर्व-उदयगिरिभाले..

गाहे विहंगम, पुण्य समीरण नवजीवनरस ढाले..

तव करुणारुणरागे..

निद्रित भारत जागे..

तव चरणे नत माथा..

जय जय जय हे जय राजेश्वर भारतभाग्यविधाता..


काळोखाची एक रात्र संपत आहे व नवीन सूर्य उगवत आहे. पक्षी गात आहेत, थंड हवा प्रत्येकात एक शक्ती भरत आहे.. हे या मातेचेच प्रेम आहे की, आज पर्यंत हा झोपलेला भारत आता जागा होत आहे.. सर्व भारतीय या मातेचे वंदन करत आहेत..


याप्रमाणे भारतमातेला भारतीयांसमोर सादर केली गेली. सर्व भारतीयांनी प्रेमपूर्वक या गीताला स्वीकारत त्यातूनच पुढे भारत माता की जय ही घोषणा उदयास आली.


आता हे गीत, आपले राष्ट्रगीत म्हणून कशाप्रकारे स्वीकारले गेले??

रवींद्र टागोरांना मानणाऱ्या अनेक बंगाली नेत्यांपैकी एक होते, 'सुभाषचंद्र बोस'. वंदे मातरम व भारतो भाग्यविधाता ही गीते त्यांच्यासाठी कायमच प्रेरणा देणारी ठरली.

काँग्रेसच्या 1938 व 1939 च्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष असताना, स्वतंत्र भारतास संबोधन करणारे महत्त्वाचे गीत वंदे मातरम किंवा भारतो भाग्यविधाता यापैकीच एक ठरावे अशी त्यांची इच्छा होती. यासंबंधीची चर्चा त्यांनी रवींद्रनाथ टागोरांसोबत केली. त्यावेळी टागोरांनी वंदे मातरम या गीतास विरोध दर्शवत, हे फक्त एका धर्माचे प्रतिनिधीत्व करते, म्हणून त्यास नाकारले. भारत व भाग्यविधाता हे गीत त्यांना या देशासाठी जास्त समर्पक वाटले.


पुढे आझाद हिंद सेने सोबतच, आजाद हिंद शासन स्थापन करताना सुभाषचंद्र बोसांनी, या गीतातील पहिले कडवे आपल्या सेनेचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यासंबंधी तरतूद केली. हे गीत संपूर्ण भारतास आपले वाटण्यासाठी, त्यांनी यातील अनेक शब्द बंगाली मधून हिंदुस्तानी या भाषेत भाषांतरित करून घेतले. हिंदी व उर्दू मिश्रित अशी हिंदुस्तानी भाषा; त्याकाळी भारतात मोठ्या प्रमाणात बोलली जात असे.


आझाद हिंद सेनेच्या सैन्यावर ब्रिटिशांनी आरोप पत्र दाखल केले. या सैनिकांच्या बाजूने खटला लढताना जवाहरलाल नेहरूंनी, या प्रकारचे गीत सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा मनसुबा रचलेला ही माहिती मिळवली. सुभाष चंद्र बोस यांचे घनिष्ठ मित्र असल्याने, आपल्या मित्राचे हे स्वप्न पूर्ण व्हावे; ही आकांक्षा जवाहरलाल नेहरूंच्या मनी आली.


आझाद हिंद सेनेमार्फत भाषांतरित केलेले हे गीत, त्यांनी संविधान सभेसमोर, राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले जावे हा प्रस्ताव मांडला व संविधान सभेने सुद्धा एकमताने तो पारित केला. तेव्हापासून, भारतो भाग्यविधाता किंवा जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे.


या २१ व्या शतकात स्वतंत्र भारतात अतिशय आरामात बसून आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचे मूल्यमापन करतो. तेव्हा फक्त एवढे ध्यानात घ्यावे की, भावनेला हृदयाशी ठेवत, विचार प्रवृत्तीने लढा उभारत व विविध गोष्टींना जाणून घेत या नेत्यांनी हे स्वातंत्र्य मिळवले. 

फक्त भावनेला महत्त्व देत, बेंबीच्या देठापासून अतिशय जोरात वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद किंवा भारत माता की जय ची घोषणा देणे या देशाला काहीही फायद्याचे नाही.

या देशासंबंधी, देशाच्या इतिहासासंबंधी विचारपूर्वक जाणून घेत व या स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांची योग्य जोपासना करत केलेले आचरण स्वातंत्र्यवीरांच्या कष्टाला न्याय देणारे ठरेल.


- अमित 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट