नशीबवान याला म्हणतात..

 


एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे, आपले भाग्य ठरवत असते. त्यातही ती योग्य व्यक्ती आपला गुरु, आपला शिष्य अथवा आपला साथीदार असेल तर आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. 


डॉक्टर विक्रम साराभाई हा माणूस काहीतरी वेगळेच नशीब घेऊन आला होता. एक अप्रतिम गुरु, अप्रतिम शिष्य व अतिशय अप्रतिम साथीदार मिळवत या माणसाने आयुष्याचे सोने केले.


गुरू -


विक्रम साराभाई यांना अवकाश संशोधनात विशेष रस होता. त्यासाठी त्यांना आपले पदव्युत्तर शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून करायचे होते. त्यांची विद्वत्ता व त्यांच्या श्रीमंत वडिलांची ओळख, यामुळे त्यांना येथे प्रवेश सहज मिळाला. परंतु, मार्गदर्शन नेमके कोणाचे घ्यायचे?


त्यावेळी नोबेल विजेते डॉ. सी. व्ही. रमण हे तेथील प्राचार्य होते. त्यांचा पूर्ण वेळ साराभाईंना मिळणं शक्य नव्हतं. पहिल्याच दिवशी साराभाईंशी बोलता-बोलता रमण यांनी एका शिक्षकाशी त्यांची ओळख करून दिली.

तो शिक्षक होता - महान वैज्ञानिक डॉक्टर होमी भाभा.


नेहमीप्रमाणे डॉक्टर भाभा, रमणना प्रयोग करण्यासाठी साहित्य कमी पडतेय याची तक्रार करत होते. त्यांना अंतराळ किरणांचा अभ्यास करण्यासाठी आकाशात किमान ५० किलोमीटर उंच जाईल असा फुगा तयार करायचा होता. त्यासाठी विशिष्ट घनता असणाऱ्या रबरची आवश्यकता होती. 

रमण म्हणाले की,"दुसरे महायुद्ध सुरू असल्याने जपान कडून हे रबर मिळणे आता शक्य नाही. युद्ध संपेपर्यंत थांब."

भाभा या विधानावर नाराज झाले.


तिथे उपस्थित असलेल्या साराभाई यांनी भाभांना रबर ऐवजी पॉलिथिलिन पदार्थ वापरण्याचा पर्याय दिला. तिची घनता कमी असल्याने असा फुगा जास्त उंच जाईल असे सांगितले. भाभांनी हा पर्याय ऐकला.

भाभा म्हणाले, "एवढ्या उंच आकाशात तापमान -७०° असेल. त्या वातावरणाला सहन करण्याची क्षमता पॉलिथिलिन मध्ये नसेल व असा फुगा नक्कीच फुटून जाईल कारण पॉलिथिलीनची घनता कमी आहे. त्यामुळे मला रबर हवा आहे."


साराभाईंना त्यांची चूक कळली व असा पर्याय देण्याबद्दल त्यांनी माफी मागितली. 

मात्र होमी भाभा म्हणाले," तुला माफी मागण्याची गरज नाही. महत्वाचे हे नाही की, तू योग्य अथवा अयोग्य पर्याय दिलास. महत्त्वाचे हे की, तू पर्याय शोधण्याचा प्रयत्न केलास. ही वृत्ती कायम ठेव."

या एका भेटीने साराभाईंचे जीवन बदलले.

त्यांना त्यांच्या आयुष्यातील गुरु भेटला होता.




शिष्य -


आता साराभाईंचे नाव एक नामवंत वैज्ञानिक म्हणून भारतभर पसरले होते. अनेकांना त्यांच्याकडून शिकण्याची संधी हवी असायची.

त्यातीलच एक नाव म्हणजे - अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम.


कलमांना रॉकेट व अंतराळ यामध्ये फार रस होता. यामध्येच त्यांना संशोधन करायचे होते. साराभाईंनी त्यांच्या घराजवळ अहमदाबाद येथे अंतराळावर संशोधन सुरू केले होते. हे माहीत पडल्यावर कलामांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत संशोधन करण्यात रस दाखवला.


अचानक एक काम आल्याने साराभाईंनी त्यांना थोडा वेळ ऑफिसमध्ये  थांबण्यास सांगून ते निघून गेले. त्यांचे सर्व संशोधन पाहता-पाहता कलाम यांना हे कळले की, रॉकेट संबंधीचे प्रयोग साराभाईंनी बंद केले आहेत. हे माहित पडल्यावर साराभाईंची वाट न पाहता कलाम ऑफिस मधून खाली निघून आले व नेमके कोणत्या संशोधन संस्थेत जायचे याचा विचार करू लागले.


साराभाई आपले काम आटोपून परत येत असताना त्यांना कलाम दिसले. त्यांनी, तू ऑफिस मधून का निघून आलास हे विचारले. 

कलम म्हणाले," मला फक्त आणि फक्त रॉकेट संशोधनाचे कार्य करायचे आहे. तुम्ही ते करताय हे समजल्यावर मी इथे आलो. परंतु, येथे कळले की तुम्ही ते संशोधन बंद केले आहे. काही हरकत नाही, मी माझ्या पोर्टफोलिओवर तुम्ही मला स्वीकारले नाही असे नमूद करेन. परंतु संशोधन करेन तर रॉकेटचेच."


ही जबरदस्त महत्वाकांक्षा पाहून साराभाईंना कळले की, हा व्यक्ती खूप पुढे जाणार. त्यांनी खास त्यांच्या या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आपले रॉकेट संशोधन सुरू केले व त्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवल्या.

पुढे कलाम भारताचे - 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले गेले.



साथीदार -


संशोधन करता-करता, घरचा सूतगिरणीचा कारभार सुद्धा साराभाई सांभाळत असत. त्यासाठी त्यांना दक्षिण भारतात अनेक वेळा जावे लागे. कलेची जाण असल्याने त्यांनी अनेकदा शास्त्रीय नृत्याचे प्रयोग तेथे पाहिले. तेथेच त्यांचे शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी यांच्याशी प्रेम संबंध जुळले व लवकरच त्यांनी लग्न केले.


लग्नानंतर अहमदाबादला राहायला आल्यावर मृणालिनी यांनी 'दर्पण नृत्य अकॅडमी' सुरू केली. या अकॅडमी मधून त्यांनी अनेक जगविख्यात नृत्यांगण घडवलेत. तसेच, भारताचे नृत्य जगभर पोहोचवले. शास्त्रीय नृत्यातील या कामगिरीबद्दल त्यांना भारत शासनाकडून पद्मभूषण पुरस्कार दिला गेला.


लग्न होऊन अनेक वर्ष झाली होती. साराभाईंची मुले लहान होती. तेव्हा मृणालिनीची एक मैत्रीण - कमला चौधरी हिच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या नवऱ्याचा कोणीतरी खुन केला. कमला जवळची मैत्रीण असल्याने मृणालिनीने तिला आपल्या घरी बोलावले व तिथेच राहण्यास सांगितले. यावेळी साराभाई कापड संशोधन केंद्र उभारत होते.


कमला सुद्धा उच्चशिक्षित असल्याने, तिला या संशोधन केंद्राचा भाग करावे जेणेकरून तिचे दुःख दूर होण्यास लवकर मदत होईल; असे मृणालीनीने साराभाईंना सुचवले. साराभाई यांनी तिची मुलाखत घेता, त्यांनाही कळले की या स्त्रीमध्ये खूप विद्वत्ता आहे. काम सुरू झाले.

दिवसेंदिवस आपल्या उत्कृष्ट कार्याने कमला साराभाईंना मोहित करत होती. साराभाईंचे व्यक्तिमत्व सुद्धा कोणालाही भुरळ पाडेल असेच होते. मृणालिनी त्यांच्या नृत्य प्रयोगांसाठी बराच काळ युरोपमध्ये असायच्या. या अवधीत कमला व साराभाई यांमध्ये जवळीक वाढली व प्रेम निर्माण झाले.


प्रेम तर होते; मात्र आपण आपल्या मैत्रिणीचा याप्रकारे विश्वासघात करू शकत नाही, ही जाणीव सुद्धा कमलामध्ये होती. त्यामुळे तिने संशोधन केंद्र सोडण्याचे ठरवले. 

भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, यावेळी IIM अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्यास प्रयत्नशील होते. साराभाईंच्या प्रयत्नांनी यातील पहिले केंद्र अहमदाबादला स्थापन करण्याचे ठरले व त्यांच्या शिफारसीने कमला यांना या केंद्रात शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. साराभाईंना त्यांची ही उत्कृष्ट मैत्रीण कधीही दूर व्हावी असे वाटत नव्हते.


परंतु, कमला तिथे सुद्धा थांबण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्या लवकरच नावाजल्या गेल्या. साराभाईंपासून त्या दूर तर झाल्या होत्या, तरीही एकाच शहरात राहणे अवघड ठरू शकते. यामुळे त्यांनी ती नोकरी सुद्धा सोडण्याचा निर्णय घेतला. 


मृणालिनी यांना या सर्व प्रकरणाची जाणीव होती. भांडून, आदळाआपट करून परिस्थिती बदलणार नाही हे माहीत होते. त्यामुळे त्यांनी अलिप्तता स्वीकारली होती. कमला यांचा शिक्षिकेची नोकरी सोडण्याचा निर्णय ऐकताच, त्या त्यांना भेटायला गेल्या. 

त्या कमलांना म्हणाल्या," आपण मनुष्य आहोत. भावनांवर नियंत्रण राहणे, आपल्या हातात नसते. जय घडायचे ते घडणारच. परंतु, आपल्या हातून काही उत्कृष्ट होत असेल; तर जगाला त्यापासून वंचित करणे कधीही योग्य ठरणार नाही. तू एक उत्कृष्ट शिक्षिका आहेस. तुझ्या ज्ञानापासून तुझ्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नकोस."


माफ करणे हे मोठे धैर्याचे काम आहे, असे गांधीजी म्हणाले होते. परंतु, याप्रकारे आपल्या साथीदाराला व आपल्या मैत्रिणीला समजून घेत, सांभाळून घेत, त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्य होत राहील याची काळजी घेणे..  हे एका अप्रतिम साथीदारालाच जमू शकते.


याप्रकारे.. एक अप्रतिम शिक्षक, शिष्य व साथीदार मिळवत साराभाई अत्यंत नशीबवान ठरले.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट