याला तुम्ही जगणं म्हणता???



युट्युबर सांगेल तसं जेवण बनवता..

फेसबुक सांगेल त्याला मित्र बनवता..

इंस्टाग्रामच्या तालावर नाचता..

स्नॅपचॅट रंगवेल तसं थोबाड रंगवता..

व्हाट्स ॲप जे पण सांगेल त्याला खरं मानता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



स्वस्तातला उसाचा रस सोडून महागडे प्रोटीन शेक घेता..

भाजीवाली सोबत पाच रुपयासाठी भांडून, हॉटेलमध्ये मात्र बिल सोबत टिप सुद्धा देता..

घरचा घट्ट दुधाचा चहा सोडून, अर्धा कप फक्त बर्फाने भरलेली कोल्ड कॉफी पसंत करता..

दुकानदाराने दिलेल्या मालावर संशय..परंतु, ॲमेझॉन वरून आलेलं डोळे मिटून स्वीकारता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



घरच्यांचे मत ऐकून कपडे.. 

मित्रांचे मत ऐकून मोबाईल..

नातेवाईकांचे मत ऐकून साथीदार..

आणि मग साथीदाराचे मत ऐकून नातेवाईक ठरवता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



शेजारचे घेतील तसे फर्निचर घेता..

मित्र जे घेतील तसे वाहन घेता..

दहा जण झोपतील एवढी लॉबी आणि दोन जणांना झोपण्यापुरता फ्लॅट, अशा ठिकाणाला घर करता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



स्वतःचं करिअर बॉसच्या हातात..

स्वतःचा स्वाभिमान पैशाच्या हातात..

स्वतःचा संयम इतरांच्या हातात..

अगदी स्वतःचं आयुष्य सुद्धा बाबा - बुवांच्या हातात देऊन बसता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



इतरांच्या नजरेत स्वतःच दिसणं शोधता..

इतरांच्या शब्दात स्वतःचं असणं शोधता..

इतरांच्या कौतुकात स्वतःची कामगिरी शोधता..

इतरांच्या निर्णयात स्वतःचे महत्त्व शोधता..

इतकच काय तर इतरांच्या जगण्यात स्वतःच जगणं शोधता..

आणि याला तुम्ही जगणं म्हणता..



जगणं तेच जे मनाला भावेल..

जगणं तेच ज्यात स्वातंत्र्य मावेल..

जगणं तेच ज्यात स्वतःबद्दल आदर दुणावेल..

जगणं तेच ज्यात आनंदाचा आसमंत सामावेल..

जगणं तेच ज्यात प्रत्येक क्षण एक मधुर गीत सुनावेल..

बेफाम, बेखौफ, बेधडक, फक्त आणि फक्त स्वतःच्याच अटींवर तुम्ही नेमकं किती वेळ जगता..??

.

.

आणि याला तुम्ही जगणं म्हणता...

टिप्पण्या

  1. Manushyala jagnyachi visar padli ahe..... Hi kavita he satya samor the UN.. Manala tochun jate

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. जर यातील आशय समजून मनुष्याने आपल्या वागण्यात थोडा जरी बदल केला, तरी तो त्याच्या दुःखांना दूर सारेल..

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट