एका हिंदुत्ववादीशी चर्चा..
ही मुलाखत काल्पनिक नाही. परंतु, ही पूर्णपणे एकाच व्यक्ती सोबत केलेली नाही. मला चर्चा करायला आवडते व विविध प्रसंगात झालेल्या चर्चांचा हा सारांश म्हणू शकता. चर्चा करणाऱ्या व्यक्तींच्या भाषेला मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
माझी हिंदुत्ववादी मैत्रीण आपल्या धर्माचे अमूल्य ज्ञान मला देत होती. ज्यामध्ये धार्मिकता कमी व राजकारण आणि द्वेष जास्त होता. तरीही भोळाभाबडा मी, शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेत होतो. तेवढ्यात अजान सुरू झाली..
मैत्रीण - हे काय यांचं सारखं अल्लाहू अकबर.. असे डोक्यात जातात ना.. ह्या कटलेल्या लांड्यांचे राहिलेले सुद्धा कापून टाकावे वाटतात.
भोळाभाबडा मी - लांडे म्हणजे काय ग??
मैत्रीण - तू ऐकलं नाही का, मुस्लिम लोकांबद्दल असेच तर बोलतात सर्व. कटलेले म्हणजेच लांडे.
भोळाभाबडा मी - सर्वांचे नाही माहीत, मी तर नाही म्हणत. परंतु, तू जो अर्थ सांगितला आहेस; तो नक्की योग्य आहे का??
मैत्रीण - नक्की माहीत नाही, पण तोच असावा.
भोळाभाबडा मी - लांडे हा शब्द वापरणाऱ्या बहुतेक हिंदूंना या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. फक्त दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा द्वेष दाखवण्यासाठी हा समाजमान्य शब्द वापरला जातो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी या द्वेषयुक्त वासनेला विकृत आनंद असे बोलले आहे.
मैत्रीण - ते देव होते. त्यांची व आपली बरोबरी कुठे?? भगवद्गीता वाचणे महत्त्वाचे आणि त्यातील जेवढे जमेल तेवढे आपण करावे.
भोळाभाबडा मी - मी वाचलेली. परंतु, मला त्यातील ज्ञानयोग नीट कळाला नाही. तु समजावशील का??
मैत्रीण - भगवद्गीता समजणे सोपी गोष्ट नाही. ती फक्त वाचली तरी आयुष्याचे सार्थक होऊन जाते. तू वाचलीस, म्हणजे तुझं कल्याण नक्कीच होईल.
भोळाभाबडा मी - (तिचे भगवद्गीतेबद्दलचे ज्ञान पाहून तो विषय तिथेच थांबवत) तुझ्या या मुस्लिम द्वेषामागे काही विशिष्ट कारण??
मैत्रीण - त्यांनी आपल्या धर्माला संपवायला घेतलंय.
भोळाभाबडा मी - काय बोलतेस!!!
मैत्रीण - त्यांची खेळी तुझ्यासारख्या लोकांना कळणार नाही. आपल्या धर्माला व देशाला त्यांना संपवायचंय.
भोळाभाबडा मी - सांगून ठेव मला. म्हणजे मी सावध राहीन. नक्की काय करतात ते लोक असं??
मैत्रीण - एक मुलगी आहे म्हणून मी सांगते; हे नीच लोकं आपल्या पोरींना बाटवतात.
भोळाभाबडा मी - समजलं नाही मला.
मैत्रीण - आपल्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यात फसवतात, त्यांच्या शरीराचा उपभोग घेतात आणि मग देतात सोडून.
भोळाभाबडा मी - ते लव जिहाद सारखं बोलतेय का तू??
मैत्रीण - नाही. त्यात लग्न करून पोरींचा धर्मच बदलून घेतात. पण अशी लग्न फारशी होत नाहीत. आपले लोक लग्न होऊ देत नाहीत. त्यामुळे, मग अशा प्रकारे वापरून सोडून देतात. मग अशा पोरीसोबत कोण लग्न करणार?? मुलीची बदनामी होते. काहींना तर वेश्यागृहात सुद्धा विकतात.
भोळाभाबडा मी - हिंदू धर्मात, शरीरापेक्षा आत्म्याच्या पावित्र्याला महत्त्व दिले आहे. जर हिंदू मुले या पीडित मुलींना स्वीकारत नसतील, तर यात दोष मुलींना फक्त उपभोग योग्य वस्तू माणणाऱ्या हिंदू मुलांचा सुद्धा नाही का??
मैत्रीण - म्हणजे त्यांनी काही केलं तरी चालेल, सहन आपणच करायचं??
भोळाभाबडा मी - यात सहन करण्याची कोणती गोष्ट आहे?? ही आपल्या शास्त्रांची शिकवणच आहे की, मानवाच्या उपयोगी पडणं, माणुसकी जपणं, हाच जीवनाचा खरा उद्देश आहे. एका राक्षसाने अपहरण केलेल्या स्त्रियांना अर्धांगिनी म्हणून श्रीकृष्णाने स्वीकारलेलं, अशी काहीतरी कथा वाचलेली मी.
मैत्रीण - (वैतागत) तू परत देवाचं आणि माणसाचं मिसळतोयस!! सामान्य माणसाच्या काही इच्छा आकांक्षा असतात, हे तुला समजत नाही का??
भोळाभाबडा मी - बरोबर आहे तुझं. धार्मिकता आपल्या जागी आणि स्वार्थ आपल्या जागी. परंतु, तु जे म्हणालीस की, त्यांना अगदी वेश्यागृहात सुद्धा विकलं जातं.. तू वकिली करतेयस, पोलिसांशी ओळख असेलच.. तू स्वतः त्या मुलींना सोडवण्याचा प्रयत्न का नाहीस करत??
मैत्रीण - कोणकोणत्या मुलींना कुठे कुठे शोधायचं?? तेवढंच काम आहे का मला?? त्यापेक्षा आजाराच्या मुळावरच घाव घालतेय.
भोळाभाबडा मी - वाह!!! असं काय करतेस तु??
मैत्रीण - शक्य असेल तेवढ्या मशिदी शासनाची मदत घेऊन जमीन दोस्त करण्याचा आमचा कार्यक्रम चालला आहे.
भोळाभाबडा मी - त्याने काय साध्य होईल??
मैत्रीण - या पोरांना, मुलींना फिरवण्यासाठी मशिदींमधून पैसा पुरवला जातो. त्यांनी काही काम नाही करायचं, फक्त एवढेच की मुलींना बाटवायचं.
भोळाभाबडा मी - या मशिदींकडे एवढा पैसा येतो कुठून??
मैत्रीण - दुसऱ्या देशांकडून पुरवला जातो. मुख्यत्वे पाकिस्तान!!
भोळाभाबडा मी - (मनात : ज्या देशाचे स्वतःचे खायचे वांदे आहेत, ते यांना पैसा पुरवणार!!) हे प्रकरण तर गंभीर आहे. आज केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. ते याबद्दल काही पावले का उचलत नाहीत?? केंद्रीय नेतृत्व तर एवढे प्रबळ आहे की या प्रकारच्या गोष्टी क्षणात थांबवू शकते.
मैत्रीण - त्यांना करायचे असते रे!! पण स्थानिक अधिकारी त्यांच्या धर्माचे असतात. मग या गोष्टी राहून जातात.
भोळाभाबडा मी - मी तर वाचलेलं की, शासकीय सेवांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण नगण्य आहे आणि केंद्रीय शासन याबाबतीत एवढे गंभीर आहे की, खरंच हे सर्व असं असतं, तर त्यांनी कठोर पावले उचलली असती.
मैत्रीण - (विषय हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेत) ते सर्व जाऊ दे. मी आणि माझी संघटना हे सर्व नीट करू. तू आमच्यापासून थोडा दूरच राहतोस. आम्हाला सारखं भेटत जा, म्हणजे या गोष्टी हळूहळू तुला नीट समजतील.
भोळाभाबडा मी - कित्येकदा तर भेटतो. आज सुद्धा भेट झाली नाही का आपली??
मैत्रीण - ही तर साधीसुधी भेट. मागच्या आठवड्यात विजय चा वाढदिवस झाला. सगळे जमलेले. तू नव्हता आलास.
भोळाभाबडा मी - हो. कारण वाढदिवस कोणाचाही असला तरी त्यासाठीच्या पार्टीचं तुमचं सर्वांचं ठरलेले ठिकाण म्हणजे 'मियॉंची बिर्याणी'!! मी राहिलो आपला शाकाहारी. मग उगाच तुम्हाला माझ्यामुळे त्रास कशाला??
मैत्रीण - अरे तू ती बिर्याणी खाल्लीस, तर कायमचा शाकाहार सोडून देशील. एकदा खाऊन बघ च.
भोळाभाबडा मी - हिंदू रितीरिवाज 'अहिंसा परमो धर्म:' सांगतात. बरेच हिंदू देव त्यामुळे शाकाहारी दाखवले आहेत. मला हे शास्त्र पटते व त्याचे फक्त मी अनुकरण करतो.
मैत्रीण - तू परत देवांना मधे घेऊन आलास.
भोळाभाबडा मी - हो. कारण बहुतेक हिंदू मानतात त्याप्रमाणे, हिंदू शास्त्र देवांना फक्त एक काल्पनिक शक्ती याप्रमाणे न मांडता, एक विचार म्हणून प्रस्तुत करते. तुम्ही देवाला मानणे याचा अर्थ तुम्ही त्याच्या सर्व विचारांचा व गुणांचा स्वीकार करणे. अगदी त्याच्या शाकाहाराचा सुद्धा. परंतु ठीक आहे, माणसाच्या या स्वार्थासोबत कदाचित देव सुद्धा ऍडजस्ट करायला शिकला असेल.
मैत्रीण - कुठला विषय कुठे घेऊन गेलास.. यात देवाधर्माचं काय होतं??
भोळाभाबडा मी - २-३ मिनिटांच्या अजान ने शांतता भंग पावत जसा तुझ्यातला द्वेषयुक्त धर्म जागा झाला, त्याचप्रमाणे मानवी आचरणाच्या बाबतीत व व्यवहाराच्या बाबतीत विचार करताना माझ्यातील प्रेमयुक्त व शांतता युक्त धर्म जागा होतो.
एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते..
मैत्रीण - कोणती रे??
भोळाभाबडा मी - मुसलमान युवकाशी प्रेमाचे संबंध ठेवले, तर मुली बाटतात. (आणि हे फक्त मुलींपुरतेच लागू आहे, मुलांसंबंधी असे काही नियम नाहीत) परंतु, तुम्ही सर्वांनी कितीही वेळा त्यांच्या हातचे खाल्ले तरी तुम्ही पवित्र राहता!!
मैत्रीण - तुला काही समजावणे म्हणजे कर्मकठीण गोष्ट आहे!!
मला आता निघायला हवे. उद्या २६ जानेवारी. सुट्टीचा दिवस. उद्या ये सर्वांसोबत भेटायला, आपण मिळून चर्चा करू.
भोळाभाबडा मी - उद्या जरांगे पाटील आपला मोर्चा घेऊन मुंबईमध्ये येत आहेत. याबाबतीत काय होतंय, याबद्दल मला कुतूहल आहे. माझे सर्व लक्ष तिकडे असेल. शक्य झालं तर मी प्रत्यक्ष जाऊन पाहीन सुद्धा.
मैत्रीण - हे राजकारण आहे रे सर्व. यांचा बोलवता धनी वेगळा आहे.
भोळाभाबडा मी - असेल. मला याबद्दल फारसे ज्ञान नाही. परंतु, एकेकाळी समृद्ध असा मराठा समाज आज आरक्षण मागतोय, तर नक्कीच काहीतरी चुकीचे झाले आहे. बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण हे मुख्य कारण.
मैत्रीण - कुठे आहे बेरोजगारी?? यांना फक्त मोठमोठी पदे पाहिजेत. काम करायला माणूस तयार असेल, तर प्रत्येकाला रोजगार मिळतो.
भोळाभाबडा मी - म्हणजे याचा अर्थ उच्च शिक्षण घेऊन झाडू मारायचा??
मैत्रीण - आधीच दलितांना आणि त्या इतर मागासलेल्यांना एवढे आरक्षण देऊन झाले आहे. या आरक्षणामुळेच आपला देश किती मागे पडला बघ. त्यात हे सुद्धा आरक्षण मागतायत. ही आरक्षण नावाची गोष्टच नको होती.
भोळाभाबडा मी - पटलं मला तुझं. स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासात, सर्व महत्त्वाची मंत्रिपदे, अधिकारवर्गाची पदे, विविध संस्था व समित्यांची मुख्य पदे, भारताच्या भविष्याचा निर्णय घेणारी अशी सर्व मुख्य पदे फक्त उच्चवर्णीयांनी भूषविली. हे आरक्षण जर नसते, तर आजची स्थिती वेगळी असती.
मैत्रीण - (अगदी जीवनाशी स्वतःचा वैताग सांभाळत) ते आंबेडकरनेच संविधानात लिहून ठेवलंय, ५०% पेक्षा जास्त आरक्षण द्यायचे नाही आणि मराठ्यांचे आरक्षण कोर्टाला मान्य नाही, मग आपले शासन करणार तरी काय?
भोळाभाबडा मी - हे संविधानात लिहिलेले नाही. ५०% पेक्षा जास्त आरक्षण होऊ नये असे बाबासाहेबांचे म्हणणे यासाठी होते की, यामुळे उच्चवर्णीयांचे प्रमाण कोणत्याही क्षेत्रात कमी होऊ नये. त्यांवर अन्याय होऊ नये. परंतु, आज जर उच्चवर्णीयच आरक्षण मागत आहेत; तर त्यात विशेष तरतूद करण्यासाठी संसदेला व न्यायालयाला हक्क देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये आरक्षण ६९% आहे.
मैत्रीण - ते ठीक आहे. पण मग इतर मागासवर्गीयांवर अन्याय व्हायला नको ना.
भोळाभाबडा मी - त्यांवर अन्याय करण्याची गरजच नाही. आरक्षणाची मर्यादा वाढवत मराठ्यांच्या लोकसंख्येनुसार विशेष ३०% आरक्षण मराठ्यांना देण्यात आले तर त्यांची मागणी पूर्ण होणे सहज शक्य आहे.
मैत्रीण - म्हणजे आरक्षण ८०% वर पोहोचवायचे!!!
भोळाभाबडा मी - जसे मी मघाशी म्हणालो की, उच्च पदांवरील १००% आरक्षण देशाने ७५ वर्षे सहन केले. त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जर सर्वांना आरक्षण मिळाले, तर कोणालाही पोटात दुखण्याचे कारण नाही.
मैत्रीण - (हा विषय सुद्धा जमत नाहीये हे पाहून) काही नाही रे, एवढे भव्य राम मंदिर बांधले. हे पाहून ख्रिश्चन, मुस्लिम, बुद्ध, जैन, शीख हे इतर धर्मीय जळतात आणि या सर्वांचा छुपा पाठिंबा मुद्दाम या आंदोलनाला आहे. फक्त दिशाभूल करायची. देशात रामराज्य आले आहे आणि यांचं हे असं!!
भोळाभाबडा मी - रामाच्या मूर्तीमध्ये बुद्धाला सुद्धा कोरले आहे; मग तो इतर धर्मीय झाला का??
मैत्रीण - (बुद्धाला विष्णूचा अवतार ठरवल्याबद्दल मनातल्या मनात आपल्या पूर्वजांना शिव्या घालत) बुद्ध आपलाच आहे. पण हे बौद्ध धर्मीय हिंदूंना आपले मानत नाहीत ना. हिंदूंना व हिंदू धर्माला घालून-पाडून बोलत असतात. कसं सहन करायचं त्यांना सांग. त्यांचा हा भेदभाव तुला तरी पटतो का??
भोळाभाबडा मी - नाही पटत मला. भेदभाव करणं अतिशय चुकीचं आहे. ही जातीव्यवस्थाच नष्ट व्हायला हवी. सर्व भेदभाव संपेल.
मैत्रीण - मला जरा एके ठिकाणी जायचे आहे. उशीर होतोय. पुन्हा कधी भेटून आपण बोलू यावर सविस्तर.
भोळाभाबडा मी - नक्कीच. मला 'सविस्तर' तुझ्याकडून ज्ञान घ्यायला आवडेल.
- अमित
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा