मंदिर, संस्कृती आणि महाराष्ट्र


 

      अनेक भारतीयांसाठी हा आठवडा जल्लोषाचा व उत्साहाचा असणार आहे. २२ जानेवारीला राम मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित आहे. अपेक्षा आहे की पुढील दोन वर्षात मंदिराचे सर्वच काम पूर्ण होईल व रामाचे एक भव्य मंदिर भारतीयांसाठी उपलब्ध असेल. या मंदिराबाबत अनेक वाद उपस्थित केले गेले होते व केले जात आहेत आणि ते तेवढ्यापुरते राहत आहेत. काही गोष्टींना नीट विचार करून अभ्यासले जाणे गरजेचे आहे.


१) मंदिर - 

      प्राचीन कालखंडापासून मंदिरातील पूजा ही भारतीयांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. अनेक देवीदेवतांची मंदिरे या दोन हजार वर्षांत आपण उभारली. आपणास हा प्रश्न कधी पडत नाही का, की दक्षिण भारतात प्राचीन काळातील एवढी भव्य व मोठी मंदिरे आजही पाहायला मिळतात; परंतु, उत्तर भारतात मात्र असे एकही मंदिर पाहायला मिळत नाही. असं का??


काहीजण याचे एक सोपे उत्तर देतील, की उत्तर भारतातील मंदिरे मुस्लिम आक्रमकांनी पाडलीत. परंतु, दक्षिण भारतातील मंदिरे नाही पाडण्यात आली. कुतुबशहा, निजाम, टिपू सुलतान, इत्यादी अनेक मुस्लिम राजे दक्षिण भारतात होऊन गेले. टिपू सुलतानला तर हिंदू विरोधक म्हणून उभे केले जाते. मग या मुस्लिम सुलतानांनी हिंदू मंदिरे का बरे पाडली नाहीत??


याचे उत्तर इतिहासकार डॉ राम पुनियानी यांच्याकडून मला मिळाले.


डॉ राम पुनियानी : 

मोहम्मद गजनी पश्चिम आशियामधून बामियानमार्गे सोमनाथ मंदिर तोडण्यासाठी गुजरातमध्ये आला. बामियान या ठिकाणी बुद्धाची भव्य मूर्ती होती, जी आता काही वर्षांपूर्वी तालिबानी आतंकवाद्यांनी पाडली. मात्र त्यावेळी, ती त्याने नाही तोडली. बामियानवरून राजस्थानमार्गे तो गुजरातेत पोहोचला. या दोन हजार किलोमीटरच्या वाटेत शेकडो हिंदू मंदिरे असतील, ती त्याने नाही तोडली. 

इकडे येताना मुलतानचा शासक अब्दुल फत दाऊद याने गजनीचा मार्ग रोखला. गजनीने त्यावर हल्ला केला, तसे हा घाबरून तेथील एका मस्जिद मध्ये जाऊन लपला. गजनी ने ही मस्जिद तोडली व त्याला मारले.

गजनीच्या सेनेमध्ये १२ सेनापतींपैकी ५ सेनापती हिंदू होते.

बुद्धाची मूर्ती न पाडणारा, हिंदू मंदिरे न पाडणारा व वेळे येताच मस्जिद पाडणारा हा गजनी; सोमनाथ मंदिर पाडण्यात रस का दाखवत होता??

कारण प्रश्न धर्माचा नव्हता. सोमनाथ मंदिरात तेथील शासकांनी अपार संपत्ती जमा करून ठेवली होती. या संपत्तीच्या लुटीचे कारण, या मंदिराच्या विध्वंसाचे कारण ठरले.

अनेक हिंदू शासकांनी सुद्धा हिंदू मंदिरांची लूट केल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मुस्लिम शासकांनी जी लूट केली, ती उत्तर भारतातील हिंदूंच्या मदतीनेच. दक्षिण भारतात मात्र स्थानिक हिंदूंचा तो सहभाग कदाचित या शासकांना मिळाला नसावा. 


अयोध्येत राम मंदिर होते किंवा नाही?

बाबरने ते पाडले का?

या प्रश्नांना रंगवत धार्मिक विलगता तयार करण्यापेक्षा, हिंदूंनी आपला इतिहास नीट जाणून घेणे महत्त्वाचे. या प्रकारचे प्रश्न पडणे, त्यांची उत्तरे शोधणे व मिळालेली उत्तरे मान्य करणे महत्त्वाचे.



२) संस्कृती -

               इस्त्राईलच्या जेरोस्लेम या ठिकाणी ज्यू, इस्लाम व ख्रिश्चन या एकेश्वरवादी धर्मांची निर्मिती झाली. एकेश्वरवाद म्हणजे जगात एकच देव आहे, असे मानणारी विचारधारा. हिंदू संस्कृतीमध्ये मात्र अनेक देवांना स्थान देण्यात आले. जातीनुसार व भौगोलिक स्थाननुसार लोकांचे देव बदलत होते. 


भारतात सुफी पंथीय इस्लाम धर्माला घेऊन आलेत. त्यांनी भारतीयांना एकेश्वरवाद शिकवला. सर्वशक्तिशाली एकाच देवाची कल्पना भारतीयांच्या मनात रुजवली. त्यामुळे हिंदू धर्मात इतर देवांचे स्थान गौण होऊन; ब्रम्हा, विष्णू व महेश या तिघांना प्रभावी ठरविणारे साहित्य लिहिण्यात आले. क्षत्रियांशी लढता - लढता परशुराम स्वतः क्षत्रिय झाला होता; असेच काहीसे भारतीयांसोबत झाले. मुस्लिम धर्माचा द्वेष करता- करता त्या धर्माची अनेक तत्वे भारती हिंदूंनी कधी स्वीकारली, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.


हिंदू धर्मात यज्ञास महत्त्व होते. आपण देवाला काहीतरी अर्पण केल्याशिवाय, त्याकडून काही मिळणार नाही ही पक्की धारणा होती.

मात्र इस्लाम धर्मानुसार फक्त अल्लाचे नाव घेतले तरी तो आपल्याला हवी ती मदत करतो, ही शिकवण हिंदू धर्मियांमध्ये रूजू झाली व यज्ञ पद्धत पूर्णपणे बंद होऊन देवाचे नामस्मरण सुरू झाले.

इस्लामच्या प्रभावामुळे स्त्रियांवर अनेक नवीन बंधने लादण्यात आली.

प्राचीन भारतात समलैंगिक संबंधांना फारसा विरोध नव्हता. मात्र इस्लामच्या प्रभावाने ही गोष्ट पाप समजली जावू लागली.

ज्याप्रमाणे सुफी पंथीय देवाचे किंवा प्रेषिताचे कौतुक करणारी गाणी लिहितात; त्याप्रमाणे देवाचे कौतुक करणारी गाणी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्ये सुद्धा लिहिली जाऊ लागली.

एकेश्वरवादाचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या मनात रुजला की, आता फक्त प्रभु रामच सर्वांचे पूज्य देव झाले आहेत.

भगवान शंकर कधी कधी तुल्यबळ ठरतात. मात्र या दोघांसमोर इतर देव पूर्णपणे अप्रभावी ठरत आहेत.



३) महाराष्ट्र -

         ‌ मराठी माणसाचे कसे आहे ना; ढोरांसारखे ज्या दिशेने हाकलले जाईल तिकडे तो गप गुमान चालला जातो. आपण नेमके कोणाचे गुलाम होत आहोत, याचा फारसा विचार तो करत नाही.

त्याला प्रश्न पडत नाहीत -


लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर गणपती व त्या आधीपासूनच विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राहिले आहेत. या क्षेत्रात रामाला फारशी जागा नव्हती. आज आपण अतिशय आनंदाने जय श्रीराम बोलू. मात्र, तेच उत्तर भारतीयांना हरी ओम विठ्ठल म्हणायला लावले; तर ते आधी विठ्ठलाची जात विचारतील. दक्षिण भारतीय तर मुळीच रस दाखवणार नाहीत. आपण मात्र तिरुपतीच्या वाऱ्या करून ते देवस्थान अजून कसे श्रीमंत होईल हे पाहू. विठ्ठल उपेक्षित होता व राहील.

अयोध्येसारखी किंवा तिरुपती सारखी प्रसिद्धी पंढरपुरासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानाला नको का मिळायला??

मराठी माणसाला स्वतःच्या गोष्टींची कदर नसल्यामुळे हे घडते.


रामावर किंवा शंकरावर अनेक हिंदी गीते लिहिली जातात. काही सिनेमांद्वारे किंवा काही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. आपण आपल्या प्रत्येक समारंभात ती आनंदाने वाजवतो. आपण लिहिलेली देवाची मराठी गीते, त्यांच्या समारंभात किती प्रमाणात वाजतात??

दक्षिण भारतात लोक राम व शंकराला मानतात. तरीही ते लोक ही हिंदी गीते का नाही वाजवत??

पाहायला गेले तर त्यांना त्यांच्या अय्यप्पा किंवा तिरुपती पेक्षा राम व शंकर महत्त्वाचे नाहीतच. त्याचप्रमाणे स्वतःच्या भाषेपेक्षा ही हिंदी भाषा महत्त्वाची वाटत नाही. 

हिंदी भाषिक पट्ट्याने महाराष्ट्राला मात्र स्वतःच्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळेच आपल्या संत तुकारामांबद्दल अभद्र बोलणारा बाघेश्वर, आता महाराष्ट्राच्या घराघरात पूजनीय ठरत आहे.


पूर्वी छठ पुजा किंवा त्यासारखे इतर प्रकार फक्त उत्तर भारतीयांकडून महाराष्ट्रात केले जायचे. आता मराठी स्त्रिया सुद्धा उत्तर भारतीयांच्या अनेक पद्धतींचे अनुकरण करत आहेत. दाजी हा शब्द जाऊन, जीजू हा शब्द एवढा सामान्य ठरतोय की मराठी माणसे सर्रास याच शब्दाचा वापर करत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण डोळसपणे पाहिल्या तर मराठी संस्कृतीच्या अध:पतनाचे आपण वारसदार कसे ठरत आहोत, हे आपल्यास सांगतील.


मंदिर तर तयार झाले. परंतु, विचार करण्यास प्रवृत्त करतील अशा अनेक गोष्टी त्यामुळे समोर आल्या आहेत. जर यावर आता विचार करण्यात नाही आला, तर अनेक दृष्टीने महाराष्ट्राचे व भारताचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित.


- अमित 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट